🚩 *राधेय/४५* 🚩
महालात कर्ण अस्वस्थपणे फेऱ्या घालीत होता. काही न बोलता वृषाली पतीचे ते रूप पाहत होती. बाहेरच्या भर दुपारच्या प्रखर उन्हाच्या प्रकाशाने सारा महाल अधिकच प्रकाशमान झाला होता. अचानक कर्ण थांबला. एक दीर्घ नि:श्वास त्याच्या मुखातून बाहेर पडला. त्याचे लक्ष वृषालीकडे गेले. ‘काय पाहतेस?’
‘तुम्हांला!’ वृषाली म्हणाली.
‘वसू, आज युद्धाचा दहावा दिवस. तिकडं घनघोर युद्ध चालू असता, येईल ती वार्ता ऐकत स्वस्थ बसून राहायचं ती प्रतिज्ञा मी केली नसती, तर फार बरं झाल असतं, असं वाटतं.’
‘त्यात आपला काय दोष? पितामह भीष्मांनी आपला अपमान केला नसता, तर…’
‘अपमान काय नव्यानं केला होता? ते नेहमीचंच होतं. तेवढ़ं निमित मी साधलं अन् प्रतिज्ञा करून रणांगण चुकवलं; पण जीवनातलं रण टाळून टळत नाही. ते माझ्या दैवी लिहिलं आहे. आज, नाहीतर उद्या.’
‘रणांगण टाळलं?’ आश्चर्याने वृषालीने विचारले.
कर्ण एकदम सावध झाला. खोटे हसत तो म्हणाला, ‘वसू आपली सेना, मुलं, भाऊ, रणांगणावर लढत आहेत अन् मी इथं स्वस्थ बसून आहे. याचा अर्थ तोच नाही का? मी रणांगणावर नसलो, म्हणून काय झालं? आज दहावा दिवस. आज तो कुरुपुंगव अजोड पराक्रम करील. कुणास माहीत, आज युद्धही संपून जाईल… अन्..’
बोलता-बोलता कर्ण थांबला. त्याची मुद्रा चिंतातुर बनली. आपले उत्तरीय सावरून तो सौधाकडे धावला. पाठोपाठ वृषाली गेली. तिला कारण विचारावे लागले नाही. युद्धभूमीकडून शंखनाद, रणभेरींचा आवाज उठत होता. कर्णाने सूर्याकडे पाहिले. मस्तकावरचा सूर्य ढळला होता.
‘वसू, कसल्या विजयाचा हा नाद आहे? कोणी विजय मिळविला? कोणाच्या मृत्यूनं कोण वाचलं? कोणाच्या पराजयानं कुणाचं यश वाढवलं?’
कर्ण युद्धभूमीच्या दिशेने पाहत होता आणि त्याच वेळी कर्णनिवासाच्या दिशेने एक रथ भरधाव येताना दिसला. द्रुम, चक्रधर, वृषसेन युद्धावर गेले होते. अशुभाच्या कल्पनेने कर्ण सौधावरून माघारी आला. धावत तो प्रासादद्वारी गेला. तोवर रथ तेथे येऊन पोहोचला होता. त्या रथातून द्रुम, चक्रधर, वृषसेन उतरत होते. त्या तिघांना सुखरूप पाहून कर्णाचे मन स्थिरावले.
सर्वांच्या पुढे आलेल्या चक्रधराला कर्णाने विचारले, ‘आज पितामह पराक्रमाची शर्थ करतात ना?’
‘हो! त्यांच्या पराक्रमाला तोड नव्हती. आजचा सूर्यास्त पांडवांनी पाहिला नसता.’
‘चक्रधर!’
‘भीष्मांच्या समोर पांडवांनी शिखंडीला आणलं. भीष्मांनी शस्र खाली ठेवलं अन् शिखंडी मागून अर्जुनानं…’
‘भीष्मांचा वध केला?
‘नाही. पितामह धारातीर्थी पडले आहेत. ते स्वेच्छामरणी आहेत. सध्या दक्षिणायन सुरू आहे. उत्तरायणा पर्यंत जीव धारण करण्याचा त्यांचा निग्रह आहे.’
‘पितामहांना शिबिरात आणलं?’
‘नाही. रणांगणावर जिथं ते पडले, तिथंच ते विश्रांती घेत आहेत. शरीरात घुसलेले बाणही काढण्यास त्यांनी नकार दिला आहे. दुर्योधन महाराजांनी त्यांना सुखशय्या देऊ केली; पण तीही त्यांनी नाकारली आहे.’
