पावनखिंड 37

*⚔🌄पावनखिंड🌄⚔*

 

🔰 *भाग : ३७* 🔰

 

 

गडाखाली वेढ्याची तयारी जोरात सुरू झाली होती. सर्व वाटा रोखल्या गेल्या. ठायी ठायी डेरे, शामियाने उभारले जात होते. घोडदळाची फिरती गस्त चालू होती. रात्री सिद्दी जौहरच्या छावणीतल्या मशाली बघून आकाशातली नक्षत्रं धरित्रीवर उतरल्याचा भास होत होता.

एके दिवशी धुरळ्याचे लोट उडवत सिद्दी जौहर आपल्या घोडदळासह नौबत वाजवीत आपल्या छावणीत हजर झाला. सिद्दी जौहर येताच त्यानं वेगानं वेढा वाढवायला सुरूवात केली. पूर्वेच्या बाजूला स्वतः सिद्दी जौहर, फाजल, बडेखान व रुस्तुमेजमां होते. पश्चिमेला सादतखान, मसूद, बाजी घोरपडे, भाईखान होते.

तोफांचे मोर्चे बांधले जात होते. छावणीची वर्दळ, तोफांच्या जागा, सैन्याची वर्दळ गडावरून दिसत होती.

राजे ते शांतपणे पाहत होते.

‘राजे! आपण काय करायचं?’ बाजींनी विचारलं.

‘बघायचं!’ राजे म्हणाले.

‘नुसतं बघायचं?’

‘हो! त्यांची चाल प्रथम समजायला हवी. त्यानंतर आपली पावलं टाकायची. बघता-बघता उन्हाळा संपेल. मग मृगराज आपल्या दळासह आपल्या मदतीला येतील. विजापूरच्या कोरड्या मुलखावर वाढलेली ही माणसं आमच्या पावसापुढं टिकाव धरणार नाहीत. त्यांना ते परवडायचं नाही. त्या दिवासाची आपण वाट पहायला हवी.’

 

दुसऱ्या दिवशी गडावर तोफांचे आवाज येऊ लागले.

राजे सज्जा कोठीवर गेले. सिद्दी जौहरच्या तोफा वाजत होत्या. पण एकही गोळा गडाच्या पायथ्याशी पोहोचत नव्हता.

राजे हसत म्हणाले,

‘नेमबाजीचा सराव करीत असावेत!’ त्र्यंबकजींच्याकडं वळून ते म्हणाले, ‘त्र्यंबकजी! एवढा तोफांचा भडिमार होतो आणि गडावरून त्याला उत्तर दिलं जात नाही?’

त्र्यंबकजी संकोचले. ते म्हणाले,

‘बाजींनी तशी आज्ञा दिली आहे.’

‘आज्ञा? कसली?’

‘बाजी म्हणाले की, आम्ही सांगितल्याखेरीज एकही तोफ उडता कामा नये.’

‘असं बाजी म्हणाले? त्यांना बोलावून घ्या.’

थोड्याच वेळात बाजी फुलाजींसह सज्जा कोठीवर हजर झाले. राजांना मुजरा करून ते उभे राहिले. राजांनी विचारले,

‘बाजी! आम्ही तुमचीच वाट पाहत होतो.’

‘राजे! गडाची पश्चिम बाजू पाहायला आम्ही गेलो होतो.’

राजे म्हणाले,

‘इकडं पूर्वेकडून सिद्दी जौहर तोफांचा भडिमार करतो आहे. आणि तुम्ही पश्चिमेला गेलात?’

‘आम्ही समजलो नाही!’

‘समजायचं काय?’ राजे म्हणाले, ‘गडावर तीनशे तोफा असून शत्रूला प्रत्युत्तर दिलं जात नाही. त्र्यंबकजी सांगतात की, ती आज्ञा तुम्ही केली, म्हणून! खरं?’

‘जी! खरं आहे.’

‘पण का? कशासाठी?’

‘राजे! सिद्दीच्या तोफा उडत असतील. कदाचित तो आपल्या नेमबाजीचा सराव करीत असेल. त्याच्या तोफांचे गोळे गडावर यायला त्याला दुसरा जन्म घ्यावा लागेल.’

