राधेय – भाग २४

🚩 *राधेय/२४* 🚩

कृष्ण द्रौपदीसह सभागृहातून जाताच थकलेला धृतराष्ट्र संजयाच्या, सेवकांच्या मदतीने सभागृहाबाहेर निघून गेला. सभागृहात एकच कुजबूज सुरू होती. कृपाचार्य, द्रोणाचार्य कुणाशी काही न बोलता सभागृहातून चालू लागले.

आतल्या आत संतापाने धुमसणाऱ्या दुर्योधनाने उठलेल्या शकुनीला खुणावले आणि शकुनीसह दुर्योधन गडबडीने गेला.

हळूहळू सारे सभागृह मोकळे झाले.

सभागृहात कर्ण शांतपणे आपल्या आसनावर बसून होता.

कसला तरी आवाज सुरू झाला.

कर्णाने पाहिले, तेव्हा कृष्ण बसलेल्या आसनावरून आपला थकला हात फिरवीत विदुर उभा होता.

विदुराने कर्णाकडे पाहिले आणि तोही सभागृहाच्या बाहेर निघून गेला.

त्या तोरणस्फटिकेत एकटा कर्ण उरला होता.

ते रत्नजडित सभागृह, ती सुवर्णासने, ते भव्य सिंहासन कर्ण पाहत होता. कर्ण आपल्या आसनावरून उठला.

ऐश्वर्यसंपन्न असलेले ते सभागृह भयावह वाटत होते. एक वेगळीच उजाड उदासीनता त्यावर पसरली होती.

हे ऐश्वर्य, ही मोकळी सुवर्णासनं, हे सिंहासन आणि हे धारण करणारी ही भूमी अशीच मोकळी राहणार! केव्हा ना केव्हा तरी हे घडणार आहे. ते अटळ आहे. मग ही ईर्ष्या, हा मत्सर, हा अपमान कशासाठी? यानं जन्ममृत्यूचं आह्वान टळणार आहे का?

कर्ण त्या विचाराने कासावीस झाला. त्या सभागृहातून बाहेर पडण्यासाठी तो राज-आसनांच्या मालिकेतून पायऱ्या उतरला. सभास्थानासमोरची भूमी चित्रवर्ण उर्णावस्त्राने आच्छादली होती. त्या मऊ वस्त्रावर पाऊल ठेवताच कर्णाची दृष्टी द्यूतपटाकडे गेली.

शकुनीने विजयाने उधळलेला द्यूतपट तसाच पडला होता. फासे विखुरले होते.

पायांनजीक पडलेल्या फाशांवर कर्णाचे लक्ष गेले. त्या फाशांवर कोरलेली हस्तमुद्रा त्याच्या डोळ्यांत भरली.

हस्तमुद्रा! ज्या मोकळ्या हातांनी फाशांची दाने टाकली, ते हात सारे जिंकूनही मोकळेच राहिले. ज्या हातांनी द्यूतचा पट मांडला, तो द्यूत जिंकताच त्याच हातांनी तो पट उधळून दिला होता. आता द्यूतपट साधी लाकडी फळी बनली होती. फाशांना हस्तिदंती सोंगट्यांखेरीज काही अर्थ उरला नव्हता.

पण याखेरीज फाशांना रूप लाभत नाही का?

मानवी बुद्धीने रचलेला द्यूत किती सहजपणे उधळला गेला!

कोणत्या इच्छेने?

ऐन वेळी कृष्ण कसा आला?

कर्णाच्या चेहऱ्यावर एक खिन्न स्मित उमटले.

ज्याला आईनं टाकलं, त्याला हे विधात्याचं भाकीत कळणार कसं?

पडलेला फासा उचलण्यासाठी कर्ण वाकला. फासा धरण्यासाठी पुढे केलेला हात एकदम मागे आला.

तृणांकुरात लपलेला चेंडू उचलायला जावे आणि तेथे फणा काढून बसलेल्या भुजंगाचे दर्शन व्हावे, तशी कर्णाच्या चेहऱ्यावर साक्षात भीती उमटली होती. मंतरल्यासारखी त्याची दृष्टी त्या फाशावर जडली होती.

त्या हस्तिदंती फाशावर एक नीलवर्ण, लांब, कुरळा केस डुलत होता.

त्या सूक्ष्म केसाच्या दर्शनाने एक सूक्ष्म, पण अत्यंत तीव्र अशी वेदना कर्णाच्या मनात विजेसारखी खेळली.

अपमानाच्या संतापात विवेक एवढा ढळावा! द्रौपदी विवस्त्र केली गेली असती, तर ते रूप पाहण्याचं धार्ष्ट्य झालं असतं का? यज्ञामध्ये समिधांवर तुपाची धार सोडतानादेखील ती धार उंचावून सोडावी लागते. ते अवधान राहिलं नाही, तर त्या धारेबरोबर प्रज्वलित होणाऱ्या अग्निशिखांनी हात होरपळून जातो. अपमानाच्या अग्नीवर वासनांची धार सोडताना ते अवधान कुठं गेलं? कसं हरवलं?

