🚩 *राधेय/४४* 🚩
पहाटेला खूप अवकाश असता कर्णप्रासाद जागा झाला होता. रणांगणी जाण्यासाठी शत्रुंजय, वृषकेतु, वृषसेन, द्रुम तयार होत होते. प्रासादासमोर रथ उभे होते. कर्णमहालात चौघांनी प्रवेश केला. वृषालीने चौघांनी ओवाळले. ते पाहत असलेल्या कर्णाने विचारले, ‘अन् पाचवा कुठं आहे?’
‘आहे इथंच!’ म्हणात चक्रधराने प्रवेश केला.
‘वहिनी, रणांगणातून तुम्हांला काय आणू?’
‘तुम्ही सारे सुखरूप मागे या. आणखी काही नको.’
साऱ्यांनी कर्णाला वंदन केले आणि ते युद्धभूमीकडे निघून गेले.
वृषालीने कशीबशी आरती खाली ठेवली अन् ती रडू लागली.
कर्णाने तिला जवळ घेतले. तो म्हणाला, ‘वसू, रणांगणी जाताना रडायचं नसतं, चल.’
वृषालीसह तो प्रासादाच्या सज्जावर आला. रणांगणाकडे जाणाऱ्यां रथांचे पलिते दिसत होते. गार वारा वाहत होता. वृषाली-कर्ण त्या सौधावर बराच वेळ उभे होते. हळूहळू पहाट होऊ लागली. आकाशातील नक्षत्रे कोमेजू लागली. असंख्य पक्ष्यांच्या नानाविध आवाजांनी वातावरण गजबजून उठळे. कुठेतरी दूरवर वृषालीचे भयभीत डोळे त्या दिशेने वळले. काही दिसत नव्हते. कुरुक्षेत्रावरच्या सात वनांपैकी सूर्यवनाचा भाग दिसत होता. त्या वनात, वनापलीकडे कुठेतरी ते रणांगण जोडले गेले. सूर्यवंदन करून तो म्हणाला, ‘वसू, युद्ध सुरु झालं.’
दोघे संथ पावलांनी प्रासादात आली.
कौरव-पांडवांचे तुंबळ युद्ध सुरू होते, दिवसामागून जात होते. भीष्मांच्या सेनापति पदाखाली नऊ दिवस झाले, तरी युद्धाचा निर्णय निश्चितपणे सांगता येत नव्हता. या नऊ दिवसांत शकुंजय, वृषकेतु हे दोघे मात्र रणांगणावर हरवले गेले. बसल्या जागी युद्धाची वार्ता ऐकत, पुत्रवियोगाचे दु:ख सहन करीत राहणे कर्णाला असह्य झाले होते.
नवव्या दिवशी सायंकाळी युवराज दुर्योधन कर्णाच्या भेटीला आला, युद्धात थकलेल्या त्या युवराजाचे कर्णाने स्वागत केले.
दुर्योधन म्हणाला, ‘कर्णा, तुझ्या निश्चयापासून परावृत्त करण्यासाठी मी आलो आहे.’
‘कारण?’
‘कारण? मित्रा, नऊ दिवस हे युद्ध चाललं; पण त्याचं फळ काय? माझी सेना आहुती जाते आहे.’
‘पण भीष्मप्रतिज्ञेनुसार दररोज दहा हजार शत्रू मरतात ना?’
‘त्या प्रतिज्ञेनुसार पांडवही सुरक्षित आहेत.’
‘युवराज’, कर्ण हसून म्हणाला, ‘त्या दशसहस्र हत्येची गणना करण्यासाठी पितामहांना एखादा चांगला सहायक द्या. नाही तर कुठंतरी मोजण्यात चूक घडली, तर प्रतिज्ञाभंगाचं पाप पितामहांना वाटायचं.’
‘मित्रा, रणांगणाच्या या दर्शनानं माझं मन त्रस्त झालं असता, तुला थट्टा सुचावी?’
‘युवराज, तुमची चिंता मला कळते; पण माझा नाइलाज आहे. पितामह थोर योद्धे आहेत, पण ते मनापासून लढायला हवेत.’
