पावनखिंड 33

*⚔🌄पावनखिंड🌄⚔*

 

🔰 *भाग : ३३* 🔰

 

 

पन्हाळगडाच्या पूर्व कड्यावर उभा असलेल्या सदर महालाच्या दुसऱ्या मजल्यावरच्या गच्चीवर राजे उभे होते. गच्चीच्या कमानीतून दिसणारा मुलूख ते न्याहाळत होते. हवेतला गारवा त्यांना जाणवत नव्हता. उजव्या हाताला हिरव्या गर्द रानानं वेढलेला पावनगड दिसत होता. गडाच्या पायथ्याशी विखुरलेली गावं दिसत होती. आणि त्यामागं दूरवर पसरलेला मुलूख थेट क्षितिजापर्यंत पोहोचला होता.

धरित्रीचं ते विशाल, प्रसन्न रूप राजे डोळ्यांत साठवत असता पावलांचा आवाज झाला. राजांनी मागं वळून पाहिलं. गंगाधरपंत आले होते.

‘या, पंत!’

‘राजे! आपल्या आज्ञेप्रमाणे सर्व खाली आले आहेत.’

‘ठीक! गंगाधरपंत, आपण खाली जा. आणि बाजी, त्र्यंबक भास्कर, सूर्याजी यांना वर घेऊन या. येताना कुणाला वरती सोडू नका. अशी सक्त ताकीद द्या.’

मान तुकवून गंगाधरपंत गेले. राजांनी एक दीर्घ निःश्वास सोडला. आणि परत ते पूर्वेचा मुलूख न्याहाळू लागले.

राजांच्या आज्ञेनुसार गंगाधरपंत बाजी, त्र्यंबक भास्कर, सूर्याजी यांना सज्जात घेऊन आले. राजांनी बाजींना विचारलं,

‘बाजी! फुलाजी कुठं दिसत नाहीत?’

‘पाडव्याला घरच्या दैवताची पूजा-अर्चा असते; तेव्हा ते गावी गेले आहेत. दोन दिवसांत गडावर दाखल होतील.’

राजे बैठकीवर बसले. क्षणात आजूबाजूच्या माणसांचं अस्तित्व विसरून ते स्वतःच्याच विचारात हरवले.

राजांचं ते रूप सर्वांनाच नवं होतं. सारे राजांच्याकडं आणि एकमेकांकडं पाहत होते.

बाजींनी धीर करून विचारलं,

‘राजे! मिरजेचा किल्ला ताब्यात आला?’

‘अं!’ म्हणत राजांनी मान उंचावली, ‘काय म्हणालात?’

‘मिरजेचा किल्ला घेतला?’

‘नाही. वेढा उठवून यावं लागलं.’

‘एवढा किल्ला अवघड आहे?’

‘मुळीच नाही. किल्ला मुळीच अवघड नाही. पण वेळ अवघड आहे.’

‘आम्ही समजलो नाही!’ त्र्यंबक भास्कर म्हणाले.

‘काल सणाचा दिवस, म्हणून आम्ही काही बोललो नाही. आम्ही रुस्तुमेजमाचा पराभव केला. तेव्हाच आम्हांला शंका आली होती! माणसाचं यश जसं वाढत जातं, तसे त्याचे शत्रूही वाढत जातात. तो अधिक एकाकी पडू लागतो. विजापूरहून आमच्या पारिपत्यासाठी कर्नुलचा सरदार सिद्दी जौहर अदिलशाहीच्या सर्वशक्तीनिशी आमच्यावर चालून येतो आहे; ही बातमी आम्हांला मिरजेला मिळाली. तेव्हा वेढा उठवून आम्हांला यावं लागलं.’

‘गडाची चिंता नसावी, राजे!’ किल्लेदार त्र्यंबक भास्कर म्हणाले.

राजे खिन्नपणे हसले,

‘त्र्यंबकजी! संकट कधी एकटं येत नसतं. आज या क्षणी दिल्लीची फौज आमच्यावर चालून येते आहे. खुद्द औरंगजेब बादशहाचा मामा शाईस्तेखान अफाट फौज घेऊन येत आहे. औरंगाबाद ओलांडून तो अहमदनगरला येऊन पोहोचला आहे.’

ती बातमी ऐकून कुणाला, काय बोलावं, सुचत नव्हतं.

‘आपली फौज?’ बाजींनी विचारलं.

‘बरीचशी कर्नाटकच्या मोहिमेवर गुंतली आहे. आमचे सेनापतीही तिकडंच आहेत.’

‘आपली छावणी कोल्हापूरला आहे?’

‘नाही. आम्ही छावणी उठवूनच इकडं आलो. आपलं अश्वदळ आम्ही राजगडाकडं पाठविलं आहे. पायदळाला गडावर यायला सांगितलं आहे.’

राजांच्या उत्तरानं बाजी आणखीन संभ्रमात पडले होते.

एवढे प्रबळ शत्रू अंगावर चालून येत असता राजे आपलं घोडदळ पाठवून देतात!

राजे विस्तवाशी डाव तर खेळत नाहीत ना?

राजांच्या हातून आंधळ्या कोशिंबीरीचा डाव कधी खेळला जात नसतो.

