पावनखिंड 40

*⚔🌄पावनखिंड🌄⚔*

 

🔰 *भाग : ४०* 🔰

 

 

गडावर धो-धो पाऊस कोसळत होता. जेव्हा पाऊस उसंत घेई, तेव्हा दाट धुकं अवतरत असे. रात्रीच्या वेळी तटावरून फिरणाऱ्या रखवालदारांनी हाताच्या अंतरावर धरलेली मशाल त्या उतरणाऱ्या धुक्यात काजव्यासारखी दिसे. राजांनी सारे धारकरी भर पावसात, पावसाची तमा न बाळगता चारी बाजूंच्या तटाला भिडवले होते. तटाचा पहारा जारी केला होता. दिवसरात्र गडकोटावरून ‘हुश्शार s रखवालाss’ आवाज उठत होते.

मध्यरात्रीचा समय उलटला होता. पाऊस थांबला होता. दाट धुकं सर्वत्र पसरलं होतं. सिदू हवालदार उत्तरेच्या तटावरून दोन बारगिरांच्यासह फिरत होता. गार वारा अंगाला झोंबत होता. गडावरच्या झाडांच्या पानांची सळसळ आणि घोंगावणारं वारं धुक्याची भयाणता वाढवत होतं. एका हातानं डोक्यावरची इरली सावारत तिघेजण तटावरून जात असता अचानक कसला तरी आवाज आला. बारगिरानं मशाल सावरत आवाज दिला. ‘हुश्शारss’ आणि क्षणात तिघांची पावलं थांबली. तटाखालून अस्पष्ट आवाज आला.

‘हुश्शारss’

सिदूनं आपलं इरलं फेकून दिलं. बारगिरांनी त्याचं अनुकरण केलं. तिघांनी आपल्या तलवारी सावरल्या. सिदूनं आवाज दिला,

‘अरे, कोन हाय?’

खालून आवाज आला.

‘दोर सोडा, दोरss’

तो आवाज ऐकून सिदूच्या अंगावर काटा उभा राहिला. त्यानं बारगिराला पिटाळलं.

परत खालून आवाज आला,

‘दोर सोडा, दोरss’

‘उबा ऱ्हा!’

तटावर पाच-पन्नास धारकरी गोळा झाले. त्यात त्र्यंबक भास्कर पण होते. किल्लेदार त्र्यंबक भास्करनी आज्ञा दिली,

‘दोर टाका! बघू, काय हाय, ते.’

सिदूनं दोराचं वेटोळं तटाखाली फेकलं. दोराचं टोक सिदूच्या हातात होतं. तो ओरडला,

‘दोर आला, हो s’

दोराला हिसके बसताच सिदू म्हणाला,

‘दोर पकडा.’

दोघं बारगीर पुढं झाले. तटाला पाय देऊन सर्व ताकद लावून ते दोर धरून उभे होते. दोराला ओढ लागत होती. ती ओढ हळूहळू वाढत होती. शेवटी तटावर एक हात आला. बारगीर पुढं झाले. त्यांनी त्या माणसाला तटावर घेतला. त्र्यंबकजींनी विचारलं,

‘आणि कोन हाये?’

तो थकलेला इसम म्हणाला,

‘कोन न्हाई.’

मशालीच्या उजेडात त्र्यंबकजी त्या माणसाला न्याहाळत होते. त्याचा वेष साधूचा होता. गळ्यात रुद्राक्षाच्या माळा होत्या. अनेक ठिकाणी त्याचं अंग खरचटलं होतं.

‘कोण तू?’ त्र्यंबकजींनी विचारलं.

‘साधू महाराज!’ तो म्हणाला.

‘मग अपरात्री या वाटेनं का आलास?’

‘दिवसा येन्याची परिस्थिती ऱ्हायली न्हाई. याबिगर दुसरी वाट नव्हती. मला राजांच्या म्होरं उभा करा.’

‘तर! मानकरीच तू! म्हणे, राजांच्या समोर उभं करा! राजे सुख करताहेत.’

‘मग त्यांना उठवा! नाही तर…’

‘नाही तर काय?’ त्र्यंबकजींनी विचारलं.

‘राजे आपल्यावर रागवतील.’

त्या संन्याशाच्या धिटाईनं त्र्यंबकजी गोंधळले. सन्याशासह ते वाड्याकडं चालू लागले.

राजांना जागं करण्यात आलं. ताडकन पलंगावरून उतरत राजांनी विचारलं,

‘काय आहे?’