‘ते उघड्या भूमीवर पडून आहेत?’
‘त्यांनी कुरुक्षेत्राभोवती उगवणाऱ्या शरगवताची शय्या अंथरायला सांगितली आहे. त्यावरच ते विश्रांती घेत आहेत. पितामहांच्या पतनानं आपली सारी सेना धैर्य गमावून बसलीय्.
‘युद्ध थांबलं?’
‘नाही! द्रोणाचार्य सैन्याला आवर घालीत आहेत. पांडवांच्या बाजूनं रणाच्या जयभेरी वाजवल्या जात आहेत.’
‘जय! त्यांचा पितामह पडला अन् त्यात ते जय मानतात? जय तर खराच; पण त्या जयाला जोडलेली पराक्रमाची किनार कशी त्यांच्या ध्यानी येत नाही? पितामह पडले, यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही.’
भीष्मपतनाच्या वार्तेबरोबर कर्णाच्या डोळ्यां समोर ती मूर्ती उभी राहिली. भीष्मांबद्दलचा सारा संताप विरून गेला, आठवण राहिली, ती त्या तेजस्वी जीवनाची. आठवला त्यांचा त्याग, अजोड पराक्रम. कुरुवंशाचा सर्वांत श्रेष्ठ पुरुष, सर्वांना वाढवणारा. नीती, कर्तव्य आणि कर्तृत्व यांचा अधिकारवाणीने पाठ देणारा. आपल्या शान्त-दान्त वृत्तीने असीम त्यागाचा भार पेलणारा गांगेय ढासळला. मृत्यूचं भय बाळगून सदैव त्यापासून दूर पळण्यात जीवित खर्चणारे जीव कोठे आणि दारी आलेल्या मृत्यूला तिष्ठत ठेवून शरपंजरी विश्रांती घेणारा हा भीष्म कोठे!
रथाच्या आवाजाने कर्णाची तंद्री भंग पावली. रणवेश धारण केलेला अश्वत्थामा प्रासादाच्या पायऱ्या चढून येत होता. आपल्या नेत्रांतले अश्रु कष्टाने आवरीत अश्वत्थामा म्हणाला, ‘कर्णा, पितामहांनी…’
अश्वत्थाम्याच्या खांद्यावर हात ठेवीत कर्ण म्हणाला, ‘मला सारं कळलंय्.’
‘अंगराज! भीष्मपतन पाहताच साऱ्या सैन्यात एकच हाहाकार उडाला. सेनेला आवर घालण्यात तात अन् युवराज गुंतले आहेत. आपल्या वीरांना आता फक्त तुझ्या दर्शनाची ओढ लागली आहे. ते तुझ्या नावाचा ध्यास धरून बसलेत. तुम्हांला
‘हां, मित्रा! युद्धभूमीची आतुरता मला कळते. तिच्याही सहनशक्तीला मर्यादा आहेत चक्रधर, माझा रथ सिद्ध कर.’
कर्णाची मुद्रा क्षणात पालटली. प्रासादात जात असता तो आज्ञा देत होता, ‘चक्रधर, आता अवधी नाही. माझं रत्नजडित अन् सूर्यतुल्य शिरस्त्राण, सुवर्णाचं उज्ज्वल कवच घेऊन ये अन् ते माझ्या अंगावर चढव. रथामध्ये माझे सोळा भाते तयार ठेव. रथ माझ्या सर्व शस्त्रांनी सुसज्ज कर. शुभ्र, शीघ्रगामी अश्व रथाला जुंप अन् शस्त्रांनी भयभीत करणारा माझा सुवर्णशृंखला आणि कमलचिन्हांकित जयध्वज रथावर फडकू दे. कौरवांच्या रक्षणार्थ अन् पांडवांच्या नाशार्थ मी या घोर युद्धात स्वत:चे प्राणही अर्पण करण्यास आज युद्धभूमीवर प्रवेश करणार आहे.’
काही वेळात कर्ण रणभूमीसाठी तयार झाला. त्याच्या छातीवर रत्नखचित सुवर्णकवच होते. मस्तकी शिरस्त्राण झळकत होते. उजव्या खांद्यावर दिव्य धनुष्य शोभत होते.
वृषाली निरांजनाचे तबक घेऊन आली. तिने कर्णाला तिलक लावून ओवाळले, निरांजनाचे तबक खाली ठेवून वृषालीने शेला हाती घेतला. स्मित वदनाने कर्णाने आपले हात उंचावले. कर्णाच्या कमरेला शेला बांधून वृषाली म्हणाली, ‘मी वाट पाहते.’
