🚩 *राधेय/४६* 🚩
कर्णरथाने रणभूमी ओलांडली. नकळत कर्णाने रथाचे वेग ओढले. रथ थांबला. रथावर उभा राहून कर्ण पाहत होता.
सर्वत्र शांतता नांदत होती. निरभ्र आकाशात प्रशांत चंद्रमा आपल्या प्रभावळीसह प्रवास करीत होता. कार्तिक मासाचे शुभ्रधवल चांदणे धरतीला न्हाऊ घालीत होते. निशेचे रूप गंभीर व भव्य बनले होते. पूर्वेचा गार वारा सुखदायक वाटत होता. रात्र हळुवार पावलांनी चढत होती.
भीष्मभेटीने एकाकी बनलेल्या मनाला ती गूढता जाणवत होती. कर्णाला स्वगृही जावे, असे वाटत नव्हते.
कर्णाने रथ हाकारला. कौरवशिबिराला टाळून तो नदीकडे रथ नेऊ लागला. नदीकिनारी रथ थांबताच कर्ण रथातून उतरला.
विस्तीर्ण वाळू-किनाऱ्यांमधून जाणारा हिरण्यवतीचा प्रवाह चांदण्यात चमकत होता. नदीपलीकडे धूसर अंधारात पांडवांचे शिबिर विस्तारले होते. त्या शिबिरात असंख्य पलिते-मशालींच्या खुणा रत्नशिडकाव्यासारख्या पसरल्या होत्या.
कर्णा नदीपात्राकडे वळला. तो जात असता त्याची पादत्राणे वाळूत रुतत होती. प्रत्येक पावलागणीक करकर नाद उठत होता. किनाऱ्याच्या मध्यभागी जाऊन कर्ण उभा राहिला. त्याचे लक्ष हिरण्यवतीच्या चंदेरी पठ्ठयावर खिळले होते.
… या नदीची ओढ एवढी का वाटावी? पूर्वी अनेक वेळा नदीकाठावर उभे असता मी त्या जीवनदात्रीला विचारीत असे, ‘हे जननी, कोणाच्या हातून मी तुझ्या प्रवाहावर सोडलो गेलो? त्या जीवानं तुला काही सांगितलं का? ते सुकुमार कोमल हात तुझ्या पात्रात भिजत असता निखळलेल्या अश्रुबिंदुंनी तुझ्या मनात वलयं निर्माण केली का?’
आज त्या प्रश्नांची उत्तरं मिळूनही तुझ्या दर्शनाची ओढ कमी होत नाही. ज्याला उद्या रणांगणाचं रौद्र दर्शन घ्यायचं आहे, त्या रणयज्ञात आहुती टाकायची सूडानं आकर्ण खेचलेल्या प्रत्यंचेतून सुटलेल्या बाणांच्या शिळांनी कान तप्त करायचे आहेत, क्षमा, दया, शांती, यांना अवसर न देता ईर्ष्या, अहंकार, घात, अपघात यांचा आश्रय शोधावयाचा आहे, अशा वेळी रणभूमीचं चिंतन करण्याऐवजी या नदीतटाकडं कशाला यावं एवढी ओढ का वाटावी? …
त्या विचारांनी कर्णाच्या मुखावर चिंता प्रगटली. प्रवाहपतिताला प्रवास करायचा असेल, तर प्रवाहाची सोबत कशी सोडता येईल? सारं जीवन तर या नदाकीठावर बांधलेलं, जीवनाचा प्रवास याच प्रवाहावरून सुरू झालं?: जीवनातली महादानं याच काठावर दिली आणि तशीच स्वीकारली आणि आता शेवटचं दान इथंच दिलं जाणार.
कर्णाचे अंग त्या विचाराने शहारले. त्याने आपले उत्तरीय अंगाला लपेटून घेतले.
