राधेय – भाग ३३

🚩 *राधेय/३३* 🚩

सकाळपासून कर्णाचे मन रात्रीच्या प्रसंगातच गुरफटले होते. दुसऱ्या कशात लागत नव्हते. सूर्योपासनेची वेळ नजीक येताच कर्णाने रथ सज्ज करण्याची आज्ञा केली. कर्ण दर्पणासमोर उभा असता मागे आलेल्या वृषालीकडे त्याचे लक्ष गेले. वृषालीने विचारले, ‘काय पाहता?’

‘रूप!’

‘मग त्यात नवीन काय आहे!’

‘वृषाली, आपलं रूप नित्य पाहत असूनही आपल्याला रूपाचा कंटाळा येत नाही. ते रूप अधिक मोहवीत जातं. उद्या हरवलेलं रूप पाहण्याचं बळ लाभेल ना?’

‘काय हरवलं?’

‘काय हरवत नाही? प्रत्येक दिवसाबरोबर वार्धक्य नजीक येत असतं, सूक्ष्मतेनं बळ हरवत असतं. शरीराबरोबर मनाचं बळ सरत असतं. पण दर्पणामध्ये दिसतं, ते तेच मोहक रूप! या मानवी रूपाचा जर एवढा मोह वाटतो, तर रूपाचं दैवत समजलं जाणाऱ्या त्या इंद्राचं रूप कसं असेल?’

‘आपलं मन आज ठिकाणावर दिसत नाही.’

‘का?’ कर्णाने वळून विचारले.

‘सकाळपासून आपलं लक्ष कशातच नाही. त्यात असलं बोलणं. प्रत्येक सरकणाऱ्या पळाकडं आपलं लक्ष गुंतलं आहे. नित्याच्या सूर्यपूजेला अद्याप अवधी असतानाच रथ सज्ज करण्याची आज्ञा दिलीत. आज पूजेसाठी मन अधीर झालेलं दिसतंय.’

‘खरं आहे.’ कर्ण स्मितवदनाने म्हणाला, ‘वसू या पूजेसारखा भाग्यशाली क्षण नाही. देवदर्शनाची संधी कोण सोडील?’

‘देवदर्शन?’

स्वत:ला सावरीत कर्ण म्हणाला, ‘हो ना! नदीपात्रात उभं राहून मी सूर्यस्तुती करीत असतो, उभ्या सूर्यकिरणांचं स्नान घडत असतं, तेव्हा त्या तेजानं आपणच भारले जात आहो, असा भास होतो. ज्ञात-अज्ञातांचा वस्त्र पडून चैतन्यरूपाचा साक्षात्कार म्हणजेच परमेश्वरदर्शन नाही का? त्या क्षणासाठी जीव उतावीळ झाला, तर नवल कसलं?’

वृषालीचा निरोप घेऊन कर्ण सूर्योपासनेसाठी महालाबाहेर पडला. प्रासादासमाेर रथ सज्ज होता. कर्ण रथारूढ़ होताच सारथ्याने रथ हाकारला.

रथ नेहमीप्रमाणे नदीकाठापासून दूर, दाट वृक्षराईत थांबला. सारथी व रथ तेथेच थांबवून कर्ण एकटा नदीच्या दिशेने जाऊ लागला.

