पेशवाईतील स्त्रिया भाग ८

पेशवाईतील स्त्रिया भाग ८

काशीबाई … एक सोशिक स्त्री

पेशवाई मध्ये श्रीमंत बाजीराव आणि मस्तानीबाईच्या प्रेमकहाणी बद्दल बोलताना कायम दोनच व्यक्तिंच्या प्रेमाची चर्चा होते. …..बहुतेकदा यातील तिसऱ्या महत्वाच्या व्यक्ती बद्दल मात्र फारसे कुणी बोलत नाही,

ती व्यक्ती म्हणजे काशीबाई ….

काशीबाईंचे माहेरचे नाव लाडुबाई ,त्यांचे वडील महादजी कृष्णाजी जोशी ( चासकर ) हे सावकार होते , बाळाजी विश्वनाथाना , महादजींची चुणचुणती मुलगी आपल्या लेका करता योग्य वाटली …त्या वेळेस जोशी कुटुंबाचे कल्याण मध्ये पारनाका येथील जोशी वाडय़ात वास्तव्य होते….त्यामुळे कल्याण मध्येच थोरले बाजीराव आणि काशीबाई यांचे लग्न १७११ च्या सुमारास झाले …

एक लक्षात घ्यायला हवे थोरले बाजीराव आणि काशीबाईच्या लग्नाच्या वेळेस अजुन पेशवाई भट घराण्या कडे आली नव्हती … पुढे जाऊन १७ नोव्हेंबर १७१३ ला छत्रपतींनी बाळाजी विश्वनाथांना पेशवाईची वस्त्रे दिली …..

१७२० ला बाळाजी विश्वनाथाच्या निधना नंतर बाजीराव पेशवे झाले आणि ओघाने काशीबाई झाल्या पेशवीण ….

पेशवाईतील सगळ्याच स्त्रियाना लिहायला , वाचायला व्यवस्थित येत होते … काशीबाई सुशिक्षित तर होत्याच पण त्या बरोबरीने स्वभाव लहान पणा पासुनच शांत , प्रेमळ , मनमिळाऊ होता ….

काशीबाई बरेचदा पती बरोबर स्वारी वर जात … पण राजकारभारात तसे त्या लक्ष घालत नसत , याला कारण त्या वेळेस घरात असलेली दिग्गज मंडळी … पती बाजीराव , दीर चिमाजी आप्पा आणि सासु राधाबाई ही राजकारणातील धुरंदर मंडळी असल्या मुळे काशीबाइना त्यात लक्ष घालायची गरज पडली नसावी ….

काशीबाईंना एकूण पाच अपत्ये झाली , त्या पैकी तिघांचा बाल मृत्यु झाला …. दोघे जन्मा नंतर लगेचच गेले …. आणि जनार्दन नावाचा मुलगा अकाली गेला … जीवित पैकी नानासाहेब ( बल्लाळ ) आणि रघुनाथरावांची इतिहासानं आपल्या परीने नोंद घेतली …

नानासाहेब पेशव्यांचा जन्म साधारण १७२१ चा ….त्या नंतर थोड्याच वर्षात बाजीरावांच्या आयुष्यात मस्तानीबाई आल्या ….
मस्तानी चे येणे म्हणजे , बाजीरावांच्या आयुष्यात एका स्त्रीचे येणे एवढेच नव्हते , तेव्हढेच असते तर त्यात वावगे असं काहीच नव्हते , कारण त्या वेळच्या समाज व्यवस्थेने अनेक भार्या पद्धती मान्य केली होती … पण इथे आलेली स्त्री इतर धर्मीय होती ….

थोरले बाजीराव आणि मस्तानी चे प्रेम स्वाभाविक , हळवे , उदात्त होते यात दुमत नाही …. मग काशीबाई आणि बाजीरावांच्या प्रेमाला काय म्हणायचे ?

मस्तानी आणि बाजीरावांचा विवाह झाल्याचे पुरावे उपलब्ध नाहीत , म्हणुन का त्यांच्या प्रेमाचे महत्व कमी होते ? दुसरी कडे काशीबाईचा विवाह तर देवधर्मा च्या साक्षीने झाला होता , त्या मुळे त्यांचे स्थान तर पेशव्यांच्या धर्मपत्नीचे …पण नुसते म्हणुन का स्थान मिळते ?

