राधेय – भाग ४७

🚩 *राधेय/४७* 🚩

कृष्ण थकल्या पावलांनी आपल्या शिबिराकडे जात होता. आकाशातल्या वाढत्या चंद्राबरोबर रात्र चढत होती. उतरणाऱ्या धुक्याने अंग थंडावत होते. कृष्णाचे लक्ष शिबिराबाहेर शेकोटीच्या उबाऱ्यात तिष्ठणाऱ्या सेवकांकडे गेले. कृष्ण जवळ जाताच सेवकांनी कृष्णाला वंदन केले. काही न बोलता शिबिराचा पडदा दूर सारून कृष्णाने आत प्रवेश केला. कृष्णाची पावले द्वारीच थबकली. शिबिरात धूपाचा वास दरवळत होता. समईचा प्रकाश शिबिरात पसरला होता. कृष्णाचे लक्ष आसनावर बसलेल्या विदुरावर खिळले होते. अशा अपरात्री विदुराला पाहून कृष्णाच्या मुखावर आश्चर्य प्रगटले. कृष्णाची वाट पाहणारा विदुर बसल्या जागी पेंगत होता. त्या वयोवृद्ध, सात्विक पुरुषाच्या दर्शनाने कृष्णाच्या उद्विग्न मनाला किंचित समाधान लाभले. विदुराचा निद्राभंग होऊ नये, म्हणून कृष्ण अलगद पावलांनी जात असता कृष्णाच्या हातातल्या बासरीचा स्पर्श समईला झाला. विदुराचे नेत्र उघडले गेले. कृष्णाला पाहताच तो गडबडीने आसनावरून उठला. ‘विदुर, बैस. संकोच करू नकोस.’

आसनस्थ होत असता विदुरच्या मुखातून एकच दीर्घ श्वास बाहेर पडला. विदुर कृष्णाकडे पाहत असता त्याचे लक्ष कृष्णाच्या हाती असलेल्या बासरीकडे गेले. न राहवून विदुराने विचारले, ‘कृष्णा, एक विचारू?’

कृष्णाच्या मुखावर उदास स्मित प्रगटले. ‘अशा अपरात्री बासरी घेऊन कुठं गेलो होतो, हेच तुसा मनात आलं ना?’ विदुराने होकारार्थी मान डोलावली

‘मित्रा! हरवलेली मनःशांती मिळवायला माझ्या जवळ एवढा एकच आधार आहे. थकल्या मनाला विरंगुळा वाटावा, म्हणून नदीकाठचा एकांत शोधायला गेलो होतो. शांती दूरच राहिली. उलट, मन अधिकच अशांत बनलं. माझी ही अवस्था, तर त्याची अवस्था काय असेल, कोण जाणे!’

‘कुणाची?’ विदुराने विचारले.

कृष्णाच्या चेहऱ्यावर एक निराळाच भाव उमटला. तो म्हणाला, ‘आज माझी बासरी ऐकायला असाच एव थकला-भागला श्रोता लाभला होता.’

‘कोण होता तो?’

‘ते मला कसं कळणार ऐलतीरावर मी बासरी वाजवीत होतो, पैलतीरावरून तो ती ऐकत होता. मधून हिरण्यवतीचा प्रवाह वाहत होता. आमच्यांतलं अंतर हळूहळू घुक्यानं आच्छादलं जात होतं,

विदुराला कृष्णाच्या डोळ्यात अश्रु तरळल्याचा भास झाला.

स्वतःला सावरीत कृष्णाने विचारले, ‘अशा अपरात्री तू बरा आलास.’

विदुर आसनावरून उठला. त्याचे अंग कृष्णाच्या प्रश्नाने शहारले. अग्निकुंडाजवळ जाऊन त्यावर आपली शुष्क बोटे चाळवीत विदुर उभा राहिला.

