*⚔🌄पावनखिंड🌄⚔*
*▪भाग : ३८▪*
सिद्दी जौहर हा निष्णात सेनापती. जेव्हा त्यानं पन्हाळगड पाहिला, तेव्हाच त्याला गडाच्या मजबुतीची कल्पना आली होती. त्यानं राजापूरच्या इंग्रजांकडं मदत मागण्यासाठी आपली माणसं पाठविली होती. पन्हाळगडावरून झालेल्या तोफांच्या माऱ्यानं तो अधिक संतापला होता. येणाऱ्या पावसाळ्याची त्याला भीती होती. मुंगीलाही वाव मिळू नये, असा वेढा त्यानं घातला होता.
सायंकाळच्या वेळी वाड्यासमोर राजांचा विश्वास घोडा खोगीर चढवून तयार होता. त्याखेरीज पाच-सहा घोडी खोगीरांनी सज्ज होती.
राजे सदरेवर आले. साऱ्यांनी मुजरे केले.
‘बाजी, त्र्यंबकजी! चला.’
राजे स्वार झाले. राजांचं पथक गडकोटाची पाहणी करीत गडावर फिरत होतं. राजदिंडी, पुसाटीचा बुरूज, तीन दरवाजा, चार दरवाजा एवढी चक्कर घेऊन राजे वाड्यावरून सदर महालात आले.
दोन प्रहरी राजांना जागं करण्यात आलं.
‘काय झालं?’ राजांनी विचारलं.
‘सदरेवर किल्लेदार आल्यात जी!’ सेवकानं सांगितलं.
राजे सदरेवर आले, तेव्हा चिंतातूर त्र्यंबकजी आणि बाजी उभे होते. त्यांच्या मागं यशवंत जगदाळे उभा होता.
‘काय झालं, त्र्यंबकजी!’ राजांनी विचारलं.
‘राजे! टोपीकरांनी घात केला. ते सिद्दीला मिळाले.’
‘खोटं!’ राजे म्हणाले.
‘नाही, राजे! अनुस्कुरा वाटेनं टोपीकर दोन लांब पल्ल्याच्या तोफा घेऊन सिद्दीच्या तळावर हजर झाले आहेत.’
राजांचा संताप उफाळला. कधीही संयम न सोडणारे राजे म्हणाले,
‘ही हिंमत! दारोजीनं राजापूरवर स्वारी केली. या गोऱ्या माकडांना पकडलं. भीक मागत आमच्या दाराशी आले. आदिलशाहीला मदत करणार नाही, असा तह करून आपला जीव वाचवून गेले. बेइमान! करार मोडून आज आमच्यावर चालून येतात?’
राजे क्षणभर थांबले. दीर्घ श्वास त्यांनी घेतला. आणि खिन्नपणे ते हसले—
‘बाजी, ही टोपीकरांची जात फार हुशार. सातासमुद्रांवरून आलेत ना! बोलून चालून व्यापारी. ते हा सौदा सोडतील कसा? शास्ताखान चालून येतो, हे त्यांना माहीत असणार. सिद्दीच्या वेढ्यात आम्ही पुरे अडकलो आहो, हे ते जाणतात. या दुहेरी संकटातून आम्ही वाचणार नाही, हा त्यांचा अंदाज! ठीक आहे. जगदंबेच्या कृपेनं आम्ही या संकटातून तरलो, तर त्या टोपीकरांना जरूर धडा शिकवू.’
‘त्यांच्या जवळ दूरवरचं पाहण्याचं यंत्र आहे, म्हणे!’ त्र्यंबकजी म्हणाले.
‘असेल! त्यांना दूरवरचं दिसतं. आम्हांला दिसत नाही, हे आमचं दुर्दैव आहे. बाजी, आम्हांला भीती ना आदिलशाहीची, ना दिल्ली तख्ताची. खरी भीती वाटते, ती या टोपीकरांची. सातासमुद्रांवरून आलेले हे व्यापारी नाहीत. त्यांच्या लांब पल्ल्याच्या तोफा, बंदुका त्यांसह ते येतात, ते का व्यापारासाठी! एक ना एक दिवस, हेच टोपीवाले आसेतुहिमालय कबज्यात घेऊन मोकळे नाही झाले, तर नशीब!’
राजांनी थोडी उसंत घेतली. ते बाजी, त्र्यंबकजींकडं वळून म्हणाले,
‘कठीण वेळ आहे खरं! आपला तोफखाना सज्ज ठेवा. पण ही बातमी आणली कुणी?’