तळपत्या उन्हात नदीच्या दोन्ही बाजूंना रुंद वाळूकिनारे मोकळे होते. त्या किनाऱ्यांमधून वाहणारा निळाशार जलप्रवाह डोळे सुखावत होता. कुठेच मानवी जाग लागत नव्हती. नदीकडे जात असता वाळूत रुतणाऱ्या पावलांचा आवाज उठत होता. कर्णा नदीपात्राजवळ आला. त्याने आपले उत्तरीय नदीकाठावर ठेवले. आपली पादत्राणे काढून वाळूवरून चालू लागला. तप्त वाळूचा पोळणारा स्पर्श त्याच्या तळव्यांना होत होता. नदीच्या पाण्यात प्रवेश करताच त्या तापल्या पावलांना थंडावा लाभला. त्या उथळ प्रवाहातून कर्ण तसाच चालून गेला. पाणी वाढत होते. कर्णाने त्या नदीप्रवाहावर आपले अंग झोकून दिले. कर्णाचे हात जलद गतीने पाण्यावर फिरत होते. थोडे पोहून गेल्यावर तो माघारी वळला. नदीकाठावरच्या जलात तो उभा राहिला. कपाळावर आलेले ओले केस मागे परतवून, तो किनाऱ्याकडे पाठ करून उभा राहिला. जलबिंदूंनी व्यापलेला त्याचा चेहरा सुवर्णकिरणांनी उजळला. कर्णाने सूर्यवंदन केले आणि दोन्ही बाहू उंचावून सूर्योपासना चालू झाली. कर्ण एकाग्र मनाने सूर्यचिंतन करीत होता.

अपराह्न काळी कर्णाची सूर्यपूजा संपली. उन्हाने केस कोरडे झाले होते. कर्णाने वाकून नदीचे पाणी हाती घेतले. ती ओंजळ उंचावीत असता त्याच्या मनाची अधीरता वाढत होती. त्याने हाक दिली, ‘कुणी याचक आहे?’

त्या हाकेला उत्तर आले नाही.

त्या शांततेने मन विचलित झाले. त्याने परत हाक दिली. ‘कुणी याचक आहे?’

‘आहे!’ मागून आवाज आला.

‘याचका, तुझ स्वागत असो! तुला काय हवं?’

‘दान!’

‘कसलं? माझं पौरुष आणि धर्म यांना सुरक्षित ठेवून काहीही मागा. आपलं इच्छित पुरं केलं जाईल. मी या सूर्यदेवाला साक्ष ठेवून आपलं मनोवांछित पूर्ण करण्यास बद्ध होत आहे त्या दानानं आपली मनोकामना पुरी होवो.’

कर्णाने ऑजळीतले जल नदीपात्रात सोडले आणि तो इंद्रदर्शनासाठी वळला.

इंद्राला वंदन करण्यासाठी जोडले जाणारे हात अडखळले. नदीतीरावर एक ब्राह्मण याचक म्हणून उभा होता. त्याची कृश शरीरयष्टी, त्याने परिधान केलेली जीर्ण वस्त्रे त्याच्या दारिद्र्याची ओळख करून देत होती.

कर्ण ते रूप पाहून अचंबला. त्याने आजूबाजूला पाहिले. दुसरे कोणी दिसत नव्हते.

‘अंगराजाचा विजय असो!’

कर्णाने त्याला निरखून पाहिले, आपले हात जोडले व त्याला विचारले, ‘हे विप्रा! सुवर्णालंकारांनी युक्त अशा तरुण रूपवान स्त्रिया किंवा गोधनानं समृद्ध असलेली गावं यांपैकी मी तुला काय देऊ?’

विप्र हसला. ‘अंगराज, आपण दान दिलं आहे. फक्त त्या दानाचा निर्देश करणं अन् ते आपल्या हातून घेणं एवढंच राहिलंय्.’

‘निर्भय मनानं मनोवांछित सांगा. ते अवश्य मिळेल. कर्णाच्या दातृत्वाबद्दल कुठलीहि शंका बाळगू नका.’

कर्णाची दृष्टी त्या विप्राला न्याहळीत होती. कर्णाची शोधक दृष्टी टाळीत तो विप्र म्हणाला, ‘अंगराज, सारीच दानं आनंददायक नसतात. काही भारी क्लेशकारक असतात.’

‘अशा दानानं तुम्ही तृप्त व्हाल ना? मग आपण माझ्या यातनांची चिंता करू नका. आपणांसाठी त्या यातना मी आनंदानं सहन करीन.’

कर्णाच्या त्या निर्भय रूपदर्शनाने तो विप्र संकोचला. दानाचा उच्चार करण्याचे बळ त्याला राहिले नाही.

