*⚔🌄पावनखिंड🌄⚔*
🔰 *भाग : ३५* 🔰
दोन प्रहरीच्या वेळी राजे सज्जाकोठीवरच्या तीन कमानी सदरेत बसले होते. बाजी, फुलाजी, त्र्यंबकजी ही मंडळी हजर होती. सिद्दी जौहरचा अंदाज आणि मोहरा काय असेल, यावर खलबत चाललं असताना ढगांचा आवाज कानांवर आला. उकाडा जाणवत होता. राजे बैठकीवरून उठले आणि तीन कमानीपाशी जाऊन उभे राहिले. पाठोपाठ बाजी, फुलाजी, आणि त्र्यंबकजी यांनी राजांचं अनुकरण केलं. कमानीतून दिसणारा मुलूख राजे न्याहाळत होते.
पूर्व क्षितिजावर ढगांच्या गर्जना आकाशात चढत होत्या. वाऱ्याचा लवलेशही नव्हता. सारं वातावरण उन्हाच्या तावानं गुदमरलं होतं. सर्वत्र निःस्तब्ध शांतता पसरली होती.
राजांची नजर कमानीतून दिसणाऱ्या मुलखावर स्थिरावली होती.
उजव्या बाजूला पसरलेल्या पावनगडावरून काळ्याभोर ढगांची सावली फिरत जात होती. सामोरा ज्योतिबाचा डोंगर दिसत होता आणि त्यानंतर दृष्टीत भरत होतं, ते वारणा खोरं! गडाच्या पायथ्यापासून क्षितिजापर्यंत विस्तारलेल्या मुलखात झाडी-झुडपांत लपलेली आंबवडं, बोरपाडळे, नेवापूर ही गावं दिसत होती.
वाऱ्याचा कुठं लवलेशही नव्हता. ज्या क्षितिजावर ढगांच्या गौळणी उठल्या होत्या, त्या क्षितिजावर त्या गौळणींना वेढणाऱ्या काळ्या ढगांचा कडकडाट आकाशात उंचावत होता.
बाजींच्या बोलण्यानं राजे भानावर आले. बाजी म्हणाले,
‘राजे! पाऊस येणार, असं वाटतं!’
‘येणार तर खरंच! पण तो कसा येणार, हे आम्ही पाहत आहो.’
राजांची नजर परत कमानीबाहेर वळली.
पाखरांचे थवे आसरा शोधण्यासाठी गडाच्या झाडीकडं चालले होते. अचानक पूर्वेच्या ढगांच्या पडद्यावर वीज चमकली. नगाऱ्यावर टिपरी झडावी, तसा आवाज आसमंतात घुमला. आणि एक नाजूक, गार वाऱ्याची झुळूक अंगावरून गेली.
फुलाजी म्हणाले,
‘राजे! पाऊस आला.’
राजांचे सेवक तीन कमानीवरचे पडदे सोडण्यासाठी धावत वर आले. राजांनी त्यांना थांबवलं. ते म्हणाले,
‘आम्ही आज हा वळीव पाहणार आहोत.’
‘पण, राजे, आपण भिजाल.’ बाजी म्हणाले.
‘भिजल्याखेरीज वळीव दिसेल कसा?’ राजांनी सांगितलं. आणि क्षणार्धात राजांनी विचारलं, ‘पाऊस येणार, असं दिसतं. आपल्या गडावरच्या तोफा…’
‘चिंता नसावी! साऱ्या बुरूजांच्या तोफांची तोंडं चिलखाटीनं बांधली आहेत. तोफांची मोहरीही झाकली आहेत.’ बाजींनी सांगितलं.
गार वाऱ्याचा झोत वाढला होता. सारं आकाश पाहता-पाहता कुंदावून गेलं होतं. एक वीज कडाडत धरित्रीवर उतरली. साऱ्यांचे डोळे दिपून गेले. आणि पूर्वेकडून पावसाचा पडदा पुढं सरकू लागला. लक्षदल पावलांचा आवाज यावा, तसा आवाज करीत पाऊस पुढं येत होता. विजा कडाडत होत्या. समोरचा मुलूख दृष्टीआड करीत पाऊस पुढं सरकत होता. हळू हळू सारी माळवदं त्या पावसाच्या पडद्याआड दिसेनाशी झाली. टपोऱ्या थेंबांच्या तिरकस सरी सज्जा कोठीच्या तीन कमानीतून प्रवेश करू लागल्या. राजे त्या पावसाच्या सरींत भिजत होते. पण त्यांना पावसांच भान नव्हतं. मंत्रमुग्ध होऊन ते पाहत होते.