‘कर्णा, या नऊ दिवसांत फक्त श्वेताचा वध भीष्मांनी केला. दुसरा कोणताही उल्लेखनीय पराक्रम घडला नाही.’
‘कृष्णाला हाती शस्त्र घ्यावं लागलं, हा का थोडा पराक्रम?’
‘कृष्णानं ते वापरलं असतं, तरी मला समाधान वाटलं असतं…’ दुर्योधन उद्वेगाने म्हणाला.
‘युवराज, असे निराश होऊ नका. ज्या पितामहांनी गुरुदेव परशुरामांना युद्धाचं आह्वान दिलं, त्यांच्या पराक्रमाबद्दल शंका घेऊ नका. मनापासून ते युद्धाला उभे राहतील, तर त्यांच्या पराक्रमाला तोड राहणार नाही.’
दुर्योधनाने नि:श्वास सोडला. ‘पण ते होणार कसं?’
‘करायचं ठरवलं, तर जरूर होईल.’
दुर्योधनाने कर्णाकडे आशेने पाहिले.
कर्ण म्हणाला, ‘युवराज, उठा! असेच भीष्मांकडं जा. त्यांना सांगा, हातून पराक्रम होत नसेल, तर सेनेच्या नाशाला कारणीभूत न होता शस्त्रसंन्यास घ्या अन् युद्धातून निवृत्त व्हा.’
‘अाणि त्यांनी तसं केलं, तर?’
कर्ण समाधानाने हसला. ‘नाही, युवराज! पितामह केव्हाही शस्त्रसंन्यास घेणार नाहीत. ते क्षत्रिय आहेत अन् क्षत्रियाला शस्त्रसंन्यासा इतकं दु:ख नाही. तुमच्या त्या नुसत्या सूचनेनं त्यांचा सारा अहंकार जागृत होईल अन् ते युद्धाला उभे राहतील. युवराज, तसं घडलं, तर रणांगणात त्यांच्या सारखा योद्धा राहणार नाही. हा माझा अंदाज तिळमात्र चुकायचा नाही.’
दुर्योधन आशेने उठला आणि त्याने कर्णाचा आनंदाने निरोप घेतला.
रात्री कर्ण आपल्या शय्यागृहात जात असता युवराज आल्याचे त्याला समजले. कर्ण दिसताच दुर्योधन आनंदाने म्हणाला, ‘कर्णा, तुझी मात्रा लागू पडली. शस्त्रसंन्यास सुचवताच एखाद्या नागानं फणा उंचवावा, तसं पितामहांचं रूप प्रखर बनलं अन् त्यांनी घोर प्रतिज्ञा केली.’
‘खरं! कसली प्रतिज्ञा ?’
‘ते म्हणाले, दुर्योधना, माझं वचन ऐक. उद्या सूर्यास्त व्हायच्या आत पृथ्वी निष्पांडव करीन.’
कर्णाने आवेगाने दुर्योधनाला मिठी मारली. तो म्हणाला, ‘युवराज, उद्या विजय तुमचाच आहे.’
आनंदित दुर्योधन सांगत होता, ‘पितामहांनी ती प्रतिज्ञा केली अन्? मी त्यांना विचारलं…’
‘काय विचारलंत, युवराज?’ कर्ण भीतीने म्हणाला.
‘मी विचारलं… अन् असं झालं नाही, तर?… पितामहांनी माझ्याकडं रागानं पाहिलं अन्? ते म्हणाले. तसं झालं नाही, तर भीष्म राहणार नाही.’
जागच्या जागी खिळलेला कर्ण उद्गारला, ‘कशाला विचारलंत? भावनेआहारी जाऊन केवढी घोर प्रतिज्ञा त्यांनी केली होती. तुमच्या शंकेनं त्यांनी आपली सुटका करून घेतली. जा, युवराज, विश्रांती घ्या. उद्या पितामहांचा पराक्रम मला पाहायला मिळणार नाही, याचं दुःख वाटतं.’
दुर्योधन जाताच कर्ण शय्यागृहाकडे जाऊ लागला. त्याचे मन थकले होते, पण कुठेतरी समाधान वाटत होते. ते समाधान त्याला बेचैन करीत होते…
✍️ *क्रमश:* ✍️
