🚩 *राधेय/२७* 🚩
द्वैतवनाकडे गेलेल्या कौरवांच्या बातम्या दररोज हस्तिनापुराला येत होत्या. त्या ऐकून धृतराष्ट्राला समाधान वाटत होते. शकुनि, कर्ण यांच्यासह दुर्योधन गोधन पाहत होता. खिल्लारे मोजली जात होती.
घोषयात्रा पुरी करून दुर्योधन आपल्या परिवारासह द्वैतवनाकडे वनसंचारासाठी निघाला होता.
धृतराष्ट्राचे ते समाधान फार काळ टिकले नाही.
एके दिवशी जी वार्ता राजप्रसादात आली, तिने धृतराष्ट्र, विदुर, भीष्म, द्रोणाचार्य यांची मने चिंतेने भरून गेली.
कौरव वनात गेले असता गंधर्वांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. त्यात दुर्योधनासह कौरवस्त्रिया गंधर्वांनी पकडून नेल्या होत्या. सुदैवाने तेथून जवळच राहणाऱ्या पांडवांना ते कळले आणि संकटात सापडलेल्या कौरवांच्या मदतीला अर्जुन धावला. गंधर्वाने पकडून नेलेला दुर्योधन व दुर्योधन परिवार अर्जुनाने सोडवून आणला. त्या घटनेमुळे धृतराष्ट्र संतप्त बनले होते.
विदुर, भीष्म, द्रोण अर्जुनाच्या मोठ्या मनाचे, शौर्याचे, मुक्त कंठाने कौरवराजसभेत गुणगान गात होते.
दुर्योधनाच्या आगमनाकडे साऱ्यांचे लक्ष लागले असता, एके दिवशी सायंकाळी दुर्योधन घोषयात्रेवरून माघारी आला. त्याला राजप्रसादात सोडून कर्ण घरी आला.
घरात चमत्कारिक वातावरण होते. कर्णपुत्र, अधिरथ, राधा, कर्णबंधू- सारे कर्णाची दृष्टी चुकवीत होते.
रात्री महालात प्रवेश करताच उभ्या असलेल्या वृषालीकडे कर्णाची दृष्टी गेली. तिचा चेहरा पाहताच कर्ण हसला. तो म्हणाला, ‘आज वातावरण संतप्त दिसतंय्!’
‘नाही! मुळीच नाही.’ वृषाली म्हणाली.
कर्ण मोठ्याने हसला. ‘आनंद आहे.’
‘हसता काय?’ वृषाली उफाळली. ‘बाहेर तोंड दाखवायला जागा राहिली नाही.’
‘का?’
‘आपला पराक्रम कळला. साऱ्यांना ठाऊक झालंय् ते.’
‘वसू जय आणि पराजय यांचं एका गोष्टीत मात्र मोठं साधर्म्य आहे. दोन्हींच्याही कथा अतिरंजित असतात.’
‘घोषयात्रेत घडलं, ते खोटं?’
‘खोटं नव्हे! अतिरंजित!’ कर्ण वृषालीजवळ गेला. तिचा हात धरून पलंगाकडे गेला. शय्येवर बसत कर्ण म्हणाला, ‘वसू, आम्ही घोषयात्रा आटोपली. मृगया करीत समाधानानं आम्ही द्वैतवनाकडं जात होतो. जलक्रीडेसाठी सरोवरांच्या जागा सुसज्ज करण्यासाठी सेवक पुढं गेले होते. दुर्दैवानं त्याच वेळी त्या सरोवरात एक गंधर्व आपल्या स्त्रियांसह जलक्रीडा करीत होता. गेलेले दूत गंधर्वानं माघारी पाठविले. द्वैतवन ही कुरुराज्याची भूमी. त्या भूमीत सेवकांचा झालेला अपमान दुर्योधनाला सहन झाला नाही. तो युद्धाला उभा राहिला. युवराज ऐकत नाहीत, हे लक्षात येताच मी सैन्यासह गंधर्वावर चालून गेलो.’
‘अन् मग?’