विदुरच्या पाठमोऱ्या आकृतीकडे कृष्ण पाहत होता. विदुराचे शब्द उमटले, ‘कृष्णा, पितामह पडले. शरपंजरी पडलेल्या त्या वृद्ध तापसाचं दर्शन घेतल्या पासून मन भडकून उठलंय्? बोलूनचालून मी दासीपुत्र. मान, अपमान, अवहेलना सोशीत माझं आयुष्य गेलं. धृतराष्ट्राचं सख्य आणि आश्रय लाभला, तरी खऱ्या अर्थानं मी भीष्मांच्या स्नेहामुळं जगलो. माझ्या ज्ञानोपासनेला अर्थ लाभला. कृष्णा, मी तुझ्या इतका ज्ञानी नाही, पण चारी पुरुषार्थांचं ज्ञान असणारा एकच क्षत्रिय मला माहीत आहे. तो अधिकार फक्त भीष्मांचाच आहे. त्या भीष्माला शरपंजरी पडलेलं पाहिल्यापासून माझ्या जिवाचा थारा उडाला आहे. आयुष्यात प्रथमच मला पोरकेपण जाणवतंय्. काही सुचेना, कळेना, तेव्हा अशा अपरात्री तुझ्याकडं…

विदुर बोलता-बोलता थांबला. त्याच्या खांद्यावर कृष्णाचा हात स्थिरावला होता. त्या स्पर्शातला स्नेह विदुराला जाणवत होता. विदुर वळला. विदुराचे सुरकुतलेले गाल अश्रूंनी भिजले होते. विदुराचे ते विकल रूप पाहून कृष्णाचा जीव उभ्या जागी गुदमरला. सारी शक्ती एकवटून विदुराने विचारले, ‘कृष्णा, कशासाठी हे युद्ध? यातून काय प्राप्त होणार?’

‘सर्वनाश!’ कृष्णाने शांतपणे सांगितले.

‘कशासाठी?’

‘पुरुषार्थाचा अहंकार अन् सत्तेची लालसा हेच कारण.’

‘कृष्णा, यात तुला आनंद आहे?’ आश्चर्याने विदुराने विचारले.

‘दु:ख अन् सुख यांच्या मर्यादा ओलांडून मी हा निर्णय घेतला आहे.’ कृष्ण खिन्नपणे हसला. ‘विदुरा, ही नुसती सुरुवात आहे. यानंतर मला खूप पाहायचं आहे, सोसायचं आहे. ज्यांनी पांडवांना शस्त्रविद्या दिली, त्या द्रोणाचार्यांचा मृत्यू पांडवांकरवी घडलेला मला पाहावा लागेल. ज्याच्या दातृत्वानं पांडव निर्भय झाले, त्या कर्णाचा मृत्यू त्याच्याच भावाच्या हातून होत असलेला मला पाहावयाचा आहे. ते घडवायला पांडवांचं बळ अपुरं आहे. ते मलाच करावं लागेल. भीष्माचा वध शिखंडीला पुढं करून साधता आला. अशाच अन्य मार्गानी पांडवांना विजय प्राप्त करून घ्यावा लागेल अन् ते माझ्याचकरवी घडेल. विदुरा, तू युद्धभूमीपासून दूर आहेस. जे घडतं, ते तुझ्या परोक्ष. पण मला हे सर्व पाहावं लागणार आहे. ते बळ मिळविण्याचा मी प्रयत्न करीत आहे.’

कृष्णाची दृष्टी टाळीत विदुर म्हणाला, ‘हे बळ मिळवण्यापेक्षा हे थांबवीतच का नाहीस?’

‘काय?’

‘हे सर्वनाशी युद्ध!’

‘त्यात मला आनंद का आहे? विदुरा, प्रत्यंचेतून बाण सुटण्याआधी त्याचा विचार करायचा. सुटलेला बाण नंतर अडवता येत नाही. तुला उपाय सुचतो?’

‘एकच उपाय आहे.’ विदुर म्हणाला.

‘कोणता?’ कृष्णाने आशेने विचारले.

‘त्या कर्णाला त्याचं जन्मरहस्य सांगितलं, तर…’

‘कर्णाला त्याचं जन्मरहस्य कळलेलं आहे.’ कृष्ण बोलानी विदुर चकित झाला. त्याने विचारले, कुणी सांगितले?’

