*⚔🌄पावनखिंड🌄⚔*
🔰 *भाग : ४१* 🔰
सदर महालात अहोरात्र खलबतं चालू होती. दिवसा, रात्री, भर पावसातून, धुक्यातून महादेव धारकऱ्यांसह बाहेर पडत होता. माघारी येत होता.
___आणि एके दिवशी गंगाधरपंत तहाचा खलिता आणि पांढरं निशाण हाती घेऊन मोजक्या धारकऱ्यांनिशी गडाखाली तहासाठी उतरले.
सिद्दी जौहरनं त्यांचं स्वागत केलं. अभय मिळाल्यास, आपण सारे किल्ले शरण करून बादशहाच्या सेवेस हजर राहण्यास तयार आहोत, असं राजांनी सिद्दीस कळविलं होतं.
वादळ-वाऱ्यात, उभ्या पावसात सापडलेल्या सिद्दीच्या छावणीला ती बातमी आनंददायक वाटली. तहाची बोलणी सुरू झाली. गंगाधरपंत गडावरून सिद्दीच्या छावणीपर्यंत येरझाऱ्या घालीत होते – आणि शेवटी राजांनी सिद्दीची भेट घेण्याचं ठरवलं.
राजांनी सकाळच्या वेळी बाजींना बोलावून घेतलं. बाजी येताच ते स्मित वदनानं म्हणाले,
‘बाजी, आम्ही दोन दिवसांनी सिद्दीच्या भेटीला जाणार. या असल्या वादळी हवेत, भर पावसात आमच्या या सैनिकांनी निष्ठेनं पहारा ठेवला. त्यांना मानाचे विडे द्यायला आम्ही जायला हवं!’
‘आपण जाणार?’ बाजींनी विचारलं.
‘हो!’ राजांनी हाक मारली, ‘शिवाs’
आतून शिवा बाहेर आला. बाजी थक्क होऊन शिवाकडं पाहत होते. राजांचे कपडे त्यानं परिधान केले होते. मस्तकी जिरेटोप होता. कपाळी शिवगंध होतं. शिवाच्या रूपानं राजांचं दुसरं रूप साकार झालं होतं.
राजे म्हणाले,
‘बाजी, या शिवाजी राजांच्या समवेत तुम्ही जा. सैनिकांना, मानकऱ्यांना मानाचे विडे देऊन माघारी या.’
बाजी हसले. त्यांना सर्व समजलं.
थोड्याच वेळात राजांचा विश्वास घोडा उभा केला गेला. शिवाबरोबर जाणारे शिबंदीचे घोडे तयार होते. शिवानं राजांना मुजरा केला आणि तो सदरेवर आला. पण राजे बाहेर आले नाहीत. शिवापाठोपाठ बाजी चालत होते. शिवानं विश्वास घोड्यावर मांड टाकली आणि बाजींच्यासह ते अश्वपथक चार दरवाज्याकडं जाऊ लागलं.
पाऊस थांबला होता. धुक्याचे लोट गडावरून वाहत होते. दोन प्रहरच्या वेळी शिवासह बाजी परत आले. वाड्यात येताच राजांनी शिवाला विचारलं,
‘मानाचे विडे दिले?’
‘जी!’
बाजी हसत म्हणाले,
‘राजे, हा शिवा खरा सोंगाड्या आहे. आपल्या माणसांना तर विडे घेताना बहुमान वाटला. एवढंच नव्हे, तर गडाखाली उतरत असता आमच्या माणसांनी ह्याला ओळखलं नाही. सारे मुजरे करीत होते आणि हा घोड्यावरून मान तुकवून मुजऱ्यांचा स्वीकार करीत होता.’
‘जसं सोंग, तसा रिवाजss’ राजे शिवाला म्हणाले, ‘शिवा, ते कपडे व्यवस्थित ठेव. कुणास माहीत, त्याची गरज केव्हा लागेल, ती!’
हे बोलत असता राजांच्या मुखावर सदैव विलसणारं स्मित लुप्त झालं होतं.
रात्री सदर महालात खास बैठक भरली होती. त्र्यंबकजी, बाजी, फुलाजी, महादेव, शिवा न्हावी, गंगाधरपंत एवढीच मंडळी तिथं होती. राजे सांगत होते,
‘बाजी, पन्हाळा खूप महिने लढवता येईल, हे खरं. पण तेवढी उसंत आम्हांला नाही. शाईस्तेखानाचं संकट पुण्याच्या उंबरठ्यावर आलं आहे. हा पावसाळा संपला की, गारठलेली सिद्दी जौहरची फौज ताजीतवानी होईल. नंतर वेढा लढवणं एवढं सोपं जाणार नाही.’
बाजी विश्वासानं बोलले,
‘त्याची चिंता नसावी, राजे. महादेवनं शोधलेली वाट सुखरूप आहे. काल महादेव परत जाऊन आला. पश्चिमेच्या दोन मेटी पातळ आहेत. डोंगराच्या कडेकडेनं जावं लागेल.’
‘आणि शत्रू सावध झाला तर?…’ त्र्यंबकजी म्हणाले.
‘शत्रू सावध झाला, तर…. जाग्याला कापून काढू.’ बाजींची छाती रुंदावली होती.
‘तेही जमेल!’ राजे म्हणाले, ‘पण खेळणा वीस कोस दूर. शत्रूनं गाठायच्या आधी तो गड जवळ करता येईल?’
