राधेय – भाग २८

🚩 *राधेय/२८* 🚩

दुसऱ्या दिवशी सायंकाळी विकर्ण कर्णाकडे आला. तो म्हणाला, ‘अंगराज, आपल्याला प्रासादावर बोलावलंय्.’

‘कुणी? युवराजांनी?’

‘नाही; सम्राटांनी!’

क्षणात कर्णाच्या सारे ध्यानी आले. त्याने शांतपणे विचारले, ‘तिथं पितामह, विदुर, आचार्य असतीलच.’

विकर्ण खिन्नपणे हसला. तो म्हणाला,

‘अंगराज, आज तेवढ्यावर भागणार नाही. पितामहांनी राजसभा बोलवलीय्.’

‘कशासाठी?’

‘आपल्या पराक्रमाचं कौतुक करण्यासाठी! भर रणांगणातून युवराजांना एकटे सोडून आपण माघारी पळून आलात…’

‘ते खोटं आहे. विकर्णा, तू माझ्या बरोबर होतास ना? जेव्हा आपण गंधर्वांवर चालून गेलो, तेव्हा युवराज मागं होते.’
‘ते खरं! पण राजसभेत ते कोणी ऐकून घेत नाही. पितामहांनी युवराजांना काही बोलू दिलं नाही.’

‘एकंदरीत प्रकार गंभीर दिसतो.’

‘आपण वेळ केलात, तर आणखी गंभीर होईल. आपण विश्रांती घेत आहा; आपली प्रकृती बरी नाही, असं सांगितलं, तर कदाचित…’

‘नाही, विकर्णा, गैरसमज अधिक वाढण्याआधीच ते मिटलेले बरे! मी येतो. आणखी काही…’

‘तसं विशेष काही नाही. पण असं बोललं जातं की, अंगदेशाचं राज्य आपल्या हातून काढून घेतलं जावं…’

‘अस्सं! युवराजांनी सांगितलं, तर मी आनंदानं ते राज्य त्यांच्या पायांशी ठेवीन. पण कुणी काढून घेतो, असं म्हटलं, तर ते जमणार नाही, स्वपराक्रमानं ते राज्य मी मिळवळं आहे. ठीक आहे. पाहू काय होतं, ते.’

कर्ण आपल्या महालात गेला. थोड्याच वेळात विकर्णासह कर्ण राजप्रसादाकडे जाण्यासाठी निघाला.

विकर्णाने सांगितले, त्यात काही अतिशयोक्ती नव्हती. राजसभागृह तुडुंब भरले होते. साऱ्यांचे लक्ष कर्णाच्या आगमनाकडे लागले होते. विकर्णापाठोपाठ येणारा कर्ण पाहताच सभागृहात स्तब्धता पसरली.

कर्ण ताठ मानेने गृहात येत होता. त्याची धीट नजर सर्वांवरून फिरत होती.

कर्णाने सम्राटांना वंदन केले. भीष्म, द्रोण, विदुर यांच्या चेहऱ्यांवर कर्णाबद्दलची अप्रीती उमटली होती. दुर्योधन धृतराष्ट्रांसमोर उभा होता. कर्णाकडे मान वर करून पाहण्याची त्याची स्थिती राहिली नव्हती. दुर्योधनामागे शकुनि, दु:शासन नतमस्तक बसले होते.

कर्ण आलेला पाहताच भीष्म उद्‌गारले, ‘सम्राट, आपल्या आज्ञेनुसार अंगराज कर्ण आला आहे.’

धृतराष्ट्र थकल्या आवाजात म्हणाले, ‘पितामह, त्याच्या वर्तनानं आज कुरुराज्याची मान खाली झाली आहे. त्याबद्दल मी काही बोलावं, असं वाटत नाही. तुम्हीच माझ्या वतीनं भाग घ्या.’

‘त्यात मलाही आनंद नाही.’ भीष्म म्हणाले, ‘जे झालं, त्यात युवराज दुर्योधनाचा दोष मला दिसत नाही. या सर्वाला एकच कारण आहे.’ कर्णाकडे बोट दाखवीत भीष्म गरजले, ‘हा सूतपुत्र राधेय!’

कर्णाने भीष्मांकडे पाहिले.

कर्णाच्या ओठांवर विलसणारे स्मित पाहून भीष्मांचा संताप वाढला.

‘राधेया, हा दासीपरिवार नाही. ही कौरवसभा आहे. इथं हा अहंकार चालणार नाही.’

कर्णाने मान तुकवली. भीष्म बोलत होते, ‘घोषयात्रेचं निमित्त तुम्ही पुढं केलंत, तेव्हाच मी विरोध केला होता; पण सम्राटांची आर्जवं करून तुम्ही संमती मिळवलीत. नको ते धाडस केलंत अन् स्वतःच्या फजितीला कारणीभूत झलात. एवढं होऊनही त्याची लाज तुम्हां कोणालाच वाटू नये, याचं आश्चर्य वाटतं.’

