राधेय – भाग ३१

🚩 *राधेय/३१* 🚩

दुर्योधनाने यज्ञ सुखरूपपणे पार पाडला. यज्ञास आलेले सर्व नृपती, महाभाग, ब्राह्मण यांचा द्रव्य व मूल्यवान वस्तू अर्पण करून यथाशास्त्र, यथाक्रम सन्मान केला अन् त्या सर्वांना निरोप देऊन दुर्योधन, कर्ण-शकुनींसह हस्तिनापुरास आले.

सायंकाळी कर्ण आपल्या गृही अधिरथ, राधा, शत्रुंजय, वृषकेतु, वृषसेन यांच्यासह बोलत असता चक्रधर अधिरथांना म्हणाला, ‘एक आनंदाची बातमी सांगणार आहे सांगणार आहे.’

‘कसली?’ अधिरथांनी विचारले.

‘अंगदेशाचं राज्य मला मिळणार आहे.’

‘अंगदेशाचं राज्य?’ सारे उद्गारले.

‘हो!’

‘कोण देणार?’ कर्णाने विचारले.

‘तुम्ही!’

सारे चक्रधराकडे पाहत होते. चक्रधराने सांगितले, ‘आता कर्ण इथंच राहणार! एवढ्या वर्षांत त्याला राज्याची आठवण नाही, काळजी नाही, तेव्हा ते राज्य मलाच मिळायला नको?’

सारे हसले.

कर्ण म्हणाला, ‘नाहीतरी माझ्या नावानं तूच राज्य करतोस ना? मित्रा, मला तुझं बोलणं समजलं. आता मी मोकळा झालो. तू म्हणशील, तेव्हा आपण निघू.’

‘मी इथंच राहणार.’ वृषसेन म्हणाला.

कर्णाने वृषसेनाकडे पाहिले.
वृषसेन आता मोठा झाला होता. शस्त्रपारंगत बनला होता. राधाई म्हणाली, ‘राहू दे, रे!’

‘मी कुठं नको म्हणतोय्?’ राधाईमागे उभ्या असलेल्या वृषालीकडे पाहत कर्णाने विचारले, ‘तू तरी येणार का?’

-आणि एकच हसणे तेथे उसळले.

कर्णाने आपला बेत दुर्योधनाला सांगितला, तेव्हा तो गंभीर झाला.

दुर्योधन म्हणाला, ‘मित्रा, तू अंगदेशी जाणं आवश्यक आहे, हे मला पटतं; पण तुला फार काळ राहता येईल, असं! वाटत नाही. पांडवांचा वनवास संपताच, अज्ञातवासाच्या वर्षात त्यांना शोधायला हवं.’

‘युवराज, चिंता करू नका! आपण बोलवाल, तेव्हा मी धावत येईन.’

कर्ण अंगदेशाला निघाला, तेव्हा बऱ्याच अंतरापर्यंत दुर्योधन त्याला पोहोचवायला गेला होता…

✍️ *क्रमश:* ✍️