रणांगणावरचा मी – सुधीर एरंडे (द्वितीय पुरस्कार) – गोष्ट अर्धी आमची… आणि अर्धी तुमची २०२४

पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ

गोष्ट अर्धी आमची… आणि अर्धी तुमची २०२४

नाव:  सुधीर एरंडे (द्वितीय पुरस्कार)      वय. 66 वर्ष

रणांगणावरचा मी

इतिहासाचे सर अफजलखानाचा वध अत्यंत आवेशाने शिकवत होते. आवेश इतका की अंगावर रोमांच उभे राहिले आणि मी स्वतः वाघ नखं घालून खानाचा कोथळा बाहेर काढला असं वाटायला लागलं. खानाचा वध झाला, महाराज चपळाईने शामियान्यातून बाहेर पडण्यासाठी वळाले तोच…. बापरे घात होता होता वाचला. सगळा वर्ग चडीचुप. जिवाने वार आपल्या अंगावर घेतला आणि महाराज बाहेर पडले. सगळ्या वर्गाचा अडकलेला श्वास बाहेर पडला.
तोफा धडाडल्या. मावळ्यांनी जावळीत खानाच्या सैन्याचा धुव्वा उडवला.
धडा संपला आणि सरांनी सांगितले माझ्या कडे एक मंत्र आहे तो उच्चारताच तुम्ही मनातल्या कोणत्याही ऐतिहासिक प्रसंगात पाहिजे त्या भुमिकेत रणांगणावर हजर होऊन घडणाऱ्या युध्दात सहभागी होऊ शकाल पुर्ण एक तास….
मी तर कितीतरी वेळा श्रीकृष्णाने सारथ्य केलेल्या रथावर अर्जूनाच्या भुमिकेत जाऊन स्वतः कौरव सेनेचा धुव्वा उडवून आलो आहे. शिवाजी होऊन शाहिस्तेखानाची लाल महालात बोटं छाटून आलोय.

आज मी (सुधीर एरंडे) पण मंत्र उच्चारला आणि .सतराव्या शतकात शिवाजी महाराजांच्या काळात येऊन पोहोचलो……

