🚩 *राधेय/२६* 🚩
कर्णाने सांगितले, ते काही खोटे नव्हते. हस्तिनापुरात नवा उत्साह संचारला होता. रथशाळा-शस्त्रशाळा सुरू झाल्या. राज्याबाहेर विखुरलेले कारागीर परत हस्तिनापुरात बोलावण्यात आले. रथशाळेत सुदृढ रथांची निर्मिती सुरू झाली. शस्त्रशाळेत खड्ग, तोमर, प्रास, नाराच बाण तयार होत होते. गजशाला, अश्वशाळेत सुलक्षणी जनावरांची जोपासना होत होती. आश्रमातून शस्त्रविद्येत निपुण असे वीर तयार होत होते. दुर्योधन, कर्ण यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील अठरा कारखाने अहोरात्र काम करताना दिसू लागले.
वृषसेन दुर्योधनपुत्रांबरोबर आश्रमात जात होता. दुर्योधनासह कर्ण राज्यकारभार पाहत होता. उलटणाऱ्या वर्षांचंही भान त्यांना राहिलं नव्हतं.
दुर्योधन-महालात कर्ण आणि दुर्योधन बसले होते. रात्रीची वेळ होती. दुर्योधन म्हणाला, ‘मित्रा, सुवर्णकारांनी गजशाळेचे हौदे, अंबाऱ्या चांगल्या केल्यात. नाही?’
‘युवराज, तुमच्यासारखा कलेचं कौतुक करणारा धनी असल्यावर कारागिरांना आपोआप हुरूप चढतो.’
‘कर्णा, रथशाळा, शस्त्रशाळा, आश्रम पाहून आता कंटाळा आला. दररोज तेच तेच!’
‘युवराज, आता दिवस चांगले आहेत. आपलं मन रमवायला मृगयेला जायला काहीच हरकत नाही. हे दिवस मृगयेचेच.’
‘छान कल्पना सुचवलीस. खरंच, आपण मृगयेला जाऊ या. तेवढाच बदल बरा वाटेल.’
सेवक महालात आला. त्याने सांगितले, ‘शकुनि महाराज येत आहेत.’
कर्ण-दुर्योधन उभे राहिले. शकुनीचे स्वागत दोघांनीही केले.
शकुनि स्थानापन्न होताच दुर्योधनाने विचारले, ‘मामा, अलीकडं आपलं दर्शन दुर्मीळ झालंय्.’
‘
दुर्योधना, अरे, आम्हांला द्यूताखेरीज काही येत नाही. तू द्यूत खेळत नाहीस. मग भेट घडणार कशी?’
कर्ण उठला. शकुनीकडे जात तो म्हणाला, ‘महाराज, या कर्णावर एवढा राग नसावा. एकदा क्रोधाच्या आहारी जाऊन बोललो; पण ते आपल्या मनातून जात नाही. मोठ्यांनी क्षमा करायची नाही, तर कुणी करायची?’
शकुनीने उठून कर्णाच्या खांद्यावर हात ठेवला. ‘नाही, अंगराज, मी सहज थट्टा केली. माझ्या मनात काही नाही. तुम्ही दोघे निश्चयानं उभे राहिलात, म्हणूनच हस्तिनापूर परत राजधानी भासू लागली. सारे प्रजाजन तुमचं कौतुक करतात. पांडवांची आठवणही त्यांच्या मनांत राहिली नाही.’
‘बिचारे पांडव!’ दुर्योधन हसून म्हणाला, ‘कुठं रानावनांत फिरत असतील, कोण जाणे!’
‘युवराज! वनवासी पांडव सध्या आपल्या राज्याच्या द्वैतवनातच वनवास भोगीत आहेत.’ शकुनि म्हणाले.
‘द्वैतवनात? पण, मामा, हे तुम्हांला कुणी सांगितलं?’ कर्णाने विचारले.
‘अंगराज, आज धृतराष्ट्र महाराजांच्या दर्शनाला गेलो होतो. तिथं एक कथेकरी ब्राह्मण आला होता. त्यानं पांडवांचा वृत्तांत सम्राटांना सांगितला. वनवासातल्या पांडवांचे कष्ट ऐकून सम्राटांना खूप दुःख झालं.’
‘मग तातांनी त्यांना बोलावलं, की काय?’ दुर्योधन उद्गारला.
‘नाही! उलट, ते म्हणाले, पांडवांना त्यांच्या संपत्तीचा अल्पांशही देणार नाही.’
‘खरं?’ आनंदी होऊन दुर्योधनाने विचारले.