बाजींनी सांगितलं,
‘यशवंत जगदाळे घेऊन आला.’
राजांनी विचारलं,
‘यशवंता गडाखाली उतरला होता?’
‘जी!’
राजांची नजर यशवंतावर खिळली. कठोर शब्द उमटले,
‘यशवंत! हे फिरतीचे दिवस नाहीत. शत्रूगोटाभोवती फिरणं हे धोक्याचं असतं, हे तुम्हांला कळायला हवं होतं. बाजी, आमच्या आज्ञेखेरीज कोणीही गडाखाली उतरत नाही, याची दखल घ्या. आम्हांला थोडा एकांत हवा. आम्ही जातो.’
राजे गेले. आणि पडल्या चेहऱ्याच्या यशवंताकडं पाहत बाजींनी विचारलं,
‘मिळाली शाबासकी? पण, यशवंता, तू गडाखाली गेलाच कशाला?’
यशवंतानं आवंढा गिळला.’
‘सांग ना!’ बाजी म्हणाले.
‘मैतरांनी पैज लावली.’
‘कसली पैज?’
‘खालच्या छावनीवर फेरफटका करू ईल, त्याला…’
यशवंत अडखळलेला पहाताच बाजींनी विचारलं,
‘कसली पैज?’
‘कोंबड्याची! जिंकल, तर त्यांनी कोंबडं द्याच. न्हायतर मी…’
‘छान!’ बाजी हसले. ‘इकडे राजांनी मेजवान्या बंद केल्या आणि तिकडं कोंबड्यांची पैज लावता! आणि एवढा जीव स्वस्त केव्हापासून झाला?’
सारे हसले.
बाजी यशवंतासह सदरेबाहेर पडले.
रात्री बाजी, फुलाजी आपल्या निवासात बोलत बसले होते. फुलाजींनी बाजींची चिंता ओळखली होती. आपल्या चिलमीचा बार फुंकत फुलाजी म्हणाले,
‘बाजी, गावावर पाडव्याचा सण जोरात साजरा झाला. पण तू नव्हतास, त्याचं दोन पोरींना फार वाईट वाटलं.’
‘देवीची पालखी गेली ना?’ बाजींनी विचारलं.
‘त्यात काहीही कमी पडलं नाही.’
‘बरं झालं! पण, दादा, आज राजे उदास होते, हे ध्यानी आलं?’
‘होय! राजे कधी नाही ते घोरात दिसले. ते गोरे आले नसते, तर…’
‘दादा, माझ्या मनात एक विचार आहे. उद्या आपली बांदल फौज घेऊन गडाखाली उतरायचं.’
‘राजांना न विचारता?’
‘हां! आणि त्या टोपीकरांच्या दोन्ही तोफा निकामी करून यायचं.’
‘सिद्दीचा वेढा एवढा सोपा वाटला?’ फुलाजींनी चिलमीचा धूर सोडत विचारलं.
‘लई तर काय होईल? मरू एवढंच ना?’ बाजी म्हणाले.
‘तू मरशील. मी मरेन. पण राजे एकटे राहतील, याचा विचार केलास?’
‘म्हणजे?’ बाजींनी विचारलं.
‘त्यांना कोण वाचवणार? नाही, बाजी, हा राजा जपला नाही, तर काही राहणार नाही. या राजावरची नजर हलू न देता त्याला जपायला हवं.’
बाजींच्या डोळ्यांत पाणी तरळलं. त्यांना हुंदका फुटला. डोळे टिपून ते म्हणाले,
‘कोणत्या जन्माचं देणं देतो आहे, कुणास ठाऊक. या राजाचं प्रत्येक पाऊल पाहत असता वाटतं की, याच्यावरून जीव ओवाळून टाकावा! त्याच्या रूपात हरवून जावं! दादा, हा माणूस जगला नाही, तर काही होणार नाही. आमचा मुलूख, आमची माणसं अब्रूनं जगणार नाहीत.’
बाजींना काही सुचत नव्हतं. ते उठले आणि घराबाहेर पडले.
सर्वत्र काळोख पसरला होता. तटावरून गस्तकऱ्यांच्या दिवट्या फिरत होत्या. आवाज उठत होता,
‘हुश्श्यारsss’
*🚩 क्रमशः 🚩*