राधेय – भाग २९

🚩 *राधेय/२९* 🚩

दिग्विजयासाठी हस्तिनापुरात कौरवदल एकत्रित होत होते. राजरस्त्यावरून अश्वपथके टापांचे आवाज उठवीत भरधाव वेगाने जाताना दिसू लागली. रथांचे धडधडाट उठू लागले. अंबाऱ्या तोलीत जाणाऱ्या हत्तींच्या पावलांनी धरणी दबू लगली. शंख, नौबतींच्या आवाजांनी वातावरण धुंदावून गेले. चंपानगरीहून कर्णदलासह चक्रधरही हस्तिनापुरात आला. दिग्विजयाची तयारी पुरी झाली होती.

मुहूर्ताच्या दिवशी कर्णाने धृतराष्ट्र-गांधारींचे दर्शन घेतले. ब्राह्मणांनी मंत्र म्हणून त्याला आशीर्वाद दिले. दुर्योधनाचा निरोप घेऊन कर्ण रथारूढ झाला. चक्रधर कर्णाचे सारथ्य करीत होता. राजरस्त्याने दळ जात असता नागरिक दुतर्फा उभे होते, कर्णाचा जयघोष करीत होते. कर्णरथ जेव्हा कर्णाच्या वाड्यासमोर आला, तेव्हा कर्णाने रथातून उतरून अधिरथ-राधाईंचे आशीर्वाद घेतले. वृषालीने कर्णाला ओवाळले आणि कर्ण परत रथारूढ झाला. हस्तिनापुराबाहेर कर्णाची वाट पाहणाऱ्या सेनासागराने कर्णरथ दिसताच कर्णाचा जयजयकार केला. त्या अपाट दळासह कर्ण दिग्विजयासाठी निघाला.

कर्णाने प्रथम द्रुपदाकडे आपले लक्ष वळवले. घनघोर संग्राम झाला; आणि शेवटी द्रुपदाचा पराभव करून कर्णाने द्रुपदाकडून सुवर्ण, रौप्य, रत्ने यांच्या राशी करभार म्हणून घेतल्या. द्रुपदाचा पराभव होताच त्या भागातले सर्वच राजे आपोआप कर्णाला शरण आले आणि करभार देऊन मोकळे झाले.

हिमालयापर्यंतचा मुलूख पादाक्रांत करून कर्ण पूर्वेकडे वळला. कर्णदळ विजय मिळवीत पुढे सरकत होते. अंग, वंग, कलिंग, शुंडिक, मगध, इत्यादी देश जिंकीत तो दक्षिणेकडे उतरला. दक्षिणेतल्या प्रबळ रुक्मीने कर्णाशी प्रखर झुंज दिली. शेवटी रुक्मीने कर्णपराक्रम पाहून युद्ध थांबवले आणि प्रचंड करभार देऊन कर्णाशी सख्य जोडले.

कर्ण-विजयाच्या वार्ता हस्तिनापुरात येत होत्या. येणाऱ्या विजयाच्या वार्तेबरोबर नगराच्या चारी गोपुरांवरून विजय नौबतीचे गंभीर आवाज उठत होते. दुर्योधन कर्ण-स्वागताची तयारी करण्यात गुंतला होता.

भर दुपारच्या उन्हात हस्तिनापुराच्या नगरवेशीबाहेर दुर्योधन आपल्या रथात उभा होता. दुर्योधनाचे रक्षक-दळ मागे उभे होते. दुर्योधनाचे डोळे समोरचा रस्ता निरखीत होते. दुर्योधनाला फार काळ तिष्ठावे लागले नाही. एक स्वार भरधाव वेगाने दौडत येत होता. स्वार नजीक आला आणि हर्षभरित मुद्रेने तो दुर्योधनाला म्हणाला, ‘अंगराज कर्ण दृष्टिक्षेपात आले आहेत.’

दुर्योधनाने आनंदाने हातातील रत्नकंकण काढले आणि स्वाराकडे फेकले. दुर्योधनरथ आपल्या दळासह दौडू लागला. एका उंचवट्यावर येताच रथ थांबला. दुर्योधन एकाग्रपणे पाहत होता.

त्या विस्तीर्ण, सपाट भूमीवरून कौरवसैन्य पुढे येत होते. अप्रभागी कौरवध्वज मानाने फडकत होता. असंख्य रथ, स्वार, सैनिकांनी ती भूमी व्यापली होती.

दुर्योधनाने रथ पुढे नेण्यास सांगितले. दुर्योधनाचा रथ ओळखला जाताच सहस्त्रमुखांनी युवराज दुर्योधनाचा जयजयकार उठला. कर्णाचा रथ दुर्योधनाला सामोरा गेला. दोन्ही रथ एकमेकांजवळ येऊन थांबले. कर्ण-दुर्योधन रथाखाली उतरले आणि आनंदभरित दुर्योधनाने कर्णाला मिठी मारली. दोघांच्या नावांचा जयजयकार आकाशाला भिडला.

