राधेय – भाग २२

🚩 *राधेय/२२* 🚩

द्रौपदीच्या वस्त्राला दुःशासनाने हात घातला आणि सभागृहात विचित्र शांतता पसरली. श्वास अवरोधले गेले; पण ती भयाण शांतता तशीच टिकून राहिली. नग्नतेच्या भीतीनं आपल्या तुटपुंज्या वस्त्राला आणि कंचुकीला कवटाळून उभ्या असलेल्या द्रौपदीला ती शांतता जाणवली. नव्या संकटाच्या भीतीने तिने डोळे उघडले. तिची दृष्टी समोर गेली. साऱ्या सभेत डोळे महाद्वाराकडे लागले होते. दुःशासनाचा पदरावरचा हात ढळला होता. जिकडे सारे पाहत होते, तिकडे द्रौपदीचे लक्ष वळले.

सभागृहाच्या दारात कृष्ण उभा होता.

द्रौपदीचा डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. तिची दृष्टी कृष्णावर खिळली होती.

कृष्ण धीमी पावले टाकीत सभागृहात येत होता.

रेशमी पीतांबर, अंगावर रेशमी उत्तरीय, मस्तकी धारण केलेला सुवर्णकिरीट, कृष्णाचे रूप तेच होते. तेच मानेवर रुळणारे केस. तेच विशाल नेत्र. त्या सावळ्या रुपात उणीव होती, ती फक्त ओठांवर सदैव विलसणाऱ्या स्मिताची. डोळ्यांत विलक्षण शांत भाव प्रगटला होता, लाटाहीन समुद्र दिसावा, तसा.

कृष्णाला पाहताच द्रौपदीच्या मनाचे सारे बांध फुटले. पुढे येणाऱ्या कृष्णाकडे ती धावली आणि पाहता-पाहता कृष्णाच्या मिठीत ती बद्ध झाली. पाठीवरून फिरणारे कृष्णाचे हात तिला अभय देत होते.

त्या हातांच्या विश्वासाने द्रौपदी सावरली गेली. अश्रू पुसून ती कृष्णाला म्हणाली, ‘कृष्णा, कशाला आलास इथं? साक्षात पुरुषार्थ असा लौकिक असणारे माझे पती भीम, अर्जुन, त्यांची अवस्था बघ. धर्मबुद्धी युधिष्ठिराची ही द्यूतलंपटता बघ. द्यूतामध्ये माझ्या पतींनी ऐश्वर्य, राज्य आणि स्वतःला हरवलं, याचं मला दुःख नाही; पण स्वतःच्या पत्नीला पणाला लावून आपला पुरुषार्थ गमावला, याचं मला मरणप्राय दुःख आहे… अन् ज्यांच्याकडून अभय अपेक्षावं, तेच माझं वस्त्रहरण पाहायला उत्सुक झाले आहेत. यांतल्या एकाही धर्मज्ञाला माझ्या स्त्रीत्वाची जाणीव झाली नाही. ना एकाही वीराला माझ्या अनुकंपनीय स्थितीची लाज वाटली. हे सर्व घडत असता एकच समाधान वाटत होतं, निदान तू तरी ही विटंबना पाहायला इथं नाहीस. हेच ते समाधान होतं; पण तेवढंसुद्धा माझ्या नशिबी लिहिलं नाही का, रे? कशाला आलास इथं? ही विटंबना पाहायला?’

‘शांत हो, द्रौपदी!’कृष्णाने तिचे अश्रू पुसले, ‘विटंबना पाहण्यासाठी मी इथं आलो नाही. या द्यूताची मला कल्पना नव्हती. मी आवर्त देशातून दूर गेलो होतो. स्वदेशी मी असतो, तर वेळीच येऊन हा द्यूत घडू दिला नसता. हे कृष्णे, तू भयग्रस्त होऊ नकोस. वस्त्रहरण इतकं सोपं नाही. प्रत्येक मानवी जीवन विधात्याच्या अनेक सुंदर वस्त्रांनी विभूषित झालेलं असतं. या मानवी जीवनाची लज्जा अनेक सुक्ष्म वस्त्रांनी वेढलेली आहे. ती वस्त्रं महावस्त्रं असतात. माता-पिता, बंधु-भगिनी, पति-पुत्र, गुरु-मित्र, अशा अनेकांच्या स्नेहांनी विणलेली ती वस्त्रं- त्यांनीच जीवनाची खरी लज्जा झाकली जाते. तुझे वीरबाहू पती तुझं रक्षण करण्यास असमर्थ ठरले असतील. या सभेतल्या महायोग्यांचं बळ अपुरं पडलं असेल; पण त्यामुळं भयव्याकूळ होऊ नकोस. मी आलोय् ना! निदान माझ्यावर तरी विश्वास ठेव.’

