राधेय – भाग ४८

🚩 *राधेय/४८* 🚩

पहाटे कर्ण कौरव-शिबिरावर आपल्या रथातून आला. कर्णाचे दुर्योधनाने स्वागत केले. कर्ण दुर्योधनासह द्रोणाचार्यांकडे गेला. युद्धास सज्ज झालेला तो वृद्धयुवा दुर्योधन-कर्णाचे स्वागत करून म्हणाला, ‘कर्णा, युधिष्ठिराला जिवंत पकडून देण्यासाठी मी दुर्योधनाला वचनबद्ध झालोय्. आजच्या युद्धाची मी आखणी केली आहे. युद्ध सुरू होताच मी योजल्याप्रमाणे संशप्तकांकडून अर्जुनाला आह्वान दिलं जाईल. अर्जुन या युद्धात गुंतला असता, मी दुसरीकडं चक्रव्यूहचा मांडलेला असेल. त्या व्यूहाच्या मध्यभागी तुम्ही श्रेष्ठ वीर राहाल. अर्जुन युद्धात गुंतल्यानं युधिष्ठिर चक्रव्यूहाचा भेद करण्यासाठी येईल. त्याला सहजपणे आपल्याला पकडता येईल. आज मी रचलेल्या चक्रव्यूहाचा भेद करण्याचं सामर्थ्य फक्त अर्जुनाखेरीज एकाही पांडववीरात नाही, हे मी निश्चितपणं सांगतो.’

द्रोणाचार्यांच्या त्या बोलण्याने उत्साहित झालेला दुर्योधन सर्व वीरांसह रणांगणावर गेला. द्रोणाचार्यांनी रचलेला चक्रव्यूह खरोखरच अलौकिक होता. त्या चक्राच्या आरांच्या ठिकाणी श्रेष्ठ राजकुमारांची योजना केली होती. कर्ण दुर्योधनासह व्यूहाच्या मध्यभागी पोहोचला. तेथे दु:शासन, कृपाचार्यांनी त्यांचे स्वागत केले.
सूर्योदयाला रणभूमीवर शंखनाद उमटले. युद्ध सुरू झाले. आचार्यांनी योजल्याप्रमाणे अर्जुनाला संशप्तकांनी गुंतवले. चक्रव्यूह भेदण्यास कोण येतो, याची सारे आतुरतेने वाट पाहत असता पांडवसेना व्यूहावर चालून येत असलेली दिसली. तुंबळ युद्ध सुरू झाले. कर्ण चाललेले युद्ध पाहत होता. चक्रव्यूहाची एक एक कडी फुटत होती आणि त्याच वेळी मध्यभागीच्या चक्रात पांडवरथाने प्रवेश केला. भीमदर्शनाच्या अपेक्षेने कर्णाने रथाकडे पाहिले; पण त्या रथात भीम नव्हता. कर्णाच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. रथावर कोवळ्या वयाचा अर्जुनपुत्र अभिमन्यू उभा होता. सुवर्णकवच धारण केलेला तो बालक शरवर्षावाची भीती न बाळगता त्वेषाने आपली प्रत्यंचा खेचीत होता. सुटलेले बाण आपले लक्ष्य अचूक हेरीत होते. अभिमन्यूने आपल्या पराक्रमाने अर्जुनपुत्र नाव सार्थ केले होते. द्रोणाचार्यही कर्णासह ते युद्ध कौतुकाने पाहत होते. अभिमन्यूचा पराक्रम वाढत होता. त्याने शल्यराजाला घायाळ केले. त्याच्या भावाचा वध केला. दुःशासनाला मूर्च्छा आली. कौरववीरांची ती वाताहत पाहून कर्ण पुढे झाला. अभिमन्यूच्या चेहऱ्या वरचे तेज, त्या रणभूमीतही त्याच्या मुखावर विलसणारे स्मित पाहून कर्णाला त्या बालयोद्धयाचे कौतुक वाटत होते. कर्णाच्या प्रत्यंचेला सूडाची धार येत नव्हती. आकर्ण बाण खेचताना समोरचे लक्ष्य चित्त वेधून घेत होते. अचानक एक बाण सणसणत आला आणि त्याने कर्णाच्या हातचे धनुष्य छेदले. त्यापाठोपाठ कर्णरथावरचा ध्वजही ढासळला. चकित झालेला कर्ण मागे वळला. त्याने दुसरे धनुष्य उचलले. त्याच वेळी कर्णाचा भाऊ अभिमन्यूला सामोरा गेला. कर्णाने भात्यातले बाण काढून प्रत्यंचेला लावला, त्याच वेळी अभिमन्यूच्या बाणाने कर्णाच्या भावाच्या कंठाचा वेध घेतला होता. भावाचा वध पाहताच कर्णाच्या मुखावर विलसणारे कौतुक लुप्त पावले. त्याने आकर्ण प्रत्यंचा खेचून बाण सोडला आणि अभिमन्यूच्या हातचे धनुष्य मोडून पडले. आता अभिमन्यूच्या हाती गदा होती. दुःशासनपुत्र गदा घेऊन अभिमन्यूला सामोरा गेला. दोघे गदायुद्ध खेळत होते. शेवटी दोन्ही वीर एकमेकांवर प्रहार करून मूर्च्छित पडले. प्रथम दौ:शासनी सावध झाला. त्याने आपली गदा उचलली आणि सावध होत असलेल्या अभिमन्यूच्या मस्तकावर प्रहार केला. कर्णाला ते पाहण्याचे बळ राहिले नव्हते. कौरवांकडून जयशंख फुंकले जात असता सेनेतून वाट काढीत कर्ण शिबिराकडे जात होता.

