🚩 *राधेय/२१* 🚩
घरंगळत जाणारे फासे द्यूतपटावर स्थिरावले. हताश पांडवांच्या बरोबरच शकुनीची आसक्त नजर फाशांवर स्थिरावली.
शकुनीच्या कृतहस्ताचाच विजय झाला होता.
दान कौरवांच्या बाजूनेच पडले होते.
पांडव द्रौपदी हरले होते.
राजसभेतील शांतता असह्य होऊन अंधळ्या धृतराष्ट्राने अधीऱ्या मनाने शेजारी बसलेल्या संजयाला विचारले, ‘मी काय जिकलं? काय जिंकलं?’
संजयाला त्याचे उत्तर द्यावे लागले नाही. नि:श्वासाबरोबर बाहेर पडलेल्या युधिष्ठिराचे शब्द ऐकू आले, ‘मी हरलो.’
‘जिंकलं! जिंकलं!!’ म्हणत हर्षाने उन्मादित झालेल्या शकुनीने द्यूताचा पट उधळला.
कौरवसभेत एकच आनंद उसळला. ‘पांडव द्रौपदी हरले,’ हा एकच आवाज सभागृहात फिरत होता.
द्रौपदी दासी झाली.
आकाशीचा चंद्र पृथ्वीवर उतरला. सूर्यकिरणाने काळोख पसरला. अग्नीने जलधारांत स्नान केले. अमृताला मद्याची ग्लानी आली. वायू अचल बनला. वज्राची एकतारी झाली. द्रौपदी कौरवांची दासी झाली. पांडवांच्या हाती गमवायला आणि कौरवांना मिळवायला काहीही शिल्लक राहिले नाही.
आनंदभरित राजसभेकडे समाधानाने पाहत शकुनि उभा राहिला. वार्धक्यामुळे आणि झालेल्या हर्षाने त्याची मान हलत होती. त्यामुळे शिरोभूषणातले रत्नजडित शिरपेच अधिकच झगमगत होते. आपल्या डाव्या मनगटावर विळखा घालून अधांतरी रुळणाऱ्या पीतवर्ण शेल्याच्या शेवाने शकुनि वारा घेत होता. ती उंच, शेलाटी, गौरवर्ण आकृती आपल्या भेदक घाऱ्या डोळ्यांनी पराजित पांडवांची दयनीय स्थिती निरखीत होती.
शकुनीने मंचावरच्या आपल्या अंगठ्या उचलल्या. शांतपणे त्या बोटांत पूर्ववत चढवल्या आणि पांडवांकडे अंगुलिनिर्देश करून क्षणभर तसाच उभा राहिला.
त्या कृतीने सभेतला आवाज विरला.
पसरलेल्या शांततेची उसंत घेऊन शकुनीचा आवाज त्या सभेमध्ये उठला, ‘कौरवश्रेष्ठहो! द्यूतामध्ये ऐश्वर्यासह राज्य गमावून आधीच एकवस्त्र बनलेले हे पांडव आता पणामध्ये द्रौपदी हरून अर्धवस्त्र बनले आहेत. या दानानं द्रौपदी कौरवांची दासी झालीय्. या क्षणापुढं कृष्णेच्या दैवाचे फासे फक्त कौरवांच्या इच्छेवर अवलंबून आहेत.’
दुर्योधनाच्या शेजारी बसलेला कर्ण हे शांतपणे पाहत होता. दुर्योधनाच्या हाताचा स्पर्श होताच कर्णाने त्याच्याकडे पाहिले.
दुर्योधनाचे समाधान त्याच्या मुखावर प्रगटले होते.
त्याच वेळी विदुर सभेमध्ये उभे राहिले.
दुर्योधनाचे समाधान नाहीसे झाले, त्याच्या कपाळी सूक्ष्म आठी पडली.