कृष्णाच्या त्या बोलण्याने द्रौपदीचे मन शांत होण्याऐवजी अधिकच भडकले. ती नकारार्थी मान हलवीत म्हणाली, ‘कृष्णा, फार उशीर झाला. जे घडू नये, ते केव्हाच घडून गेलंय्. मी एकवस्त्रा, पण पुरुष म्हणवून घेणाऱ्यांनी ती अवस्था जाणली नाही. प्रत्यक्ष पतींनीच मी अशा अवस्थेत राजसभेत यावं, असा आग्रह धरला. त्या दुःशासनानं अंत:पुरात प्रवेश करून माझ्या केसांना धरून फरफटत आणलं. कृष्णा, मी याज्ञसेनी द्रुपदकन्या. मला या सभेत ओढून आणलं जातं अन् त्याची लाज कुणालाही वाटत नाही!’ आपले मृदू, नीलवर्णीय कुरळे केस डाव्या हातात धरून ते कृष्णासमोर दाखवीत द्रौपदी म्हणाली, ‘मधुसूदना, या केसांची लाज तू बाळग. दुःशासनानं ओढलेला हा केशपाश कधीही विसरू नकोस. कृष्णा, या सभेत काय घडलं नाही? या सभेत नेत्रसंकेत झाले. उघडी मांडी दाखवली गेली. अपशब्द ऐकले. एवढंच नव्हे, तर माझ्या पदरालाही हात घालण्याचं धाडस झालं. यापेक्षा आणखी कोणती विटंबना शिल्लक राहिली? स्वाभिमानानं जगता येण्यासारखं या तुझ्या अभागी भगिनीजवळ काहीही शिल्लक राहिलं नाही.’

द्रौपदीच्या करुण बोलांनी कृष्णाच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. आपला थरथरता हात त्यानं द्रौपदीच्या केसांवरून फिरवला. कृष्णाच्या कंठ दाटून आला. आपले आरक्त नेत्र उंचावत तो म्हणाला, ‘कृष्णे, पृथ्वीतलावर जे जे घडतं, ते फक्त ईश्वराच्या इच्छेनं, आज्ञेनं. दुष्टांचा विनाशकाल यायचा झाला, तरी पापांच्या राशी उभारण्याला संधी मिळावी लागते. तू या सुटल्या केसांसाठी कष्टी होऊ नकोस. तुझ्या पदराला स्पर्श झाला, म्हणून खंत बाळगू नकोस. अपशब्द ऐकून घ्यावे लागले, म्हणून दुःखी होऊ नकोस. या सभेतील ज्यांनी ज्यांनी हा प्रकार केला, पाहिला, सोसला, त्या सर्वांचा रणांगणावर विदारक मृत्यू पाहूनच मी देह ठेवीन. साऱ्या कौरवस्त्रिया अशाच आपल्या सुटल्या केसांनी आणि मोकळ्या कपाळांनी शोक करीत जाताना तुला दिसतील. ते घडेपर्यंत माझ्या मनाला शांती लाभणार नाही. त्यासाठीच या सभेला साक्ष ठेवून मी प्रतिज्ञाबद्ध होत आहे.’

दुःशासन आवेशाने पुढे झाला. ‘कृष्णा, आमंत्रण नसता येणं हाच मुळात असभ्यपणा अन् त्यात असल्या प्रतिज्ञा…’

कृष्णाची जळजळीत दृष्टी वळताच दुःशासनाचे शब्द गळ्यातच राहिले. तिरस्कारयुक्त आवाजात कृष्णाचे मोजकेच शब्द प्रगटले, ‘सामर्थ्यशाली पुरुषाला दुर्बलांच्या सभेत प्रवेश करण्यास आमंत्रणाची आवश्यकता नसते.’

