पेशवाईतील स्त्रिया भाग १५

पेशवाईतील स्त्रिया …. भाग १५

 

सगुणाबाई

 

पेशवाईतील बहुतेक स्त्रियांना काही काळ का होईना सुवासिनीच्या सौभाग्याचा लाभ मिळाला , पण एक अशी स्त्री होऊन गेली जीच्या भाळी आले होते बालवैधव्य !!!

 

थोरले बाजीराव आणि काशीबाईंना चार अपत्ये झाली , पैकी एकाचा म्हणजे रामचंद्रांचा बाल मृत्यु झाला …. बाकी तीन म्हणजे नानासाहेब , रघुनाथ आणि जनार्दन , यातील दोघांची म्हणजे नानासाहेब आणि रघुनाथरावांची इतिहासानं आपल्या परीने नोंद घेतली … तिसरे बंधु म्हणजे जनार्दन तरुणपणी देवाघरी गेले.

त्याच्याच पत्नी म्हणजे सगुणाबाई … ह्या होत्या पेशवाईतील बालविधवा !!

 

जनार्दनराव तर दुर्दैवी ठरलेच पण त्यांच्या पत्नी सगुणाबाई त्याहुन जास्त दुर्दैवी ठरल्या … कारण जाणारा तर जातो आणि मग मागे राहिलेल्याला भोगावे लागते.

जनार्दनरावांचा जन्म १७३५ चा , वयाच्या पाचव्या वर्षी त्यांची मुंज वडीलबंधू नानासाहेबांच्या मांडीवर पुण्यात झाली , त्या वेळेस वडील म्हणजे थोरले बाजीराव रावेरखेडीला मुक्कामाला होते , मुंजी नंतर लगेचच वडील अत्यवस्थ असल्याचे कळल्याने मातोश्री काशीबाई जनार्दनरावांना घेऊन रावेरखेडीला गेल्या , गेल्यानंतर काही दिवसातच श्रीमंतांचे दुर्दैवाने निधन झाले …जनार्दनरावानी वडलांवर अंत्यसंस्कार केले आणि मातोश्री काशीबाईंना घेऊन पुण्यात आले.

 

त्या नंतर काही वर्षांनी जनार्दनरावांचा विवाह २० एप्रिल १७४४ ला सातारचे सावकार रामाजी अनंत भिडे यांची कन्या सगुणाबाईशी झाला , सगुणाबाईंचा जन्म १७३९ चा म्हणजे लग्नाच्या वेळेस त्यांचे वय होते पाच आणि जनार्दनरावाचे नऊ वर्षे .हे लग्न शनिवारवाड्यात पेशव्यांना शोभेल अशा थाटात झाले.

 

सुंदर , गोर्यापान आणि मुख्य सुशिक्षित सगुणाबाई पेशवे कुटुंबात आल्या तेंव्हा एकाहून एक मातब्बर स्त्रिया वाड्यात होत्या … आजेसासुबाई राधाबाई , सासुबाई काशीबाई , तीन जावा म्हणजे थोरल्या गोपिकाबाई , सदाशिवभाऊ पत्नी उमाबाई , रघुनाथराव पत्नी जानकीबाई अशा एकाहून एक दिग्गज स्त्रिया बरोबर स्वतःचे अस्तित्व टिकवुन त्यांना राहायचं होतं .

 

दिवस जात होते , या काळात जनार्दनराव अनेक मोहिमांत भाग घेत होते …सगळं सुरळीत चालु असताना अघटित घडवणारी नियती असते ….१७४९ साली सदाशिवभाऊ बरोबर कर्नाटक मोहिमेवरून येत असताना सातार मुक्कामी टायफॉईडचं निमित्त होऊन जनार्दनरावाचे निधन झालं … वय होतं अवघ चौदा वर्षाचे …. सगुणाबाई होत्या अवघ्या दहा वर्षांच्या. पोर अजुन वयातही आली नव्हती , नक्की काय झालंय हेही कळण्या पुर्वीच विधात्याने सौभाग्यलंकार उतरवले .. आणि लाल आळवण अंगावर चढवले …

 

बालविधवा !!! शास्त्रा प्रमाणे वय लहान असल्यामुळे केशवपन झाले नाही … इथुन पुढे जवळपास अजुन ३५ वर्षे त्यांना वैधव्य भोगत राहायचं होतं …मृत्यु हीच यातुन सुटका ठरणार होती…

 

माहेरची श्रीमंती आणि सासर तर साक्षात पेशवे , त्या मुळे चरितार्थाची चिंता नव्हती …. पण चरितार्थ म्हणजे फक्त दोन वेळेस उदर भरण एव्हढचं असते का ? जगायला कारण हवे …आपले म्हणावे असं कोण होते त्या वाड्यात ? म्हटलं तर सगळेच होते …नाही म्हंटल तर कोणीच नव्हतं !!

पती भावंडात सगळ्यात लहान त्यात अल्पजीवी त्यामुळे जनार्दनरावाच्या नावावर असा कुठला पराक्रम नव्हता, म्हणुन घरातील इतर तालेवार स्त्रियांसमोर सगुणाबाई कडे सत्ता किंवा त्यांना महत्व असण्याचा प्रश्नच नव्हता .