‘निश्चित बघ! माझ्या पराक्रमाची महती सांगण्यासाठी मीच तुझ्या समोर येईन वृषाली, माझा शंख…’
देव्हाऱ्यावर ठेवलेला, सुवर्णाने आलंकृत केलेला शंख वृषालीने कर्णाच्या हाती दिला. तो शंख अत्यंत आदरभावाने मस्तकी लावून कर्णाने तो उजव्या हाती घेतला.
कर्ण प्रासादाबाहेर आला, तेव्हा रथ सिद्ध झाला होता. पायऱ्यांवर उभ्या असलेल्या वृषालीकडे त्याने पाहिले. त्याच्या ओठांवर स्मित प्रकटले. रथारूढ होत कर्णाने सारथ्याला आज्ञा केली, ‘युवराज दुर्योधनाच्या शिबिराकडं रथ जाऊ दे.’
रथ चालू लागला. पाठोपाठ अश्वत्थामा आणि चक्रधर यांचे रथ होते. रथ शिविराकडे वेगान जात होता. कौरवांनी आकाशी फडकत येणारा कर्ण-ध्वज पाहताच भीष्म पराभवाच दु:ख विसरून कर्णाचा जयजयकार करण्यास सुरुवात केली.
दुर्योधन कर्णाला सामोरा आला. कर्णाचे स्वागत करून तो कर्णाला सन्मानाने शिबिरात घेऊन गेला. तेथे कौरववीर गोळा झाले होते. युद्धभूमीवर युद्ध चालूच होते. दुर्योधन कष्टाने म्हणाला, ‘मित्रा, पितामह…’
‘त्यांच्या जीवनाचं सार्थक झालं; पण त्यांनी आरंभलेलं हे युद्ध…’
‘पुढं चालेल… दुर्योधन निश्चयाने म्हणाला, ‘मित्रा, आता पितामहांच्या नंतर सेनापतिपद तू स्वीकारावंस, असं साऱ्यांना वाटतं.’
‘नाही, युवराज. तसं झाल, तर फार मोठी चूक होईल. आता जबाबदारी मोठी आहे. भीष्म पतन पावले असतानाही, या क्षणी रणभार उचलून युद्ध करीत आहेत, ते द्रोणाचार्यच या पदाला योग्य आहेत. गुरुवर्य द्रोण उपस्थित असता तू अन्य कोणास सेनापती केलंस, तर या कीर्तिवंत योद्धयांना ते खपायचं नाही.’
‘पण तू…’
‘मित्रा, माझी चिंता करू नकोस. गुरुवर्य द्रोणाचार्यांच्या आधिपत्याखाली राहण्यात मला आनंद आहे. तू निश्चिंत ऐस. तुझ्यासाठी मी पराक्रमाची शर्थ करीन.’
‘दुर्योधन, कर्ण सर्व वीरांसह सैन्याच्या मध्यभागी असलेल्या द्रोणांकडे गेले. द्रोणाचार्यांना सेनापतिपद स्वीकारण्याची विनंती केली. द्रोणाचार्यांनी संमती देताच दुर्योधनाने यथाशास्त्र द्रोणाचार्यांना सेनापतित्वाचा अभिषेक केला. वाद्यांच्या प्रचंड घोषाने आणि शंखनादाने नव्या सेनापतीची द्वाही रणभूमीवर पसरवली. नव्या त्वेषाने कौरवसेना पांडवांना सामोरी गेली. सूर्यास्तापर्यंत युद्ध चालले.
सूर्यास्ताला युद्ध थांबले. श्रमाने व जखमांनी थकलेले योद्धे आपल्या शिबिरात परतले. कर्ण दुर्योधन-शिबिरात आला. दुर्योधनाचा निरोप घेत असता कर्ण म्हणाला, ‘युवराज, एक चूक घडली आहे. तिचं परिमार्जन मला करायला हवं,’
‘कसली चूक?’
‘रणभूमीवर जाण्याआधी पितामह भीष्मांचा आशीर्वाद घ्यायला हवा होता. तेवढी उसंत मिळाली नाही. तेच मी आता करणार आहे.’
‘मी येऊ?
‘नको, मी एकटाच जाईन.’