‘मी… भीष्मांनी, एवढंच नव्हे तर त्याच्या आईनंसुद्धा…’

‘अन् ते त्यानं मान्य केलं नाही?’ विदुराचे ताठरलेले अंग सैल पडले.

‘नाही, विदुरा, त्यानं रक्ताचं नातं आनंदानं मान्य केलं; पण ते करीत असता त्याचं कर्तव्याकडं दुर्लक्ष झालं नाही.’

‘कसलं कर्तव्य ?’

‘त्याच्या जीवनात एकच कर्तव्य उरलं आहे. मित्रप्रेम! तेवढं तो निष्ठेनं पाळीत आहे.’

‘अधर्माशी जोडलेलं सख्य, त्याला का निष्ठा समजायची?’

‘धर्म आणि अधर्म! त्याच्या मर्यादा सांगायच्या कुणी? विदुरा, सूक्ष्मपणे सांगायचं झालं, तर धर्म हा स्वार्थ प्रेरितच असतो. जेव्हा त्या स्वार्थाला तडा जातो, असं दिसतं, तेव्हा ते कारण अधर्मी भासतं.’

‘कृष्णा, तू हे सांगतोस?’

‘त्यात आश्चर्य कसलं? विदुरा, तू ज्ञानी आहेस. तत्त्वज्ञानी आहेस. नित्य नवं ज्ञान मिळवण्यात तुइया जीवनाचा आनंद. तोच तुझा छंद. सत्ताविहीन चांगुलपणा आणि स्वार्थनिरपेक्ष तत्वज्ञान हे तुझं बळ आहे. तुला मी स्पष्टपणे विचारू?’

‘विचार ना!’

‘कौरवांची बाजू एवढी अधर्मी होती, तर तू, पितामह द्रोणाचार्य, कृपाचार्य ‘कौरवांची बाजूनं का उभे राहिलात?’

‘कौरवेश्वरांना सोडून आम्ही कुठं जाणार? त्याखेरीज आम्हांला गत्यंतर नव्हतं.’

‘हे उत्तर खरं आहे?’ कृष्णाच्या चेहऱ्यावर स्मित उमटले.

विदुराची दृष्टी वळली.

‘विदुरा, अशी फसवणूक करून चालत नाही. तुम्ही मनात आणलं असतं, तर युद्ध टाळता आलं नसतं, तरी यातून स्वत:ची सुटका सहज करून घेता आली असती.’

‘सुटका?’

‘हो!’ विदुराच्या दृष्टीला दृष्टी भिडवीत कृष्ण म्हणाला, ‘भीष्म बोलूनचालून पितामह. त्यांचा अधिकार मोठा. त्यांना आपल्याच कुलाचा संहार पाहण्याची सक्ती नव्हती. युद्ध अटळ दिसताच वानप्रस्थाला जातो, असं ते म्हणाले असते, तर त्यांना कुणी अडवलं असतं? मी पांडवांच्या बाजूनं उभा राहिलेलं पाहताच, दुर्योधनाबद्दल प्रीती बाळगणाऱ्या माझ्या ज्येष्ठ भावानं- बलरामदादानं या युद्धातून आपलं अंग काढून घेतलं नाही का? त्यांना कुठं मी सक्ती करू शकलो? तुम्हां सर्वांचा तर वयाचा, ज्ञानाचा, मानाचा अधिकार होता; पण तुम्ही त्याचा आधार घेऊ शकला नाही. कारण….’

‘बोल, कृष्णा! मी त्या कल्पनेनंच अस्वस्थ आहे. मला ते कारण ऐकायचं आहे.’

कृष्णाने विदुरावरची दृष्टी न काढता स्पष्टपणे सांगितले, ‘कारण, कौरवांची निष्ठा हा तुम्हांला धर्म वाटत होता. मनात असलेली पांडवप्रीतीसुद्धा त्या निष्ठेपुढं कमी पडली. कौरवनिष्ठेपासून पळून जाणं तुम्हांला जमणारं नव्हतं, तुमच्या ज्ञानाला तो भयानक शाप होता.’