मृत्युचे भय मला वाटत नाही. जगण्यासारखं काहीच उरलंच नाही; मग मृत्युचं भय का वाटावं? सारेच प्रवाह एक ना एक दिवशी सागराला मिळतात, असं. ऐकतो. हा प्रवाह त्या रूपात विलीन होईल, तेव्हा त्या प्रवाहाचं स्वतंत्र अस्तित्व राहील का? नशिबी स्वर्ग असो, नाहीतर रौरव; पण तो कोणत्या रुपानं भोगायला मिळतो? हं! भोगाची आसक्ती म्हणजेच जीवन. भोगांचा त्याग म्हणजेच मृत्यू. त्या मृत्यूची वाट चालत असता भोगाची आठवण का व्हावी? ज्यांनी जीवनमरणाच्या कक्षा सहजतेनं ओलांडल्या आहेत, त्या पितामहांनाच हा प्रश्न विचारायला हवा होता. मृत्यूला शरण जाणं सर्वांत सोपं; पण दरी आलेल्या मृत्यूला तिष्ठत ठेवून, त्यावर दृष्टी बांधून राहणं केवढ कठीण असेल!
मरणापेक्षा वृद्ध होत जाणं अधिक कठीण. मृत्यूबरोबर सारं संपून जातं. पण वृद्ध होत जाणं म्हणजे रोज काही ना काही त्याग करणं. आपलं मरण आपण रोज पाहणं. आपला क्षय आपण सहन करणं. हे माहीत असून, इच्छामरणी भीष्मांनी जीवनाची आसक्ती का धरली? कोणत्या इच्छेसाठी? पितृनिष्ठेपायी पाळलेलं खडतर ब्रह्मचर्य आणि केलेला राजत्याग. त्या त्यागाचं फळ भोगण्यासाठी? परोक्ष सत्ता गाजवण्यासाठी का जीवनाची धडपड होती? त्याचा विचार मी का करावा? तो माझा अधिकारही नाही. दारी मृत्यु तिष्ठत असता, याचा विचार करण्याची मला उसंत तरी कुठं आहे?
मृत्यु! सर्व यातायात संपवणारा जीवनातल्या धडपडीत विश्राम देणारा तो मृत्यु केवढा कल्याणकारक वाटावयास हवा; पण मनात मृत्युचा विचार आला की, त्या ओगळवाण्या किडयाचा स्पर्श जाणवतो- आपल्या कठोर नांग्यांनी मांडी पोखरणारा.
त्या विचाराने कर्णाचे अंग गारठले. साऱ्या अंगाला कापरा भरला. आपले उत्तरीय झटकून त्याने त्वरेने ते अंगाभोवती लपेटून घेतले. ती कृती करीत असता किनाऱ्यावर विसावलेली एक टिटवी भीतीने उडाली. आपल्या कर्कश आवाजाचा दीर्घ साद घालीत ती कर्णाच्या मस्तकावरून निघून गेली.
कर्णाने मनातले विचार झटकले. तो रथाकडे जाण्यासाठी वळला. त्याच वेळी त्याची पावले जमिनीला खिळली. कर्णाच्या चेहऱ्यावर आश्चर्य प्रगटले. तो सावकाश वळला. तो भास नव्हता. नदीच्या पैलतीरावरून बासरीचे गोड सूर कानांवर येत होते.
अशा अपरात्री बासरी कोण वाजवतेय्? एवढी सुरेल! उद्या रणसंग्राम सुरू, त्या रणभूमीवर प्रवेश करण्याआधी बासरीचे सूर ऐकू येतात. वचनपूर्तीसाठी कृष्ण बासरी वाजवतोय् की, मनाची व्यथा टाळण्यासाठी बासरीचा आश्रय घेतोय्?
शरपंजरी पडलेल्या भीष्माजवळ अधोवदन बसलेल्या कृष्णाचे रूप कर्णाला आठवले. त्याने प्रथम मान वर केली, तेव्हा त्याच्या रूपावर प्रगटलेली व्यथा कर्णाच्या दृष्टीसमोरून तरळून गेली.
पितामह भीष्म! एक वयोवृद्ध, तपोवृद्ध तापस. कुरुकुलाचा ज्येष्ठ. याच भीष्मांनी पांडवांच्या राजसूय यज्ञप्रसंगी कौरवांचा रोष पत्करून कृष्णाला अग्रपूजेचा मान दिला होता. त्याला ईश्वरी अंश मानले होते. त्याच भीष्मांच्या समोर शिखंडीला उभा करून, अर्जुनाच्या हातून भीष्मपतन घडवीत असता, कृष्णा, तुझ्या मनाला केवढे क्लेश झाले असतील?
कर्णाने पैलतीर न्याहाळण्याचा प्रयत्न केला; पण चांदण्याच्या धूसर पडद्याखेरीज काही दिसत नव्हते. वाऱ्यावरून बासरीचा साद अखंड लहरत येत होता.