‘राजे!’ बाजी म्हणाले, ‘फक्त वेढ्यातून बाहेर पडू या. पुढं खेळणा गाठायची जबाबदारी आमची.’
राजांची नजर गंगाधरपंतांच्याकडं वळली. ते म्हणाले,
‘पंत! सिद्दी जौहरसाठी आमचा खलिता तयार करा. त्यात लिहाः ‘सलाबत खानानं मध्यस्थी करून अली शहांच्याकडं रदबदली करावी; म्हणजे आम्ही आपलं सर्वस्व त्यांच्या चरणी अर्पण करू.’ आणि सिद्दी जौहरना सांगा की, आमच्या जीविताची हमी दिली, तर आम्ही आनंदानं त्यांच्याशी दिलखुलास वाटाघाटीसाठी त्याच्या छावणीत हजर होऊ.’
‘दुसरे दिवशी पहाटेपासून बाजी, फुलाजी, यशवंत, बांदल मावळे निवडत होते. सदर महालासमोर दोन पालख्या सज्ज केल्या जात होत्या. त्या महालाकडं कोणीही फिरकू नये, असा पहारा जारी केला होता.’
पावसाची उघडीप मिळताच गंगाधरपंत राजांचा खलिता घेऊन पांढऱ्या निशाणासह गडाखाली उतरले.
सिद्दी जौहरच्या छावणीत शिवाजीची माणसं पांढरं निशाण घेऊन येत असल्याची बातमी गेली. सिद्दी जौहर, फाजलखान, मसूद सारे गंगाधरपंतांची वाट पाहत होते.
गंगाधरपंत डेऱ्यात आले. अत्यंत नम्रतेनं त्यांनी सिद्दीच्या हाती खलिता दिला. सिद्दीनं तो खलिता शेजारच्या दुभाष्याकडं दिला. खलित्याचा मसुदा समजताच सिद्दी जौहर म्हणाला,
‘ठीक है! राजासाब यहाँ कब हाजिर होंगे?’
‘आपण राजांच्या जीविताची हमी दिली, तर राजे उद्या आपल्यासमोर हजर होतील.’
‘आम्ही जरूर हमी देऊ.’ सिद्दी जौहर म्हणाला, ‘पण राजासाब त्यावर विश्वास ठेवतील?’
‘का नाही?’ गंगाधरपंत म्हणाले.
‘आणि दगा झाला, तर?’
‘अशक्य!’ गंगाधरपंत म्हणाले, ‘दगा होणार नाही, याचा राजांना पुरा विश्वास आहे.’
‘मतलब?’ सिद्दीनं विचारलं.
‘राजे, हे फर्जंद शहाजीराजांचे सुपुत्र आहेत. राजांच्या केसाला जरी धक्का लागला, तरी शहाजी राजांना हे सहन होणार नाही.’
सिद्दी जौहरला गंगाधरपंतांचं भाषण ऐकून कौतुक वाटत होतं. तो म्हणाला,
‘बिलकुल दुरुस्त! आम्हांला तुमच्या राजांच्या सावधगिरीचं जरूर कौतुक वाटतं. राजांना सांगा, त्यांच्या भेटीसाठी आम्ही उतावीळ आहोत.’
सिद्दी जौहरनं जरी वस्त्रं, विडे देऊन गंगाधरपंतांना सन्मानित केलं. आणि गंगाधरपंत गडाकडं जायला निघाले.
गंगाधरपंत निघून जाताच, रागानं उसळलेला फाजलखान म्हणाला,
‘येऊ दे तो शिवा! ज्यानं माझ्या आब्बाजानची कत्तल केली, त्याला मी जिंदा सोडणार नाही.’
सिद्दी जौहरची तिखट नजर फाजलवर गेली. सिद्दी म्हणाला,
‘हां, फाजल! ही माझी छावणी आहे. माझ्या हुकमाखेरीज इथं गवताची काडीही हलता उपयोगी नाही.’
‘लेकिन…’
‘फाजल! त्या शिवाला दरबारात हजर करणं, एवढंच माझं काम आहे. तो दरबारी गेल्यानंतर तुम्ही आणि दरबार हवा तो निर्णय घ्या.’
‘तो शिवा एवढा सरळ नाही. आब्बाजानला त्यानं असंच फसवलं होतं.’
सिद्दी जौहर मोकळेपणानं हसला. त्याच्या हसण्यानं सारा डेरा भरून गेला. सिद्दीचा आवाज उठला,
‘फाजलखान! त्या भेटीत ह्या भेटीत फार फरक आहे. इथं सिद्दी जौहर आहे आणि तो अफजलखान होता. त्या वेळी तुझे आब्बाजान मूर्खपणानं, एकटे शिवाजीला भेटायला त्याच्या गोटात गेले होते. उद्या शिवाजी आमच्या गोटात येतो आहे…’
शिवाजी राजे उद्या छावणीत येणार, या वार्तेनं सिद्दी जौहरचा वेढा आनंदीत झाला.
वेढ्याचा ताण ढिला पडला.
विजापूरच्या दरबारातलं आपलं स्वागत रंगवण्यात सिद्दी जौहर मशगूल झाला होता.
बाहेर उभा पाऊस कोसळत होता.
*🚩 क्रमशः 🚩*