कृष्णाने आपले उत्तरीय सावरले आणि तो सभेकडे वळला. सारी सभा कृष्णाच्या आकस्मिक आगमनाने व त्याच्या बोलण्याने कासावीस झाली होती.

द्रौपदीला सोडून कृष्णाची पावले अर्धचंद्राकृती सभेच्या दिशेने येत होती. सभा निरखीत तो चालत होता. स्तब्ध बनलेल्या सभेत त्याच्या पावलांचा तेवढा आवाज ऐकू येत होता. कृष्णाच्या आवाजानेच त्या शांततेचा भंग केला- ‘कौरवश्रेष्ठहो! या सभेत आमंत्रण नसता माझ्या आगंतुक येण्यानं तुम्ही विचलित होऊ नका. तुम्ही केलेला यज्ञ अन् ज्यापुढं पांडवांची मयसभा निष्प्रभ ठरावी, असं हे ऐश्वर्यसंपन्न द्यूतगृह- तोरणस्फटिका पाहण्यासाठीच मी इथं आलोय्. या तुमच्या सुवर्णासनांनी युक्त असलेल्या रत्नजडित तोरणस्फटिकेत उभा असता साक्षात गंधर्वनगरीचा भास मला होतोय्. तुमच्या आनंदात भाग घेण्यासाठीच मी इथवर धावत आलोय्.’

कृष्ण सभास्थानाच्या समोर आला होता. साऱ्या सभेवरून दृष्टी फिरवून तो म्हणाला, ‘सज्जनहो! ही सभा अलौकिक आहे. नेत्रांनी अंध असूनही, ज्याच्या ज्ञानचक्षूंनी कधीही विश्रांती घेतली नाही, असे कुरुश्रेष्ठ सम्राट धृतराष्ट्रमहाराज या सभेत सिंहासनस्थ झाले आहेत. आपल्या त्यागानं पतिनिष्ठेचा परमोच्च आदर्श निर्माण करणाऱ्या माता गांधारीचे सुपुत्र ही सभा भूषवीत आहेत. ही सभा द्रोणाचार्य, कृपाचार्यांसारख्या ज्ञानयोग्यांनी सिद्ध आहे. आपल्या प्रतिज्ञेसाठी आणि दिल्या वचनासाठी या कुरुराज्यावरील आपला हक्क सोडणाऱ्या पितामह भीष्मचार्यांचं मोकळं आसन त्यांच्या त्यागाचंच प्रतीक बनलं आहे. कृतहस्त, अतिदेवी असा लौकिक असणारे द्यूतनिपुण शकुनि या तोरणस्फटिकेचे साक्षात तोरण बनले आहेत. प्रतिकर्मा, दुःशासनासारखे कर्तव्यकठोर आज्ञापालक कार्यसिद्धीस सामर्थ्य देत आहेत. ज्यांच्या पराक्रमाची तुलना साक्षात सूर्याशी करावी, अशा वीर दुर्योधनाची ही सभा आहे. देवांचाही अभिमान कमी ठरावा, अशा आपल्या दातृत्वानं त्रिखंडात कीर्ती संपादन करणाऱ्या महारथी कर्णासारख्या अनेक क्षात्रांच्या तेजानं ही सभा प्रकाशमान झालीय्. या सभेत विदुरांच्या उपस्थितीनं साक्षात विवेक प्रगटला आहे. पंचनद्यांच्या उदकानंसुद्धा जे पुण्य लाभत नाही, ते या सभेच्या दर्शनानं लाभावं, अशी ही भयहारिणी, पुण्यमय सभा आहे. या सभेच्या दर्शनानं मी धन्य झालो.’