 

सगुणाबाईंनी परिथिती स्वीकारून , विधवेचे सन्यस्त आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला … लिहता वाचता येत असल्या मुळे शनिवारवाड्यातील ग्रंथ वाचन सुरु केले ,, निरनिराळे ग्रंथ मागवुन वाड्यात दुर्मिळ ग्रंथ संग्रह केला. इतिहासकार त्यांना सात्विक स्त्रि म्हणतात , त्याची योग्यता भाऊ पत्नी पार्वतीबाई इतकी होती …यातच सगळं आले….पार्वतीबाई आणि सगुणाबाई दोघीना एकमेकींबद्दल अत्यंत जिव्हाळा होता… पुढे अनेक वर्षांनी गंगाबाईच्या मृत्यु नंतर सवाई माधवरावांचे पालनपोषण या दोघीनीच केलं.

 

पेशवाईच्या अनेक पिढ्या पाहत असताना त्यांनी पेशवाईतील अनेक उलता पालथीही पाहिल्या …राजकारण , भाऊबंदकी पासुन स्वतःला वेगळे ठेवले … कुटुंबात त्यांना महत्वाचे स्थान नव्हते तरी पण अक्ख्या कुटुंबाला त्यांच्या बद्दल आदर होता … कुटुंबात जो मान मिळायला हवा होता तो नक्कीच मिळत होता , नानासाहेब पेशवे त्यांना वडील स्थानी होते … हे सगळे असले तरी त्या एक अलिप्त आणि सन्यस्त आयुष्य जगत होत्या …पोथी पुराणे , ग्रंथ वाचन , देव पुजा यात वेळ घालवत होत्या .. पेशवाईतील इतर स्त्रिया प्रमाणे त्यांनी तीर्थयात्रा केल्या , काशीबाई स्वतः बरोबर रामेश्वर यात्रेला त्यांना घेऊन गेल्या ..नानासाहेबांच्या आज्ञेवरून मस्तानी पुत्र समशेर बहाद्दर स्वतः जातीने त्यांना काशी , गया , प्रयाग अशा अनेक ठिकाणी घेऊन गेले ..तीर्थयात्रा हाच काय तो विरंगुळा होता त्या वैराण आयुष्यात !

 

कुटुंबातले अनेक मृत्यु पचवले , मायाळु सासु काशीबाई गेल्या , वडिलसमान नानासाहेब , कोवळा विश्वासराव , भावासामान सदाशिवभाऊ , नारायणराव , गंगाबाई … असे एक ना अनेक! पण माधवराव आणि रमाबाईंचे आकस्मिक जाणे त्यांना चटका लावुन गेले …हे होत असताना पार्वतीबाई आणि सगुणाबाई जोडीने दिवस काढत होत्या .

सवाईमाधवराव गादीवर असताना , श्रीमंतांच्या लहरी स्वभावामुळे त्यांचे खटके उडाले आणि त्यांनी शनिवारवाडा आणि पुणे सोडण्याचा निर्णय घेतला … साताऱ्याजवळ वडुज गावी पेशव्यांचा वाडलोपार्जीत वाड्यात त्या राहु लागल्या ,नाना फडणवीसांनी सगुणाबाईंची तिथे व्यवस्थित सोय केली .. नोकर चाकर , आचारी , पुजारी त्या बरोबर त्यांची ग्रंथ संपदा अशी सगळी व्यवस्था वडुजच्या वाड्यात झाली … ज्या सवाई माधवरावाचं पालनपोषण त्यांनी आणि पार्वतीबाईंनी केले , त्याच पेशव्याच्या लहरीपणा मुळे पुणे सोडले …. म्हणुन या पुत्रा समान माधवरावाच्या विवाहा करताही त्या पुण्यात आल्या नाहीत…

 

वडुज ला काही दिवस राहिल्या नंतर एकटे पण जाणवु लागले , नाशिक त्र्यंबकेश्वर यात्रा करायचं मनावर घेतलं , प्रवासात असतानाच त्यांना पार्वतीबाईंच्या निधनाची बातमी समजली आणि त्यांचा धीर सुटला … या धक्क्याने प्रकृती बिघडली .. आणि हळु हळु ढासळत गेली आणि त्यातच १३ नोव्हेंबर १७८३ ला नाशिक जवळ जलालपुर किंवा जगदीशपूर अशा गावी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

 

अशी ही पेशवाईतील बालविधवा इतिहासात गडप झाली …

 

( त्यांनी जमवलेल्या दुर्मिळ ग्रंथ संग्रहाची नोंद पेशवे इतिहासात घेतली गेली आहे)

 

बिपीन कुलकर्णी

 

संदर्भ –

पेशवे घराण्याचा इतिहास ( प्रमोद ओक )

पेशवेकुलीन स्त्रिया – मुक्ता केणेकर

मराठा रियासत खंड ४-५

 

🙏🙏 *इथेच या लेख मालेची सांगता झाली।।*🙏🙏