पेशवाईतील स्त्रिया भाग १२

पेशवाईतील स्त्रिया – भाग १२

थोरल्या राधाबाई

 

पेशवाईची वस्त्रे भट घराण्यात आली ती बाळाजी विश्वनाथांकडे , त्या पुर्वी पिंगळे घराण्याकडे पेशवेपद होते … तिथुन पुढे भट घराण्यात पेशवाई रुजली, वाढली आणि लयालाही गेली , बाळाजी विश्वनाथाच्या पत्नी म्हणजेच मातोश्री राधाबाई !

राधाबाइंचे वडील दादाजी जोगदेव बर्वे डुबेरकर नाशिकला सावकारी करत , रत्नागिरी जिल्ह्यातील नेवरे हे मुळ गाव..पेशवाईतील कर्तबगार स्त्रियांची परंपरा राधाबाईं पासुन सुरु झाली ….इथुन पुढची ५०-६० वर्षे म्हणजे त्यांच्या मृत्यु पर्यंत घराण्यावर त्यांचा एक छत्री अंमल होता.

मातोश्री राधाबाईचे नाव अजरामर झाले ते त्यांच्या दोन थोर पुत्रा मुळे , “बाजीराव” आणि “चिमाजीअप्पा”. राधाबाईना दोन मुलीही झाल्या. पहिल्या भिऊबाई, ज्यांचा बारामतीच्या आबाजी जोशी यांच्याशी विवाह झाला तर दुसऱ्या अनुबाई ह्यांचा विवाह पेशव्यांचे एक सरदार व्यंकटराव घोरपडे यांच्याशी झाला…

राधाबाईं घरातल्या छोट्या मोठ्या गोष्टी आपल्या परवानगी शिवाय होणार नाहीत याची काळजी घेत , पेशवाईतील लग्न कार्ये , दान दक्षिणा मंदिराची कामे , मुलांची शिक्षणे हे सगळे व्यवहार राधाबाईंच्या सल्ल्याने होत ..त्या व्यवहारनीती मध्ये अतिशय चोख होत्या ..स्वतः सावकार घराण्यातील असल्याने, राज्यकारभार करत असताना सावकार हाताशी असणे किती गरजेचे असते ह्याची कल्पना असल्या मुळे त्यांनी पेशवाईतील सोयरिकी सावकार घराण्यात होतील याची काळजी घेतली होती …

अत्यंत चतुर ,बुद्धिमान अशा राधाबाई वेळ पडल्यास कट कारस्थानेही करत , चांगले लिहिता वाचता येत होते ,स्वभाव अतिशय करारी आणि अत्यंत स्वाभिमानी होता … पेशवे कुटुंबच नाही तर इतर सरदार आणि सदरे वरची मंडळी त्यांना वचकुन असत .

थोरले बाजीराव आणि चिमाजी अप्पा वेळोवेळी त्यांचा सल्ला घेत , थोरल्या बाजीरावांच्या हैद्राबाद निजामाच्या पहिल्या भेटीच्या वेळेस , राधाबाईंनी त्यांना पुर्ण मार्गदर्शन केले होते … कुठे भेटाव ? कसं भेटावं ? काय बोलावे ? दोन्ही मुलांचा आणि त्यांचा सतत पत्रव्यवहार होत असे … या दोन्ही पुत्रांचा आई वर पुर्ण विश्वास होता ” मातोश्रींच्या आशिर्वादापासून आपले सर्व मनोरथ सिद्धीस जातात ” अशी भावना त्यांच्या बोलण्यात येत असे …एव्हढेच नाही तर बाजीराव आणि चिमाजी आप्पा मोहिमेवर असताना पुण्याचा कारभार राधाबाई एकहाती चालवत ..

थोरल्या बाजीरावांची कीर्ती अखंड हिंदुस्थानात पोहोचली होती , त्या मुळे पेशव्यांच्या मातोश्री म्हणुन सगळी कडे त्यांना योग्य मान मिळत होता .. त्यांनी अनेक तीर्थ यात्रा केल्या , तीर्थयात्रा करत असताना जातील तिथे स्वतः मुत्सद्देगिरी करून राज्याची भरभराट होईल याची काळजी घेतली होती .. त्या मुळे इतर राजे सरदारानी त्यांची धास्ती घेतली होती …जयपुर चा राजा म्हणतॊ ” श्रीमंतांच्या मातुश्री यात्रेच्या मिषाने उत्तरेत येतात आणि आमच्या घरात भेद पडतात ”

बाजीराव मस्तानी प्रकरणात त्यांना थोडाकाळ अत्यंत दुःख झाले होते ,मस्तानीबाईं बद्दल व्यक्तिगत राग नव्हता पण बाजीराव मस्तानीच्या आहारी गेल्यास त्यांचे राज्यकारभाराकडे दुर्लक्ष होईल अशी धास्ती होती. बाजीराव मस्तानी प्रकार पाहुन पुढे त्यांनी नानासाहेब पेशव्यांना स्वारीवर जाताना गोपिकाबाईंना घेऊन जाण्याचे आदेश दिले , आणि इथुन पुढे हा प्रघात अधिक वाढत गेला ….पण स्त्रियांना मोहिमेवर नेण्याचा राधाबाईंचा हेतु उद्दात असला तरी त्याचा फारसा उपयोग झाला नाही ,उलट पानिपतावर अंगलट आला .

वयाची पंच्याहत्तरी पार केली म्हणुन नानासाहेब पेशव्यांनी त्यांची सुवर्णतुला केली , पंच्याहत्तर म्हणजे त्या काळाच्या मानाने दीर्घायुष्यच म्हणावे लागेल …

पण दीर्घायुष्य हा कधी कधी शाप असतो कारण हयातीत अनेक मृत्यु पाहावे लागतात … राधाबाईंनी अनेक जवळचे मृत्यु पाहिले दोन्ही मुले थोरले बाजीराव , चिमाजीआप्पा , सती गेलेली सुन अन्नपुर्णाबाई , मस्तानीबाई इतर नातसुना जानकीबाई , उमाबाई , जावई आबाजी जोशी नाईक , सती गेलेली मुलगी भिऊबाई नाईक … हा प्रत्येक मृत्यु राधाबाईंवर मानसिक आघात करत होते .. हळु हळु त्या थकत गेल्या आणि १९ एप्रिल १७५३ ला स्वर्गवासी झाल्या !! पुण्यात मृत्यु च्या वेळेस नानासाहेब , गोपिकाबाई , काशीबाई आणि मुलगी अनुबाई त्यांच्या जवळ होत्या …

अशी ही पेशवेघराण्यातील सर्वात जेष्ठ आणि तितकीच कर्तृत्ववान स्त्री तिच्या बद्दल रियासतकार गो स सरदेसाईनी लिहुन ठेवले आहे ” जशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या खालोखाल थोरल्या बाजीरावांची योग्यता होती , तशी राजमाता जिजाबाईंच्या खालोखाल राधाबाईंची योग्यता मानण्यास बिलकुल हरकत नाही ”

©️बिपीन कुलकर्णी

 

संदर्भ –

पेशवे घराण्याचा इतिहास ( प्रमोद ओक )

पेशवेकुलीन स्त्रिया – मुक्ता केणेकर

मराठी रियासत खंड 3