*”वाचन-मनाचे”—-!!!*
कुणि उत्तम चित्रकार, कुणि गोड सुरांचा धनी, कुणि निष्णात चिकित्सक, तर कुणि आवडता शिक्षक, म्हणजे प्रत्येकात कांही न कांही गुण, व्यक्ती तितक्या, प्रकृती, जो तो आपल्या क्षेत्रात तरबेज-! वेगवेगळ्या आवडी-निवडी “हॉबीज़”जपणारा.माझे विचाराल तर आजकाल छंद जडला आहे, “वाचन”, करण्याचा. कसले–? अहो, मी आता” माणसे”वाचायच्या प्रयत्नात आहे. मला आवडू लागले आहे समोरच्या व्यक्तिच्या हालचाली, हावभावांतून, त्याच्या स्वभावाचे आकलन करणे. बारीक नजरेने मी न्याहाळते त्यांचे बोलणे, वागणे. त्यांच्या डोळ्यांत डोकावून त्यांचे स्वभाव ठरवायचा यत्न करते.
आतां मी आयुष्याच्या अश्या उंबरठ्यावर आहे, ज्याच्या मागेपुढे बरेच कांही घडून गेले आहे. जीवनांत अनेक “खट्टे-मीठे”, कडु-गोड”, अनुभवांचे स्वाद चाखले आहेत. आतां निष्पक्ष राहून व्यक्तिंचा दृष्टिकोन जाणून घेण्यास तरबेज तर नाहीं, पण चाणाक्ष जरूर झाले वाटते. आपण टी. व्ही. वर सीरियल पाहतो. पुष्कळ जण त्याला ” इडियट बॉक्स ”
म्हणतात. पण अहो, पुस्तके जशी चांगली, वाईट, तसेच आहे. काय वाचायचे, काय बोध घ्यायचा आपण ठरवायचे. तसेच पात्रे चांगली, वाईट. आपण वाईट कसे वागायचे नाहीं, चांगले आचरण कसे करायचे, ठरवायचे–!
कधीकधी आपण चुकीचे कयास आधी घडलेल्या प्रसंगाने लावतो व नंतर आपली चूक उमगते. लहानपणी आमच्या प्रत्येक ब्लॉकला पार्क असायचा. आम्ही मुली तिथे एक खेळ खेळायचो “लंगडी-टांग”.एका पाया वर जाऊन मुलींना ” आऊट “करणे.आमचा ‘5’ब्लाक, 4’ब्लाकशी’मॅच.तिथे एक मुलगी यायची ‘शशी’कॉन्व्हेट मधे शिकलेली.
आम्ही ‘हिंदी’ मिडियम. आम्हाला वाटायचे ती शिष्ट असेल. सहवासाने समजले ती फार छान स्वभावाची, सुदंर, हुशार, आहे. नंतर कॉलेज मध्ये आमचा छान ग्रुप झाला. तर कधी कधी दिसते तसे नसते.
दिसायला देखणा, देखणी, स्वभावाने ‘खडूस’तर साधारण वाटणारी अतिशय सालस, कुशाग्र बुद्धी, असू शकतात.
भोळी ठरतात बेरकी, अबोल सहवासाने अतिशय बोलकी आढळतात, तर भांडकुदळ वाटणारी “माणुसकी” जपणारी. एकूण काय अनुभव घेतल्या शिवाय आपण दुसऱ्याच्या स्वभावाचे आकलन करू शकत नाहीं. आजकाल जो तो आप आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत असतानां कावलेला, थकलेला, अशांत आढळतो. नात्यात त्यामुळे दुरावा जाणवतो.
माझी स्व. सून सौ. दीप्ती , लग्नाला 20वर्षे होऊनही ‘माहेरशी इतकी अटेच्ड कशी आश्चर्य वाटायचे. ती गेल्यावर तिसऱ्या दिवशीच आम्हाला तिच्या बहिणी, मेव्हण्यानी’ग्वाल्हेरला बोलावले. मुले 7वी, 12वीत, कुणिच जेवत नव्हते. रंजन माझा मुलगा आजारातून उठलेला. कोरोना मुळे कुणि येत जात नव्हते. कारने निघालो, ‘आग्रा’येथे दोघे मेहुणे जेवण घेऊन आले. धाकट्या बहिणीकडे राह्यलो.मुलांना, आम्हाला तिने स्वतः चे दुख बाजुला सारुन सावरले. 4,5,महिने मुले तिथे, आम्ही तिघे येऊन जाऊन राहिलो. हळूहळू तिच्या मावशी, मामा, भाऊ, भावजयानी इतके प्रेम दिले कि वाटले इथे “प्रेमाची गंगा” वाहते आहे. आम्ही सासु सासरे-दीप्तीचे, पण सर्वांनी खूप जीव लावला. सख्खे नातलग झाले. अजून सारे सम्पर्कात आहेत.
दीप्ती ची आत्या आणि, बहिणी अजुन What’s app वर रोज असतात.
आतां कामवाल्या बायकांना मान- अपमान समजू लागलेत. त्यांच्याशी फटकून वागून चालत नाहीं. माणुसकी ने वागवले कि त्याही आपुलकीने घरचे काम समजून करतात. एकूण काय ज्या समाजात रहायचे त्यांच्याशी स्नेह सम्बन्ध असेल तर जीवन सुखावह होते. सहवासात येणाऱ्या प्रत्येकाच्या स्वभावाचा अभ्यास करते. आतां असे होऊच शकते कि तुम्ही समोरच्या व्यक्तीला छान समजून घ्याल,पण त्याला तुमच्या बद्दल आकस, ईर्ष्या, द्वेष, असूच शकतो. तो ज़र तुम्हाला नांवें ठेवत असेल, निंदा करत असेल, तर तुम्ही त्रास करून घेणार कां? नाहीं, अशा वेळी स्वतः वर विश्वास ठेवणे. खरेच आपले चुकले असेल तर माफी मागणे, नसेल तर त्याचा दृष्टीकोन, त्याच्या नज़रेचा दोष समजून क्षमा करणे. एकूण काय आपण मस्त रहाणे. जो बरोबर चालेल, घेऊन चालायचे, जो नाहीं त्याला सोडायचे.