विप्राची ती अवस्था पाहून कर्ण मनातून आनंदला. विप्राचे बोल ऐकण्यास तो अधीर झाला असता त्याच्या कानांवर शब्द आले, ‘अंगराज! मला… मला तुमची कवचकुंडलं हवीत…’

‘दिली!’ कर्णाने सुटकेचा नि:श्वास सोडला.

विप्राच्या मुखावर स्मित उमटले; पण ते फार काळ टिकले नाही.

कर्णाच्या चेहऱ्यांवरचे हास्य विरले होते. नेत्रकडांवर अश्रु गोळा झाले होते. ते अश्रु पाहून विप्राने विचारले, ‘महाराज, दानार्च दु:ख होतं?’

कर्णाने अश्र् पुसले. खिन्नपणे हसत तो म्हणाला, ‘कर्णाला दानाचं दुःख नाही; पण याचनेची क्षुद्रता आज जाणवली. याचनेसारखं दारिद्र्य या जगात दुसरं नाही, याचं प्रत्यंतर आज आलं. नाहीतर ऐश्वर्य आणि अधिकार यांनी संपत्र देवेंद्राला याचना करताना दरिद्री ब्राह्मणाचं रूप का घ्यावं लागलं असतं?’

तो विप्र ओशाळला. त्याने विचारले, ‘आपण मला ओळखलंत?’

‘आपण माझ्याकडं कवचकुंडल मागण्यासाठी येणार आहात, हे मला आधीच समजलं होतं. आपल्या दर्शनासाठी मी आतुर झालो होतो. त्यासाठी मी अधीर आहे.’

‘तुला कुणी सांगितलं?’

‘जसा अर्जुन आपला भक्त, तसा मी सूर्याचा.’

विप्रवेशातील इंद्राच्या मुखावर हास्य प्रगटले. कर्णाचे लक्ष इंद्राच्या पावलांकडे लागले होते.

त्या काष्ठवत पावलांचे रूप बदलले. विप्राने नेसलेल्या अंतरीयाचे पीतांबरात रूपांतर झाले.

कर्णाची दृष्टी उंचावत होती.

हिरण्यवर्णीय दीर्घबाहू इंद्राचे वज्रधारी रूप पाहून कर्ण तृप्त झाला. कर्णावर छाया पसरली. गार वाऱ्यांचा झोत अखंड वाहू लागला. कर्णाने वर पाहिले. आकाशात एक कृष्णमेघ त्या दोघांवर सावली धरून उभा होता. अत्यंत आदरयुक्त भावाने कर्णाने इंद्राला वंदन केले.

‘कल्याण असो! राधेया, कवचकुंडलं देणार ना?’

कर्णाने आपल्या कवचाकडे पाहिले. कर्ण अद्यापि पाण्यात उभा होता. तो पाण्यातून बाहेर आला. किनाऱ्यावर उत्तरीय होते. रथ, सारथी, शस्त्र सारे दूर वृक्षराईत होते.

कर्णाची अडचण इंद्राच्या ध्यानी आली. इंद्राने आपला उजवा हात पुढे केला. त्या हातावर एक धारदार शस्त्र होते.

कर्णाने ते हाती घेतले. कर्ण त्या शस्त्राकडे पाहत होता. ‘कर्णा, विचार कसला?’

कर्णाने इंद्राकडे पाहिले. तो म्हणाला, ‘देवा, मी एक सामान्य मानव. सूतकुलात वाढलेला. पूर्वपुण्याईची खूण सांगणारी एवढी एकच खूण- कवचकुंडलं. एवढंच माझ्या जीवनातलं दैवी लेणं. ते आज जाणार, याची खंत वाटत नाही; पण ते जात असताना, त्याबरोबरच उरलेलं हे मानव रूप, ते विरूप होणार नाही ना, अशी भीती वाटते. आपण साक्षात रूपाचं दैवत. आपण समोर असता ज्याचा मला सदैव अभिमान वाटतो, असं माझं रूप, ते या दानानं विरूप होऊ नये, असं वाटतं.’

