*⚔🌄पावनखिंड🌄⚔*
🔰 *भाग-१* 🔰
सूर्य उगवला, तरी हिरडस मावळातल्या सिंध गावावर धुकं रेंगाळत होतं. सिंध ! पाच-पन्नास घरट्यांचं गाव. गावाच्या मध्यभागी काळ्याशर दगडांनी चिरेबंद झालेला तीन चौकी देशपांडे-वाडा उभा होता. वाड्याच्या भव्य कमानीत भालाईत पहारेकरी उभे होते. पहिल्या चौकाच्या उजव्या बाजूला घोड्यांची पागा होती. सदरेवर पाच-सहा मंडळी बाजींची वाट पाहत बसली होती. सदरेवरच्या झोपाळ्यावर बाजींची बैठक मांडली होती. पितळी, चकचकीत पानाचा डबा झोपाळ्यावर नजरेत भरत होता. झोपाळ्यालगत जमिनीवर एक मोठी पितळी पिंकदाणी ठेवली होती. वाड्यातल्या तिसऱ्या सोप्यातील देवघरातून बाजी बाहेर आले. बाजींनी जांभळा मुकटा नेसला होता. लिंब कांतीचे, धिप्पाड देहाचे, पिळदार शरीराचे बाजी होते. कपाळी गंध रेखाटलं होतं. मस्तकी काळाभोर संजाब होता. त्यातून उतरलेली शेंडी मानेवर रुळत होती. ओठावरच्या भरदार गलमिश्यांनी आणि जाड भुवयांनी त्यांच्या भव्यतेत अधिक भर घातली होती.
बाजी देवघराबाहेर येताच त्यांच्या पत्नी सोनाबाई म्हणाल्या,
‘न्याहरीची तयारी झालेय्.’
‘हो ! आम्ही पोशाख करून आलोच.’
बाजी आपल्या शयनगृहात गेले, तेव्हा तिथं त्यांच्या द्वितीय पत्नी गौतमाई आदबीनं उभ्या होत्या. पलंगावर बाजींचा पोशाख काढून ठेवला होता.
बाजींनी त्या पोशाखाकडं नजर टाकली व ते हसून म्हणाले,
‘हा तर सणासुदीचा पोशाख काढलात !’
गौतमाई म्हणाल्या,
‘आज सणाचा दिवस. तेव्हा….’
‘बरोबर !’ बाजी म्हणाले, ‘तुम्ही म्हणाल, ते खरं. आमची हुकमत बाहेर. इथं आम्ही तुमच्याच हुकुमाचे ताबेदार ! खरं ना ?’
गौतमाई लाजल्या. त्या म्हणाल्या,
‘थोरल्या वाट बघत असतील. लवकर पोशाख करून न्याहरीला चलावं.’
‘जशी आज्ञा !’
बाजी पोशाख करून, न्याहरी आटोपून, जेव्हा सदरेवर आले, तेव्हा सदरेवरच्या साऱ्यांनी उठून बाजींना मुजरे केले. त्या मुजऱ्यांचा स्वीकार करून बाजी झोपाळ्यावर बसले. पानाचा डबा उघडला. पान जुळवत असता त्यांचं लक्ष उभा असलेल्या तात्याबा म्हसकराकडं गेलं.
तात्याबा एक वयोवृद्ध शेतकरी. ऐंशीच्या घरात गेला, तरी म्हातारा अजून ताठ होता. गुडघ्यापर्यंत धोतर, अंगात घोंगड्याची खोळ आणि डोईला मुंडासं बांधलेला तात्याबा बाजींच्याकडं पाहत होता.
‘तात्याबा, बस ! येरवाळीच आलास ?’
‘जानार कुठं ?’ तात्याबा म्हणाला, ‘कोंबडं आरवायच्या आदी जाग येतीया ! शेती-भाती पोरं बघत्यात. सांगाय गेलं, तर कुत्र्यावानी भुकत्यात. तवा जायचं कुठं ? घरचा वनवा नको, म्हणून सदरंत येऊन पडायचं !’
‘पड की ! तुला कोण नको म्हणणार ?’ बाजींनी हसून विचारलं, ‘आवंदा पीक बरं हाय नव्हं ?’
‘हाय, पर गावंल, तवा !’ तात्याबा म्हणाला.
‘न गावायला काय झालं ?’ बाजींनी विचारलं.
‘का ऽ य झालं ? रानाच्या साऱ्या डुकरांची चंगळ चाललीया, बघा. दिवस म्हनत न्हाईत, रात्र म्हनत न्हाईत, कडाडा धाटं मोडत्यात.’
‘रखवाली ठेवावी.’ बाजींनी सांगितलं.
‘चार चौकांवर चार माळं केलं, तर मधनं घुसत्यात. लई बेरकी जात ती.’
‘असं म्हणतोस !’ बाजींनी क्षणभर विचार केला. ‘काळजी करू नकोस ! उद्यापासनं आमचे भालाईत स्वार शिवारात फिरतील. झालं ?’
तात्याबा उदासपणे हसला.
बाजींनी विचारलं,
‘का हसलास ?’
‘हसू नको, तर काय रडू ? धनी, पीक सजलं, तरी गरिबांच्या पोटात थोडंच पडनार ?’
‘का ? का नाही पडणार ?’
‘तुमी इचारतासा ? तुमी परधान ! तुमचं धनी बांदल राजं. मळण्या सुरू झाल्या की, तुमचं शिपाई येनार ! असंल, नसंल, ते धुऊन घेऊन जानार. गरिबांनी जायचं कुठं ?’
