राधेय – भाग ४३

🚩 *राधेय/४३* 🚩

कुरुक्षेत्र हे एक पवित्र क्षेत्र हिरण्यवतीच्या तीरावर वसलेले. एके काळी कौरवांचा मूळ पुरुष कुरु याने तेथे तप केले होते. जेवढी भूमी मी नांगरीन, तेवढी धर्मक्षेत्र ठरावी, असा वर त्याने इंद्राकडून मागून घेतला होता. त्याच क्षेत्रावर कौरवपांडवांची दळे रणसंग्रामासाठी जमा होत होती. ज्या क्षेत्रावर सूर्यग्रहणप्रसंगी कौरव, पांडव, यादव, गोपाळ एके काळी जमले होते, ते आज एकमेकांना ग्रासण्याच्या बलवत्तर हेतूने सर्व बळानिशी कुरुक्षेत्रावर गोळा झाले होते. मंदिरातल्या घंटांच्या नादांनी आणि मंत्रोच्चारांनी जी भूमी सदैव भारावत असे, तीच भूमी शंखनादांनी, हत्तींच्या चीत्कारांनी, रथांच्या घरघराटाने, घोडयांच्या खिंकाळ्यांनी व्यापली होती. ज्या भूमीवर अखंड यज्ञ चालावयाचे, त्याच भूमीवर रात्री-अपरात्री आपल्या ज्वाळांनी धडधडणाऱ्या शेकोटया दिसत होत्या. हिरण्यवतीच्या पैलतीरावर पांडवांचे चतुरंग दळ विस्तारले होते. ऐलतीरावर कौरवांची सेना विसावली होती. सर्वसंहारक मुहूर्त नजीक येत होता.

कौरवांच्या सर्व सेना-प्रमुखांची सभा भरली होती. कौरवसेनेचे आधिपत्य कुणाकडे जावे, याची चर्चा चालली होती. भीष्म वयाने सर्वांत वडील. सेनापतिपद त्यांच्याकडेच जाणे इष्ट होते. सभेमध्ये भीष्म अत्युच्च स्थानी बसले होते.

दुर्योधन उठला. भीष्माचार्यांसमोर जाऊन हात जोडून म्हणाला, ‘पितामह, पांडवांची सेना युद्धास सज्ज झाली आहे. आपण ज्येष्ठ आणि श्रेष्ठ. आपण माझ्या सेनेचं आधिपत्य हाती घ्यावं. युद्धात आम्हांला विजय प्राप्त करून द्यावा.’

सर्व सभेने आनंद व्यक्त केला. ते पाहून भीष्म म्हणाले, ‘दुर्योधना, मला पांडव आणि कौरव दोघेही सारखेच; पण तू विनंती करतोसच, म्हणून मी सेनापतिपद जरूर स्वीकारीन, पण त्याला दोन अटी आहेत.’

‘कोणत्या? मी त्या आनंदानं मान्य करीन.’ दुर्योधन म्हणाला.

‘मी दररोज दशसहस्त्र योद्भयांना मारीन.’

आनंदाने दुर्योधन भीष्णाचार्यांकडे पाहत होता.

‘…पण पांडवांचा मी वध करणार नाही.’

सारी सभा भीष्मांच्या बोलण्याने अस्वस्थ झाली.

दुर्योधन स्वत:ला सावरीत म्हणाला, ‘पितामह, आपलं नेतृत्व हेच मोलाचं! ते आपण स्वीकारलंत, याबद्दल धन्यता वाटते.’

सभा स्थिर झाली. कौरवपक्षाकडील अतिरथी, महारथी यांची गणना चालू झाली. साऱ्या श्रेष्ठ वीरांची भीष्मांनी प्रशंसा केली; पण कर्णाच्या नावाचा उल्लेखही भीष्मांनी केला नाही.

दुर्योधनाने विचारले, ‘पितामह, महारथी कर्णाबद्दल आपण काहीच बोलत नाही.’
पितामहांच्या चेहऱ्यावर उपहास प्रगटला. ते म्हणाले, ‘राधेयाचं नाव या वीरसभेत घेतोस कशाला? तो राधेय साधा रथीही नाही, मग महारथी कुठला?’

‘पितामह?’ कर्ण संतापाने उठला.

त्याच्याकडे बोट दाखवीत पितामह म्हणाले, ‘तो अर्धरथी आहे.’

सारी सभा गोठून गेली. कर्णाचा चेहरा लालबुंद झाला. अधिरथ-राधाई वियोगापेक्षाही तो घाव मोठा होता. आपल्या साऱ्या भावना संयमित करीत कर्ण म्हणाला, ‘पितामह, कशाच्या आधारावर मला अर्धरथी समजत आहात?’

‘चारचौघांत ते कारण समजून घ्यायचं असेल, तर माझी ना नाही.’