वासना? छे! वासनेचा लवलेशही नव्हता.

मग काय होतं?

त्या प्रश्नाचे उतर कर्णाला सापडले नाही. त्या केसाला स्पर्श करण्याची ताकद कर्णाच्या ठायी राहिली नव्हती. कष्टाने आपली नजर वळवून तो सभागृहाबाहेर जाऊ लागला. त्या सभागृहात आता क्षणभरही थांबण्याची त्याची इच्छा नव्हाती.

कर्ण सभागृहाच्या बाहेर आला. सभागृहाच्या विस्तीर्ण पायऱ्यांवरून जाणाऱ्या पाठमोऱ्या विदुराकडे त्याचे लक्ष गेले. पायऱ्यांखाली एक सुवर्णरथ उभा होता. त्या रथाकडे जाणाऱ्या कृष्णापाठोपाठ विदुर त्याला गाठण्यासाठी भरभर जात होता. कर्ण जेव्हा अर्ध्या पायऱ्या उतरला, तेव्हा रथाजवळ गेलेल्या कृष्णाला विदुराने मारलेली हाक ऐकू आली.

कृष्ण थांबला, त्याने वळून पाहिले.

जवळ येणाऱ्या विदुराबरोबर दूर पायऱ्यांवर उभा असलेला कर्णही कृष्णाच्या नजरेत आला.

जवळ गेलेल्या विदुराला कृष्ण म्हणाला, ‘विदुरा, काही सांगण्याची आवश्यकता नाही. मी दोष देत नाही. पण घडलं, ते बरं झालं नाही. अदृष्टातला विनाश मला स्पष्टपणे दिसत आहे. या भूमीत आता क्षणभरही थांबावं, असं वाटत नाही. येतो मी.’
कृष्ण आपला शेला सावरून रथारूढ झाला. रथापुढे सज्ज असलेले अश्वदळ दौडू लागले आणि कृष्णाच्या रथाला गती लाभली.

रथाचा दूर जाणारा आवाज ऐकू येत असता विदुर मागे वळला. त्याची दृष्टी पायऱ्यांवर उभ्या असलेल्या कर्णावर क्षणभर स्थिरावली; पण दुसऱ्याच क्षणी ती पायाकडे वळली.

विदुर सावकाश पायऱ्या चढत होता. कर्णाला टाळण्यासाठी कर्णाजवळून भरभर पायऱ्या चढत असता त्या वयोवृद्धाचा आपल्याच वस्त्रात पाय अडकला व तोल गेला. विदुरांकडे पाहत पायऱ्या उतरणाऱ्या कर्णाच्या ते ध्यानी आले. तो धावला. कर्णाच्या हातांनी विदुर सावरला गेला. कर्णाच्या बाहूंतून आपली सुटका करून घेत विदुर म्हणाला,

‘ठीक आहे! मी ठीक आहे, कर्णा!! दासीपुत्राचा तोल सावरला जात नाही. त्याला सदैव ठेचकळावं लागतं. कारण… कारण त्यानं परिधान केलेली वस्त्रं त्याच्या अंगामापाची नसतात.’

उत्तराची अपेक्षा न करता विदुर पायऱ्या चढत होता.

कर्ण पायऱ्या उतरत होता. कर्णाच्या मनात एकच विचार होता : ‘सुतपुत्राचा तरी तोल कुठं सावरला जातो?’

कर्ण प्रासादासमोर आला.

कृष्ण गेला, त्या वाटेवर दूर धुळीचे लोट दिसत होते. रथ दिसत नव्हता. दिसत होत्या, त्या गेला वाटेवर पडलेल्या रथाच्या चाकोऱ्या.

कर्णाचा रथ सामोरा आला. कर्ण रथारूढ झाला आणि सारथ्याने रथ हाकारला. कृष्ण गेलेल्या चाकोऱ्यांतूनच कर्णाचा रथ जात होता.

द्यूतगृहातून कर्ण स्वगृही परतला. दारातच द्रुम उभा होता. द्रुम सामोरा आला. त्याने विचारले, ‘दादा, ऐकलं, ते खरं?’

कर्णाने द्रुमाकडे पाहिले. ‘द्रुमा, तू काय ऐकलंस, ते मला माहीत नाही; पण मी फार थकलोय्.’

कर्ण सरळ आपल्या शय्यागृहाकडे गेला. शय्यागृह मोकळे होते. कर्ण काही वेळ तसाच उभा होता. त्या जागेचे मोकळेपणही त्याला भेडसावत होते. तो तसाच सौधाकडे गेला.

उन्हाच्या उभ्या किरणांत हस्तिनापूर तळपत होते. दूरवर प्रासादापर्यंत गेलेला राजरस्ता नजरेत येत होता. लांबवर झाडीतून उठलेले राजप्रासादाचे सज्जे दिसत होते. राजरस्त्यावर तुरळक वर्दळ दिसत होती.