साऱ्या सभेचे लक्ष विदुरांकडे गेले. कौरवसभेत विदुर स्पष्टवक्ता म्हणून साऱ्यांना परिचित होते. त्यांच्या मनातली पांडवप्रीती, कृष्णस्नेह साऱ्यांना ज्ञात होता. त्यामुळे विदुर काय बोलणार, याची उत्सुकता साऱ्यांना लागून राहिली होती. विदुरांची शांत दृष्टी शकुनीकडे वळली.
‘शकुनिमहाराज, आज आपल्या द्यूतनैपुण्यानं आपण पांडवांना जिंकलं. द्यूतामध्ये आपला अतिदेवी म्हणजे मर्यादेचं उल्लंघन करून द्यूत खेळणारा अन् कृतहस्त म्हणजे आपल्या इच्छेप्रमाणे फासे टाकण्यात निपुण असा आपला लौकिक आजच्या द्यूतपटावर आपण सिद्ध केला. आपण बोलून-चालून कृतहस्त. त्यापुढं पांडवांचं राज्य अन् ऐश्वर्य आटून गेलं… अन् अतिदेवी लौकिक सिद्ध करण्यासाठीच की काय, आपण त्या द्यूतप्रिय युधिष्ठिराला द्रौपदी पणास लावण्यासाठी उद्युक्त केलंत; पण द्यूत हा मनोरंजनासाठीच व्हावा. भंजनासाठी, आत्मघातासाठी नव्हे. आपण व्यापारात निष्णात, अशीही आपली ख्याती आहे. या जगात जरीबासनांचा, तलम वस्त्रांचा, नेत्रदीपक रत्नांचा व्यापार होतो. मत्त गज, सुलक्षणी अश्व, सुरेख लव असणारे उंट यांचा व्यवहार, विक्रय होतो. त्याची पारख असणारे आपल्यासारखे जाणकार दुर्मीळ; पण हा विक्रय जसा होतो, तसा माणसांचा व्यापार द्यूताच्या फाशांवर नसतो. द्यूतात दास बनले, म्हणून पांडव दास ठरत नाहीत. स्वपराक्रमानं राजसूय यज्ञाची सांगता करणारे ते वीर आहेत, हे दृष्टीआड करून कसं चालेल? द्रौपदी दासी बनली असली, तरी ती स्त्री आहे, हे इथं बसलेल्या राजसभेला अन् त्या सभेतल्या धर्मगुरूंना विसरता येणार नाही. जी मर्यादा आपण सहज ओलांडलीत, ती ओलांडून निदान आम्हांला तरी जमणार नाही. ती अमर्यादा आहे.’ कर्णाकडे पाहत विदुर म्हणाले, ‘या जगात राज्य देऊन कुणी राजा होत नाही, ना राज्य हिरावून घेऊन कुणी दास. द्रौपदी ही जन्मजात राजकन्या असून, इंद्रप्रस्थाची महाराणी आहे’
मर्माघात झालेला कर्ण त्या शेवटच्या वाक्याने अधिकच संतापला. आसनावरून खाडकन उठून तो गरजला, ‘कोण महाराणी? द्रौपदी? मग राजमाता गांधारीदेवी कोण? कौरवकुलाचं अमात्यपद भोगणाऱ्या विदुरांना सम्राट धृतराष्ट्रमहाराजांचा विसर पडलेला दिसतो. नाहीतर या कौरवसभेत सम्राटांची उपस्थिती असता पांडवाच्या सम्राटपदाचा उच्चार करण्यास ते धजले नसते. राजनीतीला अन् धर्मनीतीला द्यूत मान्य आहे, उसनं धारण केलेलं राज्य पांडवांनी गमावलंय्. जिथं ते राजे राहिले नाहीत, तिथं राणी कुठली?’
कर्णाला दुजोरा देण्यासाठी दुर्योधन सरसावला, ‘कर्णा, दासाची कड दासीपुत्रानंच घ्यायची. त्यात नवल कसलं? विदुर म्हणजे साक्षात पांडवांचा पक्षपाती. तो आमच्या बाजूनं बोलेल कसा?’