‘पितामह!’ दुर्योधन म्हणाला, ‘कर्णाचा काही अपराध नसता, याच्यावर असलं दूषण?’

‘नाही, राजन्! मी वृथा दोष देत नाही. कर्ण तुझा प्रिय सखा आहे, हे मला माहीत आहे. त्याच्या प्रोत्साहनानंच हे युद्ध उभं राहिलं आहे, हेही मी जाणतो. त्याच्या अंगी तापसांचं तेज आहे; पण त्याच बरोबर तो मत्सरयुक्त आहे, हे त्याचं लांछन आहे. तो स्वभावानं अभिमानी आहे अन् तुझ्या सल्ल्यानं तो चढून गेला आहे. या कारणांमुळं तो अर्धरथी बनला आहे. युद्धात अर्जुनाची गाठ पडेल, तेव्हा तो वाचणार नाही.’

‘पितामह! मी तुमचा काहीच अपराध केला नसता, तुम्ही माझा द्वेष करता. आपल्या वाग्बाणांनी मला प्रहार करीत असता. तुम्ही अतिरथी भीष्म, ज्या कौरवांच्या आश्रयानं राहता, त्यांचं अहित चिंतीत राहता. राज्याचा त्याग करूनही, सत्तेची लालसा सदैव तुमच्या ठायी प्रगटते. पांडवांविरुद्ध उभ्या ठाकलेल्या युद्धाचं सेनापतिपद स्वीकारीत असता, पांडव सुरक्षित राखण्याची इच्छा करता. शिखंडीविरुद्ध शस्त्र धरणार नाही, म्हणून सांगता… अन् पांडवांचं हित चिंतून, कौरववीरांत रथी, महाराज, दीर्घायुष्य अन् पिकलेले केस यामुळं क्षत्रियांना महारथी समजत नाहीत. ज्यांचं बळ अधिक असतं, तेच श्रेष्ठ समजले जातात.’

कर्ण थांबताच द्रोणाचार्य क्रोधाने उभे राहिले. ते भीष्मांना म्हणाले, ‘हे गांगेया! या निंदकाचं भाष्य ऐकू नकोस. माझं मत तुझ्याप्रमाणंच आहे. प्रत्येक युद्धात प्रौढी मिरवतो… अन् प्रत्येक रणांगणापासून पळून जात असलेला दृष्टोत्पत्तीस येतो. तो प्रमादी आहे. अर्धरथी आहे. युवराज दुर्योधनाची मैत्री एवढाच त्याचा गुण.’

‘मैत्री!’ कर्ण उसळला, ‘आचार्य, मैत्री काय असते, माहीत आहे? प्रत्येक पूजेबरोबर बदलणाऱ्या मंत्राइतकी मैत्री अस्थिर नसते. निदान तुम्ही तरी मैत्रीचा उच्चार करू नका. तुमची अन् दुपदाची मैत्री सर्वांना माहीत आहे. एकाला राजैश्वर्याचा अहंकार, तर दुसऱ्याला ज्ञानाचा विश्वास. खडग म्यानयुक्त असतं, तरी जेव्हा खड्गाला प्रगटावं लागतं, तेव्हा आवरण फेकूनच द्यावं लागतं त्या आवरणाचं अन् खड्गाचं साहचर्य असतं, म्हणून कुणी त्याला मैत्री समजू नये. मैत्रीचा अर्थ तुम्हांला कधी कळला नाही. दुपदाबद्दल स्नेह असता, तर मित्रानं केलेली चूक क्षम्य ठरली असती. पण तिथे उद्भवला अपमान, खोटा अहंकार, अन् त्याच अहंकारापोटी आपलं तेज, तपश्चर्या अधीन करून शिष्याकरवी गुरुदक्षिणा म्हणून मित्राचा पराजय अपेक्षिला गेला. ही मैत्री नव्हे, आचार्य! हा मैत्रीचा साक्षात उपहास!’

‘राधेया ऽ!

‘थांबा, मला अजून सांगायचंय् युवराजांच्या प्रतिष्ठेसाठी जरासंधाशी मीच युद्ध केलं अन् विजयी झालो, तेव्हा मदतीला तुम्ही तिथं नव्हता. युवराजांसाठी मी दिग्विजय केला, तेव्हा माझ्या पारिपत्याची वाट पाहत बसलात. गंधर्वानं माझा पराभव केला असेल; पण विराटाच्या प्रसंगी तुम्ही होता ना, पितामह? तेव्हा उत्तरेच्या बाहुल्यांना नेसवण्यासाठी नेलेली तुमची वस्त्रं हे कोणत्या शौर्याचं प्रतीक होतं? हेच अतिरथी-महारथींचं वर्णन असेल, तर त्या मालिकेत माझं नाव नसलं, तरी चालेल. त्यात मला धन्यता वाटेल.’

