*⚔🌄पावनखिंड🌄⚔*
🔰 *भाग : ४२* 🔰
गंगाधरपंत गडावर आले. सदरमहालात राजे त्यांची वाट पाहत होते. गंगाधरपंतांना पाहताच राजांनी विचारलं,
‘बोला, गंगाधरपंत!’
‘राजे, आपल्या भेटीच्या वार्तेनं सिद्दी समाधानी बनला आहे. फाजल मात्र संतप्त दिसत होता.’
‘त्यात चूक काय आहे? अफजलचा वध आम्ही केला, हे सदैव त्याला डाचत राहिलच.’ राजांनी सांगितलं, ‘पंत, आम्ही उद्या सिद्दीच्या भेटीला जाणार, ही बातमी गडावर पसरू द्या. योजल्याप्रमाणे पार पडलं, तर आम्ही या वेढ्यातून बाहेर पडू. नाही जमलं, तर सिद्दीच्या भेटीला जावं लागेलच!’
‘राजे!’ बाजी म्हणाले, ‘आपल्या आखल्या बेतात एक तसूभर जरी कस राहिला असता, तरी मी ही जबाबदारी घेतली नसती. खेळणा गड मोकळा आहे. आपल्याला खेळणा गडावर पोहोचवण्याची जबाबदारी माझी.’
‘बाजी! ती आम्हांला कधीच शंका नव्हती. पण कुठलाही बेत करताना अरिष्टांची चिंता राहावी, म्हणून आम्ही ते बोललो.’
‘राजे! अरिष्ट कोसळू नये, म्हणून तर आम्ही आपल्या भोवती गोळा झालो. येणारं संकट आम्ही आनंदानं पेलू.’ बाजींनी सांगितलं.
‘बाजी, हा खेळ आम्ही आमच्यासाठी मांडला नाही. आम्ही या कारणी हरवलो, तरी हा डाव असाच चालू राहिला पाहिजे.’
मध्यान्हीचा सूर्य ढळला, तरी कुणाला जेवणा-खाण्याची जाणीव राहिली नव्हती. बाजींनी आपली माणसं निवडली होती. त्र्यंबक भास्कर, गंगाधरपंत, राजांच्या संगती जाणारं दळ, सामान यांची देखरेख करीत होते.
सायंकाळी राजे सदर महालातून बाहेर आले. सज्जाकोठीच्या समोरच्या छपरीत दोन पालख्या सजल्या होत्या. राजांनी बाजींना विचारलं,
‘बाजी, पालखी कशाला?’
‘आपल्यासाठी!’
‘नाही, बाजी. आम्ही तुम्हां सर्वांच्या संगती चालत जाऊ.’
‘क्षमा असावी, महाराज!’ बाजी म्हणाले, ‘वाट बिकट आहे. पल्ला दूरचा आहे. काळोखातून जावं लागेल. ते आपल्याला झेपणार नाही.’
‘तुम्ही म्हणाल, ते खरं!’ राजे पालखीकडं पाहत विचारते झाले, ‘पण दोन पालख्या कशाला?’
‘एक आपल्यासाठी. आणि….’
‘आणि?’
‘दुसरी शिवा न्हाव्यासाठी!’
‘शिवा!’ राजे उद्गारले.
‘हो! प्रसंग पडला, तर शिवा न्हाव्याची पालखी सिद्दीच्या तळावर जाईल. आपलं रूप घेऊन.’
राजे बाजींच्याकडं पाहतच राहिले, आपला सारा उद्वेग संयमित करीत राजे म्हणाले,
‘बाजी, कसला अघोरी खेळ खेळता हा!’
‘राजे!’ बाजी धिटाईनं म्हणाले, ‘आपली जबाबदारी मी पत्करली आहे. तुम्हीच सांगितलं की, हा डाव मांडला, तो तुमच्यासाठी नव्हे. तो पुरा करायचा झाला, तर तुम्ही राहिलं पाहिजे. आपण सुखरूपपणे खेळण्यावर पोहोचणं एवढीच ही कामगिरी आहे.’
‘जेवढी तुमची कामगिरी सरळ आहे, तेवढी आमची नाही, याचंच दुःख आम्हांला फार आहे.’ राजे कातर होऊन बोलले.