यात राजांनी निश्चित काहीतरी बेत आखला आहे.

राजांनी गंगाधरपंतांच्याकडं नजर वळवली. त्यांनी विचारलं,

‘पंत! तुमचा काय सल्ला आहे?’

पंत अकारण खाकरले,

‘नाही, म्हणजे… प्रसंग बाका दिसतो. तेव्हा शत्रू येण्याआधी आपल्या मुलखातील प्रतापगड, राजगड किंवा पुरंधरचा आश्रय घ्यावा.’

‘वाटलंच!’ राजे म्हणाले, ‘पंत, आम्ही तसं केलं, तर काय होईल, माहीत आहे? आमच्या पाठोपाठ सिद्दी जौहर बारा मावळांत घुसेल. नुकतीच कुठं जीव धरून राहिलेली आमची माणसं या फौजेच्याखाली भरडली जातील. आणि दुर्दैवानं शाईस्तेखान आणि जौहर यांची हातमिळवणी झाली, तर त्या अनर्थाला सीमा राहणार नाहीत. हा स्वराज्याचा खटाटोप आम्ही आमच्यासाठी केलेला नाही. प्रजारक्षण हे आमचं आद्य कर्तव्य आहे.’

बाजी हसले.

त्या हसण्याचं साऱ्यांना आश्चर्य वाटलं.

राजांनी विचारलं,

‘काय, बाजी!’

‘राजे! आपला पन्हाळगड चारी बाजूंनी मजबूत आहे. शत्रू केवढाही मोठा असो, त्याला गडावर शिरकाव करता येणार नाही.’

‘व्वा, बाजी! आमच्या मनातला होरा ओळखलात. आता तोच निर्णय घेतला आहे. तो शाईस्तेखान उत्तरेतून उतरतो आहे. त्याची चाल हत्तीची असली, तरी तो हत्ती आहे, हे विसरता येत नाही. चार नळे पायांशी फेकले, तरी तो बुजून माघारी वळेल. पण जाता-जाता पाच-पन्नास माणसांना पायदळी तुडवेल. आदिलशाही घोड्याच्या पावलांनी नाचत येईल, पण पराजय होतो, असं दिसलं, तर तेच घोडे त्यांना आपल्या निवासाकडं सुखरूपपणे नेता येतील.’

‘आणि आमी? सूर्याजीनं विचारलं.’

राजे हसले,

‘आम्ही! आता उरली एकच जात! दिसायला बेडौल. चाल वाकडी.’

‘उंट!’ सूर्याजी म्हणाला.

‘हां, उंट! पण कुणाच्या हे ध्यानी येत नाही, की हवं तेवढं ओझं तोलून, उपाशी-तापाशी धावणारा तेवढा एकच प्राणी आहे. बुद्धीबळातली उंटाची तिरकी चाल प्रत्यक्षात तेवढी खरी नाही. उंट वेडावाकडा चालताना दिसतो. पण त्याची चाल सरळ रेषेतच जाते.’ राजांनी निश्चयपूर्वक सांगितलं, ‘बाजी! आपल्याला आता उसंत नाही. आजच्या आज स्वार रवाना करा. जेधे, नेताजी असतील तिथं त्यांना गाठून आपल्या फौजेसह पन्हाळ्याकडं यायला सांगा. गंगाधरपंत! तसे खलिते बाजींच्या स्वाधीन करा.’

राजांची दृष्टी त्र्यंबक भास्करांच्याकडं वळली,

‘त्र्यंबकजी! गडाचे अंबरखाने, गंजीखाना भरून घ्या. गडाची तळी उन्हाळ्यात कोरडी पडत नाहीत ना?’

‘त्याची चिंता नसावी! एवढा भाग्यवान किल्ला शोधून सापडायचा नाही. पाण्याचा कितीही उपसा झाला, तरी पाणी कधी कमी होत नाही. आजवर झालेलं नाही.’ त्र्यंबक भास्कर म्हणाले.

‘नुसता गड राखून चालत नाही.’ राजे सांगत होते, ‘आजूबाजूच्या मुलखावर नजर असायला हवी. उद्या आमचे बहिर्जी, आबाजी गडावर येतील. साऱ्या मुलखात आपले नजरबाज पेरले जातील. बाजी, तुम्ही तुमची बांदल कुमक गडावर गोळा करा. सूर्याजी, तुम्ही दारू-कोठारावर नजर ठेवा. उद्यापासून गडाचे दरवाजे बंद करा. कोण गडावर येतो; कोण जातो, यावर नजर ठेवा.

साऱ्यांनी मुजरे केले. ते गेले.

बाजी माघारी राहिले होते.

‘काय, बाजी?’ राजांनी विचारलं.

‘काही नाही!’ बाजी म्हणाले.

‘चिंता करू नका. ती भवानी आपल्याला जरूर वाट दाखवील. काळजी वाटते फक्त मासाहेबांची! त्या बिचाऱ्या काळजीत असतील. त्यांना ही बातमी समजली असेल! तुम्ही जा.’

बाजी मुजरा करून निघून गेले.

एकटे राजे सज्जाकोठीत उरले होते.

 

 

*🚩 क्रमशः 🚩*