भीष्म उभे राहिले. ते दुर्योधनाला म्हणाले, ‘युवराज, उद्या युद्ध असता, मला इथं कलह वाढवायचा नाही; पण एक निर्णय मी घेतला आहे. मी जोवर जिवंत आहे, तोवर हा कर्ण माझ्या सैन्यात नको. एक त्यानं तरी युद्ध करावं किंवा मी करीन. तो नित्य माझ्याशी स्पर्धाच करतो.’

‘ठीक आहे. तसंच होईल! युवराज, तुम्ही चिंता करू नका. या भीष्मांनी आपल्या नेतृत्वानं विजय मिळवला, तर तुमचा विजय पाहून माझे नेत्र तृप्त होतील. ते झालं नाही, तर जे यांच्या हातून घडलं नाही, ते मी साध्य करून घेईन. भीष्म जिवंत असेपर्यंत मी युद्ध करणार नाही. ते मारले गेल्यावरच मी अर्जुनाशी लढेन.’

कर्ण उठला आणि राजसभेतून निघून गेला.

✍️ *क्रमश:* ✍️
: 🚩 *राधेय/४४* 🚩

पहाटेला खूप अवकाश असता कर्णप्रासाद जागा झाला होता. रणांगणी जाण्यासाठी शत्रुंजय, वृषकेतु, वृषसेन, द्रुम तयार होत होते. प्रासादासमोर रथ उभे होते. कर्णमहालात चौघांनी प्रवेश केला. वृषालीने चौघांनी ओवाळले. ते पाहत असलेल्या कर्णाने विचारले, ‘अन् पाचवा कुठं आहे?’

‘आहे इथंच!’ म्हणात चक्रधराने प्रवेश केला.

‘वहिनी, रणांगणातून तुम्हांला काय आणू?’

‘तुम्ही सारे सुखरूप मागे या. आणखी काही नको.’

साऱ्यांनी कर्णाला वंदन केले आणि ते युद्धभूमीकडे निघून गेले.

वृषालीने कशीबशी आरती खाली ठेवली अन् ती रडू लागली.

कर्णाने तिला जवळ घेतले. तो म्हणाला, ‘वसू, रणांगणी जाताना रडायचं नसतं, चल.’

वृषालीसह तो प्रासादाच्या सज्जावर आला. रणांगणाकडे जाणाऱ्यां रथांचे पलिते दिसत होते. गार वारा वाहत होता. वृषाली-कर्ण त्या सौधावर बराच वेळ उभे होते. हळूहळू पहाट होऊ लागली. आकाशातील नक्षत्रे कोमेजू लागली. असंख्य पक्ष्यांच्या नानाविध आवाजांनी वातावरण गजबजून उठळे. कुठेतरी दूरवर वृषालीचे भयभीत डोळे त्या दिशेने वळले. काही दिसत नव्हते. कुरुक्षेत्रावरच्या सात वनांपैकी सूर्यवनाचा भाग दिसत होता. त्या वनात, वनापलीकडे कुठेतरी ते रणांगण जोडले गेले. सूर्यवंदन करून तो म्हणाला, ‘वसू, युद्ध सुरु झालं.’

दोघे संथ पावलांनी प्रासादात आली.

कौरव-पांडवांचे तुंबळ युद्ध सुरू होते, दिवसामागून जात होते. भीष्मांच्या सेनापति पदाखाली नऊ दिवस झाले, तरी युद्धाचा निर्णय निश्चितपणे सांगता येत नव्हता. या नऊ दिवसांत शकुंजय, वृषकेतु हे दोघे मात्र रणांगणावर हरवले गेले. बसल्या जागी युद्धाची वार्ता ऐकत, पुत्रवियोगाचे दु:ख सहन करीत राहणे कर्णाला असह्य झाले होते.

नवव्या दिवशी सायंकाळी युवराज दुर्योधन कर्णाच्या भेटीला आला, युद्धात थकलेल्या त्या युवराजाचे कर्णाने स्वागत केले.

दुर्योधन म्हणाला, ‘कर्णा, तुझ्या निश्चयापासून परावृत्त करण्यासाठी मी आलो आहे.’

‘कारण?’

‘कारण? मित्रा, नऊ दिवस हे युद्ध चाललं; पण त्याचं फळ काय? माझी सेना आहुती जाते आहे.’

‘पण भीष्मप्रतिज्ञेनुसार दररोज दहा हजार शत्रू मरतात ना?’

‘त्या प्रतिज्ञेनुसार पांडवही सुरक्षित आहेत.’

