🚩 *राधेय/२५* 🚩
भरपूर मद्य प्राशन करूनही कर्णाचे मन स्थिरावले नव्हते. काळोख पडला होता. महालातल्या समया केव्हाच प्रज्वलित करण्यात आल्या होत्या. कर्ण उठला; त्याने आपले उत्तरीय घेतले. दारातच वृषालीची गाठ पडली. कर्णाच्या खांद्यावरचे उत्तरीय पाहून वृषालीने विचारले, ‘बाहेर जाणार?’
‘हो!’
‘पण सकाळपासून आपण उपाशीच…’
‘एका दिवसाच्या उपवासानं काय होतं? बारा वर्षांचा वनवास पत्करतात, तिथं एका दिवसाच्या उपवासानं काय होतं? वृषाली, माझा रथ आणायला सांग.’
वृषाली गेली. कर्ण पायऱ्या उतरून खालच्या सोप्यावर आला. सोप्यावरच्या बैठकीवर अधिरथ बसला होता. त्याच्या जवळच द्रुमही होता. शत्रुंजय, वृषकेतु उभे होते. दाराशी राधाई होती. वृषकेतु सांगत होता, ‘सीमेपर्यंत सारे पोहोचवायला गेले होते. सारे रडत होते.’
‘आणि, आजोबा, पांडव रडत नव्हते. युधिष्ठिर महाराजांनी साऱ्यांची समजूत काढली अन् सर्वांचा निरोप घेतला.’
अधिरथाने दीर्घ श्वास सोडला. तो म्हणाला, ‘दैव, दुसरं काय! अरे, ज्यांनी थोड्याच दिवसांपूर्वी दिग्विजय करून राजसूय केला, तेच पराक्रमी पांडव द्यूतात हरतात काय अन् वनवासाला जातात काय!’
‘पुरुष सोसतील… पण बिचारी राजकन्या!’ राधाईने डोळे टिपले.
कर्ण खाकरला. साऱ्यांचे लक्ष तिकडे गेले. कर्ण पुढे झाला. अधिरथाने विचारले, ‘बाहेर निघालास?’
‘हो! प्रासादाकडं!’
‘जरूर जा; पण येताना माझं एक काम कर.’
‘काय?’
‘येताना ते फासे जरा बघायला घेऊन ये. मला त्यांचं दर्शन घ्यायचंय्.’
‘तात!’
‘राधेया! अरे, परमेश्वरापेक्षाही मोठे आहेत ते. आता या भूमंडळात तेवढाच पराक्रम उरला आहे.’
‘तात!’
‘नको, कर्णा, मला ती हाक मारू नकोस. तू मला नदीपात्रावर सापडलास. तुला मी ईश्वरप्रसाद म्हणून घरी आणलं. माझं पुत्रहीन जीवन तुझ्या पावलांनी सफल झालं, असं वाटलं. तू आलास अन् हा द्रुम जन्माला आला. तुझ्या गुणानं कुळी उद्धरली, असं आम्हांला वाटलं; पण ते सारं खोटं होतं. कर्णा, तुझ्या या कृत्यानं आम्हांला तोंड दाखवायलाही जागा राहिली नाही.’
‘माझं कृत्य! काय केलं मी?’
‘काय केलं? आज सारी नगरी तेच बोलत आहे. धार्ष्ट्य असलं, तर ऐक जा- तुझ्या सल्ल्यांनं तो द्यूत घडला. तू तो घडवून आणलास, असं सारे बोलतात.’
‘खोटं! तात, मी युद्धाचा सल्ला दिला होता. या द्यूतात माझा कसलाही हात नव्हता.’
‘पण लोकांना ते पटत नाही.’
‘त्याला मी काय करणार?’
‘अन् त्यांचं खोटंही नाही. तू आग्रह धरला असतास, तर युवराज द्यूत खेळले नसते.’
‘युवराज एवढे आज्ञाधारक केव्हापासून बनले?’ कर्ण हसत म्हणाला.
‘राधेया, मी जेवढा तुला ओळखतो, तेवढाच युवराजांनाही. तुझा विरोध सहन करण्याची ताकद युवराजांना नाही, हे मला पूर्णपणे माहीत आहे… अन् हे सारं तू उघड्या डोळ्यांनी पाहिलंस, घडू दिलंस. हेच तुझं पातक आहे. कर्णा, जगाला फसवता येईल, पण मनाला… ते जमणार नाही… मद्यानंही…’
‘मी येतो.’ कर्ण भरभर पायऱ्या उतरला. वाड्यासमोर रथ उभा होता. रथाचे पलिते वाऱ्यावर फरफरत होते. कर्णा पाठोपाठ द्रुम धावला. कर्ण रथावर चढत असता द्रुम म्हणाला, ‘दादा, मी येतोय्.’
