पेशवाईतील स्त्रिया भाग ७

पेशवाईतील स्त्रिया भाग  ७

खलनायिका ठरलेल्या – आनंदीबाई

” ध ” चा ” मा ” करण्याचा ठपका बसलेली पेशवाईतील स्त्री …..पेशवाईतील रक्तलांछित राजकारणाचा डाग लागलेली पेशवे पत्नी … म्हणजेच आनंदीबाई !!!

आनंदीबाई रघुनाथरावाच्या दुसरया पत्नी ….

रघुनाथरावाचं पहिले लग्न जानकीबाई बर्वे यांच्याशी २५ फेब्रुवारी १७४२ ला झाले , लग्नाच्या वेळेस जानकिबाई वयाने लहान होत्या , नंतर वयात येऊन पहिल्या बाळंतपणाच्या वेळेस त्यांचे निधन झाले … ते साल होते १७५५ ….

लगेचच दोन महिन्यांनी म्हणजे १७ डिसेंबर १७५५ ला आनंदीबाई माप ओलांडुन पेशवे परिवारात आल्या … आनंदीबाईच्या वडिलांचे आणि पतीचे दोघांचेही नाव रघुनाथराव … वडील रघुनाथराव ओक पेशव्यांच्या पदरी कारकुन होते … वडिलांबरोबर सदरेवर येणारी ही चुणचूणीत मुलगी नानासाहेब पेशव्यांनी लहानभाऊ राघोबादादा करता पसंत केली … आणि यथासांग विवाह झाला …

आनंदीबाईना निसर्गाची देणगी म्हणुन उत्तम व्यक्तिमत्व लाभलं होतं ,मध्यम उंचीच्या , गोर्यापान , आकर्षक आणि रूपवान होत्या …

माहेरचा म्हणजे ओक घराण्याचा जाज्वल्य अभिमान होता … नंतर तेव्हढाच अभिमान त्यांनी पेशवे घराण्याचाही बाळगला …..

लिहाय वाचायला लहानपणिच शिकलेल्या होत्या .. वय वाढत गेले तसे त्यांचा मुळ स्वभाव जास्तच महत्वाकांक्षी, मानी आणि करारी होत गेला …रघुनाथरावा वर आनंदीबाईंचा वचक होता किँवा ते त्यांच्या शब्दात होते असे म्हणण्याचा एक प्रघात आहे .. पण ते पुर्णतः खरे नाही … काही अंशी नक्कीच खरे आहे …

रघुनाथरावाच्या स्वभाववैशिष्ठ्याच्या पार्श्वभुमीवर आनंदीबाईचे गुण नजरेत भरतात … आनंदीबाई कडे मुत्सद्देगिरी , कणखरपणा , धुर्तपणा , स्पष्टवक्त्ये पणा हे सगळे गुण सामावले होते , आणि रघुनाथरावाकडे नेमका यांचाच अभाव होता … आणि मग आनंदीबाईंचे हेच गुण त्यांच्या करता अवगुण होत गेले …

आपल्या पतीला दौलतीचा हिस्सा मागण्या करता प्रवृत्त केले … पतीला पेशवाईची वस्त्रे मिळावीत ही त्यांची महत्वकांक्षा कधीच लपुन राहिली नाही … पण असे असले तरी जेंव्हा रघुनाथराव इंग्रजांना जाऊन मिळाले तेंव्हा त्यांनी नाना फडणवीसांना मध्यस्थी करून राघोबादादाला समजावण्यास संगितलं …. कारण एकच होते दौलत परकीयांच्या घशात जायला नको ..

करून सावरून नामा निराळे राहण्याची कला त्यांना अवगत होती … श्रीमंत नारायणरावाच्या खुना नंतर त्यांच्या पत्नी गंगाबाईना आपल्या कडे ठेऊन घेतात , पण नंतर गंगाबाई पुरंदर वर गेल्यावर त्यांची हत्या करण्या करता आलेलं मारेकरी आनंदीबाईचे नाव घेतात !

छोट्या सवाई माधवरावाची काळजी करणारी पत्रे लिहतात , त्या वेळेस नवऱ्याच्या पेशवे बनण्याच्या खटपटीला पाठिंबा देतात … वागणे एकुणच गुढ होते …

आनंदीबाईंची योग्यता पेशवाईतील इतर कर्तृत्ववान स्त्रिया म्हणजे राधाबाई किँवा गोपिकाबाई यांच्या तोडीची होती …पण अती महत्वाकांक्षा आणि धूर्तपणाने त्यांचा घात केला ….

