राधेय – भाग ३०

🚩 *राधेय/३०* 🚩

दिग्विजयाहून कर्ण परत आल्यानंतर दुर्योधनाने राजसभा बोलविली. भीष्म, विदुर, द्रोण, कृप या सभेला उपस्थित होते. सर्व कौरवही तेथे आले होते. राजपुरोहितांना मुद्दाम पाचारण केले होते. राजसभा भरल्यानंतर दुर्योधनाने आपला हेतू सांगितला. तो धृतराष्ट्रांना म्हणाला, ‘तात, अंगराज कर्णानं दिग्विजय करून आपल्या साम्राज्याचा लौकिक वाढविला आहे. ज्या हेतूनं त्यानं हा दिग्विजय केला, तो राजसूय यज्ञ करण्याची मला उत्सुकता लागली आहे.’

धृतराष्ट्राने समाधानाने संमती दिली.

कर्ण म्हणाला, ‘युवराज, या क्षणी सर्व भूपाल तुला वश आहेत. तू द्विजश्रेष्ठांना सन्मानानं बोलावून घे आणि यज्ञाची सर्व उपकरणं जमविण्याची आज्ञा कर. वेदपारंगत ऋत्विजांना निमंत्रण करून त्यांच्याकडून यज्ञाचा यथाशास्त्र उपक्रम कर.’

द्रोणाचार्यांनी म्हटले, ‘युवराज, मला काही सांगावंसं वाटतं.’

‘आज्ञा!’ दुर्योधन म्हणाला.

‘सम्राट धृतराष्ट्र महाराज असताना राजसूय करण्याचा अधिकार तुला नाही.’

‘तात अंध आहेत व अंधाला क्रतूचा अधिकार नाही. त्याचमुळं त्यांचं अस्तित्व माझ्या अधिकाराला प्रतिबंध करू शकत नाही.’ दुर्योधन म्हणाला.

पुरोहित उठले. ते म्हणाले, ‘युवराज, आपण म्हणता, ते सत्य आहे; पण त्याचबरोबर एका कुलात दोन राजसूय होत नसतात. जोपर्यंत आपण युधिष्ठिराला जिंकलं नाही, तोवर आपणांस राजसूयाचा अधिकार नाही. काही कारणानं कधी युधिष्ठिराचा पराभव झालाच, तर राजसूयाचा अधिकार लाभेल.’

‘युवराजांना यज्ञच करता येणार नाही?’ कर्णाने विचारले.

‘तसं नाही. युवराज, राजसूयाशी स्पर्धा करणारा वैष्णव यज्ञ तुम्ही करा. त्यायोगे विपुल कीर्ती तुम्हांला मिळेल. तुम्हांला करभार देणारे भूपाल आहेत. ते तुम्हांला घडविलेलं व खाणीतून काढलेलं सुवर्ण देतील. त्या सोन्याचा नांगर करून त्यानं यज्ञभूमी नांगरून द्या आणि राजसूयाइतकंच श्रेष्ठ असं हे सत्र निर्विघ्नपणे पार पाडा!’

पुरोहितांनी सुचाविलेल्या यज्ञाला सरर्वांनी संमती दिली आणि सारे यज्ञतयारीसाठी विचार करू लागले.

यज्ञाची सामग्री आणण्यासाठी कुशल सेवक पाठवले होते. पार्थिवांना व ब्राह्मणांना निमंत्रण करण्यासाठी शीघ्रगामी दूत चारी दिशांना सुटले. हस्तिनापुरात सुवर्णकारागिरांकडून सुवर्ण-नांगर तयार होत होता.

त्या नांगराने यज्ञभूमी नांगरली गेली. निष्णात शिल्पकारांकडून यज्ञस्थान निर्माण करविले आणि एका सुमुहूर्तावर दुर्योधनाने त्या सुसंस्कृत, विपुल धनयुक्त यज्ञाची यथाशास्त्र व यथाक्रम दीक्षा घेतली.

तो सोहळा पाहून विदुर, भीष्म, द्रोण, कृप, कर्ण यांना अतिशय संतोष वाटला.

विदुर म्हणाले, ‘युवराज, हा यज्ञ होत असता सर्वत्र आनंद असावा. समाधान असावं.’

कर्णाकडे पाहत दुर्योधन म्हणाला, ‘मी माझ्या मित्राच्या साहाय्यानं समाधानी आहे.’

‘ते मी जाणतो, युवराज, आपण हा यज्ञ करीत असता पांडव मात्र अरण्यवासी आहेत. त्यांचं वास्तव्य आपणांस माहीत आहे. या यज्ञासाठी आपण त्यांना बोलवावं. त्यानं तुमचा मोठेपणा वाढेल.’

क्षणभर दुर्योधनाने विचार केला आणि त्यानं संमती दिली.

दुःशासनाने दूतास आज्ञा केली, ‘हे दूता, तू सत्वर द्वैतवनात जा, अन् त्या पांडवांना व वनात राहणाऱ्या ब्राह्मणांना यथान्याय यज्ञाचं निमंत्रण दे.’

यज्ञाचा दिवस जवळ येत होता. निमंत्रित ऋषी, राजे, विद्वान हस्तिनापुरास येत होते.

