पावनखिंड 30

*⚔🌄पावनखिंड🌄⚔*

 

🔰 *भाग : ३०* 🔰

 

 

बाजी, फुलाजी आपल्या निवासाकडं आले. त्या वेळी यशावंता येताना दिसला.

‘काय, यशवंतराव!’ बाजींनी विचारल

‘त्या सय्यदखानाला तोफेच्या तोंडी दिला.’ यशवंत म्हणाला.

‘आम्ही तोफेचा आवाज ऐकला.’

बाजी, फुलाजी घरात गेले. आपलं पागोटं उतरत फुलाजी म्हणाले,

‘तू काही म्हण, बाजी! राजांची हिकमत दांडगी.’

‘भाऊ!’ बाजी गुदमरलेल्या आवाजात म्हणाले, ‘राजांचं हे रूप बघितलं की, जीव ओवाळून टाकावा, असं वाटतं! केवढं लहान वय, पण समज केवढी मोठी!’

‘ते साधं पोर नाही, बाजी!’ फुलाजी म्हणाले, ‘तो अवतारी आहे. साक्षात भवानीमाता त्याला प्रसन्न आहे, वयाची सोळा ओलांडली नाही, त्या ज्ञानदेवानं ज्ञानेश्वरी लिहिलीच ना!’

‘खरं आहे!’ बाजी म्हणाले, ‘राजांची जाण फार मोठी! कणवही तेवढीच. नाहीतर अफजलखानाची लढाई राजांनी जिंकली नसती. अठरा दिवसांत प्रतापगडपासून पन्हाळ्यापर्यंतचे एकवीस गड जिंकणं एवढं सोपं नव्हतं. काळ, वेळ आणि स्थळ यांचं भान बाळगणारा या राजाइतका कोणी नसेल!’

‘नसायला काय झालं?’ फुलाजी म्हणाले, ‘नरसिंहाचा अवतार दुसरा कसला होता? नारायण असूनही, हिरण्यकश्यपूच्या वधासाठी ना पशू, ना मानव, असं रूप त्याला घ्यावं लागलं. त्याला प्रकटावं लागलं, ना दिवस ना रात्र अशा सांजवेळी. ना घरात, ना बाहेर, अशा उंबरठ्यावर घेऊन त्याला हिरण्यकश्यपूचा वध करावा लागला. कैक वेळा वाटतं, आपले राजे नरसिंहाचा अवतार आहेत.’

बाजी ते बोलणं ऐकत होते. राजांच्या रूपात हरवले होते.

 

राजांच्या करमणुकीसाठी गंगा-जमुनाच्या सामोरा बैलांची टक्कर ठेवली होती. गंगा, जमुना या दोन भव्य कोठारघरांच्या समोरचं मैदान माणसांनी तुडुंब भरलं होतं. गडाचा बैल भैरू आणि गडाखालच्या वाडीच्या पाटलांचा बैल लक्ष्मण यांची झुंज ठरवली होती. बाजींनी मोहरांच बक्षीस जाहीर केलं होतं.

दोनप्रहर टळत असता राजे मैदानावर आले. तुताऱ्या झडल्या. राजे बाजींना म्हणाले,

‘बाजी, असले शौक आम्हांला नाहीत. कुणाची तरी झुंज लावावी आणि करमणुकीसाठी आम्ही ती पाहावी, हा आमचा स्वभाव नाही. मग ती माणसं असोत वा जनावरं असोत. तुमच्या आग्रहास्तव आम्ही इथं आलो.’

‘क्षमा असावी, राजे!’ बाजी म्हणाले, ‘हा शौक आम्हांलाही नाही. पण थकलेला फौजफाटा आहे. त्यांचं मन रिझवायला हवं, म्हणून…’

‘ठीक आहे. टकरा सुरू करा.’

शिंगाची इशारत झाली. लहान-मोठ्या बैलांच्या टकरी सुरू झाल्या; आणि शेवटी पैजेची जोडी अवतरली.

गडाचा बैल भैरू माशा रंगाचा होता. वाडीच्या पाटलाचा बैल कोवळ्या शिंगांचा, खिलारी जातीचा, पांढरा शुभ्र होता. दोन्ही बैल मैदानात सोडले होते. बैलांच्या नाकपुड्यांतून वाफा निघत होत्या. उभ्या जागी दोन्ही बैल माती कोरत होते. दोघांच्या शेपट्या उभारल्या होत्या. दोन्ही बैलांचे डोळे रक्ताळले होते. कोणीतरी ओरडलं,

‘भलेss’

___आणि दोन कातळ एकमेकांवर कोसळावेत, तशी दोन बैलांची टक्कर सुरू झाली. झुंज रंगणार, अशी साऱ्यांची आशा होती. पण दुसऱ्या क्षणी गडाचा बैल भैरूनं शेपूट टाकली आणि दिसेल त्या वाटेनं तो पळत सुटला. ती झुंज पाहून राजांच्या चेहऱ्यावर हासू होतं. पहिल्या धडकीतच मैदान संपलं, याचं दुःख प्रेक्षकांना होतं.

