फादर्स डे निमित्ताने दिल्लीचे किलबिलणारे पक्षी

‘फादर्स डे निमित्ताने दिल्लीचे किलबिलणारे पक्षी’
——————————————————————-

‘पप्पा सांगा कोणाचे? पप्पा माझ्या मम्मीचे’! असं गुणगुणणारी मुले आज मात्र फादर्स डे निमित्ताने ‘पप्पा केवळ आमचेच’ असे सर्व जगभर म्हणत असणार आहेत.तसाच कांहीसा किलबिलाट दिल्ली व एनसीआर भागात राहणा-या मुलांनी आज सायंकाळी केला.स्थळ होतं दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे दिल्ली कट्टा हे व्हर्चुअल व्यासपीठ.

दिल्ली मराठी प्रतिष्ठान गेली काही वर्षे विविध उपक्रमांद्वारे दिल्लीच्या संस्था व मंडळांना जोडत चालले आहे.त्याचाच एक भाग म्हणून दिल्ली कट्टा या ऑनलाईन व्यासपीठाद्वारे लाॅकडाऊन मुळे सध्या अडकून पडलेल्या मराठी बांधवांसाठी निरनिराळे कार्यक्रम आयोजित करीत आहे.

यावेळी आपण दिल्लीच्या बालगोपाळांचा कार्यक्रम करू या, अशी कल्पना पुढे आली आणि केवळ तीन दिवसांमध्ये विविध मंडळांनी ती प्रत्यक्षात उतरवली सुद्धा.आनंदवन मंडळाच्या सोनाली पाठक, गुडगावचे जीवन तळेगावकर,पूर्वांचलचे प्रविर चित्रे,मयुर विहार मंडळाचे अभिजीत गोडबोले,सह्याद्री सोसायटीच्या माया करंजकर ,सुचिता तांबवेकर,श्री डांगे पुढे सरसावले.मुंबईहून किरण साळी यांनी आकर्षक बॅनर बनवून दिले आणि सुरू झाली तयारी.पडद्याआड विवेक गर्गे आपली भूमिका बजावत होते.

आपण ‘छोटी मुले म्हणजे देवघरातली फुले’ असे म्हणतोच की! मग या फुलांचे सादरीकरणाचा छान पैकी ओवलेला आकर्षक हार बनवणारं कोणीतरी मिळायला हवे.ती जबाबदारी पूजा सोनावणे यांनी किती उत्तम निभावली आहे हे तुम्ही सर्वजण प्रत्यक्षच अनुभवाल.अत्यंत छान स्क्रीप्ट,सफाईदार उच्चारण आणि अप्रतिम गुंफण त्यांचं होतं.सादरीकरण करणा-या मुलांपैकीच एकास सहसंयोजक म्हणून निवडलेल्या ऋत्विज पाठक याने आपली निवड सार्थ केलेली आपणांस दिसेल.

_सुरूवातच वय वर्षे सहाच्या मयुर विहारमधील अलिशा गोडबोलेने सुस्पष्ट उच्चाराने केलेल्या गणेश वंदनाने झाली.मग पूर्वांचलचे समर्थ करजगीर व सारांश करजगीर या भावंडांचे अनुक्रमे श्लोक आणि ‘एका माकडाने काढलंय दुकान’ सादरीकरण झाले.खरी मजा आली ती पूर्वांचलच्याच अभिमन्यू सुळेच्या ‘सांग सांग गुगलनाथ’ या एका अर्थी विडंबन काव्यगायनाने._

गुडगावच्या रिषभ साखरेने ‘हीच आमुची प्रार्थना’ या गाण्याने सर्वांना प्रकाश आमटेंच्या हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाची आणि बाबा आमटेंवरील चित्रपटाची आठवण करून दिली.

उत्तम व पूरक व्यासपीठ मिळताच लाभलेल्या संधीचे सोन्यात रूपांतर कसे करून दाखवतात याचे प्रात्यक्षिक म्हणजे सह्याद्री सोसायटीतील अमेय डख हा मुलगा.त्याने ‘अती तेथे माती’ नावाची गोष्ट इतकी रंगवून व खणखणीत ठासून सांगितलीय की एखादा कसलेला वकीलसुद्धा त्याच्या सादरीकरणापुढे फिका पडेल. सह्याद्रीमधीलच यतीका वैद्यने ससोबा वरची कविता छान सादर केली.

गुडगावच्या ओवी तळेगावकरने गायलेले शिव तांडव स्तोत्र आणि सह्याद्रीतीलच आरोही तांबवेकरने म्हटलेली रामरक्षा अतिशय सुस्पष्ट उच्चारांसह व लयीत होती.रामरक्षा म्हटले की रामाचे दासानुदास रामदासाचे मारूती स्तोत्र हवेच. ते सह्याद्रीतील शुभ वैद्यने म्हटले.
गुडगावच्या अर्हन तालेने संवादिनीवर ‘मेरे शाम सुंदर’ भजन गायले.

या पूर्ण कार्यक्रमाचे संचालन करणा-या आपल्या पूजादीदी सोबत सहसंचालन करणारा आनंदवनचा ऋत्विज पाठक संवादफेक मध्ये तरबेज होताच पण त्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जाज्वल्य व्यक्तिमत्वही छान मांडले.गुडगावच्या पार्थ फडणीसाने एकपात्री नाट्यछटेने आपला अभिनयाचा कस दाखवला.
योगायोगाने आज फादर्स डे व योगा डे सोबतच आंतरराष्ट्रीय संगीत दिवसही होता.त्यामुळे समारोप आनंदवनच्या तानीया भटने सिंथेसायझर वाजवून केला.तिच्या झिंगाट गाण्यावर मग मुलांसोबत त्यांचे पालकही मस्त डोलले.अखेरीस आभार दिल्ली मराठी प्रतिष्ठानच्यावतीने गणेश रामदासी यांनी मानले.

महाराष्ट्रातून दूर दिल्लीत येऊन स्थायिक झालेल्या माणसांची मराठी मातीची,संस्कृती,परंपरा आणि भाषेची ओढ किती व्यापक आहे याचा साक्षात्कार घ्यायचा तर दिल्लीतील बालकांची किलबिल आपण ऐकायलाच हवी.त्यासाठी या लिंकवर क्लिक करा 👇

https://www.facebook.com/PurvanchalMaharashtraMandal/videos/3101958156507725/

किलबिल गप्पा,दिल्ली कट्टा चा बालकांसाठीचा पहिला टप्पा

https://m.facebook.com/story.php?story_fbid=10213344770614246&id=1847861106