विदुराचा चेहरा कृष्णबोलांनी आणखीच फिका पडला. त्याचे ओठ थरथरू लागले. निश्चयी स्वरात तो म्हणाला, ‘कृष्णा! हेच मलासुद्धा म्हणता येईल. हेच सत्य असेल, तर तू पांडवांच्या बाजूनं का उभा राहिलास?’

‘त्याचं उत्तर मी शोधतोय्, विदुरा… निष्ठा स्नेहानं बांधली जाते. नुसत्या माझ्या पित्याची बहीण. पांडव माझ्या आत्याचे पुत्र. या नात्यानंच आम्ही जवळ आलो, असं नाही. या पांडवांच्या गुणांनी मी त्यांच्याकडं आकर्षित झालो. द्रौपदीशी पांडवांचा विवाह झाला, तेव्हा पांडवांच्या बाजूनं तिथं कोणी नव्हतं. मी ती उणीव भरून काढली. पांडवांना मी अगणित संपत्तीचा अहेर केला. त्यांच्या सहवासात अभेद्य स्नेह निर्माण झाला. त्यांना कुणाचा आधार नव्हता. त्यासाठी मी पुढ झालो. अरण्यात सुद्धा त्यांचं राज्य वसवलं. खांडवप्रस्थाचं रूपांतर घडवलं. माझ्या सेनेच्या बळावर त्यांना दिग्विजयी बनविलं. मी कृतार्थ झालो, असं मला भासलं; पण तो भासच होता. मानवी जीवन हाच मोठा जुगार आहे, हे त्या वेळी माझ्या ध्यानी आलं आलं नाही. निष्ठा एकदाच बांधली जाते. त्याला कारण असावंच लागतं, असं नाही. तुम्हीच काय, पण ज्या यादवकुळाचं संरक्षण मी केलं, त्यांतले मोजके अनुयायी सोडले, तर सारं यादवकुळ आज कौरवांच्या बाजूनंच उभं राहिलं आहे. जी तुमच्या निष्ठेची व्यथा, तीच माझ्या निष्ठेची कथा बनली आहे.’

‘कृष्णा, तू हे बोलतोस?’ विदुर आश्चर्याने म्हणाला, ‘युद्ध सुरू होण्याच्या दिवशी स्वजनांना पाहून गर्भगळीत झालेल्या अर्जुनाला तूच उपदेश केलास ना! ज्या धर्मज्ञानानं अर्जुनाला हरवलेलं बळ सापडलं, त्या वक्त्याच्या तोंडी हे उद्गार शोभत नाहीत.’

कृष्ण शुष्कपणे हसला. ‘मित्रा! धर्म, पांडित्य हे दुसऱ्यांना सांगायला सोपं; पण ते स्वत: आचरणं भारी क्लेशकारक होतं. कर्मफलाची अपेक्षा न धरता युद्धाला उभा राहा, असं सांगत असता, अर्जुनानं युद्धाला प्रवृत्त व्हावं, हे फल माझ्या मनाशी नव्हतं का? माझ्या उपदेशानं अर्जुन युद्धाला उभा राहिला; पण मी सांगितलेलं कितपत आचरलं जाईल, याची मला शंकाच आहे. सूडभावनेनं पेटलेला भीम नित्य नव्या प्रतिज्ञा करतोय्. अर्जुन अहंकारापोटी स्वतःला श्रेष्ठ धनुर्धर समजतो. युधिष्ठिर, जीवनातलं यश कोणत्या क्षणी द्यूतपटावर फेकील, याचा भरवसा नाही. भरवसा फक्त एकाच गोष्टीचा आहे.’

‘कोणत्या?’

‘पांडवांचा माझ्यावरचा विश्वास. कोणत्याही प्रकारे मी त्यांना इच्छित फल मिळवून देईन, ही त्यांची निष्ठा अढळ आहे… अन् त्या निष्ठेसाठी सारं उघड्या डोळ्यांनी मला सोसायला हवं. हे युद्ध आता अटळ आहे. या युद्धामुळं पदरी कीर्ती येवो वा अपकीर्ती; पण त्याचं श्रेय फक्त आम्हां दोघांनाच राहील.’