कर्ण उभ्या जागी बसला. मागे घेतलेल्या डाव्या हातावर विसावून तो ती बासरी ऐकत होता.
केवढा गोड आवाज! सारी चिंता दूर करण्याचे सामर्थ्य त्या बासरीत आहे. पहिल्या सूर्यकिरणां बरोबर शांत सरोवरातील कमल उमलावे आणि गुंजारव करीत तृप्ततेने भुंगा बाहेर पडावा, तसे ते सूर उमटत होते. बासरीचे केवढे हे सामर्थ्य.
त्या बासरीत काही नसते, म्हणे! ती एक शुष्क वेळूची नळी. छिद्रांकित. महत्त्व असते, ते सावधानतेत. त्या नळीत फुंकरीलेल्या फुंकरीला, हळूवार बोटांनी छिद्राना जपण्याला. त्यातूनच मनाचे सूर उमटतात.
कृष्णाने सांगितले होते: ‘फुंकर! निर्जीवाला सजीव करणारी, सूर भरणारी फुंकर.’
साऱ्यांनाच जीवनात अशी फुंकर थोडीच लाभते?
अग्नी प्रज्वलित करण्याला फुंकर मारावी लागते तीच फुंकर समईची ज्योत शांत करते.
तसं पहिलं, तर मानवी देह हीच एक विधात्यानं घडवलेली बासरी आहे. त्याच्या एका फुंकरीन सजीव बनलेल्या देह. मातेच्या श्वासानी जपलेला. त्या बोटाच्या जपणूखाली सुखावलेला.
बाल्यावस्थेतल्या अवखळ सुरांना केव्हातरी प्रौढत्वाचा स्थिर सूर सापडतो. तारुण्यानं घातलेल्या फुंकरीनं उन्मादक सुरांची आठवण याच बासरीतून होते. आणि वार्धाक्याच्या विकल श्वासांनी तीच बासरी अस्थिर सुरांची धनी बनते. तो सुर केव्हा तुटेल कशानं तुटेल, याची भीती बाळगीत असता, कालाच्या एका धीट फुंकरीनं सारे सूर विरून जातात: कायमचे, उरतं, ते देहाचं शुष्क काष्ठ, तेही मूळ स्वरूपात विलीन होऊन जातं, मागं रहते, ती आठवण सुरेल बासरीची आठवण रेगाळणाऱ्या सुरांचं स्वप्न!!
फुंकर मारणारा कधीच का ध्यानी येत नाही?
कर्णाने वर पाहिले.
आकाशातला चंद्र एका शुभ्र विरळ ढगाआडून सरकत होता. पाहता-पाहता त्या ढगाचे वस्त्र दूर झालेले आणि चंद्र मूळ तेजात प्रकाशु लागला.
… काळांचं अस्तित्व जाणवत नाही कसं? ते तर सदैव जाणवत असतं. निदान मला तरी जाणवलं या जगात येताच नदीप्रवाहावरचा प्रथम प्रवास घडला तो त्याच्या सोबतीनं शस्त्रस्पर्धेच्या वेळी तरुण मनात याचंच स्वप्न रेंगाळत होतं, द्रौपदी स्वयंवराच्या वेळी याच मृत्युनं मला हिणवलं. जरासंधाच्या द्वंद्वात याच काळाची छाया माझ्यावरून फिरत होती. कृष्णानं जन्मरहस्य सागितलं तेव्हा मृत्युच्या अस्तित्वाची जाणीव झाली, सूर्याच्या आशीर्वादानं ते रूप जपता आलं इंद्रच्या कृपेनं त्या रौद्र रूपाला गोंजारता आलं:… आणि जन्मदात्रीच्या भेटीत त्या मृत्युचं साक्षात दर्शन झालं मृत्युचं हे रूप माझ्याइतकं पाहिलंय् कुणी त्या परिचित मृत्यूचं भय का वाटावं?
मृत्यु म्हणजे सर्वनाश नव्हे मृत्यु म्हणजे रुपांतर. ग्रीष्मकाली सूर्यकिरणांत हिमालयाचे हिमखंड वितळतात, म्हणजे का त्या बर्फाचा नाश झाला म्हणायचं? मग गंगेचा पूर. ते रूप कोणतं? तीच गंगा सागराला मिळते म्हणजे का ती नाहीशी होते? ते सागररूप तिचंच नव रूप नाही का? या रूपांतराचं भय वाटतं म्हणूनच मृत्युच्या विचाराने कर्णाची मान ताठ झाली. एक निराळाच विश्वास त्याच्या मनात प्रगटला.
