पावनखिंड 44

*⚔🌄पावनखिंड🌄⚔*

 

🔰 *भाग : ४४*🔰

 

 

भर उन्हाळ्यात चक्री वादळ घुमत यावं, तशी शिवाजी सापडल्याची बातमी सिद्दीच्या तळावर आली. शिवाजी पकडल्याच्या आनंदात मसूद छावणीकडं येत होता. सिद्दी जौहर, फाजलखान, सलाबतखान सारे सिद्दीच्या डेऱ्यात शिवाजीला पाहण्यासाठी उत्सुक झाले होते.

मसूद दौडत डेऱ्याजवळ आला. ओलाचिंब झालेल्या मसूदला भिजलेल्याची जाणीव नव्हती. मसूदला पाहताच सिद्दी म्हणाला,

‘मसूद! बहाद्दर हो! त्या शिवाजीला पकडून आणलंस ना?’

‘जी! कोणत्याही क्षणात तो शिवाजी हजर होईल.’

‘जा, मसूद. पोशाख बदलून ये.’

मसूद गेला आणि डेऱ्यासमोर पालखी आली. पालखीला शेकडो सशस्त्र लोकांचा गराडा पडला होता. चौफेर मशाली धूर ओकत होत्या.

धिप्पाड देहाचा, काळ्या कुळकुळीत रंगाचा, जाड ओठांचा सिद्दी जौहर डेऱ्यासमोर आलेल्या पालखीकडं पाहत होता. दाट भुवयांखालील त्याचे आरक्त डोळे चमकत होते. आपल्या कुरळ्या केसांवरून हात फिरवीत सिद्दी जौहर पुढं झाला. पालखीतून उतरलेल्या राजांना तो म्हणाला,

‘आवो, राजे! भिजला नाहीत ना?’

‘फारसा नाही.’

बैठकीकडं बोट दाखवत सिद्दीनं सांगितलं,

‘बसा, राजे!’

सिद्दी जौहरबरोबर फजलखान,सलाबतखान होते. आपल्या बापाच्या मृत्यूला कारणीभूत झालेला शिवाजी फाजलखान ताठरलेल्या नजरेनं पाहत होता. सिद्दी जौहरनं सलाबतखान आणि फाजलखान यांची ओळख करून दिली. सिद्दीनं सलाबतच्या कानात काही तरी सांगितलं आणि सलाबत बाहेर गेला.

सिद्दीनं राजांना विचारलं,

‘राजासाब! पळून जात होता?’

‘जमलं, तर पाहावं, हा इरादा होता.’

‘तो फिर क्या हुआ?’

‘जमलं नाही.’

सिद्दी ढगांच्या गडगडाटासारखा हसला. म्हणाला,

‘राजे, बहाद्दूर आहात. तुमच्या धिटाईचं कौतुक वाटतं.’

‘कौतुक! जौहर!’ फाजलखान ओरडला, ‘सलतनीच्या या दुश्मनाचं कौतुक कसलं? तलवारीनं त्याची कत्तल….’

‘हां, फाजल! जुबाँ आवर.’ सिद्दी जौहर डोळे फिरवीत म्हणाला, ‘शिवाजीराजे हे तुझ्या-माझ्यासारखे सरदार नाहीत. ते राजे आहेत. त्यांचा निर्णय पादशाह सलामत घेतील. आज राजे आमचे मेहमान आहेत.’

त्या प्रकारानं राजांच्या चेहऱ्यावरची रेषाही हलली नव्हती. ते शांतपणे सैल अंगानं आरामात बसले होते.

सलाबतखान डेऱ्यात आला. त्याच्या पाठोपाठ एक मुसलमान सरदार होता. डेऱ्यात येताच त्या सरदारानं सिद्दीला मुजरा केला. राजे त्या सरदाराकडं पाहत होते.

राजांच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं. निरोपाचे विडे देण्यासाठी आले होते, तेव्हा तो हेर तिथं होता. सिद्दीनं त्या हेराला विचारलं,

‘तोहमतखाँ! तुम्ही यांना ओळखता?’

‘इनको कौन पहचानते नही? ये तो शिवा महाराज है!’

‘पूरी तरहसे पहचानते हो?’

‘जी, हाँ!’ राजांकडं निरखून पाहत तोहमतखाँ म्हणाला, ‘अच्छी तरहसे! ये शिवाजी महाराज हैं!’

‘आप जा सकते हैं!’ सिद्दीनं आज्ञा दिली.

मुजरा करून तोहमतखाँ गेला. आता सिद्दीच्या मनात कुठलाही संशय राहिला नव्हता. राजांच्या बोलण्यानं तो सावध झाला.

‘सिद्दी जौहर! आपल्याला आमच्याबद्दल शक आला होता?’

