पेशवाईतील स्त्रिया भाग १

पेशवाईतील स्त्रिया भाग १

आजपासून एक लेखमाला 11 भागात पोस्ट करेन मोठ्या आहेत पण इंटरेस्टिंग आहेत… मी लिहिलेली नाहीये… कदाचित बऱ्याच जणांनी वाचल्याही असतील… पण ज्यांनी नाही वाचल्या आवडल्या तर नक्की सांगा कमेंट्स करून….

गोपिका बाई ….शापीत पेशवीण

नियतीने अन्याय केलेली आणि पेशवाईतील अनेक दुर्दैवी स्त्रियां पैकी एक..

गोपिकाबाई म्हणजे थोरल्या बाजीरावाच्या सुनबाई … नाना साहेबांच्या पत्नी … माधवरावच्या मातोश्री ….श्रीमंताच्या अनेक पिढ्यांची साक्षीदार … अशी नाती जरी सांगितली तरी गोपिकाबाईंना स्वतःची अशी एक ओळख आहे.

मग अशी ही स्त्री दुर्दैवी कशी असु शकते ?

गोपिकाबाई म्हणजे वाईचे श्रीमंत सावकार भिकाजी गोखले – नाईक यांची कन्या , त्यांचे स्थळ नानासाहेब पेशव्याकरता सुचवलं होतं खुद्द शाहु महाराजांनी , शाहु महाराजांनी जेंव्हा भिकाजीना नानासाहेबाच्या स्थळा बद्दल विचारले तेंव्हा भिकाजीना नाही म्हणायचे काहीच कारणच नव्हतं …अखंड हिंदुस्थान गाजवणाऱ्या बाजीराव पेशव्यांचे चिरंजीव जावई म्हणुन मिळत असतील तर नाकारायचा प्रश्न होताच कुठे ?

१० जानेवरी १७३० ला शनिवार वाड्याचे भूमिपुजन झाले आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ११ जानेवारीला वाईला विवाह संपन्न झाला ….

माप ओलांडुन गोपिकाबाई पुण्यात आल्या …वाड्यात आल्या तेंव्हा तो शनिवारवाडा नव्हता कारण त्याचे बांधकाम अजुन सुरु व्हायचे होते . कुटुंबात एकाहुन एक दिग्गज मंडळी होती …. साक्षात श्रीमंत बाजीराव सासरे , काशीबाई सारखी सोशिक स्त्री सासु … राधाबाई सारखी करारी स्त्री आजे सासुबाई … चिमाजी आप्पा चुलत सासरे …. आणि बाहेर कुजबुज चालु असलेल्या मस्तानीबाई. या सगळ्यांना स्वतःची अशी ओळख होती …. इथे गोपिकाबाईना स्वतःच स्थान निर्माण करायचं होतं.

वयाच्या नवव्या वर्षी विवाह झाला ते साल होते १७३० -३१ , त्या नंतर १० वर्षांनी म्हणजे १७४० ला बाजीरावांच्या मृत्यु नंतर शाहु महाराजांनी नाना साहेबाना पेशवाईची वस्त्रं दिली … म्हणजे वयाच्या विशीत गोपिकाबाई श्रीमंत पेशवीण झाल्या …

मग तरी दुर्दैवी का म्हणायचं ?

गोपिकाबाई लहानपणी लिहा वाचायला शिकल्या होत्या ….अतिशय हुशार , तेजस्वी , करारी होत्या … दिसायला सुंदर …पण त्याच वेळेस अतिशय महत्वाकांक्षी , रागीट , अधिकार गाजवण्याच्या वृत्तीचा त्यांचा स्वभाव होता …या स्वभावा मुळे पुढे आयुष्यात घात झाला …नंतर आलेल्या दुःखा मुळे स्वभावात कडवट पणा येत गेला ….

एक गोष्ट महत्वाची इंग्लिश मध्ये म्हणतात तशा त्या visionary होत्या …म्हणुनच त्यांनी रघुनाथ यादवांकडुन ” पानिपत ची बखर ” लिहुन घेतली होती …पानिपतला २६० वर्षे उलटुन गेली … आजही त्या बखरी चे महत्व आहे …

त्यांना एकुण पाच अपत्ये होती , त्या पैकी दोन अल्पजीवी ठरली , म्हणजे जन्मा नंतर लगेचच गेली …इतर तीन विश्वास राव , माधव राव आणि नारायण राव यांची इतिहासाने गौरवाने नोंद घेतली , पण गोपिकाबाईना हयातीत पती नाना साहेब आणि पाचही अपत्यांचा मृत्यु पाहावा लागला … याला दुर्दैव नाही तर काय म्हणायचे ?

इतरांचा मोठे पणा , कर्तृत्व , गौरव त्यांना सहन होत नव्हतं … फक्त ” मी ” आणि ” माझे ” या स्वभावानं पुढं घात केला.

सदाशिवरावाना मिळणारा मान सन्मान पाहुन त्यांची तळपायाची आग मस्तकात जायची .. राघोबादादाचा दरारा त्यांना खपत नव्हता ….नानासाहेबांचा भावांवरील असलेलाल विश्वास पाहुन त्या घाबरून होत.. मग हळु हळु त्यांनी इतर कारभाऱ्यांच्या मार्फत राज्य कारभारात लक्ष घालायला सुरुवात केली … हे लक्ष घालण्यात उद्देश एकच सदाशिव भाऊ आणि राघोबादादा चे महत्व कमी करायचे !!!