रूपांतराचं भय! परिचितातून अपरिचितात जायला एवढी भीती वाटते? प्रत्येक क्षणाला रूपांतरातून जाणाऱ्या मानवाला अंतिम रुपांतराची भीती का वाटावी? आश्चर्य आहे जीवनातलं बाल्य केव्हा सरलं, तारुण्यानं जीवनात केव्हा पदार्पण केलं, वार्धक्याचा स्पर्श झाला, तो क्षण कोणता? ही रुपांतरं घडत असता भीती का वाटावी? आतृप्तता हेच कारण आसवं!
माझ्या जीवनानं मला भरपूर संपन्नता दिली.जन्मदात्रीनं मला प्रवाहावर सोडलं म्हणून काय झालं? जलप्रवाहानं जिव्हाळयात का कमतरता होती? त्या मायेच्या उबाऱ्यात वाढत असता दुर्योधना सारखा मित्र लाभला. त्याच्या प्रेमामुळं राज्याधिकार उपभोगता आला. पराक्रमाला अवसर मिळाला. वृषालीसारखी जीवनाची सोबत लाभली.गुणी पुत्रांचा पिता म्हणून समाधान अवतरलं. संपन्न जीवन म्हणजे आणखी काय असतं?
ऐहिक ऐश्वर्य व्यावहरिक समाधान वासना-तृप्ती म्हणजेच का साफल्य! ते प्राण्यांनाही भोगत येतं. मानवी जीवनाचं साफल्य ऐहिक तृप्तीत नाही. या तृप्तीखेरीज आणखी एक तृप्ती असते. ती मी संपादन केली आहे. माझ्या मृत्यूबरोबर ती तृप्ती लुप्त पावणारी नाही. परमेश्वारनं सूर भरलेल्या या बासरीतून जसे तीव्र सूर उमटले तशीच आसंख्य कोमल सुरांचीही पखरण झाली. चारित्र्य जपता आलं. उदंड स्नेह संपादन करता आला. मित्रच नव्हे, तर शत्रूही तृप्त झालेले पाहिलेले. वैरभाव पत्करला, तोही परमेश्वररुपाशी. जीवनचं यश यपेक्षा वेगळं काय असतंय़ त्या विचारांनी कर्णाला प्रसन्नता लाभली. एकदम तो सावध झाला. त्याने पैलतीराकडे पाहिले.
बासरीचा सूर थांबला होता. सर्वत्र नीरव शांतता पसरली होती.
कर्णाच्या चेहऱ्यांवर स्मित उमटले.
बासरीचा सुर विरला होता आता परत फुंकर मारीपर्यंत छिद्रांकित पोकळ काष्ठ एवढंचं बासरीचं रूप शिल्लक राहिलं होतं. केव्हातरी त्याच जागत्या नि:श्वासानं शेवटी फुंकर मारली जाईल. या देहाच्या बासरीचा सूर विरून जाईल. मागं राहील, आठवण. एका एकाकी जीवनाची. त्याच्या सफल दातृत्वाची. अजोड सोसण्याची: बस्स! तेवढं राहिलं, तरी खुप झालं…
जगायला पात्र आहेत ते जगू देत. आपल्या मृत्युनं त्यांचं जीवन संपन्न होवो. त्यांच्या साऱ्या इच्छा-आकांक्षा सफल होवोत. त्यानंच आपल्या मृत्युला अर्थ लाभेल.
कर्ण विचारातून भानावर आला. शांत मनाने तो उभा राहिला.
सर्वत्र शांतता होती.
कर्णाने पांडवशिबिराकडे पाहून हात जोडले.
कर्ण आपल्या रथाजवळ आला. रथाच्या दोन्ही मशाली शांत झाल्या होत्या. कर्ण तसाच रथारूढ झाला. त्याने मागे वळून पाहिले.
धुके दाट बनू लागले होते.
त्या धुक्याच्या पडद्यामागे पैलतीर झाकला गेला होता.
✍️ *क्रमश:* ✍️