सिद्दी हसला. तो म्हणाला,

‘राजे! माफ करा. पण आम्ही संशयाला जागा ठेवत नसतो. तो आमचा रिवाज आहे. राजासाब, शराब पिओगे?’

मंचावरचा पेला सिद्दीनं उचलला. रौप्य सुरईतलं मद्य पेल्यात ओतून ते राजांच्या हाती दिलं. पण राजांनी ते ओठाला लावलं नाही.

सिद्दीची शंका दूर झाली होती. राजांचं सावध रूप तो कौतुकानं पाहत होता. तो म्हणाला,

‘राजे! आमचाही शक आला ना?’

‘माफ करा! पण आम्ही संशयाला थारा देत नसतो.’

सिद्दी खूश होऊन मोकळेपणानं हसला. राजांचं हसणं त्यात मिसळलं होतं.

सिद्दीनं विचारलं,

‘राजासाब, एक प्रश्न विचारू?’

‘विचारा ना!’

‘जमलं असतं, तर कुठं जाणार होता?’

‘खेळणा!’

सिद्दीच्या राकट ओठांवर हसू उमटलं,

‘राजे! तुम्हांला ते जमलं नसतं.’

‘का?’

‘का? आता या क्षणी खेळण्याला आमच्या वतीनं सुर्वे आणि जसवंतराव मालवणकरांनी मोर्चे लावले आहेत.’

राजांचं सोंग घेतलेल्या शिवाचा चेहरा खरकन् उतरला.

खेळणा मोकळा आहे, अशी बातमी होती!

वेढा पडल्याचं समजलं कसं नाही?

हा सिद्दी काही खेळ तर खेळत नसेल!

बातमी खरी असली, तर राजे, बाजी सुखरूप गडावर पोहोचतील ना?

‘राजे! कसला विचार करता?’ सिद्दीनं विचारलं.

‘काही नाही.’ शिवा म्हणाला, ‘ बरं झालं, आम्ही खेळण्याला गेलो नाही, ते! रात्र खूप झाली. जरा विश्रांती घ्यावी म्हणतो.’

‘बेशक!’ म्हणत सिद्दी जौहर उठला आणि त्याच वेळी हेजीब नेहमीचे रिवाज न पाळता सरळ डेऱ्यात आला आणि सिद्दीच्या कानाला लागला. त्यानं कानात सांगितलेल्या मंत्रानं सिद्दीचं रूप पालटलं. संतापानं बेभान झालेला सिद्दी शिवावर नजर रोखत ओरडला.

‘कोण आहेस तू?’

‘मतलब?’ शिवा उसन्या धैर्यानं म्हणाला, ‘मी शिवाजी.’

‘झूट! बिलकूल झूट! तो काफर शिवा केव्हाच पळून गेला.’

‘तेही खरं आहे.’ शिवा शांतपणे म्हणाला.

‘मतलब?’

‘सिद्दी जौहर! आमचे राजे एवढया सहजासहजी शत्रूच्या हाती सापडत नसतात. एव्हाना राजे खूप दूर गेले असतील. आता तुझ्या पंज्यात ते सापडणार नाहीत.’

‘पण तू कोण?’ सिद्दीचा संयम ढळत होता.

‘माझं नाव शिवाच!’ शिवा हसून म्हणाला, ‘ जरा आडनावात फरक आहे. ते शिवाजीराजे भोसले आणि मी शिवा न्हावी.’

‘हजाम?’

‘हां! हजाम! नाहीतर आपली एवढी सुरेख मान आपल्या ताब्यात कुणी दिली असती?’

‘दगाs’ म्हणत फाजल तलवार उपसून शिवाच्या छाताडाला लावत म्हणाला, ‘याचा नतीजा माहीत आहे?’

‘ते माहीत नसतं, तर इथं कशाला आलो असतो? फाजलखान, जिवाची भीती आम्हांला नाही. ती असती, तर पालखीत हीच कट्यार दुशेल्यात खोवली होती ना!’

‘ये हिम्मत!’ फाजल उसळला.

‘हां, फाजल! आता संतापून काही उपयोग नाही. राजे केव्हाच दूर गेले.’

‘हरामखोर!’

‘हरामखोर मी नव्हे! मी माझ्या धन्यासाठी इथं आलो. हरामखोर तू! बाप मेला, तरी त्याच्याकडं पाठ वळवली नाहीस. मी तसा नाही. सोंगातला का होईना, पण शिवाजी बनलो. बस्स! जिवाचं सोनं झालं’

‘कंबख्त!’ फाजल किंचाळला आणि संतापानं भान हरवलेल्या फाजलनं आपली तलवार शिवाच्या छाताडातून आरपार नेली. तलवार उपसली, तेव्हा ते पातं रक्तानं नहालं होतं.

