माती (अन) मोल – संदीप बोबडे

॥ बोबडे बोल ॥©
“माती (अन) मोल”

माती मंदी उगवलं
रोप किती हळुवार
मातीच्याही कणा कणी
माये चा रे, भरमार ।। ।।

सुख्या बिजाले अंकुर
माती गोटीत फुटतो
वर सुर्याले भेटून,
वृक्ष छाया खाली देतो ।। ।।

बिजांकुरी मुळ सत्व
सर्वदुर तेची राही….
कधी आंब्याच्या झाडाले
दुजं फळ येत नाही ।। ।।

अणू कणांतले मोलं
माती मोल म्हणू नाही
धरतीच्या ममते ले,
कमी कधी लेखू नाही ।। ।।

सांड पाण्याले बी शुद्ध
माती धोंडे च करीती….
गाळ किनारी बांधुनी
जळ निर्मळ वाहती ।। ।।

अशी निसर्गाची नाळ
धुळ कणांनी जोडली;
पीकं – पाणी गवतांत,
सिद्धि कुणी ना पाहिली

शेण गोमुत्र लेपून
घर दार स्वच्छ ठेउ
धरित्री चा मान – सारे;
टिळा – धुळ माथी लावू।। ।।
॥ बोबडे बोल ॥©
एक अष्टाक्षर
@ संदीप बोबडे