🚩 *राधेय/५०* 🚩
पहाटेचा समय होता.
प्रासाद प्रवेशाच्या विस्तीर्ण पायऱ्यांच्या दोन्ही कडांनी मशालींचे टेंभे वाऱ्यावर फरफरत होते. प्रासादा समोर दोन रथ सज्ज होते. एका रथाला पांढरे शुभ्र अश्व जोडले होते. दुसऱ्या रथाला खेर रंगाचे उमदे घोडे जुंपले होते. रथसारथी व सेवक धन्याची वाट पाहत रथाजवळ उभे होते.
युद्धभूमीला सरावलेली ती उमदी जनावरे भावी रणसंग्रामाच्या उताविळीने उभ्या जागी खूर नाचवीत होती. रथरक्षक त्या जनावरांच्या ओठाळ्या धरून त्यांना आवरण्यात गुंतले होते. पायऱ्यांवरचे रक्षक सावध झाले. साऱ्यांचे लक्ष प्रासादद्वारावर खिळले होते. प्रासादातून महारथी कर्ण आपल्या पुत्र वृषसेनासह बाहेर येत होता.
कर्ण आणि वृषसेन दोघांच्याही शरीरांवर रणवेश होता. दोघांच्या शरीरांवर रत्नांकित रौप्य शरीरस्त्राणे, अभेद्य कवचे शोभत होती. मनगटा जवळ आवळलेली बाहुबंदांची निमुळती टोके कोपरांपर्यंत गेलेली होती. धनुष्य, खड्ग या आयुधांनी सज्ज झालेल्या त्या पितापुत्रांच्या पाठीला बाणांचे भाते शोभत होते. त्या दोघांच्या मागून कर्णपत्नी वृषाली येत होती. कर्णाने हास्यवदनाने वृषालीचा निरोप घेतला, ‘आम्ही येतो.’
‘वृषसेनावर लक्ष ठेवावं.’ न राहवून वृषाली म्हणाली.
कर्णाने वृषालीकडे पाहिले. हसत वृषसेनाच्या खांद्यावर हात ठेवीत तो म्हणाला, ‘वसूवर लक्ष ठेवायची मुळीच गरज नाही. तो योद्धा आहे. युद्धकलेत निष्णात आहे. स्वत:ला सावरण्यात तो समर्थ आहे. मी आज सेनापती म्हणून रणावर जातोय्. युद्धभूमीवर सेनापतीला सारेच वीर सारखे असतात.’
त्याच वेळी मागून चक्रधर आला. तो वृषालीला म्हणाला, ‘वहिनी, माझ्यावर लक्ष ठेवायला सांगा ना!’
वृषाली हसली. कर्णाकडे पाहत ती म्हणाली, ‘मुळीच नाही. आज ते सेनापती आहेत. त्यांच्यावर लक्ष ठेवायला कुणी तरी तुमची जबाबदारी. त्यांच्यावर लक्ष ठेवा.’
‘छान! माझ्यावर लक्ष ठेवायला योग्य निवड केलीस.’ कर्ण म्हणाला, ‘आता वेळ नको. दुर्योधन महाराज माझी वाट पाहत असतील.’
वृषसेन मातृवंदन करण्यासाठी वाकला. वृषालीने अत्यंत प्रेमभराने वृषसेनाचे अवघ्राण केले. आपल्या डाव्या हातावर घेतलेला रक्तवर्णीय शेला उंचावला. ते पाहताच कर्णाने आपले हात वर घेतले. वृषालीने कर्णाच्या कटिप्रदेशावर शेला बांधला. डाव्या कमरेवर शेल्याची गाठ मारण्यात गुंतलेल्या वृषालीला कर्ण म्हणाला, ‘रणांगणावर जाताना असले बंध चालत नाहीत. ऐनवेळी ते सुटता सुटत नाहीत.’
‘त्यासाठीच तर हे बंध बांधलेले असतात.’ वृषाली म्हणाली.