बखर कार गोपिका बाई ना ” पागुंता ” घालणारी स्त्री म्हणतात …पागुंता म्हणजे काय तर एका चालीत अनेक चाली करणे … उदाहरणं द्यायचे तर …. पानिपत मोहीम राघोबादादानी करावी अशी नानासाहेबांची इच्छा होती .. कारण युद्धभुमी वर राघोबादादा आणि राज्य कारभारात सदाशिवभाऊ माहीर होते ….इथेच गोपिका बाई नी ” पागुंता ” घालुन सदाशिवभाऊला पानिपतावर पाठवलं …. अटकळ अशी बांधली भाऊच्या अनुपस्थितीत पुर्ण राज्यकारभारावर नियंत्रण येईल … अजुन एक ” पागुंता ” म्हणजे भाऊ बरोबर स्वतः च्या मुलाला विश्वासरावला आणि भाऊ पत्नी पार्वतीबाईना मोहिमेत सामील केले … याला दोन कारणं , पार्वतीबाईच्या समंजस स्वभावा मुळे वाड्यात त्यांचे महत्व वाढत होते …. त्यांच्या अनुपस्थिती मुळे ते कमी व्हायला मदत होईल …

पानिपतावर यश मिळणार हे गृहीत धरले होते म्हणुनच विश्वासरावाना बरोबर पाठवले कारण साधं आणि सोपं होतं यशाचे श्रेय एकट्या सदाशिवभाऊना मिळु नये ….एका दगडात अनेक पक्षी मारण्याच्या नादात पुढे काय होऊन बसले ,तो इतिहास आहे ?

पानिपतचे दान उलटे पडले …..दीर तर गेलाच , मुलाचा मृत्यु झाला … या धक्याने पाठोपाठ नाना साहेब गेले ….

नियती ने तिचा न्याय दिला ….

नाना साहेबांच्या मृत्यु नंतर माधवराव गादीवर आले …

माधवरावा चे वय लहान म्हणुन राघोबा दादाला घेऊन राज्यकारभार चालवावा असे गोपिका बाई ने ठरवले , राघोबा शी जुळवुन घेण्याचा प्रयत्न करत होत्या …वेळे प्रसंगी नमते घेतले …. राघोबादादाना म्हणाल्या ” चिरंजीव आपले कारभारी , आपण त्यांना आज्ञा करून कारभार चालवावा ” पण याचा फारसा काही उपयोग झाला नाही ,,,कारण राघोबादादा काय किंवा गोपिका बाई काय एकमेकांना पुर्ण ओळखुन होते …

गोपिकाबाई ना राज्यकारभाराचे ज्ञान उत्तम होते एक उदाहरण …निजामाने पुण्या वर स्वारी केली तेंव्हा राघोबादादा आणि माधवराव पुण्या पासुन लांब दुसऱ्या मोहिमे वर होते , निजामाने खलिता पाठवला ” खंडणी द्या अथवा पुणे जाळून टाकु ” गोपिकाबाईनी उत्तर धाडले ” तुमचे वैरी तुमच्या मुलखा कडे गेले आहेत , त्या कडे काय असेल ते पाहुन घेणे , आम्हास खंडणी द्यायची गरज वाटत नाही , पुण्याचे काय ते आम्ही पाहुन घेऊ ” निजामाला असे उत्तर देण्या करता नुसतं धाडस असुन उपयोग नाही तर कारभाराचे ज्ञानही असायला हवे ….

माधव राव जसे जसे मोठे होत गेले तसा त्यांचा स्वभाव करारी बनत गेला , आईचा हा चांगला गुण त्यांच्यात आलेला होता …

पण एका म्यानात दोन तलवारी कशा राहणार ? आई लेकाचे खटके उडु लागले …मग गोपिकाबाई नाशिकला जाऊन राहिल्या …. माधवरावाच्या शेवटच्या आजार पणात पुण्याला आल्या …. त्या नंतर नारायणराव पेशवे झाल्यावर थोडे दिवस राहुन परत नाशिकला गेल्या …

त्या नंतर झाला नारायण रावा चा खुन …..या खुना नंतर मात्र गोपिकाबाई सैर भैर झाल्या …का नाही होणार ? पोटच तिसरे पोर पण गेले …शेंडेफळ थोडे जास्तच लाडके होते …. पण नियतीला हे काही मंजुर नव्हते …

एके काळची पेशवीण बाई, जिच्या एका इशाऱयांवर अक्खी पेशवाई हलत होती … तीच पेशवीणबाई पंचवटी मध्ये एका मठात जोगिणीचं आयुष्य जगत होती … पाच घरात भिक्षा मागुन आयुष्य काढत होती …असे म्हणतात त्या वेळेस पण स्वभावातला अहंकार अजूनही शाबुत होता , पाच घरात भिक्षा मागताना ती घरे सरंजामदारांची किंवा आपल्या तोला मोलाची असावीत याची त्या खबरदारी घेत असत …

३ ऑगस्ट १७८९ ला पंचवटी ला त्यांचा मृत्यु झाला ….त्यांचे भाऊ गंगाधर भिकाजी रास्त्यांनी अग्नी दिला …..

अग्नी संस्काराला एकही मुलं हयात नसावे या सारखे दुसरे दुर्दैव काय असु शकते ?

बिपीन कुलकर्णी

संदर्भ – पेशव्यांची बखर ,

पेशवे घराण्याचा इतिहास ( प्रमोद ओक )

पेशवे कालखंडातील स्त्रिया (डॉ ज्योती वटकर )

पेशवाई – कौस्तुभ कस्तुरे

#पेशवाईतील स्त्रिया ….

#भाग१