पावनखिंड 39

*⚔🌄पावनखिंड🌄⚔*

 

🔰 *भाग : ३९* 🔰

 

 

दुसरे दिवशी राजे सदर महालावर उभे होते. आपल्या संतप्त नजरेनं ते सिद्दी जौहरच्या हालचाली पाहत होते. टोपीकरांच्या दोन तोफा पुढं सरकवीत येत होत्या. मोर्चे बांधले जात होते आणि थोड्या वेळात टोपीकरांच्या तोफांनी धूर ओकला. सारा गड त्या तोफांच्या आवाजानं थरथरला. राजे सदर महालात उभे होते. तोफांचे गोळे अर्ध्या कड्यापर्यंतही पोहोचत नव्हते.

परकोट बुरूजावर बाजी शत्रूच्या निशाणबाजीचा अंदाज घेत उभे होते. शत्रू टप्प्यात येतो, असे वाटताच बाजींनी आज्ञा दिली,

‘तोफेचं तोंड वळवा!’

बुरूजावरची लांबझोक फिरंगी तोफ वळवली जात होती. काली तोफ वळवली गेली. बाजी गर्जले,

‘आता बघू कालीची करामत! आम्ही इशारा करताच तिला बत्ती द्या.’

बाजी बुरूज उतरले. दूर अंतरावर जाताच त्यांनी हातानं इशारा केला आणि कानांत बोटं घातली. काली तोफेला बत्ती दिली गेली. बत्ती देताच बत्तीदारानं जवळच्या टाक्यात उडी घेतली. टाक्यातलं पाणी उसळलं आणि बत्तीदार टाक्यातल्या पाण्यात डुबकी घेत असताच काली धडाडली. तिच्या पाठोपाठ गडावरच्या तोफा धडाडू लागल्या. साऱ्या गडावर माकडांचा आणि पाखरांचा चीत्कार उठला.

पागेतल्या घोड्यांच्या खिंकाळ्यांनी आवार भरून गेला.

तोफांच्या माऱ्यात येणारे गोळे पाहून टोपीकर आपल्या तोफा मागं नेत होते.

ती धावपळ राजे सदर महालाच्या सज्जावरून आनंदानं पाहत होते.

 

दिवस उलटले, तसे पूर्वेकडचे वारे बंद झाले. पश्चिमेच्या वाऱ्यांनी जोर धरला. काळ्या ढगांच्या राशी पश्चिमेकडून पूर्वेला सरकू लागल्या. येणाऱ्या पावसाच्या तयारीला गडकोट लागला. गडावरच्या घरट्यांना मावळतीला झडपा लावल्या जात होत्या. गार वारे गडावर आले. आकाशात ढगांची दाटी वाढू लागली.

राजे सकाळी सदर महालावर गेले. गच्चीवर उभे राहून ते सिद्दी जौहरची छावणी निरखीत असता उद्गारले,

‘बाजी! ते पहाss’

‘काय, महाराज?’ बाजींनी विचारलं.

‘सिद्दीचा शामियाना, डेरे कुठं आहेत?’

बाजींनी पाहिलं. तो राजांचं म्हणणं खरं होतं.

उन्हात तळपणारा तांबड्या अलवानाचा शामियाना कुठं दिसत नव्हता. सिद्दीचा हिरव्या रंगाचा डेरा तोही उतरला होता.

बाजी आनंदानं म्हणाले,

‘राजे! आपलं भाकीत खरं ठरलं. सिद्दी वेढा उठवतो आहे.’

‘एवढा सोपा शत्रू तो नाही. काही तरी डाव आहे.’

राजांचा तर्क खरा ठरला. सिद्दी जौहर पावसाळ्याला तोंड देण्यासाठी पावसाळी छपऱ्या उभारत होता. जिथं शामियाना होता, तिथं रानातली लाकडं तोडून भव्य छपरी उभारली होती. खानाच्या डेऱ्याचीही जागा अशाच मोठ्या छपरीनं व्यापली होती.

ते दृश्य पाहून राजे बाजींना म्हणाले,

‘बाजी! गनीम भारी पडला! सिद्दी आता हलणार नाही. तो आपली वाट बघत राहणार!’

‘कसली?’

‘शरणागतीची!’ राजांनी सांगितलं.

‘वाट बघ, म्हणावं!’ बाजी उसळले, ‘वेळ आलीच, तर मारू किंवा मरू.’