सूर्यास्त होऊन बराच अवधी झाला होता. चंद्रप्रकाशात सारे वातावरण गूढ वाटत होते. कर्ण एकटाच रथारूढ झाला. त्याने रथाचे वेग हाती घेतले. रथ चालू लागला. लावलेले पलिते पूर्वेच्या गार वाऱ्यावर फरफरत होते. रथ रणभूमीकडे जात होता. हत्तींचे चीत्कार, घोडयांची खिंकाळणी, रथांच्या चाकांचा भेदक आवाज, शंखनाद, रणवाद्यघोष, आर्त किंकाळ्या या आवाजांनी गजबजून उठणारी रणभूमी शांत वाटत होती. धारातीर्थी पडलेल्या वीरांच्या प्रेतांना चुकवीत रथ कष्टाने पुढे सरकत होता. युद्धभूमीच्या दक्षिणेला एक पलित्यांची माळ पेटली होती. त्या दिशेला कर्ण जात होता. ते स्थान नजीक येताच कर्णाने रथ थांबवला. सेवक पुढे आले. थोडया अंतरावर उभ्या असलेल्या दुसऱ्या रथाकडे पाहत कर्णाने विचारले, ‘जवळ कुणी आहे?’
‘द्वारकाधीश कृष्ण महाराज…’ सेवकाने नम्रपणे सांगितले.
‘आणि?
‘कोणी नाही सारे येऊन गेले.’
कर्णाने आपला किरीट उतरून रथात ठेवला. तो सावकाश भीष्मांजवळ गेला. भीष्म शरशय्येवर झोपले होते. त्यांच्याजवळ कृष्ण अधोवदन बसला होता. शेजारी प्रज्वलित असलेल्या मशालीचा प्रकाश भीष्मांच्या अर्ध्या चेहऱ्यावर पडला होता. त्यांचे डोळे मिटलेले होते. आपल्या रणावेषासहित धारातीर्थी विश्रांती घेणारा तो योद्धा पाहून कर्णाचे नेत्र भरून आले. त्या महापुरुषाच्या छातीवर शुभ्र दाढी रुळत होती. घायाळ होऊनही चेहऱ्यावरचे तेज लोपले नव्हते. जखमांची व्यथा दिसत नव्हती. आपल्या श्वेत कांतीमुळे नवोदित चंद्राप्रमाणे दिसणारे भीष्म शांतपणे झोपी गेल्यासारखे वाटत होते. कर्ण भीष्मांच्या पायांजवळ बसला आणि त्याने दोन्ही पाय हाती घेऊन, त्यांवर मस्तक टेकवून तो अश्रु ढाळू लागला. ज्या भीष्मांनी त्याला अनावर का व्हावेत, हेच कर्णाला कळत नव्हते. त्याच वेळी भीष्मांची हाक उमटली. ‘कोण आहे? माझे पाय धरून कोण अश्रु ढाळतंय्?’
‘हे कुरुश्रेष्ठा! अंगराज कर्ण आपल्या दर्शनास्तव आला आहे.’ कृष्णाने उठत सांगितले, ‘मी येतो. आज्ञा?’
भीष्मांनी होकार दिला.
कर्णाकडे पाहून कृष्ण जाण्यासाठी वळला.
कर्ण त्वरेने उठला. त्याने हाक मारली, ‘कृष्णा S S’
कृष्ण थांबला. वळला. तो कर्णाकडे पाहत होता.
त्या कृष्णरूपाला निरखीत कर्ण पुढे झाला. कर्णाचे अश्रु तसेच गालांवरून ओघळत होते, ते भरले नेत्र टिपण्याचेही भान कर्णाला नव्हते.
कृष्णाच्या मुखावर मंदस्मित उमटले. त्याचा उजवा हात उंचावला गेला. त्या हाताने कर्णाचे अश्रु हळुवार निपटले गेले.
कृष्णकृतीने कर्णाला अधिकच उमाळा दाटून आला आणि त्याच वेळी तो कृष्णाच्या मिठीत बद्ध झाला. क्षणभर कृष्णाचे हात कर्णाच्या पाठीवर विसावले. दुसऱ्या क्षणी कृष्ण मिठीतून दूर झाला. त्याचा उजवा हात कर्णाच्या खांद्यावर स्थिरावला. डोळे कर्णावर खिळले होते. त्यांत एक अतीव दु:ख तरळत असल्याचा कर्णाला भास झाला. दृष्टी कर्णाच्या परिचयाची होती. द्रौपदीवस्त्रहरण प्रसंगी द्वारी उभ्या असलेल्या कृष्णाचे दर्शन घडले, तेव्हा हाच भाव डोळ्यांत प्रगटला होता.
काही क्षण तसेच गेले आणि काही न बोलता कृष्ण आपल्या रथाकडे चालू लागला. मंदगतीने दूर जाणाऱ्या रथाकडे पाहत असता त्याच्या कानांवर हाक आली, ‘कर्णा!’
