पेशवाईतील स्त्रिया भाग ११

पेशवाईतील स्त्रिया भाग ११

दुसऱ्या रमाबाई

 

पेशवाईतील ” रमा माधव ” म्हणजे वलयांकित प्रेम कहाणी , माधवरावांचे असामान्य कर्तृत्व, रमाबाईंची त्यांना असलेली साथ , त्यांचे सहगमन अशा सगळ्या गोष्टी त्यांच्या प्रेमाला एका उंचीवर घेऊन गेल्या..आणि पहिल्या रमाबाई इतिहासात कोरल्या गेल्या ..

इतिहासावर नजर टाकली तर एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते , ज्या स्त्रियांच्या पतीचे युद्ध कर्तृत्व मोठे होते त्या स्त्रियांची इतिहासाने थोडी फार नोंद ठेवली, जसं की राधाबाई , काशीबाई , गोपिकाबाई , आनंदीबाई पार्वतीबाई , रमाबाई…इथेच पेशवाईतील स्त्रियाची माहीती बहुदा संपुन जाते …..असं होण्याचं खरं कारण असतं इतिहास फक्त कर्तृत्वाची दखल घेतो आणि इतिहासाला कारुण्याशी देणं घेणं नसतं !!!

थोरल्या माधवराव आणि रमाबाईंच्या सहगमना नंतर पिंडाला कावळा शिवत नव्हता तेंव्हा सांगितल गेलं की नारायणरावाना मुलगा झाला तर त्याचे नाव माधव ठेऊ … माधवरावांच्या मृत्यु नंतर खुप घडामोडी झाल्या.. नारायणराव पेशवे झाले, त्यांचा खुन आणि नंतर गंगाबाईच्या पोटी मुलाचा जन्म झाला …झालेल्या बाळाचे नाव ठेवले सवाई माधवराव !!

पुढे काही वर्षांनी म्हणजे १० फेब्रुवारी १७८३ ला सवाई माधवरावांचे पुण्यात पर्वती वर लग्न झाले , लग्न होऊन वाड्यात आलेली मुलगी म्हणजेच दुसऱ्या रमाबाई ….

केशव कृष्णाजी नाईक थत्ते हे पुण्यातील गडगंज सावकार , हे थत्ते मुळचे रत्नागिरी जवळील अंजनवेल तालुक्यातील …याच केशवरावांची मुलगी राधा , खुद्द नाना फडणीविसानी सवाई माधवरावां करता पसंत केली , लग्ना नंतर नाव बदलुन माधवरावांची म्हणुन रमाबाई झाली …

दिसायला सुंदर , सुशिक्षित आणि श्रीमंत घराण्यातील अशा या रमाबाई लग्नाच्या वेळेस होत्या सहा वर्षांच्या आणि सवाई माधवराव होते नऊ वर्षाचे …. संपुर्ण पेशवाईतील सगळ्यात शाही विवाह कोणता असेल तर तो सवाई माधवराव आणि रमाबाईंचा …

हिंदुस्तानातील बहुतेक राजे ,निजाम , नबाब , पेशव्यांचे सरदार , सावकार आणि इतर तालेवार मंडळींना नाना फडणवीसांनी जातीने निमंत्रण पाठवले होते ,हे करण्या मागे पेशवाईचे वैभव आणि दरारा याची कल्पना अखंड हिंदुस्थानाला यावी हा उद्देश होता.

विवाह शाही झाला म्हणजे नेमके काय ?

