पावनखिंड 36

*⚔🌄पावनखिंड🌄⚔*

 

🔰 *भाग : ३६* 🔰

 

 

वाड्याच्या राजसदरेवरती मशाली पेटल्या होत्या. राजे सदरेवर येताच पोशाख बदलून आलेले बाजी, फुलाजी आणि त्र्यंबकजी यांनी राजांना मुजरे केले. राजांनी विचारलं,

‘काय, त्र्यंबकजी! गडाची हालहवाल काय म्हणते?’

त्र्यंबकजींना काही बोलता येत नव्हतं. त्यांना जोराची शिंक आली. उपरण्यानं आपली शिंक सावरत ते म्हणाले,

‘ठीक आहे, महाराज!’

राजे हसले. ते त्र्यंबकजींच्याकडं पाहत होते. त्र्यंबकजींचा सारा चेहरा तांबडाबुंद झाला होता. राजे हसले. ते म्हणाले,

‘बस्स! एक वळीवात भिजलात, तर सर्दी झाली!’

बाजी म्हणाले,

‘राजे! जो गड मातब्बर असतो, सुरक्षित असतो, त्या गडाचे किल्लेदार नेहमीच नाजूक तब्येतीचे असतात.’

‘अगदी खरं!’ राजे म्हणाले, ‘त्यासाठीच माणसांना संकटांचा सराव व्हावा.’

अचानक बाजींच लक्ष सदरेवर येणाऱ्या शिवा न्हाव्याकडं गेलं आणि ते एकदम उद्गारले,

‘या, राजे!’

राजांनी शिवा न्हाव्याकडं पाहिलं आणि बाजींना ते म्हणाले,

‘काय म्हणालात, बाजी?’

बाजी हसले,

‘पाडव्याच्या दिवशी खेळ झाला. त्या दिवशी गडावर पोरांनी सोंगं काढली होती… आणि अचानक आपण आलात, म्हणून गलका झाला. सारे मुजरे करीत होते आणि आपलं सोंग घेतलेला हा शिवा मुजरे स्वीकारत पुढं येत होता.’

राजे शिवाकडं पाहत होते.

शिवा राजांच्या अंगलटीचा. बाकदार नाकाचा. राजांच्या चेहऱ्याशी जुळणारा होता. त्याची दाढी-मिश्यांची ठेवण राजांच्यासारखीच होती.

थिजल्यासारखा शिवा न्हावी खांबाशी उभा होता.

राजे एकटक नजरेनं त्याच्याकडं पाहत होते.

बाजींची नजरही राजांच्या नजरेबरोबर शिवावर खिळली होती.

 

कोल्हापूर सोडून सिद्दी जौहर पन्हाळ्याच्या दिशेनं येतो आहे, ही बातमी गडावर पोहोचली. त्र्यंबक भास्कर आणि बाजी गडावरच्या दिशेनं बुरूजांवरच्या तोफांची पाहणी करून आले. येवढं मोठं संकट येत असताही गडावरच्या कुणाच्याही मुखावर चिंतेची रेघ उमटली नव्हती. राजांचा आधार, राजांचं वास्तव्य त्यात सारे निर्धास्त होते.

राजे दोनप्रहरच्या वेळी विश्रांती घेत असता, त्र्यंबक भास्कर आल्याची वर्दी त्यांना मिळाली. राजे उठून सदरेवर आले. राजांनी विचारलं,

‘सिद्दी जौहर आला ना!’

‘जी! गडाच्या पायथ्याजवळ त्याची फौज थडकली आहे.’

‘चला, पाहू.’

राजे सज्जा कोठीवर गेले. गच्चीतून ते पाहत होते.

भर उन्हाळ्यात एखादा वळवाचा काळा ढग माळवदावरून आपली सावली टाकीत यावा, तसा फौजेचा लोंढा गडाखाली येत होता. घोड्यांच्या टापांचे आवाज गडापर्यंत पोहोचत होते.

राजे ते दृश्य शांतपणे पाहत होते. राजे मागं उभ्या असलेल्या बाजींना म्हणाले,

‘बेत तर मोठा दिसतो! बाजी, आपल्या आयुष्यात आम्हांला कधी विश्रांती मिळाली नाही. या सिद्दीच्या वेढ्यामुळं ती आम्हांला मनमुराद घेता येईल, असं वाटतं.’

एवढं मोठं संकट आलं असताही, राजांची ती शांत प्रवृत्ती पाहून बाजी चकित झाले होते. विजयाच्या वेळी बेभान होणारे बाजींनी अनेक पाहिले होते. पण कठीण समयीच्या येणाऱ्या संकटाचं अशा तऱ्हेनं स्वागत करणारे फार थोडे होते.

सिद्दी जौहरच्या छावणीची पाहणी करून राजांनी सदर महाल सोडला आणि ते राजवाड्याकडं जात असता, बाई सामोरी आली आणि तिनं राजांच्या पायांवर डोकं ठेवलं. राजे म्हणाले,

‘आऊ! सांग काय झालं?’

‘काय सांगू, राजं!’ ती पोक्त वयाची बाई म्हणाली, ‘माझी पोर, नातू वेढ्यात अडकली.’

‘राजांना सारं सांग, बाई.’ बाजी म्हणाले.