कर्ण भीष्मांच्या जवळ गेला. आपले अश्रु आवरीत तो म्हणाला, ‘हे महाबाहो, आपण ज्याचा सदैव द्वेष करीत होता, तो सूतपुत्र मी कर्ण, आपली क्षमा मागण्यासाठी आलोय्.’
‘क्षमा? कशाबद्दल?’
‘आपल्या दर्शनासाठी मी यापूर्वीच यायला हवं होतं, पण उसंत मिळाली नाही. आपल्या दर्शनाला यायला वेळ झाला.’
‘नाही, कर्णा, जे उचित होतं, तेच तू केलंस. वीर रणनीतीला बद्ध असतो. तुइयापूर्वीच अश्वत्थामा येऊन गेला. त्यानं सर्व वृत्तांत सांगितला. आचार्य द्रोणाचार्यांना तू सेनापतिपद दिलंस, ते योग्यच झालं त्या वार्तेनं मला समाधान लाभलं. महारथी कर्णा, जवळ ये.’ भीष्मांनी आज्ञा केली.
त्या संबोधनाने कर्णाचा जीव उभ्या जागी गुदमरला. तो भीष्मांच्या जवळ गेला. भीष्म त्याच्याकडे पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता प्रगटली होती. ‘मी तुझी वाट पाहत होतो. तू आलास, हे फार बरं झालं. तुझा मानी, अहंकारी स्वभाव. मी केलेला तुझा ठायीठायी अपमान स्मरून, तू येशील, की नाही, याची मला शंका होती. तू आला नसतास, तर मी बोलावलं नसतं. कारण त्यामुळं माझा अहंकार दुखावला असता ना! पण हुरहूर मात्र मागं राहिली असती.’
भीष्म क्षणभर थांबले. आपल्या शुष्क ओठांवरून जीभ फिरवीत ते म्हणाले, ‘मी तुझा खूप अपमान केला. तुझी उपेक्षा केली. तुझ्या मनात माझ्याबद्दल कटुता निर्माण होणं स्वाभाविक आहे.’
‘नाही. लाइया मनात काही नाही. तो आपला अधिकार होता.’
भीष्म समाधानाने म्हणाले, ‘कर्णा, तुझं मन स्वच्छ आहे, हे मी जाणतो. नाही तर मी शरपंजरी पडलेला पाहून तुझ्या नेत्रांतून अश्रू ओघळले नसते. तू अहंकारी असशील, पण खोटा नाहीस, हे मी जाणतो. ज्या ज्या वेळी मी तुझा अपमान करीत असे, त्या त्या वेळी तुझा प्रगटणारा संताप पाहून मला समाधान वाटत असे. तुझ्या रूपाचं कौतुक वाटत असे.’
भीष्मांच्या त्या बोलण्याने कर्ण चकित झाला. त्याचा आश्चर्यभाव निरखीत भीष्म म्हणाले, ‘तुला अहंकारी, अभिमानी म्हणून मी नेहमीच दूषणं देत असे; पण त्या दूषणांना फारसा अर्थ नव्हता. वीराला नुसतंच कवच आणि शिरस्त्राण असून चालत नाही अभेद्य मनाची गरज असते. अभिमान, अहंकार, ईर्ष्या ही वीराची खरी कवचं. वीराच्या ठायी प्रगटणारे हे गुण शत्रूंना नेहमीच दुर्गुण वाटतात. अरे वत्सा, मीही क्षत्रियच आहे. माझ्यासारखा अजोड योद्धा या पृथ्वीतलावर नाही, हा अहंकार मीही बाळगतो. त्या अहंकाराला डिवचण्याचं सामर्थ्य फक्त तुझं होतं, तुझ्या रूपात होतं, त्यामुळं माझा मत्सर भडकत असे. तुझ्या ध्यानी यायला हवं होतं. मी केलेला तुझा अपमान हा खरा तुझा सन्मान होता.’
‘पितामह, मी एक सूतपुत्र…’
‘कर्णा, आजूबाजूला कोणी आहे?’
कर्ण त्या प्रश्नने चपापला. त्याने आजूबाजूला पाहिले.
सारे रक्षक दूरवर बसले होते. कर्णाने सांगितले, ‘कोणी नाही.’
‘कर्णा, तू सूतपुत्र नाहीस. राधेय नाहीस. तू कौंतेय आहेस.’
कर्णाच्या सर्वांगावर रोमांच उठले. तो कपऱ्या आवाजात कष्टाने बोलला, ‘पण आपल्याला हे कसं कळलं?’