‘आमच्या हातून असं कोणतं कर्म घडलं, की ज्याची लाज आम्ही बाळगावी, आपला संताप वाढावा? त्याचं कारण कळेल?’

भीष्म त्या प्रश्नाने अवाक् झाले. ‘तुमच्या हातून काही चुकलं, असं सुद्धा तुम्हांला वाटत नाही ना? धन्य आहे! कुरुराज्याचे युवराज परिवारासह गंधर्वांकडून पकडून नेले जातात, यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट कोणती? राधेया, ज्या पांडवांचा तुम्ही एवढा द्वेष करता, ज्यांना कपटानं वनवास भोगायला लावलात, त्याच पांडवांनी युवराजांच्या मदतीला धावावं, श्रेष्ठ धनुर्धर अर्जुनानं कुरु युवराज दुर्योधनाची सुटका करावी… त्याच्या मनाच्या मोठेपणाला सीमा नाहीत. अन् तुमच्या…’

‘पितामह! एवढं त्या पांडवांचं कौतुक नको. पांडव कौरवांचे दास आहेत. त्यांनी युवराजांना सोडवलं, यात कसलेच उपकार नाहीत. दासानं धन्याची सेवा करणं हा दासाचा धर्म आहे! ते भाग्य त्यांना लाभलं, असं फार तर म्हणा!’

‘राधेयाS S’ भीष्म संतापले.

त्यांना शांत करीत द्रोण म्हणाले, ‘पितामह, शांत व्हा! लज्जा सज्जन बाळगतात. ती रीत अंगराज कर्णाच्या ठायी कुठून येणार? त्याला राजसभेत बोलावू नये, असं मी तेवढयासाठी सांगत होतो.’

‘फार ऐकून घेतलं!’ कर्णाचे नेत्र आरक्त बनले. ‘आचार्य, आम्ही कोणताही गुन्हा केला नाही. सम्राटांच्या आज्ञेचा भंग आमच्या हातून घडला नाही. आम्ही ठरल्याप्रमाणे घोषयात्रा पुरी केली. मृगयेसाठी आम्ही द्वैतवनात प्रवेश केला. पांडवांचा आम्ही शोध घेतला नव्हता. त्यांचं दर्शनही आम्हांला घडलं नाही. युवराज जलविहाराचा आग्रह धरीत असतानाच गंधर्वांचा प्रकोप झाला.’

‘अन् अंगराज महाधनुर्धर कर्ण युवराजांना एकटे सोडून, जिवाच्या भीतीनं वाट दिसेल तिकडं पळत सुटले, असंच ना?’ द्रोणाचार्य हसत म्हणाले.

‘हो, तसंच! फक्त थोडा गैरसमज झलाय्. मी अन् विकर्ण गंधर्वांना सामोरे गेलो, तेव्हा युवराज आमच्याबरोबर नव्हते. अन्, आचार्य, मृत मनुष्य शत्रूंना जिंकीत नसतो. प्रबळ गंधर्वांपुढं माघार घेणंच हितावह होतं.’

‘अन्, अंगराज! जे तुम्हांला जमलं नाही, ते त्या श्रेष्ठ धनुर्धर अर्जुनानं करून दाखविलं. गंधर्वांशी युद्ध करून त्यानं कौरव युवराज सोडवून आणले, हे तर खरं?’ भीष्मांनी विचारलं.

‘सोडवून आणलं, हे खरं, पण ते युद्ध करून, की भीक मागून, ते मला माहीत नाही.’

‘अंगराज!’

‘पितामह! पांडवांचं कौतुक एवढं करू नका. आम्ही मृगयेला जातो काय! त्याच सरोवरात त्याच वेळी गंधर्व क्रीडेसाठी उतरतात काय! गंधर्व युवराजांना पकडून नेतात अन् अर्जुन मदतीला धावून येतो. अर्जुन एवढा पराक्रमी झाला केव्हापासून!’

‘ते तुला कळायचं नाही! अंगराज, कुलानं हीन, मनानं क्षुद्र अन् वाचेनं आत्मश्लाघा करणाऱ्या पुरुषाला अर्जुनाचं खरं रूप कसं दिसेल?’

‘मीही तेच म्हणतो, पितामह! ज्या गंधर्वानं युवराजांना पकडून नेलं, त्या गंधर्वाचं नाव आहे चित्ररथ. स्वर्गीची कुंडं ओस पडली, म्हणून का तो पृथ्वीवरच्या डबक्यात आपल्या परिवारासह उतरला होता? जेव्हा आमच्या दळावर चित्ररथ चालून आला, तेव्हा तो अर्जुन कौरवांच्या मदतीला का आला नाही? तेव्हा त्याचं बाहुबल कुठं गेलं होतं?’