‘राजे! आमचं काही चुकलं का?’ बाजी म्हणाले.
‘नाही, बाजी! तुम्हांला आम्ही वडिलकीचा मान दिला, तो आम्हांला पाळायला हवा. तुमची आज्ञा आम्ही कधीही डावलणार नाही.’
राजे सदर महालाच्या दुसऱ्या मजल्यावर निघून गेले.
बाजी एकटे सदर महालाच्या खालच्या दिवाणखान्यात उभे होते. त्यांनी शिवा न्हाव्याला हाक मारली. शिवा न्हावी आला. बाजी त्याला आलेला पाहताच बेचैन बनले.
शिवानं विचारलं,
‘का, बाजी, का बोलवलंत?’
बाजी म्हणाले,
‘एक जोखमीची कामगिरी आहे. करशील?’
शिवा हसला. म्हणाला,
‘धनी, जोखीम सांगितली आणि ती पाळली नाही, असं कधी झालं?’
‘एवढी सोपी जोखीम नाही ही!’ बाजी म्हणाले, ‘प्रसंग आला, तर जीव गमवावा लागेल. चालेल?’
शिवाच्या चेहऱ्यावर तेच हास्य होतं. त्यानं सांगितलं,
‘ जीव! त्याची बढाई कशाला सांगता? कवाबी मरायचं नव्हं? पन जीव ओवाळून टाकावं, असं कुणीतरी भेटायला हवं!’
‘तुझ्याच नशिबी ते भाग्य आहे.’ बाजी म्हणाले, ‘रात्री राजांना घेऊन आम्ही गडाबाहेर जाणार आहोत. तुला दुसरे राजे बनायला हवं. दुर्दैवानं राजांची जाग मेटेकऱ्यांना लागली, तर तुला राजे बनून सिद्दीच्या छावणीवर जावं लागेल. राजे वेढ्याबाहेर जाईपर्यंत तुला सिद्दीला गुंतवावं लागेल. आहे तयारी?’
‘असली संधी कोन सोडंल? आता बेत बदलू नका. ती जोखीम माझी.’ शिवा म्हणाला.
‘शाबास, रे वाघा!’ म्हणत बाजींनी शिवाला मिठी मारली. ‘मला खात्री होतीच.’ कोपऱ्यातल्या मंचावर ठेवलेल्या कपड्यांकडं बोट दाखवत बाजी म्हणाले, ‘राजांचे कपडे ठेवले आहेत. ते अंगावर चढव.’
शिवाने राजांचा पोशाख चढवला. अंगरख्याचे बंद बांधत असता बाजी आत आले. आपल्या हातानं त्यांनी शिवाच्या मस्तकी जिरेटोप घातला. चार पावलं मागं सरकून ते शिवाचं रूप बघत होते.
‘छान!’ बाजी समाधानानं म्हणाले, ‘ज्यांनी राजांना जवळून पाहिलं नाही, त्यांना तू राजेच वाटशील.’
बाजींनी शिवाला दुशेला बांधला. दुशेल्यात कट्यार, तलवार खोवली. आणि त्याच वेळी गंगाधरपंत आत आले. शिवाला पाहताच त्यांनी हात जोडले.
बाजी, शिवा हसले. शिवाकडं पाहताच गंगाधरपंत उद्गारले,
‘कोण…. तुम्ही…तू….”
‘काय पंत! सोंग सजलं ना?’
‘बेमालूम!’ पंत म्हणाले, ‘एकदम राजांचा भास होतो.’
‘शिवा, सोंग उभं राहिलं. पण तुझी भाषा! ते कसं जमणार?’
शिवानं कमरेवर मूठ ठेवली. बाजींकडे पाहत तो म्हणाला,
‘बाजी, तुम्हांला शंका का यावी? पंत, आमच्या आज्ञेप्रमाणे खलिता रवाना झाला ना? आमच्या आज्ञेत कुचराई झाली, तर अक्षम्य गुन्हा ठरेल. ध्यानी घ्या!’
पंत आणि बाजी आश्चर्यानं शिवाचं बोलणं ऐकत होते.
पंत म्हणाले,
‘बाबा, रे! हे केव्हा पाठ केलंस?’
