*⚔🌄पावनखिंड🌄⚔*
🔰 *भाग : ४७* 🔰
घोडखिंडीत घनघोर युद्ध चालू होतं. खिंडीत जाणारे मसूदचे अर्धे सैनिकही माघारी सुखरूप येत नव्हते. जे येत होते, ते परत लढण्याच्या अवस्थेत नव्हते. मसूद ओरडत होता, ‘मारो s काटो ss आगे बढोss’ पण त्या आव्हानाचा काही परिणाम होत नव्हता. मसूदचे सैनिक जेवढ्या हिरिरीनं पुढ येत होते, तेवढयाच तत्परतेनं मार खाऊन मागं सरकत होते. फुलाजी, बाजी व सारे मावळे रंगपंचमीच्या दरबारातून बाहेर पडावे, तसे दिसत होते. पांढरंपाणी गावापासून ते घोडखिंडीपर्यंतचा रस्ता शत्रूच्या रक्तानं आणि वीरांच्या जखमांनी माखला होता.
सूर्य मध्यान्हीला आला, तरी राजांची तोफ ऐकू येत नव्हती. वादळवाऱ्यातून वीस कोस धावून आलेल्या उपाशी मावळ्यांचं, जखमांनी जर्जर झालेलं अंग क्षणाक्षणाला थकत होतं. खिंडीच्या तोंडाशी लढणारे बाजी आपला तोल सावरत पट्टा चालवीत होते. मावळ्यांना उत्तेजन देत होते. एका शत्रूच्या वारानं त्यांचा तोल गेला. मावळ्यांनी त्यांना सावरलं. खिंडीत मागं आणून ठेवलं. बाजी माघारी आलेले पाहताच विश्रांती घेणारे फुलाजी धडपडत उठले. त्यांनी दोन्ही हातात तलवारी पेलल्या आणि खिंड लढवणाऱ्या मावळ्यांच्या सामोरे जाऊन, येणाऱ्या शत्रूबरोबर ते लढू लागले.
मसूदचे हजार सैनिक होते. त्यानं नव्या दमाची तुकडी सज्ज केली आणि ती खिंडीवर सोडली. नव्या दमाची तुकडी येताना पाहताच फुलाजी ओरडले,
‘मागं जा, मागच्यांना पुढं पाठवा.’
विश्रांती घेणारे वीर तत्परतेनं उठले. आपली शस्त्रं सावरून ते पुढं धावले. थकलेले वीर मागं येऊन दिसेल त्या ठिकाणी ढासळले.
एकच निकराची झुंज घोडखिंडीत सुरू झाली. खिंडीत तलवारी भिडल्याचे आवाज येत होते. आरोळ्या उठत होत्या___
‘जय भवानी’
‘दीन s दीन’
‘जय विंझाई’
‘अल्ला हो अकबर’
‘आगे बढो’
‘हर हर महादेव’
‘काटो, कतल करो’
‘पुढं व्हा! कापा, मारा! राजे गडावर पोहोचत नाहीत; तोवर एका माणसाचं पाऊल या खिंडीतून पुढं जाणार नाही.’
फुलाजी लढत असताना अचानक एकाकी पडले. ती संधी साधून मसूदचे चार धारकरी त्यांच्यावर तुटून पडले. फुलाजी त्यांच्याबरोबर दोन्ही हातांत तलवारी घेऊन, सारं बळ एक करून लढत होते. अचानक एकाचा वार त्यांच्या मानेवर पडला. तोल जाऊन फुलाजी कोसळले आणि ती संधी साधून मसूदच्या निर्घृण सैनिकांनी पडलेल्या फुलाजींवर वार चालवले. ते दृश्य पाहून सारे मावळे धावले. चारी बाजूंनी धावलेल्या त्या मावळ्यांनी मसूदच्या त्या सैनिकांची त्वेषानं कत्तल केली. आणि लढता-लढता गतप्राण झालेल्या फुलाजींचा देह उचलून मागं नेला.
