निबंध लेखन स्पर्धा – द्वितीय पुरस्कार विजेते – श्री दिपक वैद्य

पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ, गणेश उत्सव 2024, निबंध लेखन स्पर्धा

द्वितीय पुरस्कार विजेते –  श्री दिपक वैद्य  

मराठीच्य संवर्धनासाठी काय करावे

कुठल्याही गोष्टीचा श्रीगणेश स्वतःपासूनच होतो तेव्हां या गोष्टीचा श्रीगणेशही स्वतःपासून होतो. आपण घरात मराठीच बोलावे. मराठी ही अत्यंत महत्वाची भाषा आहे हे आपल्या कृतीने सिद्ध होईल व बाहेरील हिंदी, इंग्रजी सुफी हे बाहेरच राहिल. संस्कृती संवर्धनाचा भाषा संवर्धन हा प्रमुख भाग आहे. महाराष्ट्रात बोली कितीही असल्या तरी सर्वांना एकसूत्रात ओवणारी ही मराठी भाषा आहे. मराठी भाषा घरी फक्त बोललीच नव्हे तर वाचली आणि लिहली पण गेली पाहीजे. लहानपणापासुन मराठी गाणी हिंदी गाण्यां इतकीच गाईली गेली पाहिजे. हिंदीचे कौतुक मराठीला डावलुन होते ते टाळले पाहिजे. मराठी ही घरातली संभाषणाची पहिली पसंती असली पाहिजे. बोलतांना मराठी पहिल्यांदा तर हिंदी, इंग्रजी नंतर आल्या पाहिजे. दोन मराठी माणसे आपापसात हिंदी मधे बोलत आहेत हे पाहुन मुलांवर काय संस्कार होणार हे आपण समजुन घेतले पाहिजे. मुले पटकन हिंदी महत्वाची असुन मराठी दुय्यम आहे हे शिकतात. हा या छोट्या गोष्टिंचा मोठा दुरगामी परिणाम आहे. स्वतःचे उदाहरण द्यायचे झाले तर लहानपणी मुलांनी हिंदी संभाषणाची कास धरली व त्यांना मराठी कडे वळवण्यामधे इतकी अधिक शक्ति खर्च झाली की मोठा नेट लावुन ते काम करावे लागले.

तरी मुलांचे मराठी वाचन लेखन राहुन गेले. आता त्याची सुतराम शक्यता नाही. म्हणुन मराठी भाषा व संस्कृतीचे संवर्धन लहानपणात केलेले योग्य संस्कारच करु शकतात.

भाषेनंतर मी मराठी सणांच्या मुद्याकडे वळतो. आपल्या सणांचे महत्व पटवुन देण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मुलांचा प्रत्येक सणात सक्रीय सहभाग हवा. उदा़. गुढीची उभारणी करतांना लहानांस गोड बोलुन व न रागवता त्यात शामिल करावे. सण हा लादला न जाता आत्मसात झाला पाहिजे. गुढीपाडवा केंव्हां आहे हा प्रश्न मुलांकडुन आला पाहिजे. प्रत्येक वर्षाचे सुरवातीस सगळे सण केंव्हां आहेत त्याबद्दल सर्वांनी मिळुन चर्चा करुन त्या त्या वेळी काय करता येईल याचीही चर्चा झाल्यास सणांचे महत्व कृतीने मुलांवर ठसेल, प्रत्येक सणाचे वैशिष्ट्य मुलांना समजेल. वामपंथियांनी दिलेली संस्कृतीविरोधी शिकवण नरम पडेल,नाहिशी होईल. गणपती उत्सव हा एक सण आहे ज्यात तरुणांचा सहभाग आवश्यक आहे. त्यात मराठी भाषेत कार्यक्रम करायला प्रोत्साहन द्यावे. या सगळ्यासाठी घरात मराठी बोलणे आवश्यक आहे. मराठी संस्कती ही गणेशोत्सव आणि शिवाजी महाराजांपूर्ती मर्यादित न ठेवता वेगगवेगळे खेळ जे स्त्रिया पूर्वी खेळत मंगळागौरीला ,अश्विनीला किंवा लग्नात नवरा नवरीला खेळवतात, त्यांचे पुन्हा येणे आवश्यक आहे.

प्रत्येक घरात आठवड्यात एकदा मराठी तास ठेवावा. त्यात काही तरी नविन मराठी गोष्ट मुलांना शिकवावी.

पालकांनी लहान मुलाना झोपवतांनाही गोष्ट ही मराठीतच सांगावी. महाराष्ट्रा बाहेरील मराठी माणसांनी महाराष्ट्राबाहेरील मराठी माणसांशी मराठीतच बोलावे. मुलांना महाराष्ट्राशी निगडीत स्थळांबद्दल प्रेमाने सांगावे. प्रत्यक्ष स्थळांना भेट द्यावी उदा. पानिपतचे मैदान, ग्वाल्हेर, झांशी , तंजावुर, पुणे, महाराष्ट्रातील गड किल्ले इत्यादी. जोपर्यंत आपण स्वतः मराठीबद्दल अभिमानास्पद वर्तन करणार नाही वा मराठीची उपेक्षा करत राहु मराठीच्या संवर्धनास ते बाधक ठरेल.
तेव्हां आपण मराठी बोला लिहा वाचा व मराठी वाचवा़ हा नारा देवुया. यात मराठी वाचवा हा द्व्यर्थी शब्द प्रयोग आहे.

To save and to make someone read असा हा प्रयोग आहे.

श्री दिपक वैद्य