राधेय – भाग ४९

🚩 *राधेय/४९* 🚩

पाचव्या दिवसाचा तापदायक रणसंग्राम संपवून कर्ण आपल्या निवासाकडे आला. कर्णापाठोपाठ वृषसेन, चक्रधरही आले होते. निवासावर येताच कर्ण आपल्या शय्यागृहात गेला. रणवेश उतरवून नित्यवस्त्रे परिधान करून तो उभा असता वृषाली महालात आली. कर्णाने वृषालीकडे पाहिले. कर्णाजवळ जात वृषालीने विचारले, ‘आज द्रोणवध झाला, म्हणे. वृषसेन सांगत होता.’

‘हां!’

‘धृष्टद्यूम्नानं अपघाती ते कृत्य केलं, म्हणे.’

‘अपघाती! मानलं, तर अपघात; नाही तर सारं धर्मनिष्ठच.’

‘तो अपघात नव्हता?’

कर्णाच्या मुखावर स्मित प्रकटले. वृषालीचा हात हाती घेऊन तो आपल्या हाताने थोपटीत कर्ण म्हणाला, ‘वसू! द्रोणाचार्यांनी खूप पराक्रम केला. युद्धाच्या सुरुवातीलाच त्यांनी विराटाचा आणि दुपदाचा वध केला. फार वर्षांपासून मनात रुजलेलं द्रुपदाचं वैर साधलं गेलं. पित्याच्या वधानं धृष्टद्युम्न खदिरांगारासारखा पेटला. तो द्रोणाचार्यांना रणभूमीवर शोधीत होता अन् त्याच वेळी अश्वत्थामा पडल्याची वदंता उठली.’

‘अश्वत्थामा पडले?’

‘तो मृत्युंजय! त्याला कोण मारणार? भीमानं अश्वत्थामा नावाचा हत्ती मारला ती बातमी स्वत: जाऊन द्रोणांना सांगितली. अश्वत्थामा मारला गेला, एवढंच सांगितलं. द्रोणांनी सत्यवक्ता म्हणून युधिष्ठिराला विचारलं, अन् सत्यवक्त्या युधिष्ठिरानं असत्याची कास धरून ती वार्ता खरी असल्याची ग्वाही दिली. पुत्रशोकानं द्रोणांनी शस्रत्याग केला अन् त्या संधीची वाट पाहत असलेला धृष्टद्यूम्न वेगानं पुढ झाला. द्रोणाचार्यांच्या रथावर जाऊन नि:शस्त्र झालेल्या त्या वयोवृद्धाचे पिकले केस हाती धरून खड्‌गानं त्यांचा शिरच्छेद केला.’

‘हा अधर्म नाही?’ वृषालीने विचारले.

‘मानलं, तर! वसू, द्रोणाचार्यांना, आपला पुत्र अश्वत्थामा मृत्युंजय आहे, हे का माहीत नव्हतं? त्याला साक्ष कशाला हवी होती? शिखंडी सामोरा आला, तेव्हा भीष्मांना परतता आलं नसतं? ते का परतले नाहीत?’

‘पण का?’

‘का?’ कर्ण हसला. ‘मरणासाठी उतावीळ झालेले जीव मारण्यासाठी जगू इच्छीत नाहीत. फक्त कीर्तिरूप मरण ते शोधीत असतात.’

‘मग आता?’

‘हे युद्ध अखेरपर्यंत असंच चालू राहणार. संपूर्ण विनाशाखेरीज हे थांबणार नाही. वसू, जयासाठी युद्ध खेळलं जातानाही अहंकार हे एकच त्याचं कारण असतं. पराजयानं अहंकार शमत नाही. त्याची धार अधिक वाढते.’

‘मग उद्याचा सेनापती…’

‘हा तुझ्या समोर उभा आहे ना! अश्वात्थामा आणि दुर्योधनांनी मलाच सेनापती करण्याचं ठरवलंय्. वसू हा तुझा पती अंगराज कर्ण उद्या कुरूंचा सेनापती बनेल. त्याच्या आधिपत्याखाली उद्या भयानक रणसंग्राम सुरू होईल.’

‘आपण विजयी व्हाल, यात मला शंका नाही.’

‘मलाही नाही.’ कर्ण क्षणभर गंभीर झाला. दुसऱ्याच क्षणी तो गंभीरपणे म्हणाला, ‘वृषाली, जे यश भीष्मांना, द्रोणाचार्यांना मिळवता आलं, ते सहज मलाही मिळवता येईल.’

वृषालीच्या चेहऱ्यांवर चिंता प्रगटली. ते पाहून कर्ण हसत तिला म्हणाला, ‘चल. उद्याच्या युद्धभूमीची चिंता आज नको. आज वृषसेनानं खूप पराक्रम केलाय्. तो त्याच्याच तोंडून ऐकू. चक्रधर-वृषसेनांसह वार्ता करू, आजच्या भोजनावर चिंतेची फुंकर पडायला नको.’

भोजन आटोपून, सर्वांचा निरोप घेऊन कर्ण शय्यागृहात आला, तेव्हा तेथे काेणी नव्हतं. पुरुषभर उंचीच्या सुवर्णसमयांच्या प्रकाशानं शय्यागृह प्रकाशात न्हाऊन निघालं होतं. पलंगानजीक हस्तिदंती तिवईवर ठेवलेल्या सुवर्णतबकात दोन गेदेदार विडे शोभत होते. शयनगृह प्रकाशित असूनही कर्णाच्या मनात अंधकार रेंगाळत होता. त्या दालनातील प्रकाशापेक्षा बाहेरचा अंधार, नि:स्तब्ध शांतता जवळचा वाटत होती. जीवनातल्या नव्या रूपाला आता सिद्ध व्हायचे होते.

