पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ
गोष्ट अर्धी आमची… आणि अर्धी तुमची २०२४
नाव : श्री पगारे (प्रथम पुरस्कार) वय: २१
रणांगणावरचा मी
जेव्हा मी मृत्यू पाहिला.
काळोख.
मृतदेहातून सुद्धा जिवंतपणाची स्पंदने ऐकू येतील इतकी भीषण शांतता. मी काळचक्राच्या अश्या कोणत्या डोहात बुडून गेलोय मला काही कल्पना नव्हती. आता काही क्षणांपूर्वी इतिहासाच्या वर्गात बसलेला मी आता या कुठल्या जागी आलो आहे? ही विचारांची शर्यत चालू असताना अचानक क्षितिजापासून कसला तरी आवाज माझ्याकडे चाल करीत आला. काळोख अजूनही माझा वैरी म्हणून डोळ्यावर ठाण मांडून बसला होता.
हळू हळू तो आवाज वाढला आणि त्या आवाजाने समस्त आसमंत दुमदुमून गेला.
भीषण. रौद्र. निर्दयी.
करुण किंकाळ्या, वीर युद्ध घोषणा आणि हृदय पिळवटून टाकणाऱ्या आक्रोशाने आवाजाचे पोट फाडत माझ्या आजूबाजूला घर केले. मला काही समजण्यापूर्वी मी डोळे उघडले आणि पाहतो तर काय…माझ्या डोळ्यांसमोर भव्य रणकंदन माजले आहे. थोडी नजर वर फिरवली तर मला दिसले, अफगाणी सैन्याचे झेंडे, अब्दाली अब्दाली! या आक्रोशा सोबत अस्मानाच्या पटलावर थैमान घालत होते. मी माझ्या हातांकडे पाहिलं…रक्ताच्या थारोळ्यात न्हाऊन निघालेले माझे हात थरथरत होते. डाव्या हातात अर्धवट तुटलेली ढाल आणि उजव्या हातात पितळी मूठ असलेली जड समशेर. मला काही कळायच्या आत कुठूनतरी एक पिळदार मिशी असलेला सरदार माझ्याकडे धावत आला,
“भाऊ…आता माघार नको. गतवेळे इतके आता खचलो तर वाडा माफ करणार नाही…पेशावर तक झुंज मारुया…भाऊराव…आता गत्यंतर नाही!”
न जाणो कोठून माझ्या हाती शक्ती आली आणि मी समशेर उगारून शत्रू सैन्याकडे धावत सुटलो. माझ्या बाहुंतलं बळ पायदळा समवेत घोडदळाला सुद्धा बेचिराख करीत होतं. जसा मी पुढे कूच करीत गेलो मला समजून चुकलं होतं की हे पानिपत आहे. आणि मी आहे चिमाजी अप्पांचा पुत्र, सदाशिव. हा विचार मनात येताच मी जागेवर थांबलो. मला कळत नव्हतं की मी काय केलं पाहिजे पण नकळत हात समोरच्या शत्रू सैन्याला कापत चालले होते. आजूबाजूला माझ्या आप्तांच, शत्रूंचं शरीर छिन्नविच्छिन्न होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलं होतं.
तेवढ्यात माझ्या एका सरदाराने मला हत्तीवर बसवलं. आता त्या हत्तीवरून मी साऱ्या रणांगणावर मर्दुमकी गाजवत होतो. कुठेतरी त्या वीररसाच्या धुंदिने मला पूर्णतः पछाडल होतं.
तितक्यात मला एक जीवघेणी अस्फुट अशी किंकाळी ऐकू आली.
“भाऊराव! वाचवा!”
मी मागे वळून पाहतो तर काय, धाकला विश्वास गतप्राण होऊन ओरडत आहे. मी क्षणाचा ही विचार न करता हत्तीवरून खाली झेप घेतली आणि विश्वास कडे धावत गेलो. मी विश्वासला शरिरांच्या लगाद्यात शोधत होतो. असंख्य प्रेतं बाजूला सारून मी विश्वासला साधण्यासाठी आकंठ आतुर झालो होतो. कधी हाताला कोणाचातरी भाऊ तर कधी कोणाचा बाप, काय आणि कोण लागत होतं…या सगळ्या तुटलेल्या नात्यांमध्ये मी माझ्या विश्वासच्या जिवंत असण्याची एक मृत आशा घेऊन स्वतःशीच लढत होतो. आताशा पाऊस वाढला होता. जणू पाठीवर विषारी बाणांचा मारा व्हावा तसे पावसाचे थेंब माझ्या जखमा भेदून काळजावर घाव करीत होते. समोर काही दिसत नव्हतं. पाणावलेल्या डोळ्यांनी सारं काही धूसर करून टाकलं होतं. तितक्यात माझ्या हाताला एक तांबट कडं लागलं. मी त्याला बघत असतानाच माझ्या डोक्यावर मागून जोरात प्रघात झाला आणि त्या क्षणासाठी माझ्या डोळ्यांसमोर माझा संपूर्ण आयुष्य पट उलगडताना दिसला.
तो छोटासा विश्वास, दारात खेळतोय.
वाड्यामध्ये मध्यान्हाचा प्रहर आहे.
पार्वती माझी वाट पाहत उंबरठयाशी उभी आहे.
मी सुद्धा उभा आहे.
फुलांच्या माळा सजवल्या जातायत.
पार्वतीच्या हातात ओवळणीच ताट आहे.
पुढच्याच क्षणी ते ताट खाली पडतं.
कुंकवाचं मळवट धरणीला रंगवित जातं.
लाल.
मी अजूनही उभा आहे.
मृतदेहांचे थर सजवले जातायत.
माझ्या हातात विश्वासचे कडे आहे.
लाल. तांबट.
त्याला आता गंज चढतोय.
बहुतेक त्याची कल्हई आता पुन्हा होणार नाही.
माझ्या डोक्यातून एक हलकी रक्ताची धार येते.
मी जमिनीवर आदळतो.
काळोख.
मी पुन्हा वर्गात आलो आहे. इतिहासाचे सर आणि संपूर्ण वर्ग शांत आहे.
पानिपतच्या रणकंदाचे निनाद अजूनही वर्गाच्या भिंतीतून गुंजत आहेत.
सारे निःशब्द.
बहुदा हेच एक युद्ध आहे.
– श्री पगारे, पुणे .
८३२९२१४३३६.