दुर्योधनाचा संताप पाहून विदुर क्षणभर स्तब्ध झाले, समर्थन करण्याचा प्रयत्न करीत ते म्हणाले, ‘युवराज! आपला संताप मी जाणतो. ज्या कुलाच्या अन्नावर माझं पोषण झालं, त्या कुलाचा मी अपमान कसा करीन! उलट, संतापाच्या भरात या कुलाला कलंक लागेल, असं वर्तन होऊ नये, म्हणूनच माझी धडपड. हे पांडव आपल्या घरी आमंत्रित आहेत. आपल्या अभ्यागताचा सत्कार… सन्मान…’
‘सन्मान? या पांडवांचा?’ दुर्योधन उसळला, ‘या द्यूतानं त्यांचा योग्य तो सन्मानच केलाय्. घरी आलेल्या अभ्यागताला कसं वागवावं, हे त्यांनीच मला शिकवलंय्. राजसूय यज्ञाच्या प्रसंगी यांनी उभारलेली मयसभा आमच्या इतकी दुसऱ्या कुणी उपभोगली? आमचा अपमान करताना घरी आलेल्या अभ्यागताची जाणीव यांना नव्हती? अन्, विदुरकाका, हे लक्षात ठेवा की, इथं पांडव जरूर आमंत्रित आहेत; पण ते आमच्या पाहुणचारासाठी नव्हे… द्यूतासाठी! तुमच्याकरवीच दिलेलं द्यूताचं ते आह्वान स्वीकारून ते इथं आलेले आहेत. शकुनि अक्षविद्येत निपुण आहेत, हे त्यांना तुम्हीच सांगितलं होतं ना? ज्वाला चुकविण्यासाठी भुयारं खोदता येतात, पाण्यावर तरंगण्यासाठी नौका उभी करता येते, पण दैव चुकविण्यासाठी काही करता येत नाही, हे तुम्हांला आता समजलं असेल. विदुरकाका, या पांडवांच्या दुर्दशेला तुम्हीच कारणीभूत आहात! अर्धवट राहिलेलं काम तुम्हीच पुरं करा. असेच अंत:पुरात जा अन् जिच्या असामान्य लावण्याची स्वत: युधिष्ठिरानं ख्याती वर्णिली आहे, त्या पांचालीला या राजसभेत घेऊन या. हे काम करण्यास तुम्हीच अधिक योग्य दिसता.’
दुर्योधनाची ती आज्ञा ऐकताच विदुराच्या पायांतले बळ सरले. ते आपल्या आसनावरून ढासळले. त्यांची अवस्था पाहून दुर्योधनाच्या चेहऱ्यावर स्मित उमटले.
दुर्योधनाचा सूत प्रतिकर्मा याला दुर्योधनाने आज्ञा केली, ‘प्रतिकर्मा, या भेकडाच्या हातून हे काम होणार नाही. हा विदुर नेहमीच आमची निंदा आणि पांडवांची स्तुती करीत आला आहे. कौरवांची सत्ता काटा असते, हे एकदा त्याला उघड्या डोळ्यांनी पाहू दे. तू असाच अंत:पुरात जा अन् आमच्या त्या दासीला आमची परिचर्या करण्यासाठी इथं घेऊन ये.’
प्रतिकर्मा दुर्योधनाची आज्ञा पाळण्यासाठी गेला.
दुर्योधनाच्या त्या आज्ञेने सभेत कुजबूज सुरू झाली.
भीष्म, द्रोण आणि कृप यांना स्वत:ला सावरणे कठीण झाले.
काही वेळाने प्रतिकर्मा एकटाच राजसभेत आला.
दुर्योधनाने विचारले, ‘प्रतिकर्मा, पांचाली कुठं आहे?’
प्रतिकर्म्याने सांगितले, ‘महाराज, द्रौपदी या सभेत येण्याच्या परिस्थितीत नाही.’
‘कारण?’
‘ती एकवस्त्रा… रजस्वला आहे. मी आपली आज्ञा सांगताच त्या राजकन्येनं मलाच एक प्रश्न विचारायला सांगितलंय्.’
‘कसला प्रश्न?’ नकळत दुर्योधन बोलून गेला.