नवं रूप? कसलं?

सूतपुत्र राधेयाचा अंगराज कर्ण बनला. त्या कर्णाचा कौंतेय झाला तोच कौंतेय उद्या कुरुसेनेचा सेनापती म्हणून जाणारः एका जीवाची कोण ही स्थित्यंतरं!

सेनापती!

कोणतं आधिपत्य सांभाळावं लागणार! स्वत:ला सुरक्षित राखून जे जगु इच्छितात त्यांना मृत्युच्या खोल दरीत लोटून द्यायचं. ते साधलं, तर विजय सेनापतीचा; नाही साधलं, तर, तो दोष सेनेचा?: दळाच्या कमी पडलेल्या निष्ठेचा!…

निष्ठा बाळगायलादेखील बळ असावं लागतं.

उद्या समोर भीम येईल… बळाचा विश्वास बाळगणारा तो योद्धा. मला पाहताच त्याचे बाहू स्फुरण पावू लागतील. रणासाठी अधीर होऊन, रथावर उभ्या ठाकलेल्या त्या वीराचा आवेश दृष्ट लागण्याजोगा असेल. त्याच्या पुढं जाणारा मी, रक्ताचं नातं ओळखलेला. माझ्या निष्ठेचं रूप त्या वेळी कोणतं असेल?

कृष्णानं अर्जुनाला आजवर माझ्यापासून दूर ठेवलं, म्हणून काय झालं? कदाचित उद्या तो अर्जुनही माझ्या समोर येईल. त्याच्या रथाचं सारथ्य कृष्ण करीत असेल. शुष्क काष्ठालाही आपल्या फुंकरीनं धुंदावणाऱ्या कृष्णाच्या मुखावर मला पाहून स्थित उमटले. त्या स्मिताला प्रत्युत्तर देण्यासाठी भात्यातला बाण मला निवडावा लागेल, माझ्या निष्ठेला ते बळ लाभेल?

कशासाठी हे युद्ध? यात कुणाचा विजय होणार?

जय, पराजय!

हर्ष,

खेद!!

जीवन, मृत्यु!!!

अंतर केवंढं थोडं! केवढा लहान पल्ला!

जीवन! गर्भातून येतानाच अहंकाराचा आक्रोश करणारा हा जीव, वाढत्या वयाबरोबरच आत्मश्लाघा, आत्मरूप, दातृत्व, पुरुषार्थ अशा अनेक काल्पनिक भावनांची पुटं आपल्याच हातानी अखडं लपेटून घेणारा हा जीव.

अन् मृत्युनं होणारा त्याचा शेवट!

-याची जाणीव या जिवाला झाली असती, तर ही वळवळ केव्हाच थांबली असती.

कानांवर आलेल्या चाहुलीने कर्णाची विचारधारा खंडित झाली. त्याने मागे वळून पाहिले. महालात वृषाली येत होती. तिच्या हाती अनंताच्या शुभ्र फुलांनी भरलेले तबक होते. त्या फुलांचा दरवळ महालात पसरत होता. तिवईवरचे विड्यांचे तबक उचलून त्या जागी अनंताचे तबक वृषालीने ठेवले. विडयांचे तबक कर्णापुढे करीत वृषाली म्हणाली, ‘विडा घेतला नाहीत?’

‘तुझी वाट पाहत होतो.’

कर्णाने विडा उचलला. आपला विडा उचलून वृषालीने तबक खाली ठेवले. विड्यांचा आस्वाद घेत, कर्ण वृषालीचा हात हाती घेऊन सौधावर गेला.
सर्वत्र चांदणे पसरले होते. गार वारा वाहत होता. दूरवर रणभूमीवरील पलित्यांच्या बिंदूंनी आखलेले कौरवांचे शिबिर दिसत होते.

तिकडे बोट दाखवीत कर्ण म्हणाला, ‘पाहिलंस? केवढ्या शांतपणे, निर्धास्तपणानं सेना विश्रांती घेत आहे. त्या शिबिरापासून थोड्या अंतरावर पांडवांचं शिबिर त्या हिरण्यवतीच्या काठावर ठाकलं आहे; पण उद्याच्या रणांगणाची चिंता वाटत नाही. ही शांतपणे विस्तारलेली शिबिरं उद्या एकमेकांवर जीवनमृत्यूच्या ईष्येनं तुटून पडणार आहेत, हे सांगितलं, तर खरं वाटेल?’

‘ते आपण शिकायला हवं!’ वृषालीने उत्तर दिले.

‘अं!’

कर्णाने पाहिले, तो वृषालीच्या चेहऱ्यावर अवखळ भाव उमटला होता. ती म्हणाली, ‘आपल्या सेनेला चिंता वाटत नाही. दिवसा दळ सेनापतीला अनुसरत असलं, तरी रात्री सेनापतीनं दळाला अनुसरावं.’

कर्णाने मान वाकवली आणि अत्यंत नम्रतेने तो म्हणाला, ‘चलावं, राज्ञी! आपली आज्ञा आम्हांला शिरसावंद्य आहे.’

वृषाली पाठोपाठ मोकळेपणाने हसत कर्ण महालात गेला.

✍️ *क्रमश:* ✍️