‘तथास्तु! कर्णा, तसंच घडेल! त्याबद्दल तू निश्चिंत ऐस.’ कर्णाने ते शस्त्र पेलले. इंद्र कर्णाच्या मुखाकडे पाहत होता. पण आपल्या हातांनी आपली कवचकुंडल कापीत असता त्याच्या मनोविकारांच्या दर्पणावर दु:खाची किंचितही छटा प्रकटली नव्हती, की समाधान ढळत नव्हते. कर्ण स्मितमुखच होता. कवचकुंडले कापीत असता येणाऱ्या रुधिरापाठोपाठ शरीर पूर्ववत बनत होते.

कवचकुंडले कापून होताच ती त्याने हातांत घेतली. इंद्राचे दोन्ही हात समोर आले होते. पद्मदलाप्रमाणे शोभणाऱ्यां त्या सुंदर हातांवर कर्णाने शस्त्रासह कवचकुंडले ठेवली आणि कर्णाच्या डोळ्यांदेखत ती त्या हातांवरच अंतर्धान पावली.

कर्णाचे लक्ष त्या रित हातांवर खिळले असता त्याच्या नेत्रांतून दोन टपोरे अश्रु ओघळले.

‘दानाचं दुख वाटतं?’ इंद्राने विचारले.

नकारार्थी मान हलवीत एक नि:श्वास सोडून कर्ण म्हणाला, ‘नाही! दु:ख दानाचं नाही; माझ्या दुर्भाग्याचं दुःख वाटतं.’

‘कसलं दुर्भाग्य?’ इंद्राने आश्चर्याने विचारले.

‘माझ्या कवचकुंडलांना आपल्या हातावर विरून जाता आलं, हे त्या कवचकुंडलांचं भाग्य. त्यांचा मला हेवा वाटला. मानवी जीवनाची सार्थकता तरी दुसरी काय असते? परमेश्वररूपात विलीन होण्याचीच ना! आपण माझी कवचकुंडलं मागितलीत; पण मला मागितलं नाहीत. त्या हातांत विरून जाण्यात केवढी धन्यता वाटली असती! कवचकुंडलं हे जसं परमेश्वरी वरदान, तसंच हे शरीरही. त्या या देहाचा आत्म्यासह स्वीकार झाला नाही, याचं दुख वाटतं. देवा, आपण मलाच का मागितलं नाहीत? मी माझं सर्वस्व अत्यानंदानं आपल्या चरणी वाहिलं असतं. त्यातच जीवनाची कृतार्थता मानली असती.’

अर्जुनाच्या रक्षणासाठी कवचकुंडले हरण करण्यासाठी आलेला इंद्र कर्णाच्या शब्दांनी, त्याच्या मनाच्या निर्मळ दर्शनाने विरघळला. कर्णाचे ते भाववेडे रूप पाहून इंद्राने न राहवून कर्णाला आलिंगन दिले.

त्या तेजमय रूपाने कर्ण बद्ध असतानाच त्याच्या कानांवर शब्द आले, ‘राधेया, देवांना सारंच पेलतं, असं थोडंच आहे? तुझं निर्मळ रूप सामावून घेण्याची शक्ती माझी नाही. कर्णा, तुझं दातृत्व, तुझा सद्भाव अलौकिक आहे. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुला काही हवं असेल, तर मागून घे.’

कर्णाला सूर्याला दिलेल्या वचनाची आठवण झाली; पण याचना करण्याचे धैर्य त्याला होईना.