‘आता राजांच्या संगती राहून येवढंबी येत न्हाई?’ शिवानं सवाल केला.
‘येत, बाबा, येत!’ बाजींनी सांगितलं, ‘पंत ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद वदवला, हे खोटं वाटत होतं. आज ते पटलं.’
दोघं मोठ्यानं हसले. शिवानं विचारलं,
‘मला समजलं न्हाई.’
‘नाही समजलं, तेच बरं!’ बाजी शिवाच्या पाठीवर हात फिरवीत म्हणाले, ‘वरच्या महालात राजे आहेत, त्यांना मुजरा करून ये.’
वरच्या महालाशी शिवाचे पाय अडखळले. त्याचं मनं संकोचलं होतं.
राजे महालात उभे होते. पावलांचा आवाज ऐकताच ते वळले. त्यांनी हाक दिली,
‘कोण आहे?’
शिवानं आत पाऊल टाकलं आणि राजांना मुजरा केला. राजांना आपण आपली प्रतिमाच पाहतो, असा भास झाला. शिवाकडं पाहत ते म्हणाले,
‘शेवटी, बाजींनी आपला हट्ट पुरा केला, तर… शिवा, शिवाजी होणं इतकं सोपं नाही. कदाचित तुझ्यामुळं आम्ही सुटून जाऊ. पण तू सुटणं कठीण. त्या कर्दनकाळ सिद्दीच्या हातांत आपसूक सापडशील तू. तुला कोणी दया दाखवणार नाही. त्याचाच विचार आम्ही करीत आहोत.’
शिवानं राजांचे पाय धरले. तो म्हणाला,
‘राजे, आता विचार करू नका. भवानीची आण आहे तुम्हांला. तुम्ही राहिला, तर माझ्यासारखे लाख शिवा जन्माला येतील. तुमच्या कारणी जीव पडला, तर जन्माचं सोनं होईल.’
राजांनी शिवाला उभं केलं. एक निःश्वास सोडून ते म्हणाले,
‘ठीक आहे. जे आपल्या नशिबी असेल, ते होईल. जा, शिवा. आम्हांला एकटं राहू दे.’
शिवा वळला. तोच राजांची हाक कानांवर आली,
‘शिवा थांब!’
राजांनी आपली संदूक उघडली. त्यातली एक कवड्यांची माळ काढली. आपल्या गळ्यातला मोत्याचा कंठा त्यांनी शिवाच्या गळ्यात घातला आणि कवड्यांची माळ त्याच्या गळ्यात घालत ते म्हणाले,
‘शिवा, तो सिद्दी जौहर कशानं फसला नाही, तरी ही कवड्यांची माळ बघून फसेल. हे भोसल्यांचं खरं लेणं. भवानीचा प्रसाद. देवीच्या भक्ताची खूण. हिला कमीपणा आणू नको.’
राजांनी शिवाला मिठीत घेतलं. त्यांना अश्रू आवरत नव्हते.
शिवा म्हणाला,
‘महाराजs’
त्याला मिठीतून दूर करीत, हात हलवत राजे भरल्या आवाजात म्हणाले,
‘तू जा! आम्हांला एकांत हवा.’
पाठमोऱ्या राजांना मुजरा करून शिवा महालाबाहेर गेला. राजे भारल्यासारखे त्याच जागी खिळून होते.
कसली माणसं तयार केली आम्ही?
आमच्यासाठी मरू जाणारे जीव का शोधत होतो?
त्याचसाठी का हा स्वराज्याचा पट मांडला?
या पटावरची मोहरी अशीच उधळायला लागली, तर आमचा डाव साधणार कसा?
राजे! असला दुसऱ्या जिवाशी खेळ खेळण्याचा तुम्हांला काही अधिकार नव्हता!
अधिकार?
कुणाचा?
कोणी कुणावर गाजवायचा?
अधिकार गाजवतात बाजी.
हा शिवा आग्रह धरतो.
एवढं स्वस्त मरण कोणी केलं नसेल, ते ही माणसं करताहेत.
या राजेपणाचा वीट येतो, ते याचमुळं!
राजांना काही सुचत नव्हतं. ते तसेच मंचकाजवळ गेले आणि त्यांनी स्वतःला मंचकावर झोकून दिलं.
*🚩 क्रमशः 🚩*