जिथं बाजी विश्रांती घेत होते, तिथं फुलाजींचा देह आणला गेला. फुलाजींना पाहताच बाजी उठून उभे राहिले. ज्यांनी फुलाजींना आणलं, त्यांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले होते. फुलाजींच्याकडं पाहतच बाजी फुलाजींच्या मस्तकाजवळ बसले. एकटक नजरेनं फुलाजींकडे बाजी पाहत होते. नकळत ते उद्गारले,
‘भाऊ! जगण्याचं सार्थक केलंस! गेलास; म्हणजे जातोस कुठं! तू मोठा ना? तुझा मान पहिला! मी मागून आलोच!’ आपली आरक्त नजर भोवतालच्या मावळ्यांवरून फिरवत बाजी ओरडले, ‘रडता कशाला? तुमचा बाप पडला, त्याचा सूड घ्या! चलाss’
बाजी उठले आणि मागच्या मावळ्यांसमवेत ते खिंडीत दाखल झाले. आकाशीचा सूर्य मध्यान्हीकडं चढत होता. सारं आकाश ढगांनी व्यापलं होतं. धुक्याचे लोट खिंडीवरून जात होते. भिजल्या अंगावर, वाऱ्याच्या झोतांनी, झालेल्या जखमा तटतटत होत्या. दोन्ही हातांत पट्टे घेतलेले बाजी झोकांड्या देत पुढं येत होते. त्यांच्या नेत्रांत अंगार फुलला होता. थंडीचे दिवस असूनही त्यांच्या चेहऱ्यावर घाम डवरला होता. मस्तकावरच्या संजाबावारची शेंडी मानेवर सुटली होती. खिंडीसामोरे येत ते गर्जले,
‘आवो! आगे बढोss’
जखमांनी घायाळ झालेल्या त्या बाजींना दोन्ही हातांत पट्टे सरसावून येताना पाहताच मसूदचे सैनिक मागे हटत होते. ते किंचाळले,
‘शैतान आयाss पीछे हटोss’
बाजींच्या चेहऱ्यावर विक्राळ हास्य प्रगटलं होतं. आठवण येत होती, ती त्या शिवतांडवाची.
मसूदचा संताप वाढला होता. दोन प्रहर टक्कर देऊनही खिंड मोकळी झाली नव्हती. हजाराची शिबंदी असूनही यश मिळत नव्हतं. त्यानं बंदूकधारी बोलवला आणि सांगितलं,
‘कुछ भी हो! लेकिन वो शैतानs’
त्या बंदूकधाऱ्यानं मसूदला मुजरा केला. घोडखिंडीच्या दरडीवर तो बंदूकधारी चढत होता. खिंडीत लढणाऱ्या वीरांच्या ते ध्यानी येत नव्हतं. तो सैनिक बंदूक सावरत, सरपटत खिंडीवर सरकत होता. त्या सैनिकानं आपली जागा गाठली. त्या दरडीवरून त्याला खिंडीच्या तोंडाशी चाललेला रणसंग्राम दिसत होता. एखादा अचानक धुक्याचा लोट येई. सारं दिसेनासं होई. दोन्ही हातांत पट्टे चढवून लढणाऱ्या बाजींच्यावर तो सैनिक निशाण धरत होता. बाजी लढत होते आणि बंदुकीचा बार कडाडला होता. धूर ओकीत ती लांब नळ्याची बंदूक मोकळी झाली. सैनिकानं पाहिलं. तो बाजी मागं कोसळत होते.
बाजींचे वीर धावले. त्यांनी पाठीत गोळी शिरलेल्या बाजींना सावरलं. बाजी ओरडत होते,
‘लढा! जिवाचं मोल बाळगू नका. अजून राजेss’
बाजींची ती अवस्था पाहून साऱ्यांना नवचैतन्य प्राप्त झालं. खिंड परत त्याच हिरिरीनं लढू लागली.
बाजींना माघारी आणलं गेलं. बाजींची काही काळ शुद्ध हरपली होती. रक्ताचा ओघ थांबण्यासाठी एका वीरानं आपला कमरबंद बाजींच्या जखमेवर खुपसला होता.
बाजींना जाग आली. त्यांनी भोवती जमलेल्या साऱ्यांकडं पाहिलं. भान येताच त्यांनी विचारलं,
‘तोफ झाली?’
साऱ्यांच्या नेत्रांत पाणी तरळलं होतं. कोणी काही बोलत नव्हतं. बाजींचा चेहरा बदलला. कुणाच्याही अडकाव्याला दाद न देता बाजी सर्व बळानिशी बसले. सर्वांवर नजर फिरवीत ते म्हणाले,
‘राजे गडावर अजून पोहोचले नाहीत?’
उत्तर काय द्यावं, हे कुणालाही कळत नव्हतं. कुणी तरी धीर करून म्हणालं,
‘अजून तोफेचा आवाज झाला नाही.’
‘तोफेचा आवाज झाला नाही?’ बाजी बोलले, ‘कान बहिरे झाले का?’
बाजी उठण्याचा प्रयत्न करीत असता कोणीतरी म्हणालं,
‘बाजी, तुम्ही स्वस्थ पडा! खिंड आम्ही लढवतो.’
‘स्वस्थ पडू?’ बाजी उद्गारले, ‘राजे गडावर पोहोचले नाहीत, तोवर बाजी मरेल कसा? माझा इटा द्या.’
बाजी तोल सावरत उठले. उभे राहिले. धारदार टोकाचा इटा बाजींच्या हातात दिला गेला. बाजी त्या इट्याच्या आधारानं चालत होते.
सारे मावळे बाजींकडं एखादं स्वप्न पाहावं, तसे पाहत होते.
*🚩 क्रमशः 🚩*