पेशवाईतील स्त्रिया भाग १०

पेशवाईतील स्त्रिया – भाग १०

धाकटया राधाबाई

बहुतेकदा पेशवाई मध्ये नानासाहेब पेशव्यांच्या पत्नी म्हणजे गोपिकाबाई एव्हढेच आपल्याला माहिती असते …तो काळ गोपिकाबाईचा पेशवीणबाई म्हणुन मिरवायचा… शनिवारवाड्या वर एकछत्री अंमल करण्याचा थोडक्यात काय तर मी म्हणेल ती पुर्व दिशा म्हणायचा … असा तो काळ होता …

असे व्यक्तीमत्व वाडयावर असल्यावर इतर स्त्रिया झाकोळल्या गेल्या नसत्या तरच नवल ?

अशी एखादी स्त्री जी साक्षात गोपिकाबाईची सवत असेल तर ?

पेशवाई मध्ये चिमाजी आप्पा , सदाशिवभाऊ आणि थोरले माधवराव व्यवहारी नीती मध्ये चोख होते , असे म्हणायचं कारण, पेशवे घराण्यात आणि एकुणच त्या काळातील इतर सरदार घराण्यात पुरुषांना अनेक लग्नाच्या बायका किँवा आयुष्यात इतर स्त्रिया होत्या , या इतर न लग्नाच्या बायकांना इतिहासात नाटकशाळा असा शब्द आहे ….याला अपवाद होते चिमाजी आप्पा , सदाशिव भाऊ आणि माधवराव, यांनी लग्नाची एक बायको हयात असताना दुसरे लग्न कधीही केले नाही ..

नानासाहेब पेशव्यांचं कर्तृव मोठेच , त्यांचा काळ हा पेशवाईतील वैभवशाली काळ ….पण असे असले तरी त्यांच्या आयुष्यात गोपिकाबाई या एकट्या स्त्री नक्कीच नव्हत्या …लग्नाच्या दोन बायका आणि अनेक नाटकशाळा त्यांनी सांभाळल्या .

भाऊ आणि विश्वासराव पानिपत मध्ये गुंतुन पडलेले असताना युद्धा च्या तोंडावर नानासाहेबांनी दुसरे लग्न केले हा इतिहास आहे , या लग्नाच्या बाबतीती अनेक मतप्रवाह आहेत …काहींच्या मते गोपिकाबाई आणि नानासाहेबां मध्ये दुरावा निर्माण झाला होता म्हणुन त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला , दुसरे एक मत असे की पानिपतावर गरज असलेल्या पैसे , धान्य या गोष्टींची निकड भागवण्या करता सावकाराच्या मुलीशी लग्न करावे लागले … खरे कारण देव जाणे , पण व्यावहारिक दृष्ट्या दुसरे मत योग्य वाटते , त्या काळात सावकार कर्ज देताना पेशव्यांना घरातील मुलीशी लग्न करायची अट नाही पण आग्रह धरत ….

पानिपता च्या तोंडावर लग्न होऊन पेशव्यांची सुन झालेली आणि साक्षात गोपिकाबाई ची सवत झालेली स्त्री म्हणजेच धाकट्या राधाबाई….

पेशवाईतील बहुतेक स्त्रिया ह्या चित्पावन कोकणस्थ ब्राम्हण , पण राधाबाई याला अपवाद होत्या , पैठणचे देशस्थ ऋग्वेदी ब्राम्हण नारायण नाईक वाखरे , हे पिढीजात सावकार आणि सराफ , त्यांची मुलगी राधाबाई नानासाहेबांनी पसंत केली …

गोऱ्या पान , लांब सडक केस ..दिसायला अतिशय देखण्या अशा या राधाबाईंचं लग्नाच्या वेळेस वय होतं नऊ आणि नानासाहेब होते चाळीस वर्षांचे !

हे लग्न २० डिसेंबर १७६० ला पैठण जवळ हिरडपुरी गावात पार पडले , मुलीचे वडील नवकोट सावकार ,चांदीच्या पायघड्या घालुन पेशव्यांना मांडवात घेऊन आले. या वरून कल्पना येऊ शकते कीती थाटात लग्न झालं असेल ?