युधिष्ठिराजवळ जाऊन प्रतिकर्मा म्हणाला, ‘राजा युधिष्ठिरा, द्रौपदीनं तुलाच प्रश्न विचारलाय्. तू द्यूतामध्ये स्वत:ला हरवून घेतल्या नंतर द्रौपदीचा पण लावलास की, आधी… असा तो प्रश्न आहे.’
द्रौपदीचा प्रश्न एकून युधिष्ठिर निश्चेष्ट व संज्ञाशून्य झाला. उतावीळ झालेला दुर्योधन म्हणाला, ‘हे सूता! तू त्याला काय विचारतोस? तू असाच माघारी जा अन् त्या द्रौपदीला इथं घेऊन ये. जे प्रश्न विचारायचे, ते सभेत येऊन विचारू दे. तो संवाद ऐकण्यात आमचीही करमणूक होईल.’
प्रतिकर्म्याला ते कठोर कर्म नको वाटत होते. युधिष्ठिर काहीतरी बोलेल, सभा काहीतरी निर्णय घेईल, असे वाटत होते.
सावध झालेल्या युधिष्ठिराने प्रतिकर्म्याकडे पाहिले आणि त्याने उभ्या असलेल्या आपल्या दूताला सांगितले, ‘हे दूता, तूच द्रौपदीकड़ं जा. तिला माझा निरोप सांग, प्रश्न विचारून संकटहरण होण्याची ही वेळ नव्हे. तिला म्हणावं, तू एकवस्त्रा, रजस्वला असलीस, तरी असशील, त्या स्थितीत या राजसभेत ये. तू राजपुत्री राजसभेत तशा अवस्थेत आल्यावर रक्तलांछित स्थिती पाहून तरी या कौरवांच्या मनांत आमच्याबद्दल अनुकंपा निर्माण होईल.’
पती म्हणवून घेणाऱ्या युधिष्ठिराचे भाषण ऐकून कौरवसभेतले भीष्म, द्रोण, कृपाचार्य हताश झाले.
कर्णाला युधिष्ठिराची घृणा आली.
उत्साहित झालेला दुर्योधन दु:शासनाला आज्ञा करता झाला, ‘दु:शासना, उभा काय राहिलास? अंत:पुरात जा अन् त्या दासीला इथं घेऊन ये. सरळपणे ती यायला तयार झाली नाही, तर बळजबरीनं फरफटत तिला इथं घेऊन ये; पण एकटा माघारी येऊ नकोस.’
दुःशासन आसनावरून उठला आणि तो भावाची आज्ञा पाळण्यासाठी सभागृहाबाहेर निघून गेला.
द्रौपदी राजसभेत आणली जाणार, या कल्पनेने सारी सभा भयग्रस्त झाली होती. मनातली आसुरी उत्सुकता शिगेला पोहोचली होती. सभागृहाबाहेर उठलेल्या धडपडीच्या आवाजाने साऱ्यांचे लक्ष प्रवेशद्वाराकडे लागले आणि काही क्षणांतच द्रौपदीच्या केसांना धरून सभागृहात प्रवेश करणाऱ्या दु:शासनाकडे सर्वांचे लक्ष गेले. द्रौपदीचे शब्द कानांवर पडले.
‘सोड, पाप्या, सोड ऽ’
विहिरीतून मोट खेचून आणावा आणि पाटात रिती करावी, तसे दुःशासनाने द्रौपदीला खेचीत राजसभेच्या मध्यभागी आणून सभास्थानासमोर एका हिसड्याने सोडले.
राजसभेत द्रौपदी ढासळली होती. तिचे नीलवर्ण कुरळे केस उर्णावस्त्रावर विखुरले होते.
त्या पडलेल्या द्रौपदीकडे बोट दाखवून दुःशासन म्हणाला, ‘कौरवदासी राजसभेमध्ये उपस्थित झाली आहे.’