मागे पावलांचा आवाज आला आणि कर्णाने मागे पाहिले. महालात वृषाली येत होती. कर्ण माघारी वळला. महालात येत असता वृषालीने विचारले, ‘द्यूतसभा संपली?’

‘हो!’

‘कृष्ण आले होते?’

‘तुला कसं समजलं?’

‘काही वेळापूर्वी कृष्णांचा रथ वाड्यासमोरून गेला.’

‘हं!’

कर्णाची ती वृत्ती पाहून वृषाली काही बोलली नाही.

काही वेळाने तिने म्हटले, ‘जेवण तयार आहे.’

‘मला भूक नाही.’ कर्ण शय्येकडे जात म्हणाला.

‘एक विचारू?’

‘विचार ना!’

‘आज द्रौपदीवस्त्रहरण झालं, म्हणे!’

‘झालं नाही. सुदैवानं टळलं.’

‘कुणाच्या?’

‘तिच्या नव्हे, आमच्या सुदैवानं! तिच्या नशिबी सदैवच कृष्णाचं सुदैव आहे.’

‘त्याचसाठी कृष्ण आले होते?’

‘हो! ऐन वेळी कृष्ण आला अन् कलंक टळला,’

‘कलंक? कसला कलंक?’

‘वसू, अनावृत स्त्रीला पाहण्याचा अधिकार फक्त दोघांचाच- एक पती अन् दुसरा पुत्र. यांखेरीज अन्य पुरुषांना तो अधिकार नाही. क्रोधाच्या आहारी जाऊन ते पातक घडत होतं, पण कृष्ण अवतरला अन् ते पातक टळलं.’

‘कृष्ण आले नसते अन् ते वस्त्रहरण झालं असतं, तर…’

‘तर! खरंच काय झालं असतं!’ कर्णाचे अंग उभ्या जागी शहारले. वृषालीकडे पाहत तो निश्चयी स्वरात म्हणाला, ‘घडलं असतं, तर तुझ्या माथी वैधव्य आलं असतं. मला आत्मघाताखेरीज दुसरा मार्ग राहिला नसता.’

वृषालीचा हात भीतीने ओठांवर गेला.

शय्येवर अंग झोकून देत कर्ण म्हणाला, ‘जा, वृषाली. असेल, ते मद्य घेऊन ये. भरपूर.’

वृषाली मद्य आणण्यास गेली.

जेव्हा मद्याची झारी घेऊन ती माघारी आली, तेव्हा कर्ण झोपी गेला होता.

कर्ण दचकून जागा झाला. शय्येजवळ वृषाली उभी होती. कर्णाचे सारे अंग घामाने भिजले होते. धाप लागल्यासारखी त्याची रुंद छाती वर-खाली होत होती. हाताने घाम पुशीत तो म्हणाला, ‘कसलं भयानक स्वप्न पडलं!’

‘स्वप्न?’

‘हां! बरं झालं, जागा झालो, ते! वसू, मी स्वप्नात पांडव वनवासाला जात असताना पाहिलं!’

‘खरं?’

‘राजरस्ते माणसांनी भरले होते. एक काळाकभिन्न डोंब विकट हास्य करीत ढोल बडवीत पुढं जात होता. त्याच्या मागून पाची पांडव, द्रौपदी खाली माना घालून चालत होते.’

‘आश्चर्य आहे! घडत असलेलं स्वप्नात दिसत नाही, असं म्हणतात!’

‘घडत असलेलं?’

‘हो! या क्षणी द्यूतात हरलेले पांडव वनवासास जात आहेत.’

‘भ्रम झाला, की काय तुला? पांडव इंद्रप्रस्थाला गेलेले पाहनूच मी आलो.’

‘नाही! भ्रम नाही. सत्य आहे. ऐका S S’

कर्णाने सज्जाकडे पाहिले. गर्दीचा आवाज ऐकू येत होता.

‘राजरस्ता प्रजाजनांनी दुथडी भरला आहे. पांडव इंद्रप्रस्थाला निघाले होते; पण अर्ध्या वाटेतून त्यांना परत बोलावण्यात आलं. द्यूताचं आह्वान स्वीकारून परत युधिष्ठिर आले.’

‘अन् परत आपलं राज्य, ऐश्वर्य सारं गमावलं, असंच ना!’

‘नाही. एकच पण लावला होता: बारा वर्षं वनवास, अन् एक वर्ष अज्ञातवास, पांडव हरले…’

‘ते सांगायची गरज नाही. तरीच युवराज शकुनीसह गडबडीनं बाहेर गेले.’

‘काय म्हटलंत?’

‘काही नाही.’

बाहेरचा आवाज वाढत होता. वृषाली सज्जाकडे निघालेली पाहताच कर्ण म्हणाला, ‘नको, वृषाली. ते पाहायला तू जाऊ नकोस. इंद्रधनुष्य प्रगटताना पाहावं, मावळताना पाहू नये.’

कर्णाने उद्विग्नपणे मद्याची झारी उचलली आणि मद्याचे पात्र भरले.

✍️ *क्रमश:* ✍️