नीर निराळे विधी होत अनेक दिवस हा सोहळा चालु होता ..लग्नाच्या मिरवणुकीत सगळ्यात पुढे शंभर हत्ती , दहा हजार पायदळ ,पाच हजार घोडे स्वार , २०० वाजंत्री पथक , हिंदुस्तानातील सावकार , मुत्सद्दी , इतर राज्यातुन आलेले मोठे लोक , त्यामागे सरदार , शास्त्री , भिक्षुक , जड जवाहीर घातलेली वऱ्हाडी मंडळी असा मोठा लवाजमा होता … रात्रभर मिरवणुक चालली होती . लग्ना करता पर्वती दिव्यांनी उजळुन निघाली होती. या सोहळ्यात पेशव्यांच्या अंगावर “तमामी ” पोशाख होता , तमामी म्हणजे उभे सुत जरीचे आणि आडवे रेशमाचे.

जेवणाच्या पंगतीत खास निमंत्रितां साठी चांदीचे पाट आणि ताटं , चांदीची उदबत्ती घरं , ताटात उजेड पडावा म्हणुन शेजारी चांदीच्या समया ,केशराचे गंध आणि कस्तुरी मिश्रित अक्षता होत्या , जेवणात सोळा भाज्या , सोळा कोशिंबिरी , नीर निराळ्या आमट्या , अनेक पक्वाने असा बेत होता …

या लग्नात छत्रपती शाहु ( दुसरे )महाराजांनी रमाबाईंना आहेरात हिऱ्याच्या बांगड्या केल्या ,माहेश्वरहुन अहिल्याबाई होळकरांनी पेशवे कुटुंब आणि इतर मंडळी करता आहेर पाठवला होता …इतर नवाब आणि सरदारांनी माना प्रमाणे आहेर केले .

असा अफाट खर्च केलेला शाही विवाह पेशवाईत फक्त रमाबाईंच्या नशिबी आला होता !!
लग्ना नंतर काही दिवसांनी रमाबाई आणि सवाई माधवराव आजी म्हणजे गोपिकाबाई च्या दर्शना करता गंगापुरला जाऊन आले , तिथुन आल्यावर प्रथे प्रमाणे वयात येईपर्यंत त्या माहेरी राहतील याची काळजी पार्वतीबाईंनी घेतली …

वयात आल्यावर ऋतुप्राप्तीचा , ओटी भरण्याचा कार्यक्रम करण्याची पेशवाई मध्ये पद्धत होती , आणि त्याची नोंद कागद पत्रात ठेवलेली दिसते , रमाबाईंच्या बाबतीत हा कार्यक्रमही शाही झाला होता … चार दिवस हिरवी , गुलाबी , पिवळी आणि पांढऱ्या रंगाची साडी नेसवुन कौतुकसोहळा चालु होता , या कर्यक्रमाला मस्तानीचा नातु , नात सुन बांद्याहुन पुण्यात आले होते .

रमाबाई अतिशय समजुतदार , व्यवहार चतुर होत्या , वाडयावर सण वार , रीतीभाती जबाबदारीने सांभाळत होत्या …

काही दिवसांनी रमाबाई गर्भवती असल्याची बातमी आली , सगळी कडे आनंदाचं , उत्साहाचं वातावरण निर्माण झालं , सवाई माधवराव आणि रमाबाईं करता तो भाग्याचा काळ होता , कदाचित नियतीला हे मान्य नसावे … चार महिन्यात गर्भपात झाला … उत्साहावर पाणी फिरले …

या घटनेने रमाबाई उदास झाल्या , त्यात पुण्यात विषमज्वराची साथ सुरु झाली , त्यांना ताप येऊ लागला , सुरुवातीला त्यांनी कोणाला कळु दिले नाही , जेंव्हा कळले तेंव्हा उशीर झाला होता .. ..दुखणे विकोपाला गेले आणि त्यातच ३१ जानेवारी १७९३ ला त्यांचे निधन झाले … मृत्यु वेळेस वेळेस त्यांचे वय होतं अवघे सोळा वर्षाचे.!

पेशवेकालीन स्त्रिया मध्ये सर्वात ऐश्वर्य आणि कौतुक नशीबी घेऊन आलेल्या अशा या रमाबाई अल्पायुषी ठरल्या !!

बिपीन कुलकर्णी