‘तुला हे माहीत होतं?’
‘माहीत झालं; पण फार उशिरा. कृष्णानंच प्रथम ते मला सांगितलं… पण आपल्याला…’
भीष्मांनी दीर्घ नि:श्वास सोडला. ते म्हणाले, ‘अंगराज, विदुर जे रहस्य कृष्णापासून लपवू शकला नाही, ते तो माझ्यापासून कसं दूर ठेवील? कर्णा, तुला तुझ्या रूपाची ओळख झाली आहे. वीरश्रेष्ठा! ज्ञानाला अनेक वाटा सापड़तात; पण अज्ञानाला वाट नसते. हे खोटं आवरण चालवणं कठीण आहे. त्या मोहात तू पडू नकोस.’
‘मी काय करू?’ कर्णाने रूक्षपणे विचारले.
‘काय करू? पांडवांशी सख्य कर. ते तुझे भ्राते आहेत. तू नुसता कुन्तीपुत्र तू ज्येष्ठ कौंतेय आहेस. तुला स्वीकारण्यात पांडवांना धन्यता लाभेल. एका संयमी मातेला सुख लाभेल. कृष्णाला अत्यानंद होईल. मी सदैव शमाची इच्छा बाळगली, ती तुझ्या हातून पुरी होऊ दे. बाबा, रे, माझ्याबरोबरच या वैराची समाप्ती होऊ दे आणि सर्व राजे निरामय होऊन स्वगृही परतू देत.’
‘आणि धृतराष्ट्रपुत्र दुर्योधन… त्याची वाट कोणती?’ कर्णाच्या आवाजात रूक्षता प्रगटली.
‘अं!’
‘पितामह, ज्यानं माझ्या भरवशावर हे युद्ध उभं केलं, त्या दुर्योधनाला कोणती वाट मिळेल? मी पांडवांना मिळालेलं कळताच त्या माझ्या मित्राची उभ्या जागी छाती फुटेल. माझ्या जीवनात मला फक्त एकच जिव्हाळा, एकच धन लाभलं, ते म्हणजे मित्रप्रेम. त्या प्रेमाला मी तडा जाऊ देणार नाही. यापुढं माझं जीवन मला तृणमात्र वाटतं’
भीष्मांनी काही क्षणांची विश्रांती घेतली आणि ते म्हणाले, ‘धन्य आहेस, कर्णा! तुझी मित्रनिष्ठा पाहून मी खरोखरीच धन्य झालो. माझा तुला आग्रह नाही. इतक्या सहजपणे निष्ठेची उकल मला सुद्धा करता आली नाही. अंधळ्या प्रीतीपेक्षा डोळस प्रीतीनंच आम्ही आकर्षित झालो. पंडूबद्दल वाटणारा जिव्हाळा मनातून दूर झाला नाही. पुढे पंडुपुत्र आले. पितृछत्र हरवलेल्या मुलांची आम्हांला अनुकंपा वाटली. ज्याचा आश्रय धरला, त्याच्याकडं दुर्लक्ष झालं. पंडुपुत्रांचं रक्षण करण्यासाठी अधिक दक्षता बाळगली आणि त्यातून नकळत द्वेषभाव निर्माण झाला. कर्तव्यनिर्णयानं आम्ही सदैव अंधळ्या निष्ठेला बद्ध राहिलो. पण नुसत्या कर्तव्यापुरतेच. यांतली भक्ती कोणती, निष्ठा कोणती, याचा निर्णय करता आला नाही. मी दुर्योधनाचं काही प्रिय करू शकलो नाही. निदान तुझी निष्ठा तरी त्याला सुख देऊ दे. तुझं जन्मरहस्य कळूनही, तू ज्या निर्भयतेनं मित्रप्रेमाला एकनिष्ठ राहिलास, ती तुझी निष्ठा सफल होवो!’
‘नाही, पितामह, ती निष्ठा आता माझ्याजवळ नाही. माझी जन्मकथा मला कळली नसती, तर फार बरं झालं असतं, कृष्णानं प्रथम मला जन्मरहस्य सांगितलं, ते शिष्टाई असफल झाल्यानंतर. त्यानंतर जिचा आयुष्यभर शोध घेत होतो, त्या मातेचं दर्शन युद्धाच्या उंबरठ्यावर घडलं. माझी खरी कवचकुंडलं हरवली, ती त्या वेळी. दोघांनीही माझ्यापासून पांडव सुरक्षित करून घेतले आहेत. आता खोटा उत्साह देण्यासाठी वल्गनेखेरीज माझ्या जवळ काहीही राहिलं नाही. गुरुदेवांचा शाप खरा होवो. ब्रह्मास्त्र आठवलं, तरी ते माझ्या भावांवर कसं सोडता येईल? मी थोरला आहे ना!’