‘नको!’
कर्णाने वेग हाती घेतले. सेवकांनी घोड्यांच्या ओठाळ्या सोडल्या. आसूड घेतलेला कर्णाचा हात उंचावला. त्या आवाजाबरोबर रथ उधळला.
राजप्रासादात गेल्यावर दुर्योधन तोरणस्फटिकेत असल्याचे कर्णाला समजले. कर्णाने रथ तसाच तोरणस्फटिकेत हाकारला.
तोरणस्फटिका मशालींच्या प्रकाशात प्रकाशली होती. कर्णाचा रथ थांबताच सेवकांनी रथ धरला. कर्ण रथातून खाली उतरला.
कर्णाने विचारले, ‘युवराज!’
‘आत आहेत.’
‘आणखी कोण आहे?’
‘शकुनि महाराज…’
‘आणि…’
‘कोणी नाही.’
कर्णाच्या चेहऱ्यावर तशा स्थितीतही एक स्मित उमटले.
तो भरभर पायऱ्या चढून गेला. सभागृहाच्या द्वाराशीच कर्ण थांबला. सारे सभागृह समयांच्या उजेडात प्रकाशमान झाले होते. सभास्थानासमोर स्फटिकभूमीवर तांबडी लोकरी बैठक पसरली होती. त्यावर चंदनी चौरंग द्यूतपट म्हणून उभा होता. त्यांच्या दोन्ही बाजूंना पुरुष उंचीच्या समया तेवत होत्या.
शकुनि आणि दुर्योधन मद्याचा आस्वाद घेत द्यूत खेळत होते.
दुर्योधनाने फासे घोळवून पटावर टाकले. तो ओरडला, ‘मामा, मी जिंकलं!’
‘होय, युवराज, मी माझी वैडूर्याची अंगठी हरलो आहे.’ शकुनि म्हणाले.
दुर्योधन समाधानाने मोठ्याने हसला. त्याने मद्यपात्र रिते केले. मागे उभ्या असलेल्या दासीने तत्परतेने मद्यपात्र परत भरले. आपल्या ओठांवरून तळहात फिरवीत दुर्योधनाने विचारले, ‘तो मूर्ख युधिष्ठिर कसा हरला, ते कळत नाही.’
‘युवराज, द्यूताला हाताचा गुण असावा लागतो. तो तुमच्या हातात आहे. युवराज, उचला फासे. आज ते तुम्हांला वश आहेत.’
‘मामा, पण बोला.’
आपल्या गळ्यातला हार स्पर्शीत शकुनि म्हणाले, ‘माझा हा मूल्यवान हार मी पणाला लावतो. युवराज, याबद्दल तुम्ही काय लावणार?’
‘मी!’ आत प्रवेश करीत कर्ण म्हणाला, ‘युवराजांच्या गळ्यातला हार.’
दुर्योधन-शकुनींनी एकाच वेळी कर्णाकडे पाहिले.
दुर्योधन धडपडत उठला. कर्णाकडे जात तो म्हणाला, ‘ये, मित्रा! मी आज आनंदात आहे. ते पांडव बारा वर्षं वनवास अन् एक वर्ष अज्ञातवासात गेले. या मामांच्यामुळं ते साध्य झालं.’
‘पण, युवराज, हा दुसरा द्यूत घडला कसा? मला कसं माहीत नाही?’
दुर्योधन हसला. मद्याचा पुष्कळ अंमल झाला होता. तो म्हणाला, ‘ते गुपित आहे. मामांनीच सांगितलं की, तुला त्यात घेऊ नका, म्हणून. तू विरोध केला असतास ना?’
कर्णाने होकारार्थी मान डोलावली.
‘बरोबर! मामा कधी चुकायचे नाहीत. ते पांडव गेले अन् मामा अन् मी तातांकडं गेलो. तातांनी परत संमती दिली. पांडवांना परत आह्वान दिलं, अन् मूर्ख युधिष्ठिरानं स्वीकारलं. पुढं कारभार झटपट. एकच पण मामांनी लावला अन् पांडव हरले कायमचे…’
दुर्योधनाने कर्णाच्या खांद्यांवर हात ठेवले. त्याच्यासह कर्ण द्यूताकडे जात होता. द्युताकडे लक्ष जाताच दुर्योधन म्हणाला, ‘अरे कर्णा, आज मी मामांबरोबर द्यूत खेळलो. मी हरलो नाही. मामा हरले, मी जिंकलं.’