गोपिकाबाई आणि इतरां करता करता हे लग्न म्हणजे एक धक्का होता , पस्तीस वर्षांच्या गोपिकाबाई करता नऊ वर्षाची सवत म्हणजे संसार सुखाला तडाच म्हणायचे ! पण त्या वेळेसच्या पुरुषप्रधान संस्कृती पुढे गोपिकाबाई काहीच करू शकत नव्हत्या , झालेल्या गोष्टीत नऊ वर्षाच्या राधाबाईची काहीच चुक नाही हे समजण्याचा मोठे पणा नक्कीच त्या लोकांत होता , त्यांनी राधाबाईला कुटुंबात सामावून घेतलं.

पण पेशवाईचे सुख राधाबाईच्या नशिबात नसावे , थाटात लग्न होत असताना नियती मनात हसत असावी …

लग्ना नंतर केवळ तीनच आठवड्यात म्हणजे १४ जानेवारी १७६१ ला पानिपतचे युद्ध झाले ….पानिपत मराठ्यांच्या इतिहासातील भळाळती जखम !!

अतिशय हताश आणि निराश नानासाहेब राधाबाईना घेऊन पुण्यात आले , शनिवारवाडा “धाकल्या राधाबाई” म्हणुन त्यांना ओळखु लागला … नानासाहेब पुर्ण खचले होते , पराभवाची हाय खाऊन, वरच्या वर आजारी पडत होते , थोडा बदल म्हणुन राधाबाईना घेऊन पर्वती वर राहायला गेले …पण प्रकृती ढासळत गेली त्यातच २३ जुन १७६१ ला नानासाहेब निधन पावले …

अवघ्या सहा महिन्यात राधाबाई विधवा झाल्या .. प्रथे प्रमाणे या नऊ – दहा वर्षाच्या मुलीचे केशवपन झाले आणि अंगावर अळवण आले ,नानासाहेबांच्या मृत्यच्या घटनेत गोपिकाबाई ठाम पणे उभ्या राहिल्या आणि स्वतः सती गेल्या नाही आणी राधाबाईनाही सती जाऊ दिले नाही …

पुढे चालुन गोपिकाबाईंनी त्यांना कधीही सवत मानले नाही तर एक लहान बहीण म्हणुन वागवले , पण नानासाहेबांचा मृत्यु हा त्या कोवळ्या वयावर आघात होता … राधाबाईंचे मन उदास झाले होते , या सगळ्याचा प्रकृती वर परिणाम होत होता , पण आला दिवस ढकलत होत्या ..
काही वर्षांनी गोपिकाबाई गंगापुरला स्थायिक झाल्या मग पार्वतीबाईंनी त्यांची काळजी घेतली . …

अशातच प्रकृती ढासळली …वैद्यांच्या उपचारांना यश येईना , हवा पालट करण्याकरता त्यांना पेशव्यांच्या वडिलोपार्जित वडुजच्या वाड्यात पाठवावे असे गोपिकाबाईनी गंगापूरहुन कळवले , त्या करता नाना फडणवीसांनी तयारी केली , पण प्रकृती खुपच नाजुक झाली होती , पालखी कींवा मेण्यात निजायचेही त्राण नव्हते …म्हणुन पुण्यातच राहण्याचा निर्णय झाला .

शेवटचा प्रयत्न म्हणुन देव धर्म , अभिषेक ,दान धर्म , रौप्य तुला असे बरेच प्रयत्न केले …पण या सगळ्याला यश आले नाही , ९ नोव्हेंबर १७७१ ला राधाबाई देवा घरी गेल्या , त्या वेळेस त्यांचे वय असेल १९ -२० , पती निधना नंतर जवळ पास दहा वर्षे जगल्या , या काळात सगळ्यांनीच त्यांची व्यवस्थित काळजी घेतली , मुख्य म्हणजे माधवरावानी त्यांना मुलाची कमी जाणवु दिली नाही , कौतुक गोपिकाबाईंचे त्यांनी मन मोठे करून मोठ्या बहिणीचे प्रेम दिले …

हे सगळे असले तरी केवळ नऊ वर्षाची मुलगी पेशवे घराण्यात येते काय आणि सहा महिन्यात विधवा होते काय ?? वैधव्य भोगण्या करताच का ती पेशवे घराण्यात आली होती ?? सगळेच अतर्क्य !!!

©️बिपीन कुलकर्णी

संदर्भ –
पेशवे घराण्याचा इतिहास ( प्रमोद ओक )
पेशवेकुलीन स्त्रिया – मुक्ता केणेकर