दुःशासनाचे ते शब्द द्रौपदीच्या कानी पडले. ती भानावर आली. तिने निश्चयपूर्वक आपली मान वर केली. एका हाताने केस सावरीत दुसऱ्या हाताने अपुऱ्या वस्त्रातील लज्जा झाकण्याचा प्रयत्न करीत ती उभी राहिली. कौरवसभेवरून तिची दृष्टी फिरत होती. तिची घायाळ दृष्टी दीनवाणे बसलेल्या आपल्या पतींवर क्षणभर स्थिरावली. त्यांच्या दर्शनाने तिची असहायता कुठल्या कुठं गेली. तिच्या नेत्रांत संताप उसळला. पाहत तिचे शब्द उमटले, ‘पितामह, तुम्ही तरी मला न्याय द्या! ज्याला द्यूतातलं काही ज्ञान नाही, अशा माझ्या पतीला अक्षविद्येत निपुण असलेल्यानं आह्वान द्यावं आणि त्याचं सर्वस्व हिरावून घ्यावं, हे योग्य आहे का?’
दुर्योधन उभा राहिला. तो गरजला, ‘त्याचं उत्तर पितामहांनी द्यायचं काहीच कारण नाही. ते उत्तर माझा दास बनलेला युधिष्ठिरच देईल. दास्य आलं, तरी त्याची धर्मबुद्धी अजून जिवंत असेल.’
सारे युधिष्ठिराकडे पाहू लागले. त्याने आपली मान वर केली. तो शांतपणे म्हणाला, ‘पांचाली, हे म्हणतात, ते सत्य आहे. मी द्यूतामध्ये माझ्या हातानं सर्वस्व गमावलं आहे.’
पतिवचनाने द्रौपदीचा आणखी एक आधार सुटला. निराश न होता तिने धैर्याने भीष्मांना विचारले, ‘पितामह! या सभागृहात मला बळजबरीनं आणण्यापूर्वी मी जो प्रश्न केला होता, तो याचसाठी. सर्व हरल्यावर, स्वतःला पणाला लावून, जो स्वतःच दास बनला आहे, त्याला त्यानंतर पत्नीला पणाला लावण्याचा काय अधिकार? पितामह! जिथं माझे पराक्रमी पती दुबळे, निःसत्त्व बनले, त्या या अनार्य सभेत तुम्हीच माझे त्राते. या पणानं मी हरले आहे का, याचा निर्णय तुम्हीच द्या.’
ज्याने जीवनात त्याग आणि पराक्रम यांखेरीज काही जाणले नाही, पितृवचनासाठी ज्याने आपल्या आयुष्यातील साऱ्या महत्त्वाकांक्षांना बंध घातले, ज्याला जीवनात स्वार्थ कधीहा शिवला नाही, त्या भीष्माचार्यांना द्रौपदीचा प्रश्न धर्मसंकटासारखा वाटला.
सारे भीष्णाचार्यांकडे पाहत होते.
भीष्म आसनावरून उठले. मनाचे सारे आवेग संयमित करीत ते म्हणाले, ‘हे सुभगे! तुझा प्रश्न मोठा गहन आहे. समर्थ पुरुष ज्याला धर्म म्हणतो, तोच खरा धर्म, असं जग मानतं. मीही त्याच धर्माला बद्ध आहे. मनात असूनही तुला अनुकूल उत्तर मला देता येत नाही, याचं मला अतीव दुःख आहे. हरल्यानंतर दुसऱ्याला पणाला लावण्याचा अधिकार उरत नाही, हे तुझं वचन सत्य आहे; पण, पांचाली, तू पांडवांची धर्मानं अर्धांगी आहेस अन् त्यामुळं जेव्हा पांडव हरले, तेव्हाच तूही हरली आहेस. दासाची भार्या ती दासीच होय. हा युधिाष्ठिर स्वमुखानंच, मी पराभूत झालो, असं मानतो. तिथंच स्वतःचं दास्य त्यानं मान्य केलंय्. त्यामुळं तुझ्या प्रश्नाचं उत्तर तूच शोध. त्याचा निर्णय सांगण्यास मी असमर्थ आहे.’