आपले अश्रु पुशीत कर्ण म्हणाला, ‘माझ्या मैत्रीला केव्हाच तडा गेला. आता दुर्योधनाच्या दृष्टीला भिडण्याचं बळ राहिलं नाही. त्याची मिठी माझा जीव गुदमरून टाकते. माझ्या हाती काही यश राहिलं नाही, पितामह!’
‘शांत हो! तुझा दोष नाही. असलाच, तर तो नियतीचा आहे. जे होणार असेल, ते होऊन जाईल. तू निर्भय मनानं रणांगणात जा. तू अतिरथी आहेस. सूर्यपुत्र आहेस. तू शत्रूला रणांगणात दुःसह आहेस, हे मी जाणतो. भगवान परशुरामांना प्रसत्र करून घेणं ही सामान्य गोष्ट नव्हे. तुझी ब्राह्मणभक्ती, तुझं अजोड शौर्य, दानातलं पराकाष्ठेचं औदार्य मला माहीत आहे. तुझ्या योग्यतेचा या जगतात एकही मनुष्य नाही. तू देवतुल्य आहेस. कर्णा, शरसंधान, हस्तलाघव अन् आत्मबल या सर्वांत तू अर्जुन आणि कृष्ण यांच्या तुल्य आहेस, यात मला शंका नाही.’
कर्णाच्या मुखावर उमटलेले स्मित पाहून भीष्म म्हणाले, ‘कर्णा, मी खोटी स्तुती करीत नाही. कुरुराजाला वधू प्राप्त करून देण्यासाठी तू काशिराजाच्या नगरीत एकटा सर्व नृपांच्या विरोधी उभा राहिलास. तुझ्या पराक्रमानं तू दुर्योधनाला भानुमती प्राप्त करून दिलीस. तो पराक्रम सामान्य? त्या पराक्रमाचं रूप काय असतं, हे मी एकदा अनुभवलं आहे. महापराक्रमी जरासंधाचा पराभव करून मालिनी नगराचा अधिपती बनलास ना? अंगराज म्हणून तुझी वर्तणूक सदैव आदर्श होती. ज्ञानानं, चारित्र्यानं, दातृत्वानं आदर्श राजा म्हणून तुझा लौकिक सदैव वृद्धिंगत होत असलेला मी पाहिला. सुसंस्काराची जपणूक तुझ्याइतकी कुणीच केली नाही.’
‘पुरे, पितामह! अधिक ऐकण्याचं सामर्थ माझ्या ठायी नाही. आता त्या कीर्तीला काही अर्थ राहिला नाही. मी कौंतेय, सूर्यपुत्र असूनही कुलहीन म्हणून माझी उपेक्षा केली. कुलामुळं माझी प्रतिष्ठा पणाला लागली असता, त्या माझ्या मातेला आणि माझं कुल ज्ञात असलेल्या कुरुश्रेष्ठांना माझ्या कुलाचा उच्चार करण्याचं धैर्य लाभलं नाही. उलट, त्यांनीच माझ्या सूतकुलाचा उच्चार करून माझ्या मनावर घाव घातले. चारित्र्याची मी सदैव जपणूक केली; पण माझ्या अहंकाराला डिवचण्यानं त्या संतापाच्या भरात द्रौपदीवस्त्रहरणाची आज्ञा दिली अन् एका कृतीने माझं चारित्र्यसंपन्न जीवन पार विटाळून गेलं. ज्या दातृत्वानं माझी कीर्ती वाढवली, तेच माझं दातृत्व माझी कवचकुंडलं हिरावून घ्यायला कारणीभूत झालं. माझी गुरुभक्ती! गुरुंची निद्रा भंग पावू नये, म्हणून मी क्लेश सोसले आणि त्यासाठी मला काय मिळालं? भयानक शाप! जन्मभर मी संस्कारांना जपलं. त्यांच्या साहाय्यानं जीवन समृद्ध होतं, असं म्हणतात. पण ते संस्कारही मला उपयोगी पडले नाहीत. कृष्ण आणि माता कुंती यांना त्याच संस्कारापायी हवं होतं ते देऊन टाकलं आणि माझा पराजय निश्चित केला. जीवनात फक्त एकच मोलाचा स्नेह लाभला होता, त्यालाही अर्थ उरला नाही. जीवनाचं साफल्य पाहण्याचं माझ्या नशिबी नाही.’