द्वैतवनात गेलेला दूत परत आला. राजसभेत तो येताच दुर्योधनाने त्याला विचारले, ‘दूता, पांडव यज्ञाला येतात ना?’

दूत म्हणाला, ‘युवराज, पांडवांना मी आमंत्रण दिलं. युधिष्ठिरांनी आपण करीत असलेल्या श्रेष्ठ कर्तृत्वाबद्दल आनंद व्यक्त केला; पण तेरा वर्षांची प्रतिज्ञा पालन करावयाची असल्यानं येता येत नाही, असं ते म्हणाले.’

दुर्योधनाला मनातून समाधान वाटले; पण समाधान न दाखवता तो उद्गारला, ‘पांडव आले असते, तर बरं झालं असतं!’

कर्ण दूताकडे पाहत होता. त्याचा अस्थिर भाव ओळखून कर्णाने विचारले, ‘काही निरोप सांगितलाय्?’

‘तसा काही…’ दूत चाचरला.

‘सांग, दूता! दूतकर्मात संकोच करू नकोस, जो निरोप असेल, तो सांग.’ कर्णाने आज्ञा दिली.

भीष्म, द्रोण, विदुरांचे लक्ष दूताकडे लागले होते.

दूताने कर्णाकडे पाहत सांगितले, ‘अंगराज, युधिष्ठिर महाराजांचा मनोभाव कळताच, काही निरोप आहे का, म्हणून मी विचारलं अन् त्याच वेळी भीम उठले अन् ते म्हणाले, मी निरोप सांगतो…’

‘भीमानं काय निरोप पाठवलाय्?’ विदुरांनी उतावीळपणे विचारले.

‘भीम म्हणाले’, दूत सांगू लागला, “त्या दुर्योधनाला जाऊन सांग. ज्या वर्षी प्रतिज्ञेची तेरा वर्षं पूर्ण होतील, तेव्हा नराधिपती धर्मराज रणयज्ञामध्ये शस्त्रास्त्रांच्या प्रदीप्त अग्नीमध्ये दुर्योधनाची आहुती देण्यास सज्ज होईल, तेव्हाच कुंतीपुत्र तिथं येतील अन् जेव्हा हा धर्मात्मा युधिष्ठिर, सर्व धृतराष्ट्रपुत्र स्वतःच क्रोधानं उद्दीपित झाले असता, त्यांना अधिक प्रज्वलित करणारा क्रोधरूपी हवीचा प्रक्षेप करील, तेव्हा मीही तिथं येईन.’

सारी सभा तो निरोप ऐकून सून्न झाली.

विदुरांना काही सुचेना.

भीष्मांनी विचारले, ‘दूता, इतर पांडव काही बोलले?’

‘नाही! फक्त भीमच बोलले.’ दूताने सांगितले.

‘युवराज, तो भीम मुळातच संतापी. त्याच्या बोलण्याकडं लक्ष न देता क्षमाभाव जागृत करावा. जिथं यज्ञ होणार आहे, त्या भूमीत क्रोध, मत्सर, अपमान यांना स्थान नसतं.’ भीष्म म्हणाले.

कर्णाच्या चेहऱ्यावर उद्वेगजन्य स्मित पसरले. तो भीष्मांना म्हणाला, ‘पितामह, हा विचार योग्य आहे, तर तो शिशुपालवधाआधी कृष्णाला का दिला नाहीत? ती यज्ञभूमी सज्ज होत असतानाच त्या भूमीवर रक्त का सांडू दिलंत? का तिथं नरबलीची आवश्यकता होती?’

भीष्म काही बोलले नाहीत.

भीमाच्या त्या निरोपाने कर्णाचा संताप उसळला. तो उभा राहिला. ‘सामोपचारानं आमंत्रण पाठवलं, तर हा निरोप? वनवास भोगत असतानाही रणयज्ञात सर्व कौरवांची आहुती घालण्याचा संदेश पांडव पाठवितात अन् आमची राजसभा तो शांत चित्तानं ऐकून घेते. मित्रा दुर्योधना, यांतल्या कुणाला तुझ्या राज्याची, तुझी किंमत वाटत नसेल; पण त्याची चिंता तू बाळगू नकोस. तू आनंदानं हा यज्ञ कर. त्यानंतर ज्या दिवशी युधिष्ठिराचा पराभव करून तू राजसूय यज्ञ करशील, तेव्हाच तुझं हे कौरवसाम्राज्य सुरक्षित होईल. त्यासाठी मी आज प्रतिज्ञा करीत आहे. ती ऐक.’

कर्णाने क्षणभर उसंत घेतली.

साऱ्या राज्यसभेचे लक्ष कर्णावर स्थिरावले होते.

कर्णाने उच्च रवाने आपली प्रतिज्ञा सांगितली. ‘जोवर मी अर्जुनाचा वध केला नाही, तोवर दुसऱ्याकडून पादप्रक्षालन करून घेणार नाही. मद्य अन् मांस वर्ज्य करीन अन् कोणाही याचकाला इष्ट वस्तू देण्याचं व्रत अखंड चालवीन. या व्रताचा मी आज नियम करीत आहे.’

दुर्योधनाने अतिस्नेहाने कर्णाचा हात हाती घेतला. त्याच्या हाताची पकड कर्णाला जाणवली.

✍️ *क्रमश:* ✍️