*⚔🌄पावनखिंड🌄⚔*
🔰 *भाग : २८* 🔰
सय्यदखानाची सारी मिजास उतरली होती.
दुसरे दिवशी त्यानं मानाजी नाईकांना बोलावलं. आपली उसनी ऐट दाखावत सय्यदखानानं सांगितलं,
‘मानाजी, काल शिवाजीचा हेजीब आला होता. त्यानं तहासाठी अर्ज केला आहे.’
‘आनंदाची गोष्ट आहे, खानसाहेब! गडाची शिबंदी अपुरी आहे. अशा वेळी लढा देणं….’
‘म्हणूनच आम्ही तहाला तयार झालो.’ सय्यदखान म्हणाला, ‘मानाजी, तुम्ही तहासाठी जा.’
‘त्यापेक्षा आपणच गेलात, तर…’ मानाजी चाचरले.
सय्यदखानाचे डोळे फिरले. बसल्या जागी त्याचं अंग शहारलं.
‘कौन! हम? कभी नहीं!’ खान म्हणाला, ‘तो खतरनाक शिवाजी, अफजलखानांना असंच बोलावलं होतं. पण दगा करून त्यानं अफजलखानाचं पोट फाडलं. नहीं! हम नहीं जायेंगे! तुम जाओ! जो सुलह करनी है, करो!’
मानाजींनी मान तुकवली, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या सहकाऱ्यांसह मानाजी गड उतरले.
गडाखाली बाजीप्रभू वाट बघत होते. आबाजी प्रभूंच्या संगती लोक उतरत असल्याची खबर बाजींना मिळाली होती.
गडाच्या पायथ्याशी एक पाल उभारली होती. त्या पालीत बाजी, फुलाजी बसले होते. आबाजी प्रभूच्या मागून चालणारा मानाजी नाईक आजूबाजूला पाहत मराठ्यांची ताकद आजमावत जात होता.
बाजींनी मानाजी नाईकांचं स्वागत केले. बाजी म्हणाले,
‘मानाजीराव, तुमचा गड नामी आहे.’
‘असा बुलंद गड या भागात दुसरा गावायचा न्हाई.’
‘अगदी खरं! एवढया सुंदर गडाला खिंडारं पडावीत, असं वाटत नाही.
‘काय म्हणालात?’ मानाजींनी टाळा वासला.
‘काही नाही! आम्ही म्हणालो, असल्या सुंदर गडाची नासधूस होऊ नये.’ बाजी शांतपणे म्हणाले.
‘आम्ही तहासाठी आलोय्.’ मानाजी म्हणाले, ‘तुमच्या अटी पटल्या, तर होय म्हनू.’
‘अट! साधी आहे!’ बाजी म्हणाले, ‘बिनशर्त शरणागती.’
‘याला काय सलूख म्हणतात?’ मानाजींनी विचारलं.
‘मुळीच नाही.’ बाजी म्हणाले, ‘आम्ही चारी वाटा रोखल्या आहेत. आणि फक्त येवढ्या माणसांनी आम्ही गड लढवत नाही. इशारत देताच शिवाजीराजे आपल्या फौजफाट्यासह इथं येतील. दहा हजारांचं पायदळ आहे.’
मानाजी नाईकाचे डोळे फिरले होते. उसनं अवसान आणून तो म्हणाला,
‘आणि आमी हे मानलं नाही, तर!’
‘तर….’ बाजी हसले. आपल्या मिशीवरून पालथी मूठ फिरवीत म्हणाले, ‘आमचं कुलदैवत विंझाई. त्या देवीची आण घेऊन सांगतो, तुमच्या गडावर एक पोरही जिवंत राहणार नाही. आबाजींच्याकडून आम्ही हा निरोप सांगितला होता.’
मानाजीनं आवंढा गिळला. तो म्हणाला,
‘जरा बाजूला येता?’
बाजी, मानाजी पालीबाहेर आले. मानाजी म्हणाले,
‘गडावर आदिलशाहीचे सरदार सय्यदखान हाईत. ते आनि तेंचा कबिला तुमी गडाबाहीर सोडला, तर गड ताब्यात देतो. कसं?’
बाजींच्या मनात त्या उद्गारांनी किळस निर्माण झाली.
हे आदिलशाहीचे राखणदार!
त्यांची ही निष्ठा!
बाजींनी सांगितलं,
‘मानाजीराव, तुम्ही हे सांगण्याची गरज नव्हती. जे शरणागत असतात, त्यांची कधी कत्तल आम्ही करीत नाही. आम्ही त्यांना मानानं जाऊ देतो.’
मानाजीच्या मनावरचं ओझं उतरलं होतं. तहासाठी गडाखाली जाताना सय्यदखानानं हीच अट सांगितली होती.
निरोपाचा विडा देऊन मानाजी नाईक गडावर गेले. त्यांनी सारी हकीकत सय्यदखानाला सांगितली; आणि वाड्यात एकच धावपळ सुरू झाली. काबाडीचे बैल, उंट, वाड्यासमोर हजर झाले. सय्यदखानाच्या जनान्यासाठी अनेक मेणे उभे राहिले. सारा सरंजाम गोळा करून सय्यदखान गडाखाली उतरला.
त्याला निरोप देऊन बाजी गडावर आले.
चार दरवाज्यावर भगवा ध्वज फडकू लागला.
राजांना बातमी सांगण्यासाठी कोल्हापूरच्या रोखानं स्वार रवाना झाले.
पन्हाळा स्वराज्यात सामील झाला.
*🚩 क्रमशः 🚩*