पावनखिंड 45

*⚔🌄पावनखिंड🌄⚔*

 

🔰 *भाग : ४५* 🔰

 

 

पहाट होण्याला अवधी होता. नखशिखांत भिजलेले सहाशे धारकरी राजांची पालखी राखत धावत होते. रुतलेल्या काट्यांची, खुपलेल्या कपारींची जाणीव कुणाला नव्हती. दगडाधोंड्यांतून धावताना अनवाणी पाय जागोजागी रक्ताळत होते. लोहाराच्या भात्यासारखी प्रत्येकाची छाती फुगत होती. धापेचा निःश्वास बाहेर पडत होता. तोंडातून, नाकातून बाहेर पडलेला श्वास वाफेच्या रूपानं उसळत उतरणाऱ्या धुक्यात मिसळत होता. हेलकावे घेणाऱ्या पालखीचा गोंडा धरून राजे पालखीत बसले होते. पालखीवर झाकलेल्या अलवानामुळं राजांना काही दिसत नव्हतं. फक्त बाजींचा आवाज कानांवर येत होता,

‘चलाss’

 

चला!

कुठं जायचं?

एका माणसाच्या जिवासाठी धावायचं कुठवर?

बाजी! कशासाठी हे कष्ट घेता?

कोणाच्या स्वार्थापायी?

___आणि तेही एका माणसाच्या जिवापायी?

कोणाच्या सत्तेनं आम्ही या माणसांना गुंतवलं?

कोणत्या अधिकारानं?

जीवनात अखेरचं मोल असतं, ते स्वतःच्या जिवाचं

मग त्या जिवाच्या कवड्या यांनी आम्ही मांडलेल्या पटावर का उधळाव्यात?

कसल्या आणि कुणाच्या भरवशावर?

बाजी, फुलाजी, तुम्ही स्वामिकार्यासाठी का ह्या अवघड वाटचालीत सामील झालात?

कोणत्या त्यागापायी?

हे स्वराज्य व्हावं, ही तो श्रींची इच्छा आहे, असं आम्ही म्हणालो.

पण हा महाचंडिकेचा होम धडाडत असता त्याचं पौरोहित्य आमच्या हाती का सुपूर्द केलंत?

यातून खरं काही साधणार आहे का?

या पालखीचा वीट येतो!

नशिबानं या संकटातून पार पडलोच, तर….

बाजी, पालखीचा मान तुम्हांला देऊ!

त्या वेळी तुम्हांला कळेल, ही पालखी केवढं सुख देते, ते!

पालखी हेंदकाळत धावत होती.

अचानक पालखी थांबली. मागून नजरबाज धावत आला. तो बाजींना म्हणाला,

‘बाजी, पाठलाग होतो आहे.’

सर्वत्र दाट धुकं होतं. बाजी ओरडले,

‘थांबू नका पळा.’

राजांची पालखी धावत होती. वेग वाढला होता. पालखीत तोल सावरणं कठीण जात होतं.

पांढरंपाणी ओलांडून खेळण्याचा पायथा गाठला. गजाखिंडीत पालखी आली, नजरबाज उलट दिशेनं आला त्याने बाजींना काही सांगितलं आणि पालखी थांबली.

पालखीवरचं अलवान उचललं गेलं. बाजी म्हणाले,

‘राजे, उतरा!’

शिवाजी राजे पालखीबाहेर आले. धुक्यानं सारा मुलूख वेढला होता. दोहों बाजूंनी उंच गेलेल्या दरडींतून जाणाऱ्या त्या खिंडीत सारे उभे होते. पहाटेचा समय जवळ येत होता.

‘बाजी! काय झालं?’ राजांनी विचारलं.

‘राजे! दैवानं दावा साधला. खेळणा सुर्व्यांच्या मोर्च्यात सापडलेला आहे, हे आधी कळतं, तर मधल्या वाटेनं आपल्याला राजगडाच्या रोखानं सोडलं असतं. आता तेही जमणार नाही. मागं शत्रू आहे. पुढं वेढा आहे.’