घनमेघाने सूर्य झाकावा, तसा भास द्रौपदीला झाला. भीष्माच्या उत्तराने दुर्योधन- कर्ण आनंदित झाले. विदुर-विकर्णासारख्या सज्जनांनी द्रौपदीची बाजू घेतली; पण भीष्मनिर्णयामुळे ते समर्थन कौरवसभेत दुबळे ठरले. भर समुद्रात, वादळात सापडलेल्पा नौकेच्या एकुलत्या एका शिडाच्या चिंध्या व्हाव्यात आणि दैवगतीच्या लाटांवर लक्ष्यहीन नाव हेलकावे घ्यावी, तशी पांचालीची अवस्था झाली.
भीष्म आसनस्थ होताच दुर्योधन उठला. तो द्रौपदीला म्हणाला, ‘द्रौपदी, तुला आता माझ्याखेरीज त्राता नाही. हा युधिष्ठिर तुझा स्वामी नाही, असं तू म्हण; मी तुला दास्यातून मोकळं करतो. या युधिष्ठिराचं द्यूतकर्म खोटं म्हण; मी तुला संकटातून जरूर वाचवीन.’
द्रौपदीला ते म्हणण्याचे बळ नव्हते. द्रौपदीची मान खाली गेली.
दुर्योधनाचे विजयी हास्य सभागृहात घुमले. प्रथमपासून विदुराबरोबर द्रौपदीची कड घेणाऱ्या विकर्णाला भावी संकटाची जाणीव झाली. निश्चयपूर्वक तो उठला. ‘हे नरेंद्रहो! धर्म वाकवावा, तसा वाकतो. राजसभेत स्त्रीला आणणं हाच मुळी अधर्म, कपटानं जिंकलेल्या द्यूतात साध्वीचा छळ व्हावा, यासारखं घोर पातक नाही. ही पांचाली द्रुपदकन्या आहे. द्रौपदी जिंकली गेली नाही, असं माझं निश्चित मत आहे.’
विकर्णाचे बोलणे संपताच कर्ण उठला. आपले सुंदर बाहू उभारून तो म्हणाला, ‘विकर्णा! धर्म, नीती यांचा निर्णय करण्याइतका अजून तू मोठा झाला नाहीस. बलाच्या आधारावरच राजनीती आपला निर्णय देते, ते तुला माहीत नाही. ही द्रौपदी तुला पतिव्रता वाटावी, यासारखं अज्ञान कोणतं? अरे, देवानं स्त्रिचा एकच पती नियत केला असता, अनेक पुरुषांना भोग देते, ती पतिव्रता कसली? ही दुराचरणी एकवस्त्रा अथवा विवस्त्रा असली, तरी बिघडतं कुठं? विकर्णा, ही द्यूतसभा आहे, धर्मसभा नव्हे.’ द्रौपदीकडे पाहत कर्ण म्हणाला, ‘हे याज्ञसेनी, तू आमची दासी झाली आहेस. धर्माचा आधार शोधण्यापेक्षा ज्याची दासी बनली आहेस, त्या दुर्योधन महाराजांच्या अंत:पुरात जा आणि आपल्या सेवेनं आपल्या स्वामींना प्रसन्न करून घे. त्यातच तुझं हित आहे. तोच तुझा धर्म आहे.’
‘माझा धर्म?’ युधिष्ठिराकडे पाहत द्रौपदी म्हणाली, ‘माझ्या धर्माला जागा राहिली नाही.’
‘द्रौपदी, तुझी जागा इथं आहे, बघ!’ म्हणत दुर्योधनाने कर्दळीच्या स्तंभाप्रमाणे सर्व लक्षणयुक्त, वज्रासारखी दृढ असलेली आपली मांडी उघडी करून द्रौपदीला दाखवली.