उत्तर देण्याच्या विचारात असलेला कर्ण थांबला. दुरून रणनौबतींचा गंभीर आवाज कानांवर येत होता. रणभूमीचे दळ एकत्रित होण्याची ती खूण होती. वृषसेनाला खुणावून कर्ण पायऱ्या उतरला. दोघेही वीर आपापल्या रथावर आरूढ झाले. रथ चालू लागला. रथाला गती लाभली. रथांच्या चाकांच्या आवाजातून उठणारा टापांचा आवाज घुमू लागला.
प्रासादाच्या वरच्या पायरीवर असलेली वृषाली तो आवाज ऐकू येईनासा झाल्यावर तिथे पसरलेल्या शांततेने भयाकुल झालेली वृषाली अश्रु टिपत प्रासादात निघून गेली.
कौरवशिबिरात सारे कर्णाची वाट पाहत असता, कर्ण-वृषसेनांचे रथ दौडत शिबिरावर आले. कर्णरथ पाहताच दुर्योधन आनंदाने कर्णाला सामोरा गेला. शिबिरात सैनापत्याचा अभिषेक करण्याची सर्व तयारी झाली होती. सर्व कौरवश्रेष्ठ तेथे उपस्थित होते. दुर्योधनाने रेशमी वस्त्रांनी आच्छादलेल्या आसनावर कर्णाला बसवले. कर्णावर यथासांग अभिषेक चालला. शेवटी दुर्योधनाने गव्याच्या व गेंडयाच्या, सुवर्णाने मढविलेल्या शिंगांतल्या अभिमंत्रित जलाचा शिडकावा कर्णाच्या मस्तकावर केला. तो अभिषेक होत असता कर्णाचे मन कृतज्ञतेने भरून आले. शस्त्रस्पर्धेच्या वेळी अपमान झाला असता, याच दुर्योधनाने कर्णाला अंगदेशाचा अभिषेक केला होता.
अभिषेक होताच कर्ण उठला. त्याने नम्र भावाने दुर्योधनाला वंदन केले. दुर्योधनाने त्याला मिठी मारली. दुर्योधन म्हणाला, ‘मित्रा, तुइयामुळे मला विजयाची खात्री आहे.’
कर्ण सर्व वीरश्रेष्ठांसह रणांगणात गेला. नव्या सेनापतीला पाहायला उत्सुक असलेल्या सेनेने उत्साहभरित गगनभेदी जयघोष केला. सैन्याच्या अग्रभागी जाऊन कर्णाचा रथ उभा राहिला. कर्णरथा जवळ दुर्योधनरथ होता. कर्णाने सर्व श्रेष्ठांना रचनेच्या आज्ञा दिल्या. त्या आज्ञेनुसार सैन्यदळे आकार घेऊ लागली. कर्ण-दुर्योधन रथाखाली उतरून तो हेलावणारा दळसागर पाहत होते. त्याच वेळी दुर्योधनाचे लक्ष वृषसेनाकडे गेले. वृषसेन पुढे झाला. त्याने दुर्योधनला वंदन केले. दुर्योधनाने मोठया प्रेमाने वृषसेनाला जवळ घेतले.
‘वृषसेना, सांभाळून बरं!’ दुर्योधन म्हणाला.
‘महाराज, आपल्या विजयासाठी मला प्राणांचं मोल वाटणार नाही.’
कर्ण अभिमानाने आपल्या पुत्राकडे पाहत असता, दुर्योधनाने आपल्या गळ्यातला मोत्यांचा सर काढून वृषसेनाच्या गळ्यात घातला, आशीर्वाद दिला, ‘विजयी हो!’
वृषसेन कर्णाकडे वळला. त्याने कर्णाला वंदन केले.
कर्ण प्रतिबिंब निरखीत होता. ते रूप डोळ्यांत साठवीत होता. कर्ण स्थिर आवाजात म्हणाला, ‘पुत्रा, तुझा पराक्रम लोकोत्तर ठरावा! जय-पराजय यांचं गणित वीर कधीही मनात बाळगीत नाहीत. पराभव झाला, तर तो अशाच्या हातून व्हावा की, ज्याच्या शौर्याला पृथ्वीतलावर तोड नसेल. ते यश तुला लाभावं, हा माझा तुला आशीर्वाद आहे.’