मस्तानी प्रकरणात काशीबाई आपले दुःख , वेदना , मान अपमान गिळुन पती म्हणेल त्याला संमती देण्या शिवाय काहीच करू शकत नव्हत्या .. …याला कारण होते थोरल्या बाजीरावा सारख्या पराक्रमी पुरुषाची पत्नी होणे ही साधी सोपी गोष्ट नव्हती …कारण पतीच्या कर्तृत्वा समोर पत्नीच्या दुःखाला समाज आणि इतर लोक सहजा सहजी किंमत देत नसतात …

आपल्या वाटेला आलेले कटु सत्य त्यांनी स्वीकारले तर होतेच , पण हे स्वीकारताना काय मनस्थिती झाली असेल त्यांची ?
मनातले दुःख ओठावर किँवा चेहऱ्यावर येऊ न देता कायम पोक्त , गंभीर , भारदस्त पणे ” पेशवीण ” पदाचा आब राखत जगल्या …..मनातली वादळे मनातच ठेवली .. कधीही संयम ढळु दिला नाही …

नियतीने काशीबाईंना वेगळ्याच मुशीतुन घडवले होते …. एवहढे सगळे होऊन त्यांच्या मनात मस्तानीबाई बद्दल तिळमात्र कटुता नव्हती , कायम सहानुभुतीने वागल्या ..
मस्तानीबाईच्या पोटात जेंव्हा समशेर बहाद्दर वाढत होता , तेंव्हा गरोदरपणात आणि बाळंतपणात काशीबाईनी जातीने सगळ्या गोष्टींची काळजी घेतली …मस्तानी प्रकरणात कशीबाईंना सासुबाई म्हणजे राधाबाई आणि दीर चिमाजीआप्पाची पुर्ण साथ होती , त्यांनाही मस्तानीबाई बद्दल व्यक्तिगत राग किंवा द्वेष कधीच नव्हता …कठोर व्हावे लागत होते ते राज्य हितासाठी …

२८ एप्रिल १७४० ला थोरल्या बाजीरावांचे रावेरखेडीला निधन झाले , त्या पुर्वी आठ दिवस आधी काशीबाई आपला मुलगा जनार्दनला घेऊन तिथे पोहोचल्या होत्या , मुलगा जनार्दनच्या हाताने सगळे विधी पुर्ण करून त्या पुण्यात आल्या ….बाजीरावांच्या पाठोपाठ मस्तानीबाईचा मृत्यु झाला ….आपल्या तीन मुलांच्या बरोबरीने समशेरबहाद्दरचे आईच्या ममतेने पालनपोषण केले आणि त्याला एक समर्थ योद्धाही बनविले. …

नानासाहेब पेशवे पदावर आल्यावर देखील त्यांनी आईची भुमिका बदलली नाही , मुलगा मोहिमेवर असताना नियमित पत्र व्यवहार करून त्यांना काय हवे , नको बघत …एका पत्रात नानासाहेब मोहिमेवर असताना त्यांना आवडतात म्हणुन अंजीर पाठवल्याचा उल्लेख मिळतो …,

काशीबाईची प्रकृती कायम नाजुकच राहिली , त्या बरेचदा आजारी पडत , कदाचित मानसिक दुःख शारीरिक व्याधीला कारणीभुत असेल … औरंगाबादहुन डॉक्टर आणुन वेळोवेळी इलाज केल्याची पण नोंद दिसते ….त्यांच्या पायाला इसब झाल्याने त्या लंगडत चालत.

उत्तर आयुष्यात त्यांनी काशीयात्रा केली , दान धर्म केला ..रावेरखेडीला नर्मदा किनाऱ्यावर रामेश्वर मंदिर बांधले , माहेर चासकमान तिथे भीमा नदीवर घाट बांधला , सोमेश्वर महादेवाचे मंदिर बांधले …..

अशी ही अत्यंत सोशिक पेशवीण २७ नोव्हेंबर १७५८ रोजी मृत्यु पावली ….

एक गोष्ट विसरून चालणार नाही …श्रीमंत बाजीराव आणि मस्तानीची हळवी प्रेम कहाणी काशीबाईच्या त्यागावर किँवा आयुष्याच्या यज्ञकुंडावर उभारलेली आहे ….

बिपीन कुलकर्णी

संदर्भ – पेशवे घराण्याचा इतिहास ( प्रमोद ओक )
पेशवाई – कौस्तुभ कस्तुरे