राधेय – भाग ३२

🚩 *राधेय/३२* 🚩

कर्ण-दर्शनासाठी आतुर झालेल्या अंगवासीयांनी कर्णाचे अपूर्व असे स्वागत केले. प्रजेचा तो अानंद पाहून कर्णाला समाधान वाटले. त्या प्रजेच्या कल्याणासाठी कर्णाने स्वत:ला वाहून घेतलं. समृद्ध गाैशाळा, तृप्त प्रजाजन पाहत कर्ण वृषालीसह अंगदेशाचे राज्य करीत होता.

रात्री अचानक कर्णाला जाग आली. हजारो भुंगे एकाच वेळी गुंजारव करावेत, तसा नाद त्याच्या कानांत भरला. कर्णाने डोळे उघडले. सारा महाल सुवर्णप्रकाशात झळाळत होता. कर्णाने वळून पाहिले, तो वृषाली शांतपणे झोपी गेली होती. तो सूर्यप्रकाश, तो अखंड उठणारा नाद ऐकत असूनही कर्णाला भीती वाटली नाही. कर्णाने सावकाश पडल्या जागेवरूनच मान वळवली.

महालाच्या मध्यभागी एक दीप्तिमान आकृती उभी होती. सुवर्णतेजाने भरलेली.

नकळत कर्ण उठून उभा राहिला.

ती तेजबद्ध आकृती दिसत होती; पण तिचे रूप त्या तेजातच लपले होते. एखाद्या खोल विहिरीतून गंभीर नाद उठावा, तसा आवाज उमटला : ‘कर्णा, मी आलोय्.’

‘ज्याची नित्योपासना तू करतोस, ज्याच्या तेजानं तुझं मन सदैव भरलेलं असतं, तो मी- सूर्य.’

आपल्या आराध्यदैवताच्या दर्शनाने कर्णाचे मन उचंबळून उठले. धावत जावे आणि त्या चरणांना मिठी मारावी, असे त्याला वाटले; पण त्या तेजाला स्पर्श करण्याचे धाडस कर्णाला झाले नाही. नम्र भावाने त्याचे हात जोडले गेले.

‘कल्याण असो!’ सूर्याने आशीर्वाद दिला. तो प्रकाश बोलत होता. ‘हे कर्णा, आज मी विशिष्ट हेतूनं तुझ्यासमोर उभा आहे.’

‘आज्ञा!’

‘कर्णा, आता लौकरच पांडवांचा वनवास संपेल. अज्ञातवासाचं वर्ष उलटताच ते प्रगट होतील. वर्षा-ऋतूत क्षुधेनं व्याकूळ झालेले मृगेंद्र वर्षा-ऋतू संपताच मृगयेसाठी जसे बाहेर पडतात, तसे पांडव बाहेर पडतील- पृथ्वी पादाक्रांत करण्यासाठी. त्या पांडवांच्या भावी विजयासाठी प्रत्यक्ष इंद्र उद्या तुइयाकडं येईल.’

‘देवेंद्र इंद्र? अन् माझ्याकडं?’

‘हो! अन् तोही याचक म्हणून.’

‘पण इंद्रदेवांना पांडवांसाठी कष्ट घेण्याचं कारण?’

‘कारण जसा तू माझा भक्त आहेस, तसा अर्जुन इंद्राचा.’

‘देवेंद्र माझ्याकडं याचनेसाठी येतात, यापेक्षा जीवनाची सार्थकता कोणती? ते मी माझं भाग्य समजतो. त्यायोगे माझी तपश्चर्या फळाला आली, असंच मी समजेन. पण, देवा, देव याचक म्हणून जरी आले, तरी त्यांना तृप्त करण्याचं सामर्थ माझं कुटलं? असं माझ्याजवळ कोणतं धन आहे की, ज्यासाठी इंद्रदेवांनी स्वर्गातून खाली उतरावं?’

‘तुझी कवचकुंडल.’

‘कवचकुंडलांचं काय?’

‘ती मागण्यासाठी इंद्र येत आहे. जोवर कवचकुंडलं तुझा शरीरावर आहेत, तोवर तुझा पराजय नाही, हे इंद्राला माहीत आहे. उद्या कौरवपांडवांचं युद्ध सुरू झालं, तर पांडवांना विजय कसा प्राप्त होणार? कर्णा, ही दोन रत्नकुंडलं अमृतापासून निर्माण झाली आहेत. तुला जीवित प्रिय असेल, तर ती तू नीट जतन कर.’

कर्णाला काही सुचत नव्हते. बोलवत नव्हते.

ती कर्णाची अवस्था जाणून सूर्य म्हणाला,

‘कर्णा, मला माहीत आहे की, तू कोणाही याचकाला कधीही विमुख पाठवीत नाहीस. याचक नेहमीच तुझ्या दानानं तृप्त होऊ माघारी जातात. माझ्या चाललेल्या अखंड प्रवासात नदीतीरावरचं तुझं पुरश्चरण अन् दान पाहणं हा सुखाचा भाग असतो; पण प्रत्येक गोष्टीला मर्यादा ही असतेच. कुटिल हेतूनं मागितलेलं दान पुरवणं हे दातृत्व नव्हे, तो अविवेक म्हणावा लागेल.’

‘देवा, मी आपली अमर्यादा कशी करीन? आपण माझं कल्याण चिंतिता, यातच माझ्या जीवनाची धन्यता मानतो. त्याच जिव्हाळ्यापोटी धाडस करावंसं वाटतं.’