त्या बाईनं डोळे पुसले. ती सांगू लागली,

‘आमी गडावरच्या वाडीचं. मी, माझी सून आणि नातू येवढीच आमी मानसं. गावात सादवलं व्हतं. ज्यांचं कुनी न्हाई, त्यांनी गडावर यावं. सून म्हनली, तुमी पुढं जावा. मी मागनं येतो. धाड बसली मला! म्या गडावर आलू. पन माझी सून, माझा नातू गडाखाली ऱ्हायला, बगा.’

राजांनी विचारलं,

‘आणि तुझा मुलगा कुठं आहे?’

त्या बाईच्या डोळ्यांत अश्रू तरळले. हुंदका फुटला. डोळे टिपत ती म्हणाली,

‘राजा, तुला ठावं न्हाई? कोल्हापूरच्या लढाईत माझा पोरगा गमावला, त्याला बघायला बी मिळाला न्हाई. म्या सांगत व्हते, पन मला कुनाचा बी धीर न्हाई. तू जाऊ नगं! तर म्हनला– ‘राजाला टाकून परजा ऱ्हाईल काय?’

त्या बाईच्या बोलण्यानं राजांचं मन चिंतातूर झालं. काय करावं सुचत नव्हतं. ते म्हणाले,

‘चला, आऊ! वाड्याकडं जाऊ. बघू काय करायचं ते!’

राजे सर्वांच्यासह वाड्याकडं जात असता मागून हाक आली,

‘आज्जेss’

साऱ्यांची पावलं थांबली. एक सात-आठ वर्षांचं पोर धावत येत होतं. ती बाई धावली. तिनं त्या पोराला कवटाळलं. त्या पोरामागोमाग एक बाई आणि महादेव सोंगाडी प्रकटले. महादेवानं सांगितलं,

‘महाराज! सिद्दी उद्या दाखल व्हनार हाय. गावात ही पोर अडकली व्हती. तिला घेऊन आलो.’

राजांनी हातातलं कडं उतरलं. ते महादेवाच्या हातात घालत म्हणाले,

‘जगदंबेची कृपा! महादेव आज तू आमची लाज राखलीस! मोठ्या संकटातून आम्हांला पार केलंस’

राजे बाजींना म्हणाले,

‘बाजी, आमचे नजरबाज नुसत्या शत्रूवर नजर ठेवीत नाहीत. त्यांचं लक्ष आमच्या माणसांवरही असतं, हे केवढं भाग्य! बाजी! त्या बाईला आणि तिच्या सुनेला एक घरटं द्या. काळजी करू नका, म्हणून सांगा.’ जाता-जाता राजांनी महादेवला आज्ञा केली, ‘महादेव, वेढा बळकट होण्याआधी तू गड उतर. जमेल, तशा बातम्या देत जा. पण केव्हाही आततायीपणा करू नको आणि जीव धोक्यात घालू नको. समजलं?’

‘जी!’ महादेव म्हणाला.

राजे सर्वांच्यासह बोलत वाड्याकडं येत होते. त्या वेळी रस्ते साफ करीत असलेल्या माणसांच्याकडं त्यांचं लक्ष गेलं. राजे थांबले. ते चाललेली साफसफाई पाहत होते.

बाजींनी विचारलं,

‘राजे, का थांबलात?’

‘बाजी, गड नेहमी स्वच्छ ठेवावा, हे खरं! पण हा गोळा केलेला केरकचरा कुठं टाकतात?’

‘गडाखाली टाकीत असावेत.’ त्र्यंबक भास्कर म्हणाले.

‘असावेत!’ राजांच्या मुखावरचं हास्य विरलं, ‘त्र्यंबकजी! तुम्ही किल्लेदार. तुमच्याकडून हे उत्तर अपेक्षिलं नव्हतं. हा कचरा गडाखाली टाकला जात असेल, तर ते ताबडतोब बंद करा. ठिकठिकाणी तो गोळा करून जाळायला सांगा. त्याची जमलेली राख गडावरच्या घरट्यांच्या परड्यांत पडू दे. त्यावर पावसाळी भाजीपाला तयार होईल. ही आमची आज्ञा समजा.’

बाजी राजांच्या मागून चालत होते. पण विचारचक्र जोरानं फिरत होतं.

काय राजा आहे हा!

दाराशी येवढा प्रबळ शत्रू असता, हा गडावरच्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी, याचा विचार करतो!

भाजीपाला करायला सांगतो.

याला हे सुचतं कुठून?

राजे वाड्यात गेले, तरी बाजी सदरेवर त्याच विचारात उभे होते.

 

रात्री राजांची पंगत बसली होती. बाजी, त्र्यंबकजी, फुलाजी, महादेव वगैरे मंडळी पंगतीत सामील झाली होती.

आंबरसपुरीचा बेत केला होता.

मसालेभात होता.

पंगत उठली.

राजे सदरेवर आले.

बाजी राजांना म्हणाले,

‘आजच्या पंगतीचा बेत छान जमला.’

‘ते ठीक आहे.’ राजे म्हणाले, ‘पण यापुढं असल्या पंगती बंद करा. सिद्दीचा वेढा किती दिवस चालेल, याचा अंदाज नाही. यापुढं वेढा उठेपर्यंत आमचे मावळे जे खातात, तेच अन्न आम्ही घेऊ. नाचणी, नागलीच्या भाकरीवर जगायची सवय आम्हांला आहे. असल्या मेजवानीपेक्षा ते अन्न आम्हांला अधिक प्रिय वाटेल.’

 

 

*🚩 क्रमशः 🚩*