‘किल्लेदार आलेत. त्यांनीच उठवायला सांगितलं.’

‘पाठव त्यांना.’

त्र्यंबकजी आत आले. राजांना म्हणाले,

‘गडावर एक संन्याशी आला आहे.’

‘कसा आला?’ राजांनी करड्या आवाजात विचारलं.

‘तटाखाली दोर सोडून त्याला घ्यावं लागलं. आपल्यासमोर हजर करा, असं तो म्हणतो.’

‘घेऊन या त्याला.’

संन्याशी आणला गेला. त्याला पाहताच राजांच्या मुखावर समाधान पसरलं. राजे त्र्यंबकजींना म्हणाले,

‘तुम्ही जा. विश्रांती घ्या.’

‘पण महाराज…’

राजे हसले. ते म्हणाले,

‘त्र्यंबकजी हा संन्याशी नव्हे. हा आपला महादेव. त्याला तुम्ही ओळखला नाही. तुम्ही निर्धास्तपणे जा.’

आश्चर्यचकित झालेले त्र्यंबकजी सन्याशाकडं पाहत निघून गेले. राजांनी आपली संदूक उघडून आपले कपडे महादेवच्या हातात दिले.

‘हे कपडे घाल. तोवर आम्ही आलो.’

राजे बाहेर गेले. देवडीवरची धुमी प्रज्वलित करायला सांगून परत आले. तोवर महादेवनं कपडे बदलले होते. महादेवसमवेत राजे देवडीवर आले. धुमी प्रज्वलित झाली होती. तिथं अंथरलेल्या घोंगड्यावर दोघे बसले. राजे म्हणाले,

‘बोल…’

‘मासाहेब आपल्या काळजीत आहेत. नेताजी हरल्यापासून त्यांच्या जिवाला चैन नाही.’

राजांनी निःश्वास सोडला. त्यांनी विचारलं,

‘आणि शास्ताखान?’

‘त्यानं पुण्यात तळ ठोकला आहे. ऐंशी हजारांची फौज घेऊन तो उतरला आहे.’

महादेव आणि राजे बोलत होते. दिवस केव्हा उजाडला, हेही त्यांना कळलं नाही.

 

सकाळी बाजी, फुलाजी सदरेवर आले. राजांना मुजरा करून बाजींनी विचारलं,

‘राजे, काल रात्री तटावरून महादेव आला, म्हणे…’

‘हो!’

‘पण एवढया वेढ्यातून तो आला कसा?’

‘ते त्यालाच विचारा.’ राजे हसून म्हणाले. राजांनी हाक मारली, ‘महादेव!’

‘जी!’ म्हणत महादेव बाहेर आला.

बाजी पुढं झाले. त्यांनी महादेवच्या खांद्यावर हात ठेवून विचारलं,

‘महादेव, काल रात्री खरंच तू वेढ्यातून आलास?’

‘मी काय पाखरू आहे उडून यायला?’

सारे हसले.

‘पण एवढा कडक वेढा! मुंगीलाही शिरकाव होणार नाही.’ फुलाजी म्हणाले.

‘मुंगीला काय…मनात आणलं, तर हत्तीबी ईल…’

‘हत्ती?’ बाजी उद्गारले.

‘हां हत्ती! मावळतीच्या बाजूला दऱ्याखोरी हाईत. दाट रानानं भरलेला तो मुलूख हाय. रेड्याची मुसंडी घेत दरीतनं ओढं पळत्यात. तिथं कोन मरायला जाणार? मेट्या हाईत डोंगरावरच्या टोकावर. ह्या उपऱ्यांस्नी त्या वाटा कशा समजणार?’

‘अरे, पण तटावरून यायची काय गरज होती? राजदिंडीचा दरवाजा नव्हता का?’ बाजींनी विचारलं.

महादेव शरमला. तो म्हणाला,

‘धुकं लई दाट. काय दिसंना झालं. वाट चुकली आणि सरळ तटाखाली आलो.’

‘छान केलंस!’ राजे म्हणाले, ‘तरी बरं; वाट चुकून कुठं सिद्दीच्या छावणीत दाखल झाला नाहीस.’

सारे परत हसले. सदरेवरचे सारे राजांच्या आज्ञेनं उठून आत गेले. बराच वेळ सर्वांच्यासह ते बोलत बसले होते.

बाहेर अखंड पावसाच्या धारा ओतत होत्या. सोसाट्याचा वारा गडावर घोंघावत होता.

 

 

*🚩 क्रमशः 🚩*