‘दोघे कोण?’

‘एक मी, अन् दुसरा कर्ण! दैव तरी केवढं विचित्र! मी उपदेश केला अर्जुनाला, अन् नकळत आचरला जातो, तो कर्णाच्या हातून. सुख आणि दु:ख, लाभ अन् हानी, जय अन् पराजय ही दोन्ही सारखी मानून युद्धात उतरणारा कर्णाखेरीज दुसरा वीर कोणता? उद्या रणांगणात तो सूर्यपुत्र अवतरेल, तेव्हा त्याचं तेज प्रसन्न करणारं भासेल. कोणता स्वार्थ आता त्याच्याजवळ राहिलाय्? जीवित सुद्धा त्यानं सुरक्षित राखलं नाही. निर्विकार बुद्धीनं स्नेहासाठी सर्वस्व अर्पण करणारा तो कर्ण धन्य होय. पांडव मला दैवगुणसंपत्र समजतात. आपल्या यशासाठी अर्जुनानं माझा आधार शोधला. देवत्वाचा आधार घेऊन विजय संपादन करणारा अन् मित्रप्रेमासाठी उघड्या डोळ्यांनी माझ्याशी वैर पत्करणारा, यांतला श्रेष्ठ कोण, हे ठरवणं अवघड आहे. अर्जुनाची माझ्यावर श्रद्धा आहे; पण असं निर्व्याज प्रेम ते फक्त कर्णच करू जाणे! उद्या रणांगणातला त्याचा मृत्यू माझ्याच आज्ञेनं घडणार आहे; ही कल्पनाही मला सहन होत नाही.’

विदुराचे रूप पालटले. निश्चयी सुरात तो म्हणाला, ‘कृष्णा, त्याची चिंता करू नकोस. उद्या हे युद्ध थांबेल, थाबवावंच लागेल. त्यासाठी मी उपाय शोधलाय्.’

‘कसला उपाय?’ कृष्णाने अधीरतेने विचारले.

‘उद्या पांडवांना, कर्ण कोण आहे ते कळेल.’

‘विदुरा!’कृष्ण उद्गारला.

‘ते सात्विक वृत्तीचे पांडव आपल्या भावाचा वध कदापिही करू धजणार नाहीत.’

मूर्तिमंत भीती कृष्णाच्या मुखावर प्रकटली. विदुराचा हात हाती धरीत तो म्हणाला, ‘नाही, विदुरा. तुला हे करता येणार नाही.’

‘का ?’

‘का?’ कृष्णाने कुंडात प्रज्वलित झालेल्या अग्नीकडे पाहिले. तिकडे बोट दाखवीत तो म्हणाला, ‘ते फुललेले निखारे पाहिलेस? त्यांवर आता पाणी टाकलं, तर ते जागच्या जागी विझून जातील; पण परत ते पेट घेणार नाहीत. त्यांचं जीवन तेजोहीन होऊन जाईल, ते संपूर्ण पेटूनच शांत व्हायला हवेत. त्यातूनच जीवनाचा दाह शांत करणारं भस्म निर्माण होतं.’

‘भस्म!’

‘विदुरा, आता ती संधी राहिली नाही. पांडवांना कर्णाशी असलेलं नातं कळलं, तर ते क्षणात शस्त्र संन्यास करतील, यात मला तिळमात्र शंका नाही; पण त्यामुळं कर्ण पांडवांना मिळणार नाही. त्याचा दुर्योधन स्नेह तसाच अखंड राहील अन् पांडवांनी स्वीकारलेला पराजय कर्णहस्ते दुर्योधनाच्या सुपूर्द केला जाईल. पांडवांच्या निष्ठेला, पितामहांनी स्वेच्छेनं स्वीकारलेल्या पतनाला अर्थ राहणार नाही. ते करण्याचं धाडस तू करू नकोस. तुझ्या इतकंच माझंही दु:ख तीव्र आहे. आता हे युद्ध फार काळ चालणार नाही. जेव्हा हे युद्ध संपेल, तेव्हाच आपलं दुःख हरण होईल.’