बाजी धीर करून म्हणाले,
‘राजे! आपण भिजाल….’
राजे हसले. म्हणाले,
‘त्यासाठी तर आम्ही इथं उभे आहोत.’
तीन कमानीतून पावसाच्या सरी येत होत्या. सेवकांनी सदरेची बिछायत केव्हाच हलवली होती.
पाऊस कोसळत होता. त्या पावसात राजेच नव्हे, तर सारेच भिजत होते. गार वारे वाहत होते.
हळू हळू पाऊस कमी झाला. पाऊस थांबला, तेव्हा पश्चिमेकडून उमटलेल्या पिवळ्या किरणांत सारी धरित्री नहात होती. पूर्वेला काळ्या ढगांवर भलंमोठं इंद्रधनुष्य उमटलं होतं.
नखशिखांत भिजलेल्या राजांनी आपल्या मानेवर रुळणाऱ्या केसांवरून हात फिरवला आणि ते बाजींना म्हणाले,
‘केवढं विशाल रूप हे! बाजी, संकटं येतात ना, ती या वळीव पावसासारखीच असतात. काळे भिन्न ढग उठतात. वारा सुद्धा त्यांच्या भीतीनं दबून जातो. विजा लखलखू लागतात. कडाडतात. सारा आसमंत आपल्या आवाजानं भारून टाकतात. टपोऱ्या जलधारांच्या माऱ्याखाली सारी धरित्री भिजून जाते… आणि पाऊस थांबतो, तेव्हा तृप्त झालेला सुगंध सर्वत्र दरवळतो. पिवळ्या किरणांत हळदीच्या नवरीसारखी धरित्री नटून जाते. आकाशाकडं पाहावं, तर सप्तरंगांची, इंद्रधनुष्याची कमान भाग्योदयाची वाट दाखवीत असते. नाही, बाजी! _संकट हे वरदान आहे. ती परीक्षा असते. जी माणसं त्या संकटांना सामोरी जातात. त्यांचं यश सदैव वाढत जातं.’_
राजे बोलत होते. पण बाजींचं लक्ष भिजलेल्या राजांच्याकडं लागलं होतं. ते म्हणाले,
‘राजे! भिजल्या अंगानं फार काळ उभे राहू नका.’
‘काय म्हणालात?’ राजांनी विचारलं.
बाजी राजांच्या दृष्टीला नजर खिळवत म्हणाले,
‘राजे! भिजल्या अंगानं फार काळ राहू नका. वाड्याकडं चलावं.’
राजांची दृष्टी पूर्वेच्या दृश्याकडं लागली होती. त्या क्षितिजावर भलं मोठं सप्तरंगी इंद्रधनुष्य उभं ठाकलं होतं. त्याकडं बोट दाखवीत राजे म्हणाले,
‘पाहा, बाजी! केवढं सुरेख दृश्य! क्षितिजाला निर्माण होऊन आकाशाला भिडलेलं हे सप्तरंगी शिवधनुष्य!’
‘क्षमा असावी, राजे! इंद्रधनुष्य प्रकटत असता, ते पूर्ण होत असता राजांनी पाहावं. पण ते आकाशाचं वैभव फिकं होत असता पाहू नये. आपण वाड्याकडं चलावं!’
राजे हसले आणि बाजींना म्हणाले,
‘जशी आज्ञा!’
राजांच्या बोलण्यानं साऱ्यांच्या मुखांवर स्मित उमटलं. राजे सर्वांसह सज्जा कोठीतून वाड्याकडं चालू लागले.
ओलीचींब झालेली मंडळी राजांच्या मागून चालली होती.
वळवाच्या पावसानं जांभळाच्या, आंब्याच्या झाडांखाली जांभळं, आंब्यांचा सडा पडला होता. भिजलेली माकडं आपलं अंग झाडत जांभळांची चव घेत झाडांवरून चीत्कारत फिरत होती.
*🚩 क्रमशः 🚩*