‘बाजी! चिंता करू नका. सुर्व्यांनी मोर्चे लावलेत ना! ते जरूर आपण मोडून काढू.’

‘आपण? नाही, राजे, ते तुम्ही करायला हवं! पाठलाग करून येणारे गनीम कोणत्याही क्षणी आपल्याला गाठतील. ते आणि सुर्वे यांची हातमिळवणी होता कामा नये.’

‘मतलब!’

‘राजे, आता उसंत नाही. तीनशे धारकरी घेऊन तुम्ही गड गाठा. आम्ही ही खिंड लढवतो.’

‘नाही, बाजी! तुम्हांला सोडून आम्ही जाणार नाही. जे व्हायचं असेल, ते होऊ दे.’

राजांच्या बोलांनी बाजी कासावीस झाले. त्यांचा चेहरा कठोर बनला. ते म्हणाले,

‘राजे! आता बोलत बसायला फार वेळ नाही. एकदा वडिलकीचा मान दिलात, तो पाळा. गड गाठा!’

‘नाही, बाजी! ते होणार नाही.’

‘मला सांगता? या बाजीला? राजे, ही सारी फौज माझी, बांदलांची आहे. प्रसंग ओढवून घेतलात, तर तुमच्या मुसक्या आवळून या पालखीतून तुम्हांला जावं लागेल. विंझाईशपत सांगतो, यात तिळमात्र बदल घडणार नाही. राजे बऱ्या बोलानं गड गाठा!’

 

राजांना काही सुचत नव्हतं. बाजींचं वेडावलं रूप ते पाहत होते.

क्षणभर रोहिड्याच्या किल्ल्यावर पाहिलेलं बाजींचं रूप राजांच्या नजरेसमोर तरळलं. राजे म्हणाले,

‘बाजी, फुलाजी…पण तुम्ही….’

‘आमची चिंता करू नका, राजे! तुम्ही गड गाठा. गडावर जाताच तोफेचा आवाज करा. तोवर एकही गनीम या खिंडीतून आत येणार नाही.’

‘बाजी ss.’

‘बोलू नका, राजे! ही बोलण्याची वेळ नाही. लहान तोंडी मोठा घास घेतला असला, तर क्षमा करा.’

राजांचे डोळे भरून आले. त्यांनी बाजींना मिठी मारली. फुलाजींना कवटाळलं. बाजी म्हणाले,

‘राजे! परत नाही भेटलो, तर आठवण विसरू नका.’

दोघांच्याही अश्रूंचे बांध फुटले. डोळे पुसत बाजी म्हणाले,

‘राजे! आमची लाज राखा. सुखरूपपणे गडावर जा. जोवर तोफेचा आवाज ऐकत नाही, तोवर जिवाला चैन नाही.’ बाजींची नजर यशवंताकडं गेली. ते म्हणाले, ‘यशवंता, राजांना सांभाळ. त्यांच्यावरची नजर ढळू देऊ नको. राजे, तुम्ही जा.’ कठोर आवाजात बाजी ओरडले, ‘जा म्हणतो ना!’

राजांना काही सुचत नव्हतं. तीनशे धारकरी गोळा झाले होते. राजांनी पाऊल उचललं; पण बळ येईना. त्यांनी माघारी पाहिलं. बाजी, फुलाजी उभे होते. एखाद्या देवालयाच्या दोन्ही बाजूंना द्वारपाल असावेत, तसे.

‘या, राजे!’ बाजींनी हात उंचावला.

धुक्याचा एक लोट आला आणि बाजी, फुलाजी दिसेनासे झाले.

राजे खेळण्याकडं चालू लागले होते. गजाखिंड ते खेळणा अंतर दीड कोस तरी होतं.

 

 

*🚩 क्रमशः 🚩*