राजांच्या मुखावरचं स्मित तेच होतं. त्यांनी विचारलं,

‘पण तो आपल्याला कमकुवत समजेल ना!’

‘राजे! तेच व्हायला हवं. एकदा सिद्दी जौहर टप्प्यात येऊ द्या. मग त्याला समजेल; पन्हाळ्याची ताकद काय आहे, ती!’

राजांना आपला संयम राखणं कठीण जात होतं. आनंदभरित झालेल्या राजांनी बाजींच्या खांद्यावर हात ठेवला. ते म्हणाले,

‘बाजी! हा संयम क्वचित दिसतो. तुम्हांला बांदल देशमुखांनी दिवाण नेमलं, याचं रहस्य आज आम्हांला उलगडलं.’

सिद्दी जौहर तोफांचे गोळे उडवत होता. पूर्व व पश्चिम बाजूंनी आवाज उठत होते. पण गडावरून एकही आवाज उठत नव्हता. ती अवस्था बघून सिद्दीच्या चेहऱ्यावर हसू उमटत होतं. पन्हाळ्याच्या आश्रयाला गेलेल्या राजांना मजबूत गड मिळाला असेल, पण गडाची लढण्याची ताकद नाही, असा अंदाज होता. दुसऱ्या दिवाशीच सुलतान ढवा करण्याचा बेत त्यानं आखला. त्या अंदाजानं त्यानं सैन्याची विभागणी केली.

राजांची अपेक्षा तीच होती. दुसरे दिवशी राजे पूर्वेच्या बुरूजावर दाखल झाले. गडावरच्या तीनशे तोफा माचून तयार झाल्या. राजे बुरूजावरून पाहत होते. रात्रीत सिद्दीच्या तोफा पुढं सरकल्या होत्या. तोफांचे गोळे उतरंडीवर कोसळत होते आणि काही वेळानंतर सिद्दीची फौज गडाकडं येताना दिसू लागली.

गडावर सर्वत्र शांतता पसरली होती. भर उन्हातून सिद्दीची फौज ‘दीन s दीन ss’ म्हणत गडाकडं धावत होती.

राजांच्या चेहऱ्यावर नेहमी दिसणारे स्मित दिसत होतं. बाजींनी अधीरतेनं विचारलं,

‘राजे! आता?’

‘नाही, बाजी! तो निर्णय तुम्ही घ्यायचा! या क्षणापर्यंत तुम्हीच आमचा तोफखाना थांबवलात. यापुढची चाल तुमची. आम्ही सज्जा कोठीतून तुमची करामत पाहतो.’

राजांच्या त्या बोलण्यानं बाजी सुखावले. विश्वासानं धावत ते सज्जा कोठीतून उतरले. पाठीमागून आलेल्या त्र्यंबक भास्करना म्हणाले,

‘त्र्यंबकजी, तुम्ही तीन दरवाज्याकडं जा. आमची तोफ डागल्याखेरीज तुमच्या तोफा डागू नका.’

त्र्यंबकजी तीन दरवाज्याकडं रवाना झाले. बाजी पूर्वेच्या बुरूजावर आले. तोफ सज्ज होती. बाजी गडाच्या पायथ्यावरून येणारे सिद्दी जौहरचे सैनिक पाहत होते. बाजींनी हात वर केला आणि ते गरजले,

‘जय भवानी ss’

__आणि पन्हाळगडच्या पूर्वेच्या बुरूजावरून पहिली तोफ कडाडली. तिचा आवाज विरतो, न विरतो, तोच साऱ्या तोफा आग ओकू लागल्या. निर्भयतेनं येणाऱ्या शत्रूच्या फौजेवर आगीचा वर्षाव झाला. खाली एकच गदारोळ उडाला.’

सिद्दी जौहरची माघार घेणारी फौज राजे आनंदानं पाहत होते.

सिद्दी जौहरनं आपली माणसं, तोफा मागं खेचल्या. ती धावपळ पाहण्यास गडावरच्या साऱ्या तटावर गडाच्या शिबंदीची माणसं गोळा झाली होती. ‘जय भवानीs’ आणि ‘हर हर महादेव’ च्या गर्जनेनं सारा गड निनादत होता.

 

 

*🚩 क्रमशः 🚩*