‘तात्याबा !’ बाजी उद्गारले, ‘गेल्या वर्षी दुष्काळ होता. गडाची कोठारं भरली नाहीत, तर…’
‘व्हय, धनी ! राजा ऱ्हायला, तर परजा ऱ्हानार ! म्या न्हाई म्हनत न्हाई. चार वर्सांमागं आपल्या गावात पन्नास घरटी व्हती. व्हय का न्हाई ? आज दोन ईसा धाबी ऱ्हायली न्हाईत. कुठं गेली ती मानसं ? चौकशी केलीसा ?’
बाजींना ठसका लागला.
कुणीतरी पिंकदाणी बाजींच्या हाती दिली.
डोळ्यांत आलेलं पाणी पुसून बाजी करड्या आवाजात म्हणाले,
‘तात्याबा ! आज कुरापत काढायची ठरवलीस, वाटतं ?’
‘न्हाई, धनी ! इट्टलाशपथ न्हाई. रातसारी डोळ्यात डोळा लागला न्हाई.’
‘काय झालं ?’
‘काल परशाचा रानबा गाव सोडून गेला.’
‘गाव सोडून गेला ?’
‘व्हय, धनी ! एकानंबी त्येला आडवलं न्हाई.’
‘का गेला ? आम्हांला माहीत नाही ! आम्ही गडावर होतो.’
‘गडावरून कसं दिसनार, धनी !’ तात्याबा म्हणाला, ‘लई दूरची कानी हाय.’
‘सांग.’
‘सांगंन कवा तरी !’ म्हणत तात्याबा उठला.
बाजी म्हणाले,
‘उठू नको. सांग !’
‘सांगतो ! गेल्या वर्साला रानबाची गाय व्याली. दूध बक्कळ व्हतं. कुनीतरी ही गोष्ट राजाच्या कानांवर घातली. त्यांच्या नातवाला गाईच दूध पायजे व्हतं, म्हनं. गाय त्यांनी नेली.’
‘पण त्या गाईची किंमत मी दिली आहे. फुकट नाही घेतली.’
तात्याबा खिन्नपणे हसला.
‘धनी ! म्यानात तलवार असतीया, नव्हं ? जवा ती बाहीर पडतीया, तवा ती काय करती, हे कधी म्यानाला ठाऊक असतंय् ?’
‘काय म्हनायचंय् तुला ?’ बाजींनी विचारलं.
‘तुमी गाईची किंमत भरलीसा, ते खरं हाय ! पन राजाला मागितलेल्या गाईची किंमत दिली, याचा राग आला. आनी रानबाची तरणीताठी लेक एक दिवसरानात लाकडं आनाय् गेली आन् परत आली न्हाई.’
‘वाघरानं तिला मोडली, हा काय राजांचा दोष ?’
‘आजपातूर वाघरांनी किती जनावरं मोडली ? धनी, ते वाघरू निराळं व्हतं ! लांडग्या-कोल्ह्यांनी फाडली तिला. म्या बघितली पोरीला. रानबा गावात राहील कसा ?’
‘आता राणबाच्या घरात कोण राहतं ?’ बाजींनी विचारलं.
तात्याबा हसला.
‘मला इचारतासा ? ते तुमच्या कारभाऱ्याला इचारा ! जाऊ दे, धनी ! झालं गेलं, हून गेलं. इळा-भोपळा तुमच्या हातात. करशीला, ते खरं !’
तात्याबा आपल्या बुडाखालचं घोंगडं झटकून उठला. बाजींना मुजरा करून तो सदरेवरून उतरला. पण बाजींना त्याला परतवण्याचं बळ राहिलं नव्हतं. त्यांची नजर त्यांचे कारभारी गोविंदपंतांच्याकडं वळली.
गोविंदपंत साठीच्या घरातले. बाजींचे दूरचे नातेवाईक. बाजींच्या नजरेनं गोविंदपंत चपापले. ते गडबडीनं म्हणाले,
‘म्हातारा भारीच तऱ्हेवाईक. कुठं काय बोलावं, याचं भानच नाही.’
‘पंत, राणबाची कथा ऐकली, ती खरी ?’
‘असं लोक बोलतात !’
‘हं ! आता राणबाचं घर कुणाच्या ताब्यात आहे ?’
गोविंदपंत बाजींची नजर चुकवत, हात उडवत उद्गारले,
‘नाही. म्हणजे काय झालं… ते घर… राणबा म्हणाला…’
‘कळलं !’ बाजी म्हणाले, ‘एकूण ते घर तुम्ही घेतलंत, तर ! ठीक आहे. तुम्ही व्यवहार केला असेल. मी नाही म्हणत नाही. पण या क्षणापासून तुम्ही आमचे कारभारी नाही. तुम्ही आमचे आप्त. परत असली कागाळी आमच्या कानांवर येऊ देऊ नका. नतीजा बरा होणार नाही. कळलं ? चला !’
गोविंदपंतांचा टाळा वासला गेला होता. पण तिकडं बाजींचं लक्ष नव्हतं. तात्याबाच्या बोलण्यानं त्यांचं मन उद्विग्न झालं होतं. झोपाळ्याचे झोके वाढले होते. सदरेवरच्या कुणाला काही बोलण्याचं धैर्य नव्हतं. संजाबावरून हात फिरवीत आपल्याच विचारात बाजी मग्न झाले होते.
🚩क्रमशः🚩