राजे हसले. ते म्हणाले,

‘नाही, बाजी, असला अतिरेकी विचार आपल्याला परवडणार नाही. ते फक्त रजपूत करू जाणे! मोठं संकट आलं की, वैतागानं प्राणाची बाजी लावायची आणि रणांगणी समर्पण करायचं. मागं बायका-मुलांनी जोहार करायचा. नावलौकिक फक्त मरणाचा. यश मात्र नेहमीच शत्रूच्या हाती!’

बाजींनी विचारलं,

‘क्षमा असावी, राजे! म्हणजे नेहमी जीव राखूनच राहायचं?’

‘असं कोण म्हणतं! प्रसंग आला, तर कोणी जीव राखून राहत नाही. फक्त एकच. तो प्रसंग जीव-मोलाचा आसायला हवा. आता पावसाळा सुरू होईल. हा पाऊस सिद्दी जौहरचा दिमाख उतरवील आणि त्याच वेळी आपले नेताजी, दोराजी मदतीला येतील. तेव्हा सिद्दी टिकाव धरेल, असं वाटत नाही. एव्हाना नेताजी यायला हवे होते.’

सर्वांचं लक्ष नेताजी केव्हा येतात, इकडं लागलं होतं. गडावर पाऊस उभा कोसळत होता. पाऊस थांबला की, सारा गड धुक्यानं व्यापला जाई.

असंच धुकं गडावर उतरलं होतं. राजे सज्जा कोठीतून तो धुक्याचा पडदा पाहत होते. मागं बाजी उभे होते. अचानक धुक्याचा पडदा विरळ होऊ लागला. समाधि-अवस्थेत मोहपटल दूर व्हावं आणि स्वर्गीय अलौकिक दृश्य दिसू लागावं, तसं साऱ्या सृष्टीचं रूप साकार झालं. दरीतून आलेला आणि हिरव्याकंच माळवदावरून जाणारा तो नदीचा प्रवाह एखाद्या हिरवं वस्त्र परिधान केलेल्या नवरीच्या कमरपट्ट्यासारखा भासत होता. डोंगरमाथ्यावरून धुक्याचे ढग जात होते.

ते दृश्य पाहून राजे म्हणाले,

‘बाजी! शिवशंकराचं रूप यातूनच साकार झालं नसेल ना? हा निळाभोर डोंगर, त्याच्या मस्तकावरून खाली उतरणारे हे प्रपात. शिवविभूती रेखाटण्यासाठीच त्याच्या माथ्यावर रेंगाळणारे हे धुक्याचे विरळ ढग…’

राजे ते दृश्य पाहत असतानाच परत दाट धुकं अवतरलं, क्षणात दिसणारं ते दृश्य त्या पडद्याआड लुप्त झालं. राजांनी निःश्वास सोडला. ते माघारी वळले.

घोड्यांच्या टापांचा आवाज घुमला. राजे सज्जाकडं धावले. दाट धुक्यातून टापांचा आवाज येत होता. गडाखाली धावपळ उडाल्याची निशाणी होती. राजे म्हणाले,

‘बाजी! आवाज ऐकलात? आमचे नेताजी येत असावेत!’

त्याच वेळी राजांच्या हेरांनी राजांना सोडवण्यासाठी नेताजी येत असल्याची बातमी आणली.

राजे म्हणाले,

‘बाजी, आता वेळ करून चालणार नाही. नेताजी वेढा फोडतील, तेव्हा त्यांच्या संगती आपण सर्वांनी बाहेर पडायला हवं.’

राजे वाड्यात आले. सामानाची बांधाबांध झाली. वाड्यासमोर राजांच घोडदळ उभं राहिलं. राजांनी त्र्यंबक भास्करांना सांगितलं,

‘जर नेताजींनी वेढा फोडला, तर आम्ही बाहेर पडू. तुम्ही गड लढवा. आम्ही बाहेर जाताच सारी कुमक गोळा करून सिद्दीवर हल्ला करू. चिंता करू नका.’

राजे सर्व तयारीनिशी सज्ज होऊन बातमीची वाट पाहत होते. सायंकाळ होत असता गडावर बातमी आली—

‘सिद्दीनं नेताजीचा पराभव केला होता, त्याला माघार घ्यावी लागली होती.’

त्या बातमीनं राजे निराश झाले नाहीत. ते म्हणाले,

‘बाजी! सिद्दी केवढा जागरूक आहे, याची ही खूण आहे. या वेढ्यातून सुटण्याचा आपणच विचार करायला हवा!’

राजे शांतपणे बोलत होते. पण बाजींचं मन चिंतेनं ग्रासलं होतं.

 

 

*🚩 क्रमशः 🚩*