बाजी म्हणाले,

‘राजे! झुंज फार लौकर संपली.’

राजांनी विचारलं,

‘गडाचा भैरू कधी हरला होता का?’

‘गेल्या वर्सी अशीच झुंज लागली होती.’ शेजारी उभा असलेला रामजी मेटकर म्हणाला, ‘तवा मायरानीचा बैल आला व्हता! भैरूनं लई केलं. पन त्यो ताकदीनं भारी….’

‘समजलं!’ राजे म्हणाले, ‘बाजी, ज्याची झुंजेत छाती फुटते, तो परत कधी उभा राहील? बाजी मैदान सुरेख उभा केलंत. थकल्या जीवांना दिलासा दिलात. छान झालं.’

राजे आपल्या वाड्याकडं गेले. बाजींनी जिंकलेल्या बैलकऱ्याला बक्षीस दिलं. दंगल बघितलेल्या माणसांची पांगापांग झाली. बाजी परतत असता त्यांच्या मनात एकच वाक्य रेंगाळत होतं—

_’बाजी! ज्याची झुंजेत छाती फुटते, तो परत कधी उभा राहील?’_

 

राजांच्या पन्हाळगडावरील वास्तव्यानं सारी शिबंदी आनंदात होती. राजांनी गडाचे तिनशे बुरूज आणि तोफा निरखल्या. सोमेश्वराच्या देवळी सोमवारी जाऊन अभिषेक केला आणि एके दिवशी गडावर बातमी दौडत आली—

विजापूरहून अफजलखानाचा मुलगा फाजलखान आणि रुस्तुमजमा नव्या फौजेसह राजांच्यावर चाल करून येत आहेत.

साऱ्यांच्या चेहऱ्यांवर चिंता प्रकटली. पण राजांच्या चेहऱ्यावरचं स्मित ढळलं नव्हतं. साऱ्यांच्यावरून नजर फिरवून राजांनी विचारलं,

‘का? चिंता वाटते?’

‘चिंता नाही. पण एवढया लवकर ते येतील, असं वाटलं नव्हत.’ नेताजी म्हणाले.

‘लवकर? आमच्या मते त्यांना उशीरच झाला आहे! आपल्या वडिलांचा सूड उगवण्यासाठी फाजलखान येतो आहे आणि त्याच्या संगती रुस्तुमजमा पण आहे.’

बाजी हसले. म्हणाले,

‘राजे! फाजलखान येताहेत. बिचारे! महाबळेश्वरच्या डोंगरातून पळून जात असताना अंगात रुतलेले करवंदीचे काटे अजून निघाले नसतील.’

‘सूडानं पेटलेल्या माणसाला जखमांचं भान नसतं. अशा शत्रूचं फारसं भयही बाळगण्याचं कारण नसतं.’

‘कारण?’ फुलाजींनी विचारलं.

‘कारण एकच! _सूडानं पेटलेल्या माणसाच्या ठायी नुसता संताप उतरलेला असतो. विवेक हरवलेला असतो. नागानं फणा काढला की, त्याची गती थांबते.’_

‘पण हा रुस्तुमजमा कोण?’ हिरोजी इंगळ्यांनी विचारलं.

‘आदिलशाही सुभेदार. रायबाग, कोल्हापूर, राजापूर, कारवार हा त्याचा मुलूख, त्याची फौज याच भागात आहे. पण त्याचं आमचं वैर नाही. त्याचा-आमचा स्नेह फार जुना आहे.’

पन्हाळगडचे नवे किल्लेदार त्र्यंबक भास्कर यांनी विश्वासानं सांगितलं,

‘राजे! गडाची भीती नाही. गडकोट भक्कम आहे. गड भांडवायचा ठरवला, तर…’

‘नाही, त्र्यंबकजी! या वेळी आम्ही फाजलखानांची भेट मैदानावर घेऊ.’

‘मैदान?’ गोदाजी जगताप नकळत बोलून गेले.

गोदाजींच्यावर नजर रोखत राजांनी विचारलं,

‘का? भीती वाटते?’

गोदाजी आवेशानं एक पाऊल पुढं झाले.