‘काही हवं का? माग…’

कर्ण संकोचाने म्हणाला, ‘आपल्या कृपादृष्टीनं पर्जन्यवृष्टी होते. शुष्क भूमीला ओलावा मिळतो. ती धनधान्यांनी संपन्न बनते. आपली कृपादृष्टी झाली, तर काय होणार नाही? आपण कवचकुंडल मागावयास याल, तेव्हा आपल्याकडून एखादी शक्ती मागून घेण्यासाठी मी वचनबद्ध होतो. आपल्या दर्शनानं सारे भाव हरपले. काही मागता आलं नाही. आता तो अधिकार ही राहिला नाही. आपली कृपा असेल, तर आपण शत्रुनाशिना अमोघ शक्ती मला द्या. बलवत्तर शत्रूपासून मला रक्षण प्राप्त होईल. बलिष्ठ शत्रूचा मला नाश करता येईल, द्यायचंच झालं, तर तेवढं द्या.’

‘तथास्तु! कर्णा, तुझी इच्छा पुरी होईल. आज मी माझी वासवी शक्ती तुझ्या हाती देत आहे. या शक्तीच्या साहाय्यानं तुला एकाच शत्रूचा नाश करता येईल. या शक्तीचा वापर झाला की, त्यानंतर ती पूर्ववत माझ्याकडं येईल. एवढंच सांगावंसं वाटतं की, या शक्तीचा वापर स्वार्थप्रेरित हेतूनं करू नकोस.’

कर्णाने वासवी शक्तीचा स्वीकार केला. इंद्राला नम्र भावाने वंदन केले. आशीर्वादासाठी उंचावलेला इंद्राचा हात पाहून कर्णाने नेत्र मिटले.

डोळे उघडले, तेव्हा ते दिव्य रूप नाहीसे झाले होते. आकाशातला घनमेघ लुप्त झाला होत सूर्यकिरणांचा दाह प्रगटला होता.

कर्णाने उत्तरीय घेतले. ते अंगावर घेत असता त्याचे हात छातीवरून फिरले. काया तीच होती; पण लुप्त झालेल्या तेजाची जाणीव होत होती.

कर्ण प्रासादावर आला. कर्णाच्या मुखावर विलसणारा आनंद वृषालीला जाणवत होता. भोजन झाल्यानंतर कर्ण आपल्या महालात गेला. वृषाली कर्णाला निरखीत होती. कर्णाचा वाढलेला प्रसन्न भाव पाहून, का, कोण जाणे, तिला समाधान वाटत नव्हते. ते कर्णाच्या ध्यानी आले. वृषालीला जवळ घेत कर्णाने विचारले, ‘काय पाहतेस, वसू?’

‘काही नाही.’

‘सांगा ना!’

‘सूर्योपासनेहून आपण आल्यापासून मी पाहत आहे. आपण आनंदी दिसता; पण आपल्या…’

‘रूपात काही तरी उणीव भासते, असंच ना?’

वृषालीने होकार दिला.

‘वृषाली, तुला सांगितले, तर खरं वाटेल? आज साक्षात देवेद्र माझ्याकडं याचक म्हणून आला होता.’

‘देवेंद्र?’

‘हो!’

‘काय मागितलं त्यांनी?’ वृषालीच्या मुखावर कौतुक प्रगटले.

‘माझी कवचकुंडलं.’

वृषालीचा भाव बदलला. तिच्या चेहऱ्यांवर भीती प्रगटली. कर्णरूपाची उणीव चटकन तिच्या लक्षात आली. शरीरकांतीपेक्षा अधिक कांतीने शोभणारी कवचकुंडले तशीच दिसत होती; पण त्यांची दीप्ती लुप्त झाली होती.

‘अन् आपण ती दिलीत?’

‘कर्णानं कोणाही याचकाला विमुख पाठविलं नाही. तो तर देवेंद्र. त्याला मी नाही कसं म्हणणार?’

वृषाली दुःखाने कर्णाला बिलगली. ‘आपण त्या देवेंद्राचं काय केलं केलं होतं, म्हणून त्यानं आपली कवचकुंडलं हिरावून घेतली? कशासाठी?’

‘वृषाली, देवांनासुद्धा आपल्या अधिकाराचा, शक्तीचा अहंकार असतो. जी देवांना प्राप्त नाही, अशी शक्ती मानवाजवळ असेल, तर ते कसं खपणार? कदाचित त्याचमुळं…’

‘आपण इंद्राला विचारलं नाही?’