‘हो! पण पांडवांची बातमी ऐकून सम्राट चिंतेत पडले आहेत, पांडवांच्या हातून कौरवांचा नाश होईल, अशी त्यांना भीती वाटत आहे.’
‘तातांची भीती व्यर्थ आहे.’ दुर्योधन म्हणाला, ‘पांडव वनवास संपवून येतील, तेव्हा हस्तिनापुरचं सामर्थ्य शतपटींनी वाढलेलं असेल.’
‘युवराज, आपण मृगयेला जाणारच आहो. इतरत्र जाण्यापेक्षा द्वैतवनातच आपण गेलो, तर…’
‘द्वैतवनात?’
‘हां! पांडव तिथं आहेत. सर्व वैभवासह आपण त्या वनात मृगयेला जाऊ. वनवास भोगणाऱ्या, वल्कलं नेसलेल्या, कंदमुळं खाऊन जगणाऱ्या त्या पांडवांना आपलं ऐश्वर्य पाहून निश्चितपणे खेद होईल. शत्रूच्या मनाचा जळफळाट पाहण्यात वेगळा आनंद सामावलेला असतो.’
‘ते खरं!’ दुर्योधन विचारात पडला. ‘पण तात याला संमती देणार नाहीत.’
शकुनीने विश्वास दिला, ‘युवराज, त्याची चिंता करू नका. द्वैतवनातच आपलं गोधन आहे. त्या निमित्तानं आपल्याला सम्राटांची परवानगी मिळेल. ते काम माझ्यावर सोपवा.’
दुसऱ्या दिवशी कर्ण व दुर्योधन धृतराष्ट्रांपुढे गेले. शकुनि तेथे आधीच गेले होते. क्षेमकुशल चालले असता त्या ठिकाणी पूर्वसंकेताप्रमाणे संगम नावाचा बल्लव आला आणि त्याने धृतराष्ट्राला गोधनाचे वृत्त सांगितले.
शकुनीने कर्णाकडे पाहिले. कर्ण पुढे झाला. तो म्हणाला, ‘महाराज, एक विनंती आहे.’
‘राधेया, बोल!’
‘सध्या मृगयेचा काळ आहे. युवराजही राज्यकारभारात थकलेत. आपण आज्ञा केली, तर द्वैतवनात आम्ही जाऊ. गौळीवाडे पाहू. खिल्लारांचं वय, जाती, वर्ण, इत्यादी गणना करू. ते करणं आवश्यक आहे. मृगयेबरोबर तेही काम होऊन जाईल.’
‘नाही, राधेया, मी अनुमती देऊ शकत नाही.’
‘का?’ दुर्योधनाने विचारले.
‘कारण तिथं पांडवांचं वास्तव्य आहे.’
शकुनि म्हणाला, ‘महाराज, त्या पांडवांशी आमचं काहीच काम नाही. आम्ही मृगया करू. गोधन पाहू.’
धृतराष्ट्र विचारात पडलेले पाहून तेथे बसलेले भीष्माचार्य न राहून म्हणाले, ‘शकुनि, मृगया करावयाची आहे, तर अनेक अन्य जागा उपलब्ध आहेत. तिथं पांडव आहेत, तिथं तुम्ही जावं, असं मला वाटत नाही. तो धोका सम्राटांनी घेऊ नये.’
‘कसला धोका?’ दुर्योधन म्हणाला, ‘ते वनवासी. ते आमचं काय करणार? अन् पांडवांची चिंता वाटत असेल, तर ती करू नका. निःशस्त्रावर वार करण्याची आमची रीत नाही. आम्ही तर आमच्या परिवारासह जाणार आहोत. आम्ही त्या पांडवांकडं पाहणारसुद्धा नाही. मृगया करून वासरांची मोजणी करून आम्ही परतू.’
‘असं असेल, तर तुम्ही जाऊ शकता.’ धृतराष्ट्रांनी परवानगी दिली.
घोषयात्रेसाठी जाण्याचा बेत निश्चित झाला. त्या यात्रेची तयारी सुरू झाली. दुर्योधन आपल्या वैभवासह घोषयात्रेला निघाला. त्याच्याबरोबर शकुनि, कर्ण, इत्यादी राजे होते. कौरवस्त्रियाही बरोबर होत्या. दळासहित सर्व परिवार घेऊन दुर्योधन द्वैतवनाकडे जात होता.
हत्तींच्या आणि रथांच्या घरघराटानं तो मार्ग भरून गेला.
✍️ *क्रमश:* ✍️