‘युवराज कधी हरत नसतात.’ कर्ण म्हणाला.
‘खोटं वाटतं? विचार मामांना…’ दुर्योधन म्हणाला.
‘अंगराज, युवराज म्हणतात, ते खरं आहे. आज त्यांना फासे वश आहेत.’
‘वा! एका दिवसात बरीच प्रगती झाली, म्हणायची. युवराज, असेच खेळत राहाल, तर बारा वर्षांत आपलाही कृतहस्त अन् अतिदेवी असा लौकिक सहज होऊन जाईल.’
दुर्योधन हसला. तिकडे लक्ष न देता कर्ण म्हणाला, ‘युवराज, आता एकच कमतरता आहे.’
‘कसली?’ दुर्योधनाने विचारले.
‘आपल्या राज्यात मद्यशाला सुरू करायला हव्यात. द्यूतगृह तयार आहेच. त्याला पुरेल, एवढं मद्य निर्माण व्हायला हवं.’
दुर्योधनाने कर्णाकडे रोखून पाहिले. तो म्हणाला, ‘चेष्टा करतोस?’
‘युवराजांची चेष्टा मी कशी करीन? आता भ्यायचं काही कारण नाही. बारा वर्षांत आपण द्यूतात निष्णात बना, जरी पांडव परत आले, तरी केव्हाही परत बारा वर्षं त्यांना पाठवून देता येईल.’ कर्णाने दासीकडे पाहिले. तो दासीला म्हणाला, ‘दासी, यापुढं युवराजांच्या मद्याचं पात्र रिकामं ठेवीत जाऊ नकोस. भर ते पात्र.’
दासी पुढे झाली. तिने पात्र भरून युवराजांच्या हाती दिले. संतापाने ते पात्र फेकून देत दुर्योधन ओरडला, ‘मित्रा, समाधानाचा एक दिवसही भोगण्याचा माझ्या दैवी नाही का, रे?’
‘उद्यापासून आपल्याला त्रास होणार नाही, युवराज!’
‘उद्या काय?’
‘मी चंपानगरीला जातोय्. ती अनुज्ञा मागण्यासाठीच मी अपरात्री आलो.’
कर्णाच्या दंडावर दुर्योधनाची पकड आवळली गेली. दंडात ती बोटे रुतत होती. ‘नाही, मित्रा, मला सोडून तुला कुठंही जाता येणार नाही.’
‘का? पांडव परत येतील, अशी तुला भीती वाटते?’
‘भीती?’ दूर होत दुर्योधन म्हणाला, ‘तेवढा एकच शब्द मला माहीत नाही.’
‘अंगराज! एवढं अशुभ चिंतू नये. अंगावरच्या वस्त्रांनिशी पांडव चालत गेलेले तू पाहिलं नाहीस, वाटतं?’ शकुनीने विचारले.
‘अन् त्यांच्या पाठोपाठ नगरसीमेपर्यंत सारं हस्तिनापूर अश्रू ढाळीत जात होतं, ते तुम्ही पाहिलं नाहीत?’ कर्णाने उलट विचारले.
‘आज रडतील. उद्या हसतील.’
‘कुणाला?’
‘काय म्हटलंस?’ शकुनीने विचारले.
‘शकुनिमहाराज, जुगार एकदाच जिंकला जातो. बारा वर्ष हां हां म्हणता सरतील आणि पांडव जेव्हा माघारी येतील, तेव्हा हेच रडणारे लोक त्यांना हसत खांद्यांवरून घेऊन येतील. कारण तोवर तुमच्या जुगारी अड्ड्यांनी अन् मदिरेच्या गुत्त्यांनी प्रजा त्रस्त झालेली असेल!’
‘अंगराज!’ संतापाने उठत शकुनि म्हणाला.
‘मामा, पांडवांना वनवासाला पाठवून संकट टळत नाही. तुम्हांला ते नको असतील, तर त्यांचा वनवास संपण्याच्या आधी जनमानसात त्यांचं जे सिंहासन आहे, ते उलथवून टाका.’
‘आम्ही तेही करू.’ दुर्योधन म्हणाला.