सारी भूमी सूर्यदाहात होरपळत असता आसमंत भेदून मेघनाद उमटावा, तसा भीम गर्जला, ‘नरेंद्रहो! माझी प्रतिज्ञा ऐकून ठेवा. ज्या दुःशासनानं द्रौपदीच्या केसांना स्पर्श केला, त्याचं वक्षस्थळ नखाग्रांनी फोडून मी त्यांचं रक्त प्राशन करीन अन् उन्मत्तपणं भरसभेत उघडी मांडी दाखवणाऱ्या दुर्योधनाची मांडी मी माझ्या गदेनं छिन्नविछिन्न करून टाकीन, तेव्हाच माझी प्रतिज्ञा पुरी होईल.’
भीमाच्या त्या घोर प्रतिज्ञेनं साऱ्या सभेचा थरकाप उडाला.
दुर्योधनाच्या अपमानाने कर्णाचा संताप उसळला; पण त्याला थोपवीत दुर्योधनाचे शब्द उमटले, ‘प्रतिज्ञा! माझ्या सभेत माझे दास माझ्या पराजयाची प्रतिज्ञा करतात? अद्यापि या दासांच्या शरीरांवर राजभूषणं, राजवस्त्रं आहेत ना! त्याचमुळं त्यांना आपल्या अवस्थेची पुरी जाणीव झालेली दिसत नाही. हे वृकोदरा, तू माझा दास आहेस. हे दासा, स्वामींच्या उघड्या मांडीचं दर्शन दासीला घडलं, तर तो तिनं सन्मान समजावा; पण दासानं तिकडं दृष्टीही वळवू नये. तो प्रमाद घडला, तर काय होते, हे आताच तुला कळेल.’ दुर्योधनाचा आवाज चढला. पांडवांकडे बोटे दाखवीत तो ओरडला, ‘सेवकांनो, पाहता काय; त्या उन्मत्त दासांची भूषणं, वस्त्रं काढून घ्या!’
त्या आज्ञेने सारी सभा जागच्या जागी थिजून गेली. दास पुढे सरसावलेले पाहताच युधिष्ठिराने आपली राजभूषणे उतरवली. वस्त्रे सोडून ठेवली, इतर पांडवांनी त्याचे अनुकरण केले. पतींची ती केविलवाणी अवस्था पाहून द्रौपदीने डोळ्यांवर हात घेतले.
द्रौपदीच्या त्या कृतीने कर्णाचे लक्ष तिच्यावर खिळले. त्याने दुःशासनाला आज्ञा केली, ‘दु:शासना! हे दास जसे विवस्त्र झाले, तसेच या पांचालीला विवस्त्र कर! राजहंसी कशी असते, ते आज या सूतपुत्राला पाहायचंय्. सामान्य स्त्रीपेक्षा राजस्त्री केवढी वेगळी असते, हे जाणून घ्यायला मी उत्सुक आहे. पाहतोस काय? त्या एकवस्त्रेला विवस्त्र कर!’
आधीच चेतनाशून्य बनलेले भीष्म, विदुर त्या शब्दांनी दचकून भानावर आले. भयचकित द्रौपदीचे डोळे विस्फारले गेले. दुःशासनाने पुढे टाकलेले पाऊल पाहताच भयव्याकूळ झालेली द्रौपदी मागे सरकू लागली.
दुःशासन पुढे जात असतानाच संतापाने थरथरणारे भीष्म उभे राहिले, ‘थांब, दु:शासना, पुढं पाऊल टाकू नकोस.’
साऱ्या सभेत नि:स्तब्ध शांतता पसरली. भीष्माचार्यांची तेजपुंज मूर्ती पांढरी फटफटीत पडली होती. अतिदाहात लोह शुभ्र बनावे, तशी. अग्निस्फुलिंग वर्षावेत, तसे त्यांचे शब्द कौरवसभेवर पडू लागले, ‘अरे, धिक्कार असो या सभेचा! इथल्या सज्जन, पराक्रमी म्हणवून घेणाऱ्या नरेंद्रांचा! या राजसभेत पौरुष सरलं का? ही राजसभा आहे, की साक्षात अधर्मसभा? राजनीतीचा भाग म्हणून आतापर्यंत मी हा सारा प्रकार पाहत आलो आहे; पण तुमच्या अधोगतीला सीमा दिसत नाहीत. सूतकुलात जन्मलेल्या, हीन वृत्ती धरणाऱ्या पुरुषाला मी दोष देत नाही; पण त्याच्या सल्ल्यानं अघोरी कृत्याला उद्दीप्त झालेल्यांचा विवेक गेला कुठं? ही या सभेची अमर्यादा आहे. जोवर हा भीष्म इथं उभा आहे, तोवर अबलेला विवस्त्र करण्याचं धाडस कुणीही करू नये. दुःशासना, मागं फीर ही माझी आज्ञा आहे.’