कर्णाचा आशीर्वाद घेऊन वृषसेन आपल्या रथासह आपल्या पथकाकडे निघून गेला. कर्ण रणभूमीकडे पाहत होता.
रणभूमीवर शेकडो रथांच्या अश्वांची खिंकाळणी, अंबारी-हौद्यांनी सजलेल्या हत्तींचे चीत्कार, हातांतल्या खड़ाग, गदा, आदी शस्त्रांनी वीरश्रीला आह्वान करणारे दळातून उठणारे आवाज यांनी रणभूमी जागी होत होती.
कर्ण, दुर्योधन रथारूढ झाले. हत्तींनी वेढलेल्पा राजगोटात दुर्योधनाचा रथ पोहोचवून कर्णाने सारथ्याला आपला रथ सैन्याच्या अग्रभागी न्यायला सांगितले.
सैन्याच्या अग्रभागी कर्णाचा सुवर्णशृंखलाचिह्न असलेला रथ उभा राहिला. पूर्व दिशेला प्रकाश उमटू लागला होता. क्षितिजकडा आरती बनल्या होत्या. निरनिराळ्या पथकांचे शंखनाद उमटत होते. कर्णाचे लक्ष समोर उभ्या असलेल्या पांडवसेनेकडे लागले होते. त्याच वेळी अर्जुनाचा कपिध्वजांकित रथ पांडवांच्या अग्रभागी दिसू लागला. त्या रथावर कर्णाची दृष्टी जडली. त्याला कृष्णाचा आशीर्वाद आठवला:
‘…कसल्याही जयपराजयानं तुझं पराक्रमी जीवन झाकाळलं जाणार नाही. ते तुझ्या पित्या सारखंच सदैव तेजस्वी राहील. त्या प्रकाशाला स्पर्श करण्याचं धाडस देवांनाही होणार नाही…’
त्या कृष्ण-आठवणीनं कर्ण मोहरला. अर्जुन रथाकडे पाहत त्याने कृतज्ञतेने मान नमविली. चेहऱ्यावर स्मित उजळले. कर्णाची छाती विस्तारली गेली. त्याने मागे वळून पाहिले. पूर्वक्षितिजावर सूर्यबिंब उमटत होते. कर्णाने दोन्ही हात जोडून सूर्याला वंदन केले. रथात ठेवलेला विजयी शंख उचलला आणि दोन्ही हातांत तो सुवर्णमंडित शंख घेऊन मुखाला लावला. गाल फुगले. गळ्यातील शिर तणावली आणि एक दीर्घ नाद उमटला. कर्णाने त्रिवार शंखनाद दिला. शंख रथावर ठेवीत असतानाच पांडवांच्या बाजूने कृष्णाच्या पांचजन्य शंखाचे गंभीर उत्तर आले. कर्णाने हात उंचावला. त्याबरोबर संकेतबद्ध दळभार पुढे सरकू लागला. जयघोष करीत जाणारी सेना शत्रूला भिडली. उंटांवरून उठणारे रणनौबतींचे आवाज अखंड वाजू लागले. तुंबळ युद्धाला सुरुवात झाली.
कर्ण आपल्या रथातून ते युद्ध पाहत होता. त्याचा रथ दळाला प्रोत्साहन देत युद्धातून फिरत होता. कर्णाच्या रथाबरोबर रथरक्षक धावत होते. कर्णाच्या चारी बाजूंनी आपापल्या रथात बसलेले चार वीर कर्णाच्या रथाबरोबर त्याचा मार्ग मोकळा करीत पुढे जात होते. कर्णाला आह्वान करणारा तुल्यबळ वीर समोर येताच कर्ण त्याच्याशी युद्ध करीत असे.