‘मला दान देणं एवढंच माहीत आहे. याचकाला मी कधीही कारण विचारलं नाही.’

वृषालीचे हात कर्णाच्या विशाल छातीवरून फिरत होते- जणू हरवलेले कवच ती शोधीत होती. तिच्या डोळ्यांत अश्रु उभे राहिले.

हळुवार हाताने वृषालीची हनुवटी उंचावीत कर्णाने आपली दृष्टी तिच्या डोळ्यांना भिडवली. त्या अश्रुपूर्ण डोळ्यांचे चुंबन घेत कर्ण म्हणाला, ‘वसू, तू रडतेस? माझी कवचकुंडलं गेली, म्हणून?’ कर्ण हसला, ‘वसू, माणसानं आपल्या बाहुबलावर आपला पराक्रम सिद्ध करावा. त्यासाठी दैवी लाभाचा आश्रय घेऊ नये. कवचकुंडलं गेली, याचा उलट तुला आनंद वाटायला हवा होता.’

‘आनंद?’ वृषालीने आश्रर्याने विचारले.

‘होय ना! तुला आठवतं? एका अपरात्री मी जागा झालो होते. तेव्हा तू जागी असल्याचं माझ्या ध्यानी आलं. कसल्या तरी भयानक स्वप्नानं तुला जागं केलं होतं. भीतीनं विव्हल झालेली तू माझ्या जागे होण्याची वाट पाहत होतीस. ते समजताच मी तुला म्हणालो, ‘एवढी भीती वाटत होती, तर तू माझ्या जवळ का आली नाहीस?’ तेव्हा तू काय सांगितलं होतंस, आठवतं?’

‘काय?’ वृषालीने विचारले.

‘तू म्हणालीस, रात्री कधी मी जागी झाले, तर आपल्याकडं यावं, असं वाटतं, पण आपल्याला बिलगण्याचं धाडस होत नाही. कारण रात्रीच्या काळोखात आपली कवचकुंडलं वेगळ्याचं तेजानं जाणवतात. त्यांची भीती वाटते… वसू, यापुढं तो दुरावा राहणार नाही. तुला केव्हाही नि:संकोचपणे मला बिलगता येईल.’

वृषालीला आपल्या मिठीत बद्ध करीत कर्ण म्हणाला, ‘तुलाच काय, पण यापुढं शत्रूंनासुद्धा मनात भय न बाळगता माझ्या छातीशा भिड़ता येईल.’

*———-*

दुर्योधनाच्या निरोपा बरोबर कर्ण हस्तिनापुरात आला.

दुर्योधन-महालात शकुन, दुःशासन जमले होते.

कर्ण महालात जाताच दुर्योधनाने त्याचे स्वागत केले. दुर्योधन म्हणाला, ‘मी तुला तातडीनं बोलावलं, त्याचं कारण समजलं?’

‘नाही.’

‘विराटाघरी कीचकाचा वध झाल्याचं निश्चितपणं कळलंय्.’

‘वध?’

‘हो! निर्घृण वध! अन् तोही गंधर्वांकरवी. विराटाच्या नृत्यशाळेत सेनापती कीचकाचा छित्र-विछिन्न देह सापडला. रक्तामांसानं विखुरलेल्या अवयवांनी ती भूमी माखली होती. विराटाघरी सैरंध्री नामक एक रूपसंपत्र दासी होती. तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा कीचकानं प्रयत्न केला, म्हणून तिचं रक्षण करणाऱ्या गंधर्वानं कीचकाला शासन केलं.’

कर्ण विचारात गर्क होता. तो काही बोलत नाही, हे पाहून दु:शासनाने विचारले, ‘अंगराज, आपण बोलत का नाही?’

‘काही नाही. मी विचार करीत होतो. गंधर्वांच्या हातून असा अमानुष प्रकार होणार नाही. हे सामर्थ्य फक्त एकाचंच आहे.’