‘कर्णा, संकोच करू नकोस मन मोकळं कर.’

‘आज्ञा! देवा, आपण आपल्या तेजानं पृथ्वी प्रकाशमान करता. त्या प्रकाशात जशी पुण्यकर्मं घडतात, तशीच पापकर्मंही; पण ती पापं घडतात, म्हणून आपण आपल्या प्रकाशाला कधी आवर घातलात का? याचकाला देणं एवढंच माझ्या हाती आहे. ते कोणा, कशासाठी वापरतं, याचा विचार करण्याचा मला अधिकार नाही. तो माझा धर्मही नव्हे.’

‘तुझ्या बोलण्यानं मी तुझ्यावर प्रसन्न आहे. क्षणभर तू माझं देवत्व विसर; पण एक गोष्ट लक्षात घे. मी असतो आकाशी अन् कर्म घडतं पृथ्वीवर. त्या पापपुण्यांचा मला स्पर्श नसतो. पण कुणी माझं तेज मागितलं, तर ते मी कदापिही देणार नाही. कारण तसं झालं, तर त्या वेळी मी सूर्य राहणार नाही. मी त्या तेजाला बद्ध आहे, तसाच तूही तुझ्या जन्मजात सहज कवचकुंडलांना. जोवर तुझ्या देहावर ती कवचकुंडलं आहेत, तोवर त्यांच्यायोगे निर्मल आकाशात विशाखा नक्षत्रांच्या दोन तारकांमध्ये चंद्र शोभतो, तसा तू राहशील. कवचकुंडल दान केलीस तर, फक्त कीर्ती उरेल, जीवित राहणार नाही.’

‘तसल्या जगण्यापेक्षा कीर्तिरूप मृत्यू मी कवटाळीन.’

‘हा कीर्तीचा अहंकार जिवंत असे पर्यंतच भोगता येतो. कर्णा, हे निष्पापा, मनुष्य जिवंत असेपर्यंतच त्याला ऐश्वर्य, स्नेह, प्रेम भोगता येतं. मृत्यूनंतर कीर्ती राहते; पण ती भोगता येत नाही.’

‘जीवनातल्या निस्तेज भोगापेक्षा मी मरणोत्तर लाभणारी उदात कीर्ती मोलाची मानतो. मी त्याच जीवनाचा स्वीकार करीन. आपण माझ्या हितासाठी आलात, मला सावध केलंत, त्याचं विस्मरण मला केव्हाही होणार नाही. सामान्य मानव मी. माझ्या हिताच्या चिंतेनं साक्षात सूर्यानं धावावं, यापेक्षा धन्यता कोणती? अन् माझं यश कुणी मानवानं हिरावून घेण्यापेक्षा ते देवांनी लुटलं, तर त्यापेक्षा दुसरं भाग्य कोणातं?

‘कर्णा, मला राहवलं नाही, म्हणून मी आलो. वाटलं, ते सांगितलं. त्याचा स्वीकार अथवा अव्हेर करणं हे तुझ्याच हाती आहे.’

कर्ण त्या शब्दांनी व्यथित झाला. तो कळवळून म्हणाला, ‘क्षमा! देवा, क्षमा!! आपण रुष्ट होऊ नका. मी आपला भक्त आहे. माझं सर्वस्व मी आपल्या चरणांशी नित्य वाहतो. आपल्या प्रेमभावाचा अनादर मी कसा करीन? परमेश्वरा, साक्षात तेज असं आपल रूप! मी आपल्याला प्रिय असेन, तर माझा भाव जाणून, आपण मला माझ्या व्रतापासून परावृत्त करू नये, एवढीच प्रार्थना!’

‘ठीक आहे, कर्णा! मी तुझ्या व्रताआड येणार नाही. माझा आग्रह नाही. मी तुझ्यावर रुष्ट नाही. उलट, माझ्या मनात वसणारं तुझ्याबद्दलचं प्रेम तुझ्या या निर्णयामुळं अधिकच वाढलंय्. तुझ्या हितासाठी एक सांगतो. तेवढं मात्र ऐक.’

‘आज्ञा!’

‘इंद्र येईल. त्याला तू आपली कवचकुंडलं देशील, यात संशय नाही; पण त्या वेळी त्या देवेंद्राकडून एक अमोघ शक्ती मागून घे. तशी वेळ पडलीच, तर तुझं…’

‘भगवान! मी इंद्राकडून शक्ती मागून घेऊ?’ कर्णाने विचारले.

‘आता विरोध करू नकोस! माझी आज्ञा समज.’

‘जशी आपली आज्ञा! दात्या कर्णाच्या निष्कलंक जीवनावर देवाज्ञेनं याचनेचा कलंक लागणार असेल, तर तो चंद्राच्या कलंकाइतकाच शोभिवंत दिसेल. त्याचा मला अभिमान वाटेल.’

कर्ण नतमस्तक झाला. नाद मंदावता-मंदावता नाहीसा झाला. कर्णाने पाहिले; सुवर्णप्रकाश लुप्त झाला होता. पहाटेचा धूसर प्रकाश गवाक्षातून येत होता. कर्णाची दृष्टी वृषालीवर गेली. वृषाली शांतपणे झोपी गेली होती. झाला तो भास, दृष्ट्रांत, की स्वप्न… याचा विचार करीत कर्ण शय्येकडे गेला.

✍️ *क्रमश:* ✍️