‘पांडवांनी इंद्रप्रस्थाला राजसूय यज्ञ केला. त्यांनी आपल्या पराक्रमानं केलेल्या दिग्विजयाची ती सांगता होती. त्या महायज्ञात वीर दुर्योधन, महारथी कर्ण, शकुनि महाराज यांच्यासारखे अनेक कौरववीर उपस्थित होते. तो महायज्ञ, त्या प्रीत्यर्थ घडलेली महादानं, मनोरंजनासाठी उभारलेली मयसभा पाहून सारे तृप्त झाले; पण तुम्ही मात्र अतृप्तच राहिलात. हे लक्षण तुमच्या वाढत्या पराक्रमाचं, तुमच्या भावी उत्कर्षाचंच होय. तृप्त आत्मे कधीही दिग्विजयी बनत नसतात.’

न राहवून दुःशासन बोलला, ‘स्तुत्य! एकदम स्तुत्य बोललात.’

पण सभेतून कुणी त्याला दुजोरा दिला नाही. आपले काही तरी चुकले, याची जाणीव त्याला झाली. कृष्णाने त्याच्याकडे पाहिलेही नाही. तो बोलत होता : ‘पांडवांनी राजसूय करून स्वतःला अभिषेक करून घेतले असतील; पण तुम्ही जन्मजात सम्राटपद भोगता आहात. सम्राट धृतराष्ट्र महाराजांना ते सिद्ध करण्यासाठी नव्या यज्ञाची गरज नव्हती. तुमचं ऐश्वर्य, सत्ता जाहीर असता ही नेत्रदीपक सभा उभारण्याचं काहीच प्रयोजन नव्हतं.’

‘तुम्ही यज्ञ केलात, ते योग्यच झालं. पुण्यसंचय वाढतो. त्यासाठी यज्ञ केलात ना? तुम्ही सम्राट आहा, सत्ताधीश आहा, हे परत सांगण्यासाठीच यज्ञ केलात ना? यज्ञात पडलेल्या आहुतींनी आणि उठणाऱ्या मंत्रोच्चारानं ही पृथ्वी पावन व्हावी, म्हणूनच हा यज्ञ केलात ना? मग त्या यज्ञाची होमकुंडं तृप्ततेनं शांत होण्याआधीच या अबलेला भरसभेत विवस्त्र करण्याचं धार्ष्ट्य आलं कुठून? ही भूमी आपल्याच हातांनी विटाळण्याचा सर्वनाशी मोह तुम्हांला का झाला?’

दुर्योधनाची खाली गेलेली मान उंचावली. डोळे कृष्णाला भिडले; पण क्षणभरच. तो दाह त्याला सहन करता आला नाही. तुच्छतेनं दुर्योधनाकडे पाहत कृष्ण म्हणाला, ‘प्रजापालन हा सम्राटपदाचा प्रथम गुण. सम्राटांना प्रजा ही मुलासारखी. तुमच्या मनात पांडवांबद्दल वैरभाव असेल; पण ज्या क्षणी ते द्यूतात हरले, दास बनले, तेव्हा ते तुमचे प्रजानन झाले नाहीत का? ही द्रौपदी दासीच नव्हे, प्रजानन आहे, हे तुमच्या कुणाच्याच कसं ध्यानी आलं नाही? जे सम्राट प्रजेला नग्न करू इच्छितात, ते सम्राट कसले?’

कृष्णाचा आवाज परत संथ बनला. गृहावरची नजर न काढता त्याची पावले त्या अर्धचंद्राकृती राजसभेतून फिरत होती; पण शब्दांची धार क्षणाक्षणाला वाढत होती, ‘वीरहो! मी असं ऐकलंय् की, पुण्यसंचयासाठी यज्ञ योजला जातो, तेव्हा यज्ञाचा नाश करण्यासाठी दुष्ट राक्षस आकाशातून अवतरतात. त्या यज्ञभूमीचा नाश करतात; पण आज ते खोटं असावं, असं वाटतं. यज्ञामध्ये मंत्रोच्चाराबरोबर जी तुपाची धार धरली जाते, यज्ञकुंडात जी सुगंधी काष्ठं प्रज्वलित होतात, त्या समिधा अग्निरूप घेत असतात. धुराचे लोट उठतात. त्यातूनच अहंकाराचे राक्षस उद्‌भवतात. वासनेची आसक्ती, ऐश्वर्याचा मद अन् सत्तेचा अहंकार यांनीच तुमच्या ज्ञानयज्ञाचा नाश झाला आहे, हे सत्य इथं बसलेल्या द्रोणाचार्यांनी, कृपाचार्यांनी तुम्हांला सांगायला हवं होतं, पण ज्यांच्या विवेकावर दास्याची पुटं चढली आहेत, त्यांची जिव्हा हा मंत्र सांगावयास धजेल कशी?’