‘युद्धानं?’

‘युद्धानं नव्हे! जय-पराजयांतील अर्थ ज्यानं आधीच गमावला आहे; पण तरीही कर्तव्यावर जो अखेरपर्यंत दृढ राहिला, तो भीष्मच आपलं दुःख समजू शकेल. आपलं सांत्वन करण्याचं सामर्थ्य फक्त त्याचंच राहील. सध्या सोसण्याखेरीच आपलत हाती काहीही राहिलं नाही.’

कृष्णाच्या बोलण्याने विदुर विचारात गढला. त्या विचाराने भानावर येत विदुर म्हणाला, ‘कृष्णा, रात्र फार झाली. उद्या तुला परत सारथ्य करायचं आहे. मी येतो.’

‘कसा आलास ?’

‘नौका आणली आहे.’

‘चल! मी येतो.’

विदुरापाठोपाठ कृष्ण शिबिराबाहेर आला. बाहरचा गारवा एकदम दोघांना जाणवला. विदुराच्या अंगावर नुसतं उत्तरीय होते. ते लपेटून घेऊन विदुर नदीच्या दिशेने जात होता. मागून कृष्ण चालत होता. नदीकाठावर दोघे आले. नदीपात्रात एक हंसाकृती नाव उभी होती. आजूबाजूच्या धुक्यामुळे सारे वातावरण गूढ बनले होते. विदुर वळला. तो कष्टाने म्हणाला, ‘कृष्णा, येतो.’

कृष्णान आपल्या अंगावरचे उबदार वस्त्र काढलं. ते वस्त्र विदुराच्या खांद्यावर लपेटीत कृष्ण म्हणाला, ‘मित्रा, तू जाण्याआधी मला तुझा आशीर्वाद हवा.’

‘आशीर्वाद!’ विदुर उद्गारला.

‘हो! विदुरा, कौरवसभेत तुझी दासीपुत्र म्हणून सदैव अवहेलना होत आली. तुझं पांडित्य, तुझी राजनीती यांकडं सदैव त्यांनी दुर्लक्ष केलं; पण असं असताही तू सत्याची कास कधीही साेडली नाहीस. तुझ्या तत्वज्ञानाचा, सांगण्याचा काही उपयोग होत नाही, हे माहीत असतानाही तू थांबला नाहीस. हरघडीचा पराजय सोशीत असताही उपदेश करीत राहण्याचं तुझं बळ अलौकिक. आजवर तुझ्याकडं कुणी आशीर्वाद मागितला नसेल; पण तो मी आज मागतोय्. उद्या पांडवांच्या विजयासाठी द्रोणाचार्य, कृपाचार्य, कर्ण यांसारख्या वीरांचा पराजय मला घडवून आणावयाचा आहे. उद्या माझ्याच आज्ञेनं सद्भावाचा पराजय घडेल. ते सोसण्याचं बळ मला हवंय्. तो आशीर्वाद देण्याचं सामर्थ्य फक्त तुझंच आहे.’

कृष्णाने आपला मस्तक वाकवलं. दवबिंदूंनी भिजलेल्या कृष्ण कुंतलांवर विदुराचा हात स्थिरावला. विदुराला काही बोलवत नव्हते. कंठ दाटून आला होता. तो एकदम वळला आणि नावेकडे जाऊ लागला.

कृष्णाने मान वर केली.

विदुर नावेत बसला होता. नाव मंद गतीने जात होती.

हळूहळू नाव दिसेनाशी झाली. या शांत वातावरणात नावेच्या वल्ह्यांचा ‘चुबक सळू’ असा आवाज उमटत होता.
तो नाद ऐकू येईनासा होईपर्यंत कृष्ण तिथेच उभा होता.

✍️ *क्रमश:* ✍️