‘युवराज’, कर्ण हसून म्हणाला, ‘त्या दशसहस्र हत्येची गणना करण्यासाठी पितामहांना एखादा चांगला सहायक द्या. नाही तर कुठंतरी मोजण्यात चूक घडली, तर प्रतिज्ञाभंगाचं पाप पितामहांना वाटायचं.’

‘मित्रा, रणांगणाच्या या दर्शनानं माझं मन त्रस्त झालं असता, तुला थट्टा सुचावी?’

‘युवराज, तुमची चिंता मला कळते; पण माझा नाइलाज आहे. पितामह थोर योद्धे आहेत, पण ते मनापासून लढायला हवेत.’

‘कर्णा, या नऊ दिवसांत फक्त श्वेताचा वध भीष्मांनी केला. दुसरा कोणताही उल्लेखनीय पराक्रम घडला नाही.’

‘कृष्णाला हाती शस्त्र घ्यावं लागलं, हा का थोडा पराक्रम?’

‘कृष्णानं ते वापरलं असतं, तरी मला समाधान वाटलं असतं…’ दुर्योधन उद्वेगाने म्हणाला.

‘युवराज, असे निराश होऊ नका. ज्या पितामहांनी गुरुदेव परशुरामांना युद्धाचं आह्वान दिलं, त्यांच्या पराक्रमाबद्दल शंका घेऊ नका. मनापासून ते युद्धाला उभे राहतील, तर त्यांच्या पराक्रमाला तोड राहणार नाही.’

दुर्योधनाने नि:श्वास सोडला. ‘पण ते होणार कसं?’

‘करायचं ठरवलं, तर जरूर होईल.’

दुर्योधनाने कर्णाकडे आशेने पाहिले.

कर्ण म्हणाला, ‘युवराज, उठा! असेच भीष्मांकडं जा. त्यांना सांगा, हातून पराक्रम होत नसेल, तर सेनेच्या नाशाला कारणीभूत न होता शस्त्रसंन्यास घ्या अन् युद्धातून निवृत्त व्हा.’

‘अाणि त्यांनी तसं केलं, तर?’

कर्ण समाधानाने हसला. ‘नाही, युवराज! पितामह केव्हाही शस्त्रसंन्यास घेणार नाहीत. ते क्षत्रिय आहेत अन् क्षत्रियाला शस्त्रसंन्यासा इतकं दु:ख नाही. तुमच्या त्या नुसत्या सूचनेनं त्यांचा सारा अहंकार जागृत होईल अन् ते युद्धाला उभे राहतील. युवराज, तसं घडलं, तर रणांगणात त्यांच्या सारखा योद्धा राहणार नाही. हा माझा अंदाज तिळमात्र चुकायचा नाही.’

दुर्योधन आशेने उठला आणि त्याने कर्णाचा आनंदाने निरोप घेतला.

रात्री कर्ण आपल्या शय्यागृहात जात असता युवराज आल्याचे त्याला समजले. कर्ण दिसताच दुर्योधन आनंदाने म्हणाला, ‘कर्णा, तुझी मात्रा लागू पडली. शस्त्रसंन्यास सुचवताच एखाद्या नागानं फणा उंचवावा, तसं पितामहांचं रूप प्रखर बनलं अन् त्यांनी घोर प्रतिज्ञा केली.’

‘खरं! कसली प्रतिज्ञा ?’

‘ते म्हणाले, दुर्योधना, माझं वचन ऐक. उद्या सूर्यास्त व्हायच्या आत पृथ्वी निष्पांडव करीन.’

कर्णाने आवेगाने दुर्योधनाला मिठी मारली. तो म्हणाला, ‘युवराज, उद्या विजय तुमचाच आहे.’

आनंदित दुर्योधन सांगत होता, ‘पितामहांनी ती प्रतिज्ञा केली अन्? मी त्यांना विचारलं…’

‘काय विचारलंत, युवराज?’ कर्ण भीतीने म्हणाला.

‘मी विचारलं… अन् असं झालं नाही, तर?… पितामहांनी माझ्याकडं रागानं पाहिलं अन्? ते म्हणाले. तसं झालं नाही, तर भीष्म राहणार नाही.’

जागच्या जागी खिळलेला कर्ण उद्गारला, ‘कशाला विचारलंत? भावनेआहारी जाऊन केवढी घोर प्रतिज्ञा त्यांनी केली होती. तुमच्या शंकेनं त्यांनी आपली सुटका करून घेतली. जा, युवराज, विश्रांती घ्या. उद्या पितामहांचा पराक्रम मला पाहायला मिळणार नाही, याचं दुःख वाटतं.’

दुर्योधन जाताच कर्ण शय्यागृहाकडे जाऊ लागला. त्याचे मन थकले होते, पण कुठेतरी समाधान वाटत होते. ते समाधान त्याला बेचैन करीत होते…

✍️ *क्रमश:* ✍️