‘राजे, भीती नाही. आनंद झाला. मैदानावर दोन हात करायची खुमखुमी ऱ्हायलेय.’

राजे कधी नाही ते मनमोकळेपणाने हसले.

‘ती हौस भागणार, असं दिसतं. हे संकट आम्हांला फारसं मोठ नाही.’

गोदाजी जगताप, वाघोजी तुपे, हिरोजी इंगळे, भीमाजी वाघ, सिदोजी पवार, महाडिक, जाधव, पांढरे, खराटे, सिद्दी हिलाल, नेताजी पालकर या मंडळींना फार काळ गोंधळात टाकावं, असं राजांना वाटलं नाही—

‘आता फाजलखान येत आहे.’ राजे सांगत होते, ‘विजापूरकरांच्या जवळ फारसा फौजफाटा नाही. त्यांची बरीचशी फौज आज आदिलशाहीत घुसलेल्या आमच्या फौजेबरोबर लढा देत आहे. रुस्तुमजमाची फौज फाजलला मदत करील, असा आमचा अंदाज आहे. आम्ही कुठल्यातरी गडाचा आश्रय घेऊ, असा फाजलचा अंदाज असणार. तो समज मोडला, की फाजल निम्मा मोडेल.’ राजे शांतपणे म्हणाले, ‘नेताजी, तुम्ही आमच्या संगती रहा. आपली आदिलशाहीत जी फौज घुसली आहे, त्यांना आमच्यावर चालून येणाऱ्या फाजलखानला सतावून सोडायला सांगा.’

‘पण त्या फाजलखानला गाठायचं कुठं?’

‘कोल्हापूर. ती करवीरनिवासिनी जगदंबा आम्हांला यश देईल. तिचा आशीर्वाद आम्हांला लाभला आहे.’

राजे गडाखाली आपला फौजफाटा गोळा करीत होते. बाजीप्रभू आणि गडकरी त्र्यंबक भास्कर यांनी जातीनं पन्हाळ्यावर लक्ष ठेवलं होतं. गडाचा गंजीखाना त्यांनी भरून घेतला. अंबरखाने त्यांनी भरून घेतले. गडकोटाच्या, साऱ्या बुरूजांच्या तोफा सज्ज ठेवल्या. पहारे जारी केले.

रुस्तुमजमा आणि फाजलखान यांच्या वाटचालीची बातमी राजांना कळत होती. रुस्तुमजमानं जशी मिरज ओलांडली, तसे राजे पन्हाळगडावरून उतरायचा बेत करीत होते. राजांचे खासे सेनापती नेताजी पालकर, हिरोजी इंगळे, भीमाजी वाघ, सिदोजी पवार, गोदाजी जगताप, व महाडिक हे आपल्या फौज-फाट्यासह केव्हाच करवीरी दाखल झाले होते. नुकतेच सामील झालेले जाधव, पांढरे, खराटे व सिद्दी हिलाल राजांच्या समवेत गडावर होते.

राजे साऱ्यांना त्यांच्या कामगिऱ्या समजावून देत होते. पण बाजी, फुलाजींना त्यांनी काही आज्ञा केली नव्हती. बाजींना राहवलं नाही. त्यांनी विचारलं,

‘राजे! आमची कामगिरी?’

‘फार मोठी!’ राजांनी सांगितलं, ‘तुम्ही गड राखा.’

‘बस्स?’ बाजी नाराजीनं म्हणाले.

‘बाजी! बोलून चालून लढाई! कदाचित माघारही घ्यावी लागेल. कोणी सांगाव! तसं घडलंच, तर पन्हाळ्याखेरीज दुसरा आश्रय कोणता? ते आश्रयस्थान तुम्ही जपायचं. कुणीतरी तर राखायलाच हवं. तरच मुलूखगिरी साधते ना!’

‘जी!’ बाजींनी समाधानानं मान डोलावली.

‘बाजी! आम्ही तुमच्या यशवंतरावांना संगती नेणार. चालेल ना?’

सदरेच्या खांबाशी उभ्या असलेल्या यशवंतच्या अंगावर मूठभर मांस चढलं. साऱ्यांच्या नजरा आपल्यावर खिळल्या आहेत, हे ध्यानी येताच त्यानं मान खाली केली आणि नकळत राजांचं वास्तव्य विसरून सदरेवर एकच हसणं उसळलं.

हे हसणं विरत असता आबाजी प्रभू आणि बहिर्जी सदरेवर आले. त्यांनी राजांना मुजरा केला. बाजींच्याकडं पाहत राजे म्हणाले,

‘हे आमचे प्रभू वेताळ! येतात ते संकटाची वार्ता घेऊन! पण यांच्या आशीर्वादानं आमची संकटं आम्हांला पेलता येतात.’