‘कशाच्या बळावर? फाशांच्या? ती कला अजून शकुनींनाही अवगत झाली नाही. युवराज, स्वतःचं रूप फाशांच्या पटावर विसरू नका. भर स्वयंवरातून राजकन्येचं हरण करण्याचं ज्याचं धार्ष्ट्य आहे, मित्रासाठी अंगदेशाचं राज्य फेकण्याचं ज्याचं औदार्य आहे, ज्याच्या हातातली गदा बलरामकृपेनं अजोड आहे, तो कौरवराज्याचा युवराज द्यूतपटामध्ये गुंततो, याखेरीज दुर्दैव कोणतं? शकुनींच्या हस्तलाघवानं राज्यं सांभाळली जात नाहीत. रणांगणावरचा जुगार निश्चितपणं द्यूतपटावर ठरवला जात नाही.’
‘बस्स कर, अंगराज! यापुढं एका शब्दाचाही उपमर्द मी सहन करणार नाही. ज्याच्यामुळं हा दिवस दिसला, त्याच्या बद्दल ही कृतज्ञता! युवराज, तुम्हांला निवड करावीच लागेल. हा राधेय किंवा मी.’
दुर्योधन दोघांकडे पाहत होता. काय उत्तर द्यावे, हे त्याला सुचत नव्हते.
कर्ण पुढे झाला, ‘युवराज, मी शकुनि महाराजांची क्षमा मागतो.’
शकुनि त्या बोलण्याने सुखावले.
कर्णाने दुर्योधनाला विचारले, ‘युवराज, तुमचं खड़्ग कुठंय्?’
‘रात्री द्यूतगृहात आराम करीत असता खड़्ग कोण बाळगतं?’ दुर्योधनाने उत्तर दिले.
‘युवराज, आपला किरीट?’
‘ही काय राजसभा आहे किरीट चढवायला?’
‘निदान आपल्या छातीवर कवच तरी हवं होतं,’ कर्ण म्हणाला.
दुर्योधनाला हसू आवरणे कठीण गेले. तो म्हणाला, ‘मित्रा, मद्य जास्त झालेलं दिसतंय्! कवच रणांगणात वापरता, की द्यूतगृहात?’
‘तेच सांगतोय् मी, युवराज! गरजेनुसार शस्त्र, अस्त्र, वस्त्र, भूषण धारण केलं जातं. रणांगणात शस्त्र उपयोगी पडलं, म्हणून शय्यागृहात कुणी सशस्त्र वावरत नाही. ती शस्त्रं शस्त्रागारातच टाकावी लागतात. युवराज, फार अवधी आता राहिला नाही. बारा वर्षं हां हां म्हणता जातील. त्या आधी शस्त्रशाळा, गजशाळा पूर्ववत व्हायला हव्यात. राज्य सुरक्षित बनायला हवं.’
‘योग्य सल्ला दिलास, मित्रा!’ दुर्योधनाने शकुनीकडे पाहिले. पटावरचे फासे उचलून फेकून देत तो म्हणाला, ‘मित्रा, मी तुला वचन देतो. यापुढं मी या फाशांना स्पर्श करणार नाही. त्यांचा आधार घेणार नाही.’
संतापाने आपले उत्तरीय सावरीत शकुनि म्हणाले, ‘युवराज, येतो मी! आज्ञा?’
‘थांबा! मामा, मी तुमचा सदैव कृतज्ञ आहे. जेव्हा काही गरज भासेल, तेव्हा कौरवांचं कोषागार तुमच्यासाठी मोकळं राहील. तुम्हांला कोणी अडवणार नाही.’
शकुनीच्या पाठोपाठ कर्ण दुर्योधनासह तोरणस्फटिकेच्या बाहेर आला.
दुर्योधनाला राजगृही सोडून कर्ण स्वगृही परतला.
अर्धी रात्र उलटून गेली होती. दार उघडले गेले. दारात हाती मशाल घेऊन अधिरथ उभे होते. अधिरथांनी मशाल पूर्ववत खांबावर लावली. दार लावले. ‘तात, तुम्ही अजून जागे?’
‘तुझी वाट पाहत होतो.’ अधिरथाचा आवाज कंपित झाला. ‘वसुषेण, तू रागावला नाहीस ना? तू जन्मल्यापासून कधी तुला कटू बोललो नाही. पण…’
कर्णाचे उभे अंग त्या हाकेने पुलकित झाले. अधिरथांनी कर्णाचे नाव वसुषेण ठेवले होते.
अधिरथांना मिठी मारीत कर्ण म्हणाला, ‘नाही, तात! केव्हा तरी मुलांना रागवावं. त्यानं मुलं सुखावतात. विश्रांती घ्या. उद्यापासून तुमच्यावर खूप ताण पडणार आहे.’
‘ताण?’
‘हो! आता रथशाळा, शस्त्रशाळांना वेग येणार आहे.’
अधिरथांच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहायला कर्ण तेथे थांबला नाही.
✍️ *क्रमश:* ✍️