दुःशासन तसाच उभा राहिला. त्याने दुर्योधनाकडे आशेने पाहिले.
दुर्योधनाने स्वत:ला सावरले. आपला संताप आवरीत त्याने विचारले, ‘पितामह, ही आज्ञा कशाच्या बळावर देता आहात?’
‘काय विचारतोस?’ भीष्म चकित होऊन म्हणाले.
‘ही आज्ञा कशाच्या बळावर देता?’ दुर्योधनाने शांतपणे पुन्हा विचारले.
‘माझ्या बळाबद्दल तू विचारतोस?’ भीष्माचा संताप सुटला, ‘कुठून आलं हे बळ? मूर्खा, ज्या नावानं तू मला संबोधतोस, तेच माझं बळ आहे. मी भीष्म पितामह आहे. या राज्याचा खरा वारस. माझ्या त्यागामुळं तुम्ही हे राज्य भोगता आहात. तू मला आह्वान करतोस? दुर्योधना, दुष्ट संगतीनं तू अधोगतीच्या परिसीमेवर उभा आहेस. त्यापेक्षा जास्त ढासळू नकोस.’
आपल्या प्रहाराने तेजोभंग होईल, या कल्पनेने पाहणाऱ्या भीष्माचार्यांना दुर्योधनाच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य पाहून अचंबा वाटला. आपला आवाज स्थिर राखण्याचा प्रयत्न करीत दुर्योधन म्हणाला, पितामह! आपल्या दातृत्वाचा उल्लेख करून तुम्हीच स्वत:ची पायरी उतरला आहात. क्रोधाच्या आहारी जाऊन आणखी ढासळू नका, हे सांगण्याची पाळी माझ्यावर यावी, हे मी माझं दुर्दैव समजतो.’
दुर्योधनाच्या प्रत्याघाताने भीष्म सुन्न झाले. हिमशिखरावर तप्त किरण पडावेत आणि हिमखंड घसरू लागावेत, तशी त्या कुरुश्रेष्ठाची अवस्था झाली. सारा आवेश ढासळला. तेज सरले. सर्वांगाला कंप सुटला. दुर्योधनाने मर्माघात केला होता.
‘युवराज, कटू असलं, तरी सत्य सांगितलंत! वेळीच सावध केलंत. या भीष्माच्या दैवी आता पायऱ्या उतरण्याखेरीज काहीही राहिलं नाही.’ भीष्माचार्यांनी आपल्या खडावा चढवल्या आणि राजसभेच्या पायऱ्या उतरून ते जाऊ लागले. त्यांना अडवण्याचे बळ विदुरांना राहिलं नव्हते. स्फटिकभूमीवरून खडावांचा आवाज उठत होता. त्या जाणाऱ्या आवाजाबरोबर द्रौपदीचा उरलासुरला आधार निघून गेला.
दुर्योधनाच्या मनावरचे दडपण नाहीस झाले. त्याने दुःशासनाला संकेत केला.
सारी सभा स्तब्ध होती. दुःशासन आत्मविश्वासाने पुढे झाला आणि त्याने द्रौपदीच्या पदराला हाती घेतले. बसल्या जागी कर्णाच्या अंगाला कंप सुटला. घशाला कोरड पडली. जे घडावे, असे वाटत होते, ते पाहण्याचे धाडस कर्णाला राहिले नाही.
कर्णाचे नेत्र नकळत मिटले गेले…
✍️ *क्रमश…* ✍️
