पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ, गणेश उत्सव 2024, निबंध लेखन स्पर्धा
प्रथम पुरस्कार विजेते – सुहास शरद देशपांडे
मराठी संस्कृती टिकवण्यासाठी आपण काय केले पाहिजे ?
खरं सांगा मराठी संस्कृती टिकून राहण्यासाठी तुम्ही काय करता?
सार्वजनिक ठिकाणी एखादी लहान मुलांची स्पर्धा घेतली की झाली तुमची सुटका.
तुमच्या स्वतःच्या मुलांना येतं काहो मराठी बोलता. का संस्कृती फक्त घरा बाहेरच जोपासण्याचा विषय झालाय?
आणि मुळात म्हणजे आपला एक गैरसमज झालायं की मराठी बोलता आलं की मराठी संस्कृती जपली आपण पण तसं नक्कीच नाही. बोली भाषा हा एक भाग झाला.
आपली संस्कृती म्हणजे आपली भाषा आपली संत परंपरा, आपला इतिहास, आपले संगीत आपली नाट्य परंपरा आपले कपडे आपली भटकंती आपली खाद्य परंपरा आपली समृद्ध लेखन आणि काव्य संपदा. एकना अनेक, प्रत्येक गोष्टीतून मराठीपण जोपासता येतं.
वरील सर्व गोष्टींचा प्रसार आणि प्रचार करणे म्हणजेच मराठी संस्कृती टिकवण्यासाठी टाकलेलं फक्त एक पाऊल असेल.
आता, आपण काय करू शकतो?
सुरूवात करूयात आवडत्या *खाद्य संस्कृती* पासून.
महाप्रसादाच्या दिवशी आपण संपूर्ण मराठी होतो पण उरलेल्या चारही दिवशी एखादा मराठी पदार्थ चटपटीत किंवा गोड चालू शकेल. पदार्थांची नावं देत नाही यादी खुप लांब होईल. ( वडा पाव, पुरणपोळी)
आता थोडं *वाचन संस्कृती* बद्दल
प्रत्येक जण म्हणतो मी भरपूर मराठी पुस्तके वाचतो म्हणजे सगळ्यांकडे मराठी पुस्तके आहेत. त्यांची देवाणघेवाण करूयात. एखाद्याने वाचलेल्या पुस्तकाबद्दल सांगावे. अस्खलित मराठी वाचून दाखवावे. प्रत्येक गोष्ट स्पर्धेत अडकऊ नका.गोडी निर्माण करा.
थोडं *संत परंपरे बाबतीत*
हा महाराष्ट्राचा अमूल्य ठेवा आणि अभिमानाचा विषय. संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव, संत गाडगेबाबा, समर्थ रामदास एक ना अनेक प्रत्येकाने आपापल्या मार्गाने समाजमन जागृत ठेवण्यासाठी अथकपणे प्रयत्न केले. त्यांच्या कार्याची महती आपल्या मुलांना सुटसुटीत पणे सांगण्याचे काम आपले आहे ते आपण रोज घरात दाखले देऊन करायला हवं. फक्त आपण वारीत सहभागी न होता मुलांचा सहभाग वाढवायला हवा. मुलं घरात आहेत म्हंटल्यावर त्यांना मंडळांत आणण्याची जबाबदारी पालकांची आहे.
स्वतः थोडं फार मराठी गाणी, भजन, किर्तन, पोवाडा, लावणी, गवळण, लोकगीतं ऐका. ऐकायला शिका. तुम्ही ऐकाल तर मुलांच्याही कानावर पडेल आणि त्यातले सगळे जरी नाही काही प्रकार मुलांनाही आवडतील आणि तेही गुणगुणायला लागतील.
*इतीहास*
सुरवातीला शिवराज्याभिषेकाचे एक मोठं चित्र घरात लावा. त्यातल्या प्रत्येक पात्राचा इतिहास स्वतः वाचा. मावळे, सरसेनापती, अष्टप्रधान, गागाभट्ट, जिजाऊ, सोयराबाई आणि संभाजी राजे ह्यांच्या बरोबरीने चाफेकर बंधू, लो.टिळक, आगरकर, गोखले, रानडे, स्वा.सावरकर, बाबासाहेब आंबेडकर, राजगुरू आणि पेशव्यांचाही इतीहास वाचा आणि मुलांनाही त्यांचा अल्प परिचय करून द्या.
*पुस्तक परिचय*
पुलंचे नाव एखाद्या पुलाला देऊन भागणार नाही. पु.ल. देशपांडे, व.पु. काळे, प्र.के. अत्रे, वि.वा. शिरवाडकर, बालकवी, साने गुरुजी, बहिणाबाई ह्यांची आवड नसतांनाही चार पुस्तके घरात आणून ठेवा. घर आवरण्याच्या नादात पुस्तके कपाटात बंद करून ठेऊ नका. सहज नजरेस पडतील अशा ठिकाणी ठेवा. अधूनमधून चाळत जा.
मंडळात जेव्हा याल तेव्हा घरातली चार पुस्तके बरोबर आणा आणि करा अदलाबदल.