अभिमन्यूच्या मृत्यूने आणखी एक दिवस संपला होता.

दुसऱ्या दिवशी कौरवश्रेष्ठांच्या मुखावर चिंता प्रगटली. अर्जुनाने सूर्यास्ताच्या आत जयद्रथवध करण्याची प्रतिज्ञा केली होती. कर्णाला ते दुर्योधनाने सांगताच कर्ण चकित झाला. कर्णाने विचारले, ‘जयद्रथवधाची प्रतिज्ञा! का?’

‘अभिमन्यूवधाचा सूड, म्हणून!’ दुर्योधनाने सांगितले.

तशा स्थितीतही कर्णाच्या चेहऱ्यावर हसू प्रगटले. ‘छान! अभिमन्यूवधाच्या वेळी जयद्रथ तिथं नव्हता. तरीही त्याच्या वधाची प्रतिज्ञा!

‘ते काही असो. पण जयद्रथाला वाचवायला हवं. तो भयभीत झालाय्.’

सर्वांनी जयद्रथाला संरक्षण दिले. सारे कौरववीर एका जयद्रथाचे रक्षण करीत होते. अर्जुनाने पराक्रमाची मर्यादा गाठली, तरी कौरवरक्षित जयद्रथाचे दर्शन घडले नाही. दिवसभर तुंबळ युद्ध चालले होते. सूर्य पश्चिमेला सरकत होता. कार्तिकात कधीही न उमटणारे काळेकभिन्न ढग क्षितिजावर येत होते. पाहता-पाहता सूर्य त्या ढगांच्या आड गेला. वेळेचा अंदाज कुणालाही कळेनासा झाला. रणभूमीवर सायंच्छाया पसरली. धोका न पत्करता कौरववीर युद्ध करीत असता कुणीतरी शंखनाद केला. सूर्यास्त झाल्याची ती द्वाही समजून उतावीळ जयद्रथ हर्षाने रक्षककडयातून बाहेर आला आणि त्याच वेळी अर्जुनाचा रथ सामोरा आला. ढगांच्या आडून उमटलेले पिवळे सूर्यकिरण हळद उधळीत होते. त्या सूर्यकिरणांकडे पाहत असलेल्या जयद्रथाला सावध होण्याची संधी मिळाली नाही. अर्जुनाच्या बाणाने आपले लक्ष्य साधले होते. कौरवांचे सारे श्रम वाया गेले होते.

जयद्रथवध झाल्याचे पाहताच दुर्योधन संतापाने म्हणाला, ‘जयद्रथ पडला! चिंता नाही. हे अपघातानं चालू झालेलं युद्ध आता थांबणार नाही. हे युद्ध दिवसरात्रीचा, काळवेळाचा, जीवनमृत्यूचा विचार न करता असंच चालू द्या.’

– आणि सूर्यास्त झाला असताही राजाज्ञेने युद्ध सुरू राहिले. दिवसभराच्या युद्धाने थकलेली ती सैन्ये पुन्हा त्या रात्री एकमेकांशी भिडली. असंख्य पेटलेल्या पलित्यांनी ते सर्व रणांगण उजळून निघाले. वीरांची शस्त्रे त्या प्रकाशात तळपू लागली. वाढत्या रात्रिबरोबर युद्धही वाढत होते. कर्ण आवेगाने शत्रूशी झुंजत असता, कौरवसेनेत पळापळ दिसू लागली. सर्वत्र हाहाकार उडाला. कर्ण त्या दिशेला पाहत असता, दुर्योधन कर्णाला शोधीत तेथे आला. तो कर्णाला म्हणाला, मित्रा, घात झाला! पांडववीर घटोत्कच रणात उतरला आहे. त्यानं अलायुधाचा वध केला. कौरवसेनेचा मोड करीत तो पुढं येत आहे.’

‘मी त्याला सामोरा जाऊ का?’ कर्णाने विचारले.

‘हो! तुझ्याखेरीज कोणीही ते संकट निवारू शकणार नाही. तुझ्याकडं एक शक्ती आहे, असं मी ऐकतो. त्या शक्तीनं त्या घटोत्कचाचा वध कर.’

कर्णाने शांतपणे विचारले, ‘मित्रा, तुला घटोत्कच हवा, का अर्जुन?’

‘काय?”

‘मित्रा, माझ्याजवळ वासवी शक्ती आहे, हे खरं. ती अमोघही आहे; पण ती शक्ती एकदाच वापरता येईल. ती मी अर्जुनाकरिता राखून ठेवली आहे.’

‘कर्णा, अर्जुनाचं नंतर पाहता येईल. या घटोत्कचाला आवर घातला नाही, तर सूर्योदयाच्या आतच काैरव पराभूत हाताल. मला घटोत्कच हवा.’

‘ठीक! तसं होईल.’

कर्णाचा रथ वळला. पळणाऱ्या सैन्यातून वाट काढीत तो घटोत्कचाजवळ पोहोचला. कर्णाने वासवी शक्तीचे स्मरण करून एक दिव्य बाण धनुष्याला जोडला. बाणा घोंगावत सुटला. पर्वताचा कडा आपल्या नादाने आसमंत भेदून टाकीत कोसळावा, तसा घटोत्कच कौरववीरांवर ढासळला.

कर्णाच्या विजयाने उत्साहीत झालेली कौरवसेना कर्णाचा जयघोष करू लागली. पांडवसेनेत हाहाकार उड़ाला.

त्या दोन्हींची क्षिती न बाळगता कर्ण शिबिराकडे जात होता.

✍️ *क्रमश:* ✍️