मध्याह्न टळत आली, तरी युद्धाचा निर्णय लागत नव्हता. त्याच वेळी एक तेजस्वी रथ कर्णाच्या दिशेने दौडत आला. क्षणभर अर्जुनरथ आला की काय, असे कर्णाला वाटले. पण रथ दृष्टिपथात येताच कर्णाची दृष्टी रथाच्या ध्वजाकडे गेली. तेथे कपिध्वज नव्हता. ध्वजावर सुवर्णपुच्छ शरचिन्ह होते. त्या रथात कर्णाला नकुलाचे दर्शन घडले. चंद्र प्रगटावा, तसे त्याचे रूप कर्णाला भासले. अत्यंत देखणा, रूपसंपन्न नकुल कर्णाकडे पाहत आपल्या रथावर उभा होता. त्याच्या रूपाने तेजस्वी बाण रथामध्ये उभा असल्याचा भास कर्णाला झाला. नकुलाला टाळून जाण्याच्या विचारात कर्ण असतानाच नकुलाचे शब्द त्याच्या कानांवर पडले, ‘थांब, सूतपुत्रा! पळून जाऊ नकोस. हा मी तुझ्या समोर युद्धार्थ सिद्ध आहे. या सर्वनाशाचं, कलहाचं कारण तूच आहेच. हे अधमा, आज तुझा वध करीन मी.’
कर्णाच्या चेहऱ्यांवर हसू उमटले. तो हसत म्हणाला, ‘नकुला, राजपुत्राला शोभतील, असे तुझे उद्गार आहेत; पण नुसत्या बोलण्यानं योद्धा सिद्ध होत नाही. तू माइयावर प्रहार कर. तुझा पराक्रम पाहावा, अशीच माझी इच्छा आहे.’
कर्ण नकुलाचा मारा आपल्या बाणांनी माेडून काढात होता. तेवढ्यापुरताच तो प्रतिकार करीत होता. नकुल त्या प्रतिकाराने संतापून आवेगानं प्रखर युद्ध करात होता. बराच वेळ कर्णाने ते युद्ध कौतुकाने चालवले, युद्धाला आवर घालण्यासाठी कर्णाने आपले धनुष्य वापरले. त्याने नकुलाच धनुष्य छेदलं. त्याचा ध्वज पाडला. नकुल हताश्व, विरथ व विगतकवच झाला. नकुलाला त्या परिस्थितीत काय करावे, हे क्षणभर कळेनासे झाले. रथावरून उडी टाकून तो पळू लागला. ते पाहून कर्णाने आपल्या रथातून उडी मारली आणि पळणाऱ्या नकुलाला गाठले. त्याच्या गळ्यात आपले धनुष्य अडकवून कर्णाने त्याची गती रोखली. पराजयाचा क्षोभ अनावर झालेला, अपमानानं थरथरू लागलेला नकुल कर्ण पाहत होता. त्याचे आरक्त बनलेले मुखकमल पाहून कर्णाला वाटले की, या आपल्या कनिष्ठ भ्रात्याला उराशी कवटाळावे. मायेनं त्याच्या पाठीवरून हात फिरवावा. कष्टाने त्या विचारापासून परावृत्त होत कर्ण म्हणाला, ‘वीरश्रेष्ठा! भिऊ नकोस. माझं तुला अभय आहे. हे सुकुमारा! आपली कुवत लक्षात घेऊन वैरी पत्करावा. या भयाण रणांगणावर असा एकाकी फिरू नकोस. युद्धाची मौजच पाहायची असेल, तर तुझे भ्राते भीम, अर्जुन यांच्या निवाऱ्यात जा. सुखानं आपल्या शिबिरात परत जा.’
नकुलाच्या गळ्यात अडकवलेले आपले धनुष्य कर्णाने काढून घेतले आणि नकुलाच्या नेत्रांतले अश्रु पाहावे लागू नयेत, म्हणून तो माघारी रथाकडे वळला.
मध्यान्ह उलटली होती. तळपत्या सूर्याचे तेज रणांगणाला आले होते. ते सूर्यास्तापर्यंत तसेच चालले.
सूर्यास्तानंतर कौरवशिबिरात कर्ण विसावला असता, दुर्योधन तेथे आला. त्याची मुद्रा चिंतेने व्यग्र बनली होती. युद्धात झालेल्या जखमांची त्याला जाणीव नव्हती. कर्णाला तो म्हणाला, ‘मित्रा, हे रणांगण मला यशदायी वाटत नाही.’
त्या बोलण्याने सावध झालेल्या कर्णाने विचारले, ‘का? आजचा माझा रणांगणावरचा पराक्रम असामान्य नव्हता. पांडवांच्या सेनेला माझं आजचं दर्शन निश्चित रुचलं नसेल!”