*गाणी, गोष्टी आणि कथा कथन*
स्वतः थोडं फार मराठी गाणी, भजन, किर्तन, पोवाडा, लावणी, गवळण, भारूड, लोकगीते, ऐकायला शिका तुम्ही ऐकाल तर मुलांच्याही कानावर पडेल आणि त्यातले सगळे जरी नाही काही प्रकार मुलांनाही आवडतील आणि तेही गुणगुणायला लागतील. मुलांना मराठी गोष्टी सांगा. मंडळात एखाद्या वर्षी कथा कथन आणून तर बघा. आणल्या शिवाय त्यांची ताकद कळणार नाही. जागीच खिळून ठेवण्याची ताकद असते त्यात फक्त वक्ता त्या तोलामोलाचा पाहिजे.
*आपले सणवार*
आपल्या घरचे गौरी – गणपती, सार्वजनिक गणेश उत्सव, आपापल्या ग्राम देवतांच्या यात्रा, जत्रा, गोंधळ, जागरण, दिवट्या – बुदल्या, आपले कुळधर्म – कुळाचार ही आपली संस्कृती. आपल्या घरातही पुर्वांपार ह्या गोष्टिंची परंपरा नक्कीच असणार आपल्या आजच्या विभक्त कुटुंबपद्धती मुळे म्हणा किंवा इतर कोणत्याही कारणास्तव आपल्या घरात ह्या गोष्टी घडत नसतील तर आपले नातेवाईक किंवा मित्र परिवारात ज्यांच्या कडे हे सगळं घडतंय त्यांच्या घरी आवर्जून जा नेमके काय करतात ते तुम्हालाही समजेल आणि तुमच्या मुलांनाही जवळून बघायला मिळेल.
*देव*
आपली पंढरी, आपले विठ्ठल रखुमाई, आपले ज्ञानोबा, तुकोबा, निवृत्ती नाथ, एकनाथ, मुक्ताबाई, आपली ग्रामदैवते भैरवनाथ, म्हसोबा, खंडोबा, जेजुरी, अंबाबाई, कोल्हापूर, ज्योतिबा, माहूर, गडावरची देवी, तुळजाभवानी, आपली कुलदेवता – देवी ही आपली संस्कृती मागच्या वेळेस कधी गेला होतात? नाही आठवत. हरकत नाही. ह्या वर्षी एक पिकनिक कमी करून कुलदैवतेला जा. जाणार ना नक्की?
दिवाळीच्या फराळाचे पदार्थ सर्वांनी मिळून घरी करणं ह्यात जी मज्जा आहेना ती तुम्हाला corporate चं teamwork एका फटक्यात शिकवायला सुध्दा मदत करेल. राहता राहिला प्रश्न सगळं केलेलं संपणार कसं, विकतच्या पदार्थांची सुट्टी. मित्र मंडळींना फराळाला बोलवा तुम्हीही जा. शेजारी पाजारी विकतचे बाॅक्स आणून देण्यापेक्षा तुमच्या हाताच्या फराळाच्या पदार्थांनी भरलेली ताटे द्या फरक नक्कीच जाणवेल.
घरी परत एकदा हळद, तिखट, मसाले, कुरडई-पापड, लोणची करून तर बघा मुलं खात नाहीत त्यांना भुक लागत नाही असल्या गोष्टी ईतिहास जमा होतील.
आपण घरात जे होम-हवन करतो ना त्याहीपेक्षा घरात कैरीचे लोणचे करतांना, अगदी कैरी चिरण्या पासून लोणच्याच्या घरी केलेल्या मसाल्यात त्या फोडींना हाताने खाली वर करून सरते शेवटी त्यांच्यावर तेल घालणं काय तो सुगंध दरवळतो. जिभेला पाणी सुटलेलेच असतं आता जठराग्नी भडकतो आणि त्या लोणच्याची आहूती मुखात पडते ती गरमागरम थालीपीठाच्या साथीने. जगण्यासाठी अजून काय हवंय. ही आहे संस्कृती.
संधी मिळते. पाच दिवस पुरक वातावरणही असतं त्यात तुम्ही असल्या फक्त निबंध स्पर्धा न घेता आपल्या पाच दिवसांच्या मेनू मधून चाउमीन, राजमा चावल, छोले चावल सारखे पदार्थ हद्दपार करा. हे पदार्थ वाईट नाहीत. उरलेले ३६० दिवस ते खा. पण ह्या पाच दिवसात…..
पाच दिवस महाराष्ट्राच्या विविधतेनी नटलेल्या खाद्य पदार्थांची रेलचेल करा. त्याप्रमाणे त्याची जाहिरात सुद्धा करायला हवी. सगळेच मार्ग पोटातून जातात. संख्या वाढेल आणि संस्कृतीही जोपासली जाईल.
आणि अजून एक – व्याकरणाची जास्त भिती दाखवणं पण घातक. वेलांटी पाहिली की दुसरी, उकार पहिला की दुसरा? भितीपोटी लोक मराठी लिहीतच नाहीत.
व्याकरण महत्वाचे आहेच पण एक एक पायरी वर गेल्यावर.
मंडळाच्या प्रत्येक कार्यक्रमात संस्कृती संवर्धनाच्या दृष्टीने एखादं पोष्टर, संतांचा फोटो त्यांच्या कार्याची माहिती असलेले पोष्टर लावता येईल, मुर्ती आणली तर आपसूकच त्यावर चर्चा होईल. मार्ग खुप आहेत. फक्त देखावा न करता मनापासून करावं लागेल आणि ते आपण नक्की करूयात.
आपली भाषा आणि आपली संस्कृती इतकीही लेचीपेची नाहीये.
*जय जय महाराष्ट्र माझा*