‘यज्ञ करण्याआधी यज्ञाचं प्रयोजन तरी ध्यानी घ्यायचं होतंत! दिग्विजयासाठी बाहेर पडलेल्या वीरांच्या मनांत सदैव असूया भडकत असते. नवी भूमी पादाक्रांत करण्याची स्वामित्वाची भावना बळावत असते. अंकित बनलेल्या नरेंद्राच्या दर्शनानं अहंकार उफाळतो. रणवाद्यांच्या आवाजानं कान भारलेले असतात. शत्रुरुधिरानं न्हालेली भूमी पाहून यशाची ग्लानी चढलेली असते. असा दिग्विजय करून परतल्यानंतर मुद्दाम यज्ञ केले जातात.

‘ऐश्वर्याचा अहंकार राहू नये, म्हणून याचकांना विपुल दानं दिली जातात. कीर्तनांच्या रूपानं सुविचारांची पखरण केली जाते. यज्ञभूमीच्या प्रसन्न वातावरणात ज्याच्या आशीर्वादानं यश लाभलं, त्या परमेश्वराचं स्मरण केलं जातं, त्यामुळं स्वामित्वाची भावना लुप्त होते. योजलेल्या अधिकारी व्यक्तींनी केलेले वाद एकाग्र मनात सेविले जातात. त्यायोगानं अज्ञानाची जळमटं नाहीशी होतात. यज्ञांसाठी पाचारण केलेल्या तापसांच्या दर्शनानं जीवन शुद्ध होतं. यज्ञाच्या, तपश्चर्येच्या उत्तुंग शिखरांच्या दर्शनानं अहंकार जाऊन, त्या जागी सात्त्विक भाव जागृत होतो. यज्ञाच्या निमित्तानं एकत्रित केलेल्या आप्त-स्वकीय, इष्टमित्र जनसमूहातून सख्यभावना निर्माण होऊन आत्मनिवेदनानं जीवन उजळून जातं, तेव्हाच यज्ञाची खरी सांगता होते.’

‘यज्ञ करणाऱ्यांच्या ठायी सत्त्वगुणांचा अधिकार असावा लागतो. न्याय, नीती, दातृत्व, विवेक अन् धर्म यांनी संपन्न असलेल्या पुरुषांनीच यज्ञ करण्याचा पराक्रम करावा. तुम्ही तर काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, यांनी लिप्त असलेले! तुम्हांला दया, क्षमा, शांती आठवेल कशाला! या दुर्गुणांनी तुम्ही अंध बनलात अन् म्हणूनच एका रजस्वलेला राजसभेत आणून जीवन विटाळलंत. राजसूय यज्ञात ज्या युधिष्ठिरावर भूलोकीच्या नरेंद्रांनी छत्रचामरं ढाळलेली पाहिलीत, तोच हा युधिष्ठिर, हस्तलाघवाच्या नीच करामतीनं द्यूतामध्ये हरल्यावर साक्षात धर्म म्हणवून घेणाऱ्याच्या अंगावरची वस्त्रं हिरावून घेण्याइतके तुम्ही क्षुद्र बनलात! तुम्हांला सम्राट कोण म्हणेल! या माणुसकीला काळिमा लावणाऱ्या कृतीनंच तुम्ही राज्याधिकारास योग्य नाही, हे सिद्ध केलंय्.’

‘पांडवांनी मनोरंजनासाठी उभारलेली मयसभा करमणुकीसाठी होती. यज्ञाचा शीण घालवण्यासाठी ती उभारली होती. ती मयसभा खरोखरीच अलौकिक होती. ज्यांवर मानवाचा संपूर्ण विश्वास, ते कान, नाक व डोळे किती फसवे आहेत, हे ती मयसभा दाखवून देत होती; पण ही तोरणस्फटिका म्हणजे विश्वासघाताचं मूर्तिमंत प्रतीक. या द्यूतगृहाला नरकातसुद्धा जागा नाही. एका रजस्वलेच्या दर्शनानं रक्तलांछित झालेली ती तोरणस्फटिका कसली, ती तर साक्षात रौरववर्तिका! आपल्या क्षुद्र, हीन, दुर्बल मनोवृत्तीचं तोरण आपल्याच हातानं त्या यज्ञवेदीवर चढवताना लाज कशी वाटली नाही?’