‘मग काय; व्हायचं तेच झालं! गंधर्व आकाशयुद्धात प्रवीण. आम्ही वनात प्रवेश केला नाही, तोच आकाशातून चारी बाजूंनी शरवर्षाव होऊ लागला. बाण वृक्षराईतून येतात, की आकाशातून, हेच कळेना. समोर शत्रू दिसत नव्हता. आमचे सैनिक मात्र घायाळ होत होते. साऱ्या गंधर्वांनी आम्हांला त्या निबिड वनात घेरलं. माझा रथ हळूहळू दुबळा बनत होता. छत्र, धुरा, ध्वज, ईषा तुटत होत्या. शेवटी रथ सोडून विकर्णाच्या आधारानं जीव वाचवता आला…’
‘अन् युवराज…’
‘मी व विकर्ण जखमी अवस्थेत मिळेल त्या वाटेनं सुरक्षित जागी पोहोचलो. सारं कौरव सैन्य वनात तसंच विखुरलं होतं, युद्ध थांबल्याबरोबर सारे गोळा होत असता, युवराजांची कथा कळली. माझा पराभव झालेला पाहताच युवराज मोजक्या सैन्यानिशी गंधर्वांवर तुटून पडले आणि प्रबळ गंधर्वांनी स्त्रीपरिवारासह युवराजांना पकडून नेलं. ते वनवासी पांडवांना समजलं अन् अर्जुनानं दुर्योधनाची सुटका केली. युवराज स्त्रीपरिवारासह सुखरूप माघारी आले.’
‘पण इथं तर सारे तुम्हांलाच दोष देतात.’
‘मला?’
‘हो! युवराजांना एकाकी सोडून तुम्हीच रणांगणातून माघार घेतलीत, असं बोललं जातं.’
‘वसू, जे रणांगणावर लढतात, ते कधी त्याबद्दल बोलत नाहीत; आणि ज्यांनी रणांगण पाहिलेलं नसतं, ते सदैव रणांगणाच्या कथा सांगण्यात रमतात. म्हणून तर त्या कथांना एवढा रंग चढतो. वसू, रणांगणाचा रंग गुलाबी नसतो. तो थिजल्या रक्ताचा गर्द तांबडा रंग असतो. विजयाबरोबर तिथं हास्य प्रगटत नाही. घायाळ वीरांच्या वेदनांनी ती रणभूमी आक्रोशत असते. विजयानंतरही त्या भूमीवर तो मृत्यू घोटाळत असतो, त्याच्या शांत पावलांचा आवाज फक्त विजयी वीरालाच ऐकू येत असतो.’
कर्ण उठला. त्याच्या डोळ्यांसमोर ते रणांगण दिसत होते. चेहऱ्यावर वेगळीच छाया प्रगटली होती. वृषालीकडे न पाहता कर्ण बोलत होता,
‘वसू, पौरुषाचा अहंकार हा माझा स्थायिभाव. वेदना सोसणं हा तर स्वभाव. मृत्यूच्या वल्गना मी सदैव करीत असे; पण त्या रणभूमीत एक क्षण असा आला की, चारी बाजूंनी पावसाची टपोरी सर उतरावी, तसा शरवर्षाव होऊ लागला. काही दिसेनासं झालं. ऐकू येत होतं गंधर्वांचं विजयी हास्य, त्या निबिड अरण्यात साक्षात मृत्यू उभा असल्याची जाणीव झाली अन् सारा अहंकार, बळ कुठच्या कुठं गेलं. दिसेल त्या मार्गानं मी जीव वाचवण्यासाठी धावत सुटलो. ज्या रथाचा मी आधार घेतला, तो विकर्णाचा रथ होता, हे फार मागाहून मला कळलं.’
कर्ण वळला. वृषालीच्या नेत्रांत अश्रू तरळत होते. तिच्याकडे बोट करीत कर्ण म्हणाला, ‘वसू हेच ते अश्रू; ज्यांनी तुझ्या पतीला मृत्यूचं भय शिकवलं.’
वृषालीने वर पाहिले. तिच्या डोळ्यांकडे पाहत कर्ण म्हणाला, ‘जेव्हां शत्रूनं वेढलं, चारी दिशा व्यापल्या, अटळ पराजय समोर दिसू लागला, त्याच वेळी, वसू, साक्षात तूच समोर उभी राहिलीस अन् एका तुझ्या आठवणी बरोबर जीवनाची सारी आसक्ती उफाळून वर आली. पुरुषत्वाचा अहंकार, स्वाभिमान, अस्मिता साऱ्यांचा क्षणात विसर पडला. जीवनाची सारी आसक्ती तुझ्या रूपानं प्रगट झाली. माझ्या एकाकी जीवनातला एक ओलावा एवढा प्रबळ आहे तर ज्यांच्या जीवनांत उदंड स्नेह उदंड ऐश्वर्य असेल, त्या वीरांचं काय होत असेल? वसू, माझ्या जीवनातील तुझं स्थान किती मोठं आहे, हे मला त्या मृत्यूच्या रेषेवर उभं असता प्रथमच जाणवलं.’
वृषाली कर्णाच्या मिठीत बद्ध होत गुदमरल्या स्वरात म्हणाली, ‘नाथ, मला सारं मिळालं, सारं मिळालं…’
बाहेर शुभ्र चांदणे पडले होते.
✍️ *क्रमश:* ✍️