मंदस्मित करीत भीष्म म्हणाले, ‘तुझ्याइतकं जीवनाचं साफल्य भोगलंय् कुणी? कर्णा, साफल्य म्हणजे तुला काय हवं होतं? दुपद, विराट, शल्य या नरेंद्रांनी ऐश्वर्य, सत्ता भोगली; पण त्यांची नावं मागं राहणार आहेत? मी जन्मभर ब्रह्मचर्य पाळलं, साऱ्या मनोविकारांशी अखंड झुंज दिली, राजत्याग केला अन् अखेर या शरशय्येवर वाट पाहत धारातीर्थी पडून राहिलो, ते कशासाठी? कर्णा, या जगात जे मानव ऐश्वर्यसंपत्र जीवन जगतात, भोगतात, त्यांची आठवण मागं राहत नाही. पूर्वसंचित खर्चिण्यासाठी ते या पृथ्वीतलावर अवतरलेले असतात, त्यांची इतिकर्तव्यता त्यांच्या मृत्यूबरोबरच संपते. पण काही जीव अक्षय संचित उभारण्यासाठी जन्मास येतात. आपल्या त्यागानं, सोसण्यानं दुसऱ्यांना जीवन अधिक संपत्र करतात, तेच कीर्तिरूप बनतात. त्यांच्या आठवणीनं हे कळतं की श्रेष्ठता भोगात नाही, त्यागात आहे, सोसण्यात आहे. ध्रुवाला अढळपद प्राप्त झालं असेल, पण ते अंतरीक्षातलं. मृत्युलोकातलं ते स्थान प्राप्त करून घेणं एवढं सोपं नाही. ते असाध्य तू साध्य केलंस. तुझ्यासारखं जीवनसाफल्य पाहायला मिळणं कठीण!’
‘पितामह, क्षमा. माझ्या उभ्या जीवनानं माझ्याशी प्रतारणा केली असली, तरी मला त्याचं दु:ख नाही; पण त्यासाठी मी माझ्या एकनिष्ठ मित्राशी…’ कर्ण अडखळला.
भीष्म म्हणाले, ‘काही सांगायची आवश्यकता नाही. कर्णा, ते मी जाणतो. ते शल्य मी भोगलं आहे भोगतो आहे… थोडे वेगळ्या अर्थानं, एवढाच फरक. हे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कौंतेया, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. हवा तो वर मागून घे.’
‘वर!” कर्णाने क्षणभर विचार केला. क्षणात तो हर्षभरित झाला. तो अधीरतेनं म्हणाला, ‘पितामह! वर द्यायचाच झाला, तर एक द्या. मृत्यूला हवं तेव्हा सामोरं जाणारं आणि प्रसंगी मृत्यूलाही तिष्ठत ठेवणारं आपलं बळ मला द्या. तेवढा एकच वर मला द्या. कारण, माझ्या एकमेव मित्राला द्यायला माझ्या प्राणांखेरीज माझ्याजवळ काहीही राहिलेलं नाही. रणवेदीवरील आत्मसमर्पण एवढंच आता शिल्लक राहिलं आहे. ते बळ मला लाभावं.’
भीष्मांनी आपला थरथरता हात उंचावला. कर्णाने तो हाती घेतला, ती लांबसडक बोटे कर्णाच्या हातावर विसावली होती. भीष्म म्हणाले, ‘कर्णा, मी शरपंजरी नसतो, तर तुला छातीशी कवटाळून तुझं कौतुक केलं असतं. वीरा, तुझं कल्याण असो! हे ज्येष्ठ कौंतेया, तुझं इच्छित तुला प्राप्त होवो. मृत्यूचं आगमन तुला सहज कळेल. त्याला हसतमुखानं सामोरं जाण्याचं बळ तुला लाभेल. सूर्यपुत्रा, तुझा मृत्यू तुझ्या लौकिकाला कारणीभूत होईल. तुझं तेज अखंड राहो, हा माझा आशीर्वाद आहे. जा, निर्भय मनानं जा. तुझं कल्याण असो.’
कर्णाने भीष्माचा हात अलगद त्यांच्या छातीवर ठेवला. भीष्मांवरची दृष्टी न काढता तो तसाच चार पावलं माघारी आला.
भीष्मांनी नेत्र मिटले होते.
भीष्मचरणांना स्पर्श करून कर्ण माघारी वळला. कर्ण रथाकडे जात होता.
कर्णाच्या मनात एक वेगळीच तृप्ती नांदत होती.
✍️ *क्रमश:* ✍️