सारे हसले. राजांचं लक्ष दोघांवर खिळलं होतं. त्यांनी विचारलं,

‘बोला! काय खबर?’

‘राजे!’ बहिर्जी म्हणाले, ‘फाजलखान आणि रुस्तुमेजमा यांनी मिरज ओलांडली आहे. पन्हाळ्याच्या दिशेनं ते येत आहेत.’

‘छान!’ राजे म्हणाले, ‘आम्ही जरूर त्यांच्या स्वागताला जाऊ. आम्ही उद्या कोल्हापूरला डेरेदाखल होत आहो.’

सकाळच्या वेळी नगाऱ्याचा आवाज गडावर घुमत असता राजांचं अश्वदळ कोल्हापूरच्या वाटेनं दौडू लागले.

लढाईच्या वार्ता दररोज गडावर येत होत्या.

आणि एके दिवशी भर दुपारी सुभानराव दौडत गडावर आले. गडाच्या चार दरवाज्याशी ते पाय-उतार झाले. दिंडी दरवाज्यातून आत येताच ते म्हणाले,

‘नौबत वाजवायला सांगा. राजांनी जिंकीलं.’

चार दरवाज्याचे रखवालदार सुभानरावांभोवती जमा झाले होते. त्यातला एकजण धावत नगारखान्यावर गेला आणि नौबतीचा आवाज गडावर घुमू लागला.

बाजी, फुलाजी भोजन आटपून नुकतेच विसावले होते. त्याच वेळी त्यांच्या कानांवर नौबतीचा आवाज आला. लगबगीनं आपल्या पगड्या घेऊन ते घराबाहेर पडले. दोघांच्याही मनांत राजांचे शब्द घुमत होते…

‘बाजी! बोलून चालून लढाई! कदाचित माघारही घ्यावी लागेल… तसं घडलं, तर पन्हाळ्याखेरीज आश्रय कोणता…’

बाजी, फुलाजी धावत गडाच्या दरवाज्याकडं निघाले होते. समोरून येणाऱ्या सुभानराव जाधवांवर त्यांचं लक्ष गेलं. सुभानराव जवळ येताच अधीरतेनं बाजींनी विचारलं,

‘काय झालं?’

‘फत्ते!’ सुभानराव म्हणाले, ‘म्हणून नौबत वाजवायला सांगितली.’

‘चांगलं केलत!’ म्हणत आनंदभरित झालेल्या बाजींनी जगदंबेच्या मंदिराकडं पाहून हात जोडले.

सुभानराव जाधवांना घेऊन सारे सदरेकडं आले. सुभानराव सांगत होते,

‘जशी फत्ते झाली, तसे राजे म्हणाले, सुभाना, टाकोटाक पन्हाळा गाठ आनि बाजींना सांग आमी जिंकीलं, म्हनून. ते काळजीत असतील.’

‘असं राजे म्हणाले?’ बाजींच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. ते फुलाजींकडं वळून बोलले, ‘दादा, याला म्हणतात राजा! यशाच्या वेळी मागची आठवण सरत नाही. सांगा, सुभानराव, कशी लढाई झाली?’

‘खेळण्यातली बरी! काय नव्हचं ते! कोल्हापूरच्या म्होरं आमची गाठ पडली, बगा. राजांनी नेताजींस्नी सांगितलं, तुम्ही फाजलखान बघा. आम्ही रुस्तुम बघतो. ह्यो धुरळा उडाला! वाट सुदरंना फाजलखानाला, सारं पळत सुटलं. पयल्या धडकीत लढाई सोपली. राजांनी पाठ सोडली न्हाई. रानात हाका घालतो, तवा जनावरं पळत्यात, का न्हाई, तशी दाणादाण उडाली. फाजलखान आनि रुस्तुम जिवानीशी सुटलं, हे त्यांचं नशीब! राजांना बारा हत्ती आनि दोन हजार घोडी मिळाली.’

साऱ्यांच्या चेहऱ्यांवर आनंद ओसंडत होता.

बाजींनी गडावर साखर वाटण्याची आज्ञा दिली आणि ते म्हणाले,

‘राजांचा अंदाज कधी चुकायचा नाही. ते म्हणाले होते, एकदा ज्याची झुंजेत छाती फुटते, तो परत उभा राहत नाही. सुभानराव! राजे केव्हा येणार?’

‘ते सांगायचं इसरलोच की! राजे उद्या सकाळी गडावर दाखल होतील.’

राजांच्या स्वागताची तयारी करण्यात गड गुंतून गेला.

 

 

*🚩 क्रमशः 🚩*