दुर्योधनाने संतापाने कृष्णाकडे पाहिले. त्या दृष्टीला दृष्टी भिडवत कृष्ण म्हणाला, ‘माझ्या बोलण्याचा संताप येतो?’ बसलेल्या पांडवांकडे बोट दाखवीत तो म्हणाला, ‘धर्मबुद्धी युधिष्ठिर, पुरुषोत्तम पार्थ, शक्तिशाली भीम आपल्या पराक्रमाला आवर घालून, येईल तो अपमान सोशीत या सभेत बसले आहेत, ते तुमच्या विजयाचं फळ नाही. त्यांनी राजसूय यज्ञानं मिळवलेल्या विवेकाचं ते लक्षण आहे. ते पाळीत असलेल्या विवेकानं, तुम्ही देत असलेल्या आह्वानांचा स्वीकार ते करीत आहेत, हे मूढांनो, तुमच्या ध्यानी कसं येत नाही? पांडवांच्या असूयेतून उद्‌भवलेला तुमचा यज्ञ आणि कुटिल हेतूनं आयोजित केलेली ही सभा, यांतून पुण्यप्रभाव उगवणार कसा?’

कृष्णाने दोन पावले टाकली अन् शकुनीने विजयाने उधळलेल्या पटावरचा एक फासा कृष्णाच्या पायाखाली आला. कृष्णाने क्षणभर त्या फाशाकडे पाहिले. पायाशी ओंगळवाणा किडा यावा आणि तो लाथेने उडवावा, तसा तो फासा कृष्णाने ठोकरला. ‘जुगार! क्षत्रियत्वाच्या वृत्तीला आह्वान देण्यासाठीच तुम्ही युधिष्ठिराला द्यूताचं आमंत्रण दिलंत ना? अन् त्यानं हे आह्वान स्वीकारलं, तेही त्याच अहंकारापोटी. द्यूताचं आह्वान क्षत्रिय कधीही नाकारीत नाही, हे खरं! जुगार हा तर क्षत्रियत्वाचा प्रमुख गुण; पण तो जुगार म्हणजे पटावर मंतरलेल्या फाशांचं दान नव्हे. क्षत्रियत्वाचे जुगाराचे फासे आकाशीच्या सूर्य-चंद्रांचे बनलेले असतात. पृथ्वीसकट साऱ्या ग्रहांना फेरे देण्याची शक्ती त्यांच्यामध्ये सामावलेली असते.’

‘वीर नरेंद्रांनी व्यापलेल्या स्वयंवर-मंडपातून राजकन्येचं हरण करण्यात तो जुगार व्यक्त होतो. दान जिंकलं, तर राजकन्या घरी येते. फासे उलटे पडले, तर राजकन्या झुरून मरते, असा लौकिक जुगार, तो क्षत्रियानं खेळावा, रणांगणाच्या पटावर सामोऱ्या येणाऱ्या बलवत्तर शत्रूवर हातातल्या आयुधांचंही भान न बाळगता जन्म-मृत्यूच्या कवड्यांची दानं टाकीत जाण्यात क्षत्रियांचा द्यूत रंगतो. जिंकलं, तर पृथ्वीचं राज्य भोगता येतं, फासे उलटे पडले, तर स्वर्गीचे देव हाताचा पाळणा करून न्यायला येतात. असा हा जुगार क्षत्रियांनी खेळावा. हा कसला द्यूत अन् कसली राजसभा!!’