आनंदीबाईना पोटची सहा आणि दत्तक एक अशी सात अपत्ये झाली , पाहिली दोन मुले आणि चवथी मुलगी अल्पजीवी ठरले , दुसऱ्या मुलाचा तर करुण अंत झाला .. रघुनाथराव त्याला हातावर खेळवत असताना हातातुन पडुन जागीच ते बाळ गेले ..इतर जीवित मुला पैकी मुलगी दुर्गाबाई , तीला नारायणरावांच्या खुनातील आई वडलांची भुमिका न पटल्याने तिने संबंध तोडले , आणि शेवट पर्यँत या माय लेकीची भेट झाली नाही .. एक मुलगा बाजीराव जो शेवटचा पेशवा म्हणुन गादीवर आला .. मुलगा चिमाजी रघुनाथरावाच्या मृत्यु नंतर चार महिन्याने जन्माला आला …यालाच पुढे मोठ्या भावाने कैदेत टाकले … दत्तकपुत्र अमृतराव ह्याने बाजीराव पेशवा झाल्यावर सदरेवर बरीच मदत केली .. पण बाजीरावाच्या लहरी स्वभावा मुळे दोघांचे बिनसले …. त्या नंतर अमृतराव वाराणसीला स्थायिक झाले …

नारायणरावाच्या मृत्यु नंतर राघोबादादा अल्पकाळ पेशवे झाले , आणि बारभाई कारस्थानाने त्यांची पेशवाई गेली … इथुन पुढे आनंदीबाईंचे दिवस फिरले .. पुढचा संपुर्ण काळ कैदेत गेला … कोपरगाव , मंडलेश्वर , नाशिक जवळ आनंदवल्ली अशा ठिकाणी पुर्ण वेळ गेला ..

११ डिसेंबर १७८३ ला राघोबादादा चा मृत्यु झाला , त्यापुर्वी बरेच दिवस त्यांची तब्बेत खालावलेली होती , आजारपणात त्यांना नारायणरावाच्या मृत्यु ला आपण जबाबदार होतो ही टोचणी लागुन राहिली होती , त्या वेळेस आनंदीबाईनि त्यांना धर्मशास्त्रा नुसार प्रायश्चित घेऊन मोठ्या वहिनी गोपिकाबाईची भेट घेण्याचा सल्ला दिला … त्या प्रमाणे राघोबाने प्रायश्चित घेऊन गोपिकाबाईची नाशिक जवळ गंगापुर ला भेट घेतली …

आनंदीबाईंना जड जवाहीर आणि दागिन्यांचा प्रचंड सोस होता … नाना फडणविस बोलुन चालुन मुत्सद्दी , त्यांना या गोष्टीची चांगली कल्पना होती … नाना आणि आनंदीबाई मधुन विस्तव जात नव्हता … अशातच नानांनी राघोबाच्या मृत्यु नंतर समाचाराला सेवक पाठवले आणि पेशवाईतील दागिने मागवुन घेतले … आनंदीबाईनी सेवकाला ठणकावले ” नानांना सांगा , दागिने हवे असतील तर अंगावरून उतरवुन घ्या ” सेवक खजील होऊन निघुन गेले …

राघोबाच्या मृत्यु नंतर कैद संपेल अशी आनंदीबाईंची अपेक्षा होती , पण पेशवाईवर गोपिकाबाईचे पुण्या बाहेरून वर्सचस्व होते , त्नाना फडणवीसांचा दरारा होता … या सगळ्यांना आनंदीबाई च्या धूर्तपणाची कल्पना असल्या मुळे कैद काही संपली नाही …

कैदेत असताना त्यांचे दान धर्म , पोथी , पुजा अर्चा , उपास तापास चालु होते ….देवावरची निष्ठा आणि धर्मावरची श्रद्धा शेवट पर्यंत ढळु दिली नाही …२७ मार्च १७९४ ला आनंदीबाई नाशिक जवळ आनंदवल्ली या ठिकाणी मृत्यु पावल्या … पती निधनाच्या वेळेस गरोदर असल्या मुळे केशवपन झाले नव्हते …

इतिहासकारांच्या मते ” ध ” चा ” मा ” ही त्या काळच्या राजकारणाची कपोलकल्पित कथा … मोडी लिपी मध्ये ध आणि मा मध्ये समान असे काही नाही … आणि या ध – मा चे पुरावे उपलब्ध नाहीत … असे जरी असले तरी श्रीमंत नारायणरावाच्या खुनात त्यांचा हात नव्हता असेही म्हणता येत नाही ….

अशी ही गुढ स्त्री !….नवरा पेशवा व्हावा अशी महत्वकांक्षा बाळगणारी त्या करता झालेल्या पेशवाईतील रक्तलांछित राजकारणाला जबाबदार असलेली ……मुलगा पेशवा म्हणुन गादीवर आला तेंव्हा ते सुख (?)पाहायला या जगात नसणारी … हा नियती ने तिच्यावर उगवलेला सूडच म्हणायचे …..!!

©️बिपीन कुलकर्णी

 

संधर्भ – पेशवे घराण्याचा इतिहास ( प्रमोद ओक )

पेशवाई – कौस्तुभ कस्तुरे

पेशवे कालखंडातील स्त्रिया (डॉ ज्योती वटकर )