‘मी तुझ्या यशाबद्दल म्हणत नाही.’
‘मग?’
‘मित्रा, आज केवढी अपरिमित हानी झाली आहे, ते बघ ना! क्षेमधृतीचा भीमानं वध केला. सात्यकीनं विन्द अन् अनुविन्द यांना परलोकवास घडविला. चित्र आणि चित्रसेन धारातीर्थी पडले. आजच्या युद्धात अनेक वीर पडले. अनेक विद्ध झाले. नष्ट झालेल्या कवचांची अन् आयुधांची तर गणनाच करणं कठीण!’
‘पण त्यात माझा काय दोष?’ कर्णाने विचारले.
दुर्योधन खिन्नपणे हसला.
‘कर्णा, दोष तुझा नाही, तर कुणाचा? तू सेनापती आहेस ना? रणांगणावरील प्रत्येक जय पराजयाला सेनापतीच जबाबदार असतो. यशा बरोबर पराजयाचं धनीपण त्याला स्वीकारावं लागतं.’
कर्ण काही बोलला नाही. दुर्योधनाच्या बोलण्यातील सत्य त्याला जाणवत होते.
दुर्योधन म्हणाला, कर्णा, आज सोळा दिवस झाले. या सोळा दिवसांत आपल्या सेनेची अपरंपार हानी झाली. प्रत्येक दिवसाला असं बळ खचत चाललं, तर कठीण. मित्रा, शक्य तेवढ्या लौकर विजय आपल्या घरी येईल, असं काहीतरी करायला हवं. त्या अर्जुनाचा तू पराभव करशील, तर क्षणात सारं साध्य होईल.’
कर्ण त्या बोलण्यानं हसला. ‘युवराज, त्या इतकी सोपी गोष्ट कुठली! अर्जुनाचा पराभव इतका सोपा आहे का?’
‘मित्रा, तू हे बोलतोस? अरे, तूच तर अर्जुनवधाची प्रतिज्ञा करीत होतास ना?’
‘हो; पण तो अर्जुन माझ्यासमोर येईल तर ना? तो कृष्ण सदैव माझ्या पासून अर्जुनाला दूर ठेवतो. त्या अर्जुनाची मला भीती वाटत नाही. शरीरबल, मानसबल आणि अस्र कौशल्य या गुणांत अर्जुन माझ्या तुल्यबळ नाही. अर्जुनाच्या गांडीव धनुष्यापेक्षाही श्रेष्ठ असं माझं विजयी धनुष्य आहे. भगवान परशुरामांचं ते धनुष्य. त्यांनीच मला आशीर्वादपूर्वक दिलंय्…’
‘मग दुसरी कसली कमतरता?’ आनंदाने दुर्योधनाने विचारले.
‘फार मोठी कमतरता आहे. हे कौरवेश्वरा! श्रेष्ठ रथी नुसत्या आपल्या शस्त्रनैपुण्यावर जय मिळवीत नाहीत. तो जय प्राप्त करण्यासाठी तसाच श्रेष्ठ सारथी लागतो. कृष्णासारखा सर्वश्रेष्ठ सारथी अर्जुनाला लाभला आहे. तसा सारथी माझ्याजवळ नाही.’
‘आपल्याजवळ कृष्णासारखा तुल्यबळ असा सारथी नाही?’
‘आहे ना!’
‘कोण??
‘मद्रराज शल्य! तो अजोड सारथी आहे. शल्यराज कृष्णाइतकाच अश्वविद्याकुशल आहे. तो माझं सारथ्य करील, तर तुझं मनोवांछित पूर्ण व्हायला फार अवधी लागणार नाही.’
दुर्योधन उत्साहाने उठला. तो कर्णाला म्हणाला, ‘मित्रा, तू चिंता करू नकोस. उद्या शल्यराज तुझं सारथ्य करील.’
कर्ण त्यावर काही बोलला नाही.
कर्णाचा निरोप घेऊन शल्य निवास गाठण्यासाठी दुर्योधन रथारूढ झाला.
✍️ *क्रमश:* ✍️