दुर्योधनासह कर्णाने हस्तिनापुरात प्रवेश केला. विजयी वीरांच्या स्वागतात कोणतीच कमतरता नव्हती. सारे हस्तिनापूर राजरस्त्यावर लोटले होते. सुवर्ण-अंबाऱ्या तोलीत जाणारे गज, सुवर्णकिरणांत तळपणारे रथ, चित्रविचित्र रंगांची वस्त्रे परिधान केलेले स्वार, शिरस्त्राण-कवचधारी वीर त्या राजरस्त्यावरून जाताना पाहून नागरिकांची मने हर्षाने भरून गेली होती. कौरवध्वजाच्या मागे दुर्योधनासह कर्ण एका रथात उभा होता. दुर्योधन समाधानाने प्रजेचा आनंद पाहत होता. करभाराने सजलेले गाडे सहा-सहा बैलांनी खेचले जात होते. दुर्योधन-कर्णांवर सुगंधित पुष्पे आणि चंदनचूर्ण अखंड उधळली जात होती.

राजप्रसादाच्या द्वाराशी कर्णाला सुवासिनींनी ओवाळले. कर्णाने अंतर्गृहात जाऊन गांधारीसह धृतराष्ट्राचे दर्शन घेतले आणि पुत्राप्रमाणे धृतराष्ट्राच्या चरणांना अभिवादन केले. प्रेमभराने कर्णाला जवळ घेत धृतराष्ट्र म्हणाले, ‘राधेया! तुझ्या पराक्रमानं आज हस्तिनापुरास प्रतिष्ठा लाभली. या अंधत्वाचा आज खेद वाटतोय्. तुझं यश आणि हस्तिनापुरातील तुझं गौरवशाली आगमन पाहावयास आज दृष्टी हवी होती, असं वाटतं. राधेया, तुझ्या स्वागतासाठी राजसभा तिष्ठत आहे. तूच मला तिथं घेऊन चल.’

सम्राटांना हाताचा आधार देऊन कर्ण राजसभेकडे जात होता. राजसभेत सम्राटांसह येणाऱ्या कर्णाला सर्वांनी उत्थापन दिले.

कर्णाने अत्यंत नम्रतेने भीष्म, विदुर, द्रोणाचार्य, कृपाचार्य यांना वंदन केले. भीष्म प्रसन्न मुद्रेने म्हणाले, ‘राधेया! तुझा पराक्रम थोर आहे, तुझ्या यशानं कुरुकुलाचा अभिमान वाढला आहे. माझा तुला आशीर्वाद आहे.’

दुर्योधनाने दासींकडे पाहिले. अमूल्य रत्नालंकारांनी व मूल्यवान तलम वस्त्रे यांनी भरलेली सुवर्णतबके घेऊन दासी पुढे आल्या. दुर्योधनाचा कंठ भरून आला होता. त्याची अवस्था जाणून कर्णाने स्मितवदनाने त्या तबकांचा हस्तस्पर्शाने स्वीकार केला.

कर्ण म्हणाला, ‘हे नृपश्रेष्ठा, आज ही निष्कंटक पृथ्वी तुझी आहे. स्वर्गाचे पालन करणाऱ्या इंद्राप्रमाणे तू तिचं शासन कर.’

दुर्योधनाला राहवले नाही. प्रेमभराने त्याने कर्णाला मिठी मारली आणि भरसभेतच तो म्हणाला, ‘मित्रा, तू माझा मित्र! साह्यकर्ता आहेस. तुझ्यामुळंच आजचा भाग्याचा दिवस मला दिसतोय्. तुझं कल्याण असो. आज तुझ्यामुळं मी खऱ्या अर्थानं सनाथ आहे.’

राजसभेतला कर्णाचा सत्कार संपल्यावर दुर्योधन कर्णाला कर्णगृहापर्यंत पोहोचवायला आला. कर्णगृहाच्या दारात वृषालीने कर्णाला ओवाळले. कर्णाबरोबर आलेल्या कर्णपुत्रांचे ओवाळून स्वागत केले. चक्रधर, द्रुम त्याच सोहळ्यात गृहप्रवेश करते झाले. अधिरथ-राधाईंना आपल्या पराक्रमी मुलांना, नातवंडांना, युवराजांना येताना पाहून धन्यता वाटत होती.

बऱ्याच अवधीनंतर त्या घराला घरपण लाभले होते.

✍️ *क्रमशः* ✍️