‘अरे, ती राजसभा, की जिथं विवस्त्र गेला, तरी सवस्त्र होऊन बाहेर येईल. ती राजसभा, की जिथं पतितेलाही पावनतेचा स्पर्श व्हावा. जिथं अबला सबला बनाव्यात, अशी जी ती राजसभा. ही राजसभा कसली? जिथं न्याय अंधळा आहे, साहस दुबळ्यावर मात करू पाहतं, पराक्रम असह्य बनतो, धर्माला ग्लानी येते, ती का राजसभा? जिथं व्यभिचार घडतो, तिथं पुण्य कसं अवतरेल?’

‘आह्वान देऊन तुम्ही पांडवांना रणांगणात जिंकलं असतंत, तर ते तुमच्या पराक्रमाला शोभलं असतं; पण तुम्ही मांडलात द्यूत- जो कपटनीतीनं भरलाय्. शकुनि, म्हणे, कृतहस्त, अतिदेवी आहेत. त्याचमुळं हवे ते फासे टाकून या पांडवांना जिंकलंत अन् या द्रौपदीला अशा अवस्थेत भर राजसभेत आणून माणुसकीची मर्यादा ओलांडलीत. त्या शकुनीच्या क्षुद्र करामतीनं मिळवलेला विजय- त्याला तुम्ही विजय मानता! त्यात तुम्ही आनंद मानता! हा आनंद निश्चित क्षत्रियाचा नव्हे.’

‘एका दुबळ्या, रजस्वलेला, एकवस्त्रेला तुम्ही अभय दिलं असतंत, तर तुमच्या चारित्र्याला एक तेजस्वी भूषण चढलं असतं; पण तुम्ही एकवस्त्रेला विवस्त्र करण्याची हीन इच्छा धरलीत. नाही, तुम्ही सम्राट नाही… राजेपणाची तुमची योग्यता नाही. एवढंच नव्हे, पण सामान्य मानव म्हणूनी जगण्याची तुमची योग्यता नाही, एवढंच तुम्ही तुमच्या द्यूतानं अन् राजसभेनं सिद्ध केलंत. हे पातक तुम्ही कसं धुऊन काढणार आहात, हे परमेश्वरसुद्धा सांगू शकणार नाही.’

कृष्णानं उसंत घेतली. आपले बोट उंचावत तो म्हणाला, ‘स्वतःची स्तुती करून घेणं हा माझा स्वभाव नाही; पण या अंधसभेत माझी ओळख करून देणं मला प्राप्त आहे. सम्राट म्हणवून घेणाऱ्या अन्यायी कंसाचं कंदन ज्यानं केलं, तोच मी कृष्ण! बलाढय जरासंधाचा मीच वध करवला. राजसूय यज्ञात उन्मत्त शिशुपालाचा तुम्हां सर्वांदेखत मीच शिरच्छेद केला. मी माझं सामर्थ्य व्यक्त करायचं ठरवलं, तर त्यासाठी दुःशासनासारख्या विवेकशून्याचं अथवा चतुरंग सैन्याचं बळ मला घ्यावं लागणार नाही. आज या राजसभेत द्रौपदी उभी आहे. ती माझी भगिनी आहे. तिचं रक्षण करण्यासाठी मी इथं उभा आहे, हे कृपा करून दृष्टीआड करू नका. ते धाडस तुम्ही केलंत, तर यानंतर जे घडेल, त्याचा दोष तुम्ही मला देऊ नका.’

‘हे अंधपुत्र कौरवांनो! तुमच्या सभेत येऊन मी माझी काया अन् वाचा भ्रष्टविली आहे, असा मला भास होतो. तुमच्या अवनतीची परिसीमा कुठवर जाते, हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे. सभा तुमच्या पुण्यप्रद कार्यासाठी मोकळी आहे. बंधुबळ लाभलेली, निर्भय बनलेली माझी भगिनी तुमच्या निर्णयाची वाट पाहत आहे.’

कृष्ण थांबला.

शांतता पसरली.

कृष्णाला आसन देण्याचेही कुणाला भान राहिले नाही.

शांततेचा भंग केला विदुराने. आपल्या आसनावरून तो उठला. पश्चात्तापाच्या अश्रूंनी ज्याचे गाल भिजल आहेत, अशा त्या विदुराने कृष्णाला आपले आसन दिले.

काही न बोलता कृष्णाने त्या आसनाचा स्वीकार केला.

✍️ *क्रमश:* ✍️