मी तानाजी मालुसरे, कोकणातल्या उमरठे गावाचा राहणारा.
शिवाजी महाराजांचा बालपणी चा संवगडी व आता त्यांचा निवडक विश्वासू सरदार, मी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेपासूनच त्यांच्या बरोबर अनेक मोहीमीत उत्तम कामगिरी बजावली होती म्हणूनच महाराजांनी मला एक हजार मावळ्यांच्या सैन्याची जवाबदारी दिली होती.
पुरंदर च्या तहात शिवाजी महाराजांना दुसर्या किल्ल्यां बरोबर कोंढाणा किल्ला देखील मुघलांना द्यावा लागला.आग्र्याच्या कैदीतून सुटल्यानंतर माता जिजाऊ च्या इच्छेनुसार त्यांनी पुण्याजवळ असलेला सामरिक दृष्टीने महत्वपूर्ण कोंढाणा किल्ला पुन्हा ताब्यात घेण्याचे ठरवले.
त्यांच्या मनात ही अवघड कामगिरी मलाच द्यायचे होते.
माझा मुलगा रायबा च्या लग्नाचे आमंत्रण द्यायला मी शिवरायांच्या भेटीस गेलो तेंव्हा ते मनात काही विचार करून म्हणाले ,
“तानाजी तुम्ही मुलाचे लग्न उरकून घ्या , आम्ही स्वतः काही लग्नाला येऊ शकणार नाही कारण आम्ही जातीने कोंढाण्याची मोहीम काढायचे ठरवले आहे.”
तेव्हा मी त्यांना उत्तर दिले
“तानाजी जिवंत असताना तूम्ही कामगिरी वर जाण्याची काहीच गरज नाही ”
“आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे”
मग मी लग्नाची सगळी तैयारी अर्धवट सोडून किल्ला जिंकण्याचा विडा उचलला.
गडाचा किल्लेदार उदयभान राठोड एक पराक्रमी राजपूत योद्धा होता त्याच्या हाताखाली सुमारे ५००० मुघल सैनिकांची फौज होती, किल्याच्या दोन्ही दरवाजावर पक्का बंदोबस्त होता,त्यामुळे किल्ल्यावरच्या तुकडीला कळू न देता किल्ला दिवसा चढणें अशक्य होते.आम्ही खुप विचार करून किल्ला सर करण्याची योजना आखली.
आज ४ फेब्रुवारी १६७०, माघ‌ वद्य अष्टमी, मध्यरात्री ची वेळ, भयाण काळोखी रात्र, जंगलात रात किडे किरकिरत होते.
मी ५०० मावळ्यांची तुकडी घेऊन राजगडावरून गुंजवणी नदी पार करत कोंढाण्याच्या दिशेने निघालो, बरोबर शेलारमामा व माझा धाकटा भाऊ सूर्याजी पण होता, किल्याच्या पायथ्याशी पोहचल्यावर मी त्यांना आदेश दिला,
“सुर्याजी तुम्ही दुसर्या वाटेने कल्याण दरवाज्याच्या बाहेर जाऊन आम्ही आतून दरवाजा उघडण्याची वाट बघा.”
वर चढण्यासाठी आम्ही शत्रू च्या ध्यानी मनी न येणारा प्रचंड द्रोणागिरी कडा निवडला, जो अतिशय उंच होता, व तेथे शत्रू ची गस्त फारच कमी होती.
मी आपल्या विश्वस्त घोरपडी ला म्हटले
‘ यशवंती आज आमची लाज राख बरं ‘
ती वर कड्याला चिटकतास तिच्या शेपटी ला बांधलेल्या दोरी च्या मदतीने चार पाच मावळे वर पोहोचले , दोरीचे टोक झाडाला घट्ट बांधले नंतर बाकीचे मावळे व मी भराभर कडा चढलो.
आत जाऊन आम्ही शत्रू वर
अचानक हल्ला चढवला
‘हर हर महादेव’ चा उद्घोष करत तेथील सैन्याला कात्रीत पकडले, लढाई ला सुरुवात झाली,उदेभान चे सैन्य आमच्यावर चाल करून आले. हातघाईची लढाई सुरू झाली,तलवारी ला तलवारी भिडल्या.सपासप वार होऊ लागले. ढाली खणाणू लागल्या, सगळीकडे मशालींचा उजेड झाला, मावळ्यांनी कल्याण दरवाजा उघडला.
मी उदयभाना ला डिवचले
” तूं हिंदू असून मुघलांची चाकरी करतोय,हिंदवी स्वराज्याच्या आड येण्याचे पाप करतोय, धिक्कार आहे तुला.”
बेभान होऊन लढताना अचानक उदयभानाने माझ्यावर झेप घेतली, आमच्या दोघांची झुंज सुरू झाली.
कोणीही माघार घेण्यास तयार नव्हते. इतक्यात माझ्या हातातली ढाल खाली पडली, तेव्हा मी डाव्या हातावर लगेच आपला शेला गुंडाळला व परत शत्रू ला सामोरी गेलो. अनेक घाव अंगावर झेलत झेलत शेवटी मी उदयभाना ला आपल्या तलवारीने धारातीर्थी पाठवले.
माझ्या शरीरावर च्या असंख्य जखमांतून भळाभळा रक्त वाहत होते, श्वास हळूहळू खोल होत चालला होता, गूंगी वाढत चालली होती परंतु माझ्या मनात एकच भाव होता,
*शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती,
लढून मरावं, मरुन जगावं हेच आम्हाला ठाव.*
आता मी काही रायबा च्या लग्नाला हाजर राहू शकणार नाही , कुटुंबाच्या आठवणी ने एक क्षण डोळे पाणावले आणि
बाकीच्या मुघल सैन्याचा सूर्याजी व शेलारमामा पराभव करून किल्ला नक्कीच काबीज करतील आणि महाराजांना दिलेले वचन पाळतील, ह्या विचाराने मनातल्या मनात मी निश्चिंत झालो व राज्याच्या च्या कामी हा देह येत आहे ह्या समाधानाने रण तीर्था वर अखेरचा श्वास घेतला व भूमी वर पडलो………

…….. मराठ्यांच्या विलक्षण पराक्रमामुळे कोंढाणा किल्ला जिंकला गेल्यावर दुसऱ्या दिवशी शिवाजी महाराजांना ही बातमी कळताच त्यांनी दुःखाने हळहळत उद्गार काढले.
“गड आला पण सिंह गेला”
जेथे तानाजी मालुसरे सारख्या सिंहाने आपल्या प्राणांची आहुती दिली तो कोंढाणा किल्ला आता सिंहगड म्हणून प्रसिद्ध आहे.

सुधीर एरंडे