‘पांडवांच्या पराक्रमाला दर्पणाची गरज नाही.’ भीष्म हसून म्हणाले, ‘राधेया, पांडवांनी बाहुबलानं अन् स्वपराक्रमानं राजसूय केला, हे विसरू नकोस.’

‘हां! एका रात्री राज्य वाटून देता येतं, पितामह! म्हणून काही एका रात्रीत राज्य बलशाली होत नसतं. कृष्णाच्या चतुरंग दळाच्या पाठबळावर पांडवांचा तो तथाकथित बाहुबलाचा पराक्रम सिद्ध झाला. निदान आपल्याला तरी त्याचं विस्मरण व्हायला नको होतं, राजसूय यज्ञात आपणच कृष्णला अग्रपूजेचा मान दिला होता ना?’

भीष्मांना काही उत्तर सुचेना.

विदुरांनी विचारले, ‘पण अर्जुनानं युवराजांची सुटका केली, हे तर खरं ना?’

‘हो! चित्ररथ अन् अर्जुनाचा जुना स्नेह. हर्षभरित होऊन त्यांनी एकमेकांना मारलेल्या मिठ्या तुम्ही पाहिल्या नसतील; पण त्या युवराजांनी पाहिल्या आहेत.’

‘कर्णा, तुला काय म्हणायचंय्?’ धृतराष्ट्रांनी विचारले.

‘क्षमस्व! मला खूप म्हणायचंय्; पण ते ऐकतं कोण? महाराज, जे झालं, त्यामागं निश्चितपणे पांडवांचा हात आहे. चित्ररथाकरवी त्यांनीच हे कारस्थान घडवून आणलं. वनवास भोगत असूनही त्यांच्या मनांत केवढं तीव्र वैर नांदत आहे, याची ती घटना साक्ष आहे. द्वैतवनात आम्ही जाणार, हेही त्या पांडवांना आधीच कळलं असलं पाहिजे. ती दिव्य दृष्टी त्यांच्याजवळ नसली, तरी ती प्राप्त करून देणारे आमच्या राजसभेत अनेक आहेत. पांडवांच्या त्या कृतीबद्दल संतप्त होण्या ऐवजी त्यांचंच गुणगान गात बसलेले आमचे वयोवृद्ध, तपोवृद्ध उलट आमच्या माथी दोष थापण्यासाठी राजसभा बोलावीत आहेत… अन् त्याबद्दल कुणाला ना खंत, ना खेद!’

कर्णाच्या त्या बोलण्याने साऱ्या सभेचे रूप बदलले. दुर्योधनाच्या चेहऱ्यावर अभिमानयुक्त आनंद उमटला. धृतराष्ट्रांनी विचारले, ‘कर्णा, तू बोलतोस, त्यात कदाचित सत्य असेलही; पण जो अपमान घडला, तो भरून येत नाही.’

‘जय-पराजयाची निश्चिती कुणाला नसते. गंधर्वांकडून आमचा पराजय झाला आहे. पांडवांकडून नव्हे. त्याबद्दल कोणताही सुज्ञ आम्हांला दोष देणार नाही. एखादा महायज्ञ करूनही हा पराजय धुऊन काढता येईल.’

‘महायज्ञ! कशाच्या बळावर? तुमच्या रथशाळा, गजशाळा, शस्त्रगृह सुसज्ज करण्यात कौरवांची कोषागारं रिती झाली आहेत, याची कुणाला जाणीव आहे?’ विदुराने विचारले, ‘राधेया, कल्पनेत रमून, असलेल्या ऐश्वर्याची उधळण करणं सोपं असतं. ती मोकळी कोषागारं भरण्याचं सामर्थ्य कुणाला?’

‘मला ते सामर्थ आहे. मी एकटा दिग्विजय करून कौरवांची रत्नघरं परत समृद्ध करीन.’

‘केव्हा?’ भीष्मांनी विचारले.

कर्णाने आपली दृष्टी पितामहांच्या दृष्टीला खिळवली. तो म्हणाला, ‘पितामह! पराक्रमाच्या लालसेनं नव्हे, तर मित्राचा कलंक धुऊन काढण्यासाठी मी लवकरच दिग्विजयासाठी बाहेर पडेन. पांडवांच्या राजसूयापेक्षाही भव्य असा यज्ञ पार पाडून दाखवीन. एकच विनंती आहे. ज्या वेळी मी दिग्विजयावरून परत येईन, तेव्हा आज माझ्या निर्भर्त्सनेसाठी जशी राजसभा आयोजित केलीत, तशीच राजसभा माझ्या स्वागतासाठी आयोजित करा. या राजसभेत परत येईन, तो सन्मान भोगण्यासाठीच येईन. येतो मी!’

‘कर्णा, तुझा विजय असो.’ म्हणत दुर्योधनाने भर राजसभेत कर्णाला मिठी मारली आणि कर्णाचा हात धरून तो सभेतून निघून गेला.

✍️ *क्रमश:* ✍️