🚩 *राधेय/२३* 🚩
कृष्णाच्या ओजस्वी भाषणाने सारे सभागृह भारावून गेले. दुर्योधन, कर्ण यांच्या अंगी कृष्णाकडे मान वर करून पाहण्याचेही त्राण राहिले नाही. धृतराष्ट्राची अवस्था तर अत्यंत शोचनीय बनली. भरसभेत कृष्णाने केलेला कौरवांचा उपहास, तेजोभंग यांतून कसे सुटावे, हे त्याला कळत नव्हते. कृष्णाने उभारलेल्या भावी विनाशाच्या भीतीने त्याचे मन कातर बनले.
राजसभेचा उत्साह केव्हाच सरला होता. सर्व नरेंद्रांना तेथून केव्हा बाहेर जातो, असे झाले. जो तो एकमेकांकडे पाहत, बसल्या जागी कुढत होता.
‘कृष्णा!’ धृतराष्ट्र आपल्या उत्तरीयाने घाम टिपीत म्हणाला, ‘तुझं सत्यवचन ऐकून मी कृतार्थ झालो. पुत्राच्या आग्रहाखातर मी या द्यूताला माझ्या मनाविरुद्ध संमती दिली. हा एक मनोरंजनाचा भाग होईल, असं मला वाटत होतं. त्या निमित्तानं आप्तेष्टांच्या भेटीगाठी होतील, या मुलांचं गुणदर्शन घडेल, असं मला वाटलं. या द्यूताचा परिणाम एवढा घोर होईल, असं मला वाटलं असतं, तर मी हा द्यूत कधीच घडू दिला नसता. कृष्णा, तू योग्य वेळी इथं आलास. मला अन् माझ्या मुलांना या पापापासून वाचवलंस, त्याबद्दल समाधान वाटतं.’
धृतराष्ट्राने हाक मारली, ‘द्रौपदी!’
द्रौपदीने धृतराष्ट्राकडे पाहिले.
कृष्णाकडे पाहिले.
कृष्णाने मान तुकवताच ती म्हणाली, ‘आज्ञा!’
‘मुली, आज्ञा कसली? तो अधिकार आता राहिला नाही. हे राजस्नुषे, तू माझ्यावर रुष्ट होऊ नकोस. या सभेत जे काही घडलं, त्याचं मला मरणप्राय दुःख आहे. जन्मजात अंधत्वानं अन वृद्धापकाळामुळं या माझ्या उन्मत्त पुत्रांच्या सभेत तुझं रक्षण करण्यासाठी मी दुबळा ठरलो, म्हणून मला दोष देऊ नकोस. तू मला माझ्या स्नुषे इतकीच प्रिय आहेस. तुझ्यावर झालेल्या अन्यायाचं परिमार्जन करण्यास मी समर्थ आहे. द्रौपदी, तुला हवा असेल, तो वर मागून घे.’
द्रौपदीने पाहिले.
कृष्णाच्या मुखावर संतापाचे एकही चिन्ह राहिले नव्हते. ओठांवर सदैव विलसणाऱ्या स्मिताने परत जागा घेतली होती.
द्रौपदीने आपल्या पतींकडे परत पाहिले. तिचा संताप परत प्रगटला, ‘पूज्य भरतश्रेष्ठा! आपल्या अभयामुळं मी निश्चिंत झालेय्. द्यायचाच असेल, तर एक वर द्या. धर्माचं अनुवर्तन करणारे माझे सर्व पती अ-दास होवोत. माझी मुलं दास्यातून मुक्त होवोत.’
सारी सभा त्या वराने चकित झाली. धृतराष्ट्र म्हणाला, ‘तसंच होवो! हे भद्रे, तू योग्य तोच वर मागितलास. मी प्रसन्न आहे. आणखी वर माग. तू एका वराला योग्य नाहीस, म्हणूनच मी तुला दुसरा वर मागण्यास सांगत आहे.’
‘पाची पंडुपुत्र आपापले रथ, शस्त्रं यांसह कौरवांच्या दास्यातून मुक्त होवोत.’
‘तथास्तु! पण, याज्ञसेने, वर मागून घेताना संकोच कसला करतेस? तुमचं राज्य, ऐश्वर्य सारं मागून घे. मी तुला आनंदानं ते देईन. त्यासाठी मी तुला तिसरा वर देत आहे. माग.’
‘महाराज, आपली कृपादृष्टी आहे, तीच मला पुष्कळ आहे. मला आणखी काही मागायचं नाही. अतिलोभ धर्माच्या नाशाला कारणीभूत होतो. मला तिसरा वर नको.’ आपल्या पतींकडे दृष्टीक्षेप करीत द्रौपदी म्हणाली, ‘या माझ्या पतींच्या ठायी काही पुरुषार्थ असेल, तर आपलं गमावलेलं राज्य, ऐश्वर्य, धनसंपदा शस्त्रबळावर ते परत मिळवून घेतील. तसं झालं, तर त्यांना ऐश्वर्यासह राज्याची, लक्ष्मीसह गृहलक्ष्मीची योग्यता कळेल. आपण जे दिलं, त्यात मी तृप्त आहे.’
द्रौपदीच्या त्या शब्दांनी ती सारी सभा थक्क झाली होती.
दयनीय स्थितीतही द्रौपदीचा तो आवेश, तिची निष्ठा पाहून कर्णाला राहवले नाही. तो म्हणाला, ‘द्रौपदी, तू धन्य आहेस! तुझं क्षात्रतेज अलौकिक आहे. तुझ्यामुळंच आज हे पांडव वाचले. दास्यातून मुक्त झाले. हे पांचाली, या विपत्सागरात नौकाहीन बुडत असलेल्या या पंडुपुत्रांना तारणारी तू नौका झाली आहेस. धन्य! खरोखरीच धन्य!!’
धृतराष्ट्राच्या आज्ञेने पांडवांनी वस्त्रे परिधान केली. धृतराष्ट्र म्हणाला, ‘हे युधिष्ठिरा, तुम्ही निर्विघ्नपणे परत जा. आपलं सर्व धन व परिवार यांसह जाऊन सुखानं राज्य करा. एक वृद्ध अंध या नात्यानं एवढंच सांगावंसं वाटतं की, जे घडलं, त्याची कटुता मनात ठेवू नका. माझ्या मुलांबद्दल दुष्टावा बाळगू नका, दुर्योधनादी भ्रात्यांवर तुझं प्रेम अखंड राहो! अन् तुझं मन सर्वथा असंच सर्वांत स्थिर राहो.’
कृष्ण उठला. तो पांचालीजवळ गेला. द्रौपदीला उजव्या हाताचा आधार देऊन तो तिला सभागृहाच्या बाहेर नेत होता.
कृष्ण द्रौपदीसह जाताना पाहून दुर्योधन सावध झाला. महाकष्टाने आखलेला डाव कृष्णाच्या येण्याने पुरा उधळला गेला होता.
दुर्योधन संतापाने उभा राहिला. त्याचवेळी कृष्णाने मागे वळून पाहिले.
ती दाहक दृष्टी पाहताच दुर्योधन नकळत उठला, तसा परत आसनावर बसला.
त्याची दृष्टी परत जेव्हा सभागृहाच्या द्वाराकडे गेली, तेव्हा तेथे कृष्ण व द्रौपदी नव्हती.
राजद्वार मोकळे होते.
✍️ *क्रमश:* ✍️