शिवाचं शरीर विजेसारखं कंप पावत होतं. छाताडात रुतलेल्या तलवारीच्या जखमेतून रक्त उसळत होतं. त्यावर आपला उजवा हात दाबून तोल सावरण्यासाठी शिवानं कनातीची दांडी डाव्या हातानं पकडली. एक विराट हास्य त्याच्या मुखावर अवतरलं. फाजलकडं पाहत तो म्हणाला,

‘फाजल! सोंगातला शिवाजी झाला, म्हणून काय झालं? तो कधी पालथा पडतो काय?’ एक असह्य वेदना शिवाच्या मुखावर प्रगटली. डोळे विस्फारले गेले. कनातीच्या दांडीला धरून घरंगळत ढासळत असता तो उद्गारला, ‘राजेss, येतोss मुज…’

‘कुत्ता कहीं का!’ ढासळलेल्या शिवाकडं पाहत फाजलखान उभा होता. त्याच्या हातात रक्तानं माखलेली तलवार तशीच होती. शिवा न्हावी कनातीची दांडी धरून अंग मुरचडून तसाच बसला होता. मान कनातीच्या दांडीवर विसावली होती. प्राणज्योत केव्हाच नाहीशी झाली होती. पण छातीतून पडणाऱ्या रक्ताचा ओहोळ गालिच्यात टिपला जात होता.

फाजलचे शब्द ऐकताच सिद्दी संतापानं उद्गारला,

‘कौन कुत्ता!’

शिवाकडं बोट दाखवत सिद्दी म्हणाला,

‘येssनहीं, फाजल! गलत बात करतोस तू! असा एक जरी इमान बाळगणारा आदमी आदिलशाहीत पैदास्त झाला असता, तर या धुवांधार पावसात पन्हाळ्याला वेढा घालायची पाळी आली नसती. काय या माणसाचं इमान! जान कुर्बान करून टाकावी, असं वाटतं.’

सलाबतखानानं विचारलं,

‘या माणसाबरोबर पालखीसह जी माणसं आली आहेत, त्यांचं काय करायचं?’

‘काय करायचं?’ फाजल हसला, ‘कत्तल!’

‘फाजल! तुझा दिमाग बिघडलेला दिसतो. बादशहांनी आमच्या हाती ही मोहीम दिली, हे विसरतोस! इथं तुला हुकूम देण्याचा अधिकार नाही.’

‘मग काय त्यांना सोडणार?’ फाजलनं विचारलं.

‘अलबत! ज्याला पकडायचा, तो केव्हाच सुटला. गरुड निघून गेला. कावळे मारून काय करणार? फाजल, त्या माणसांची कत्तल केलीस, तर त्याचा नतीजा जाणतोस?’

‘काय होईल?’

‘काय होईल? काय होणार नाही, ते विचार. त्यातल्या प्रत्येकाची बायको, आई, बाप, मुलं गोतावळा आहे. ती माणसं पिढ्यान् पिढ्याची वैरी बनतील. एका माणसाचं वैर घ्यायला शंभर उभे राहतील. तुझ्या आब्बाजानचा वध झाला, तेव्हा सापडलेले सारे सरदार बाईज्जत शिवाजीनं माघारी पाठविले. ती नुसती दया नव्हती. त्यात फार मोठं शहाणपण होतं.’

सिद्दी जौहर बोलत असता मसूद कपडे करून डेऱ्यात आला. कनातीच्या दांडीला मिठी मारून पडलेला शिवाजी, रक्तानं डागाळलेली तलवार घेऊन उभा असलेला फाजलखान पाहून त्याला काय बोलावं, हे सुचत नव्हतं.

मसूदला पाहताच सिद्दीनं आज्ञा केली,

‘मसूद! शिवाजीचा पाठलाग करा. तो पळून जाता कामा नये.’

मसूदला काही कळत नव्हतं. त्यानं पडलेल्या शिवाकडं बोट दाखवलं.

‘मूरख! तो शिवा नाही. अस्सल शिवा केव्हाच पळून गेला. त्याला गाठ. त्याला पकडून आणल्याखेरीज आम्हांला तोंड दाखवू नको. अंधे कहीं के! जाव! निकल जाव मेरे सामनेसे!!’

सिद्दीच्या संतापानं भ्यालेला मसूद वळला.

छावणीत धावपळ सुरू झाली आणि काही वेळानं शेकडो घोड्यांच्या टापांचा आवाज उठला.

तुफान वाऱ्या-वादळाची, पाऊस पाण्याची क्षती न बाळगता कोरड्या कपड्यांनिशी आलेला मसूद परत भिजण्यासाठी चिखला-राडीतून शिवाजीचा शोध घेत दौडत होता.

*🚩 क्रमशः 🚩*