‘कुणाचं?’ दु:शासनाने विचारले.

‘भीम!’ कर्णाने सांगितले,

सारे त्याच्याकडे पाहत राहिले.

‘युवराज, अज्ञातवासात राहणाऱ्या पांडवांना तू शोधतोय्स ना? मग विराटाचं घर ही एक तशी जागा आहे.’

‘आम्ही तोच विचार करीत होतो.’ दुर्योधन म्हणाला.

‘कसला?

‘पांडवांची चिंता करण्याचं काही कारण नाही. पांडवांच्या शोधार्थ पाठवलेले दूत माघारी आले आहेत. त्यांचा कुठंही सुगावा लागत नाही. ते निःसंशय मृत झाले असावेत.’

‘युवराज, एवढ्या सहजपणं पांडवांचा मृत्यू ओढवायचा नाही. तुमच्या चतुर दूतांना, भरपूर द्रव्य देऊन, चारी दिशांना पांडवांचा शोध घेत फिरू दे. अज्ञातवासातल्या पांडवांचा शोध लागला नाही, तर अज्ञातवासाचं हे वर्ष संपताच ते प्रगट होतील युद्धासाठी.’

‘ठीक आहे. मी तशी आज्ञा देतो.’ दुर्योधनाने संमती दिली व त्याने सांगितले, ‘राधेया, राजधानी त्रिगतीचा राजा सुशर्मा आलाय्. कीचकाचा वध झाल्यानं विराटराजा निराश्रय व निरुत्साही झाला आहे. त्या विराटनगरीवर चालून जावं, असं त्याचं मत आहे. राजसभेला ते मान्य आहे. भीष्म, द्रोण, विदुरांनी त्याला संमती दिली आहे.विराटस्वारीत आपल्याला विपुल धन, गोधन मिळेल अन् तो शरण येताच त्याचं बळही आपल्याला लाभेल.’

कर्णाने होकार दिला.

जास्त अवधी न दवडता भीष्म-द्रोणांसह कौरव विराट राज्यावर स्वारी करण्यासाठी ससैन्य निघाले. विराटाच्या स्वारीसाठी सैन्याचे दोन भाग केले होते. एका भागाने- सुशर्म्याने गोधन लुटावे, नंतर दुसऱ्या सैन्यभागाने उरलेले गोधन पळवावे, असे ठरले होते.

सुशर्म्याने ठरल्याप्रमाणे विराटाच्या गोपाळांस पळवून लावले आणि विराटाचे त्या भागातले गोधन घेऊन तो परतला. कौरवांच्या सेनेने गोधन पळवल्याचे कळताच विराट हतबल झाला. तो आपल्या मोजक्या सैन्यानिशी विरोधाला उभा राहिला; पण सुशर्म्याने पराभव करून त्याला पकडले. सुशर्म्याची कामगिरी पार पडताच कौरवसेनेने दुसरा लढा उभारला. विराटपुत्र उत्तराला काही सुचेनासे झाले. त्याची दयनीय स्थिती पाहून विराटाघरी आश्रयाला राहिलेले अज्ञातवासातले पांडव प्रगट झाले. तुंबळ युद्धात पांडवांनी कौरवांचा पराजय केला. विराटाला सोडवले. त्या युद्धात अर्जुनाने कर्णाचा, भीष्मांचा, द्रोणांचा पराभव केला.

पांडव प्रकट झालेले पाहताच कर्णाने दुर्योधनाला मागे फिरण्याचा सल्ला दिला. तो म्हणाला, ‘युवराज, पांडव प्रकट झाले आहेत. या युद्धात जय-पराजयाचा निर्णय लावण्यापेक्षा भावी युद्धावर लक्ष केंद्रित करावयास हवं.’

दुर्योधनाने तो सल्ला मानला आणि चिंताग्रस्त मनाने कौरव हस्